लॉकडाऊन: सतरावा दिवस
नमस्कार मिपाकरहो! लॉकडाऊनच्या लेखमालेतील सतरावा पुष्प अर्पण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. याआधी सिद्धहस्त लेखकांनी आपापले प्रकटन सादर केले आहे आणि अर्थातच...
कल और आयेंगे नगमो की
खिलती कलियाँ चुननेवाले,
मुझसे बेहतर कहनेवाले...या ओळींप्रमाणे आणखीही मान्यवर येतील परंतु आज, आत्ता तर हा क्षण मला अनुभवण्यास मिळत आहे त्याचा मला अतीव आनंद होत आहे.
लॉकडाऊनमध्ये मानवी स्वभावाचे विचित्र कंगोरे आपणांस ठळक अनुभवण्यास मिळत आहेत. म्हणजे तसे ते नेहमीच आपल्या अवतीभवती दिसत असतातच पण त्यांचा ठळकपणा आजच्या वैश्विक आपत्तीमुळे चटकन दिसून येतो. एरवी दिसला तरी, मला काय त्याचे? यामुळे त्यावर विचार करायला कुणाला वेळ नसतो. आता सध्या लोकांमध्ये पुढे काय? नोकरी करणार्यांना, लॉकडाऊननंतरचे वाढलेले टार्गेट्स दिसत आहेत. व्यावसायिकांना येणे आणि देणे यांचा मेळ बसवण्यावर विचार करण्यात वेळ खर्च करावा लागतोय. विद्यार्थ्यांना राहिलेले पेपर, परीक्षा, त्यांचा अभ्यास याची चिंता आहे. पण... पण... यातलं कोणी जरा थांबून विचार करेल का की आत्ता या क्षणी काय?
गेले ते निसटले,
पुढचे पुढेच राहिले
आत्ताच्या या क्षणी,
मी जीवनासी पाहिले.. मी तरी स्वतः या ओळींनुसार कायमच जगत आलोय आणि कायम तसाच राहण्याचा प्रयत्न करीन. वाचनाची आवड आणि एक यःकश्चित कवी असल्यामुळे काव्याचा माझ्या जगण्यावर खूप प्रभाव आहे. अवतीभवती असणार्या विसंगतीचा मला त्रास होतो पण त्याचाच मला फायदाही असा होतो की त्या विसंगतीला वळसा घालून मला पुढे जाण्यास काव्यामधून प्रेरणा मिळत जाते आणि तसा प्रयत्न करताना एक आत्मिक समाधानही मिळत राहते. असो, उगीचच आध्यात्मिक वगैरे व्हायला लागलंय बहुतेक. तर, मानवी स्वभावातली त्रुटी दर्शवणारे, जीवन जगतानाची होणारी ओढाताण यावर भाष्य करणारे, कटू परंतु सत्य साध्या आणि थेट शब्दांत पोहोचवणारे आणि चालत राहण्यासाठी प्रेरणा देणारे, खंबीरपणे उभे राहण्यासाठी उर्जा देणारे अशा विविध विषयांवरच्या काव्यरचनांची मिसळप्लेट असा आजचा माझा हा लेख असणार आहे आणि याद्वारे मी मला प्रभावित करणार्या काही काव्यांना उजळणी देणार आहे.
प्रथम मला मनुष्य स्वभावाच्या अंधानुकरण करण्याच्या स्वभावावर व्यंग करणार्या ओळी आठवतात. हिंदीतील प्रसिध्द कवी हरिशंकर परसाई यांच्या अमर लेखणीतून त्या आलेल्या आहेत. कुठलीच कविता संपूर्णपणे देत नाही कारण लेख लांबण्याची शक्यता आहे. आपण सर्व नेटकरी आहात, नेटाने नेटवर सर्च करालच. तर, हरिशंकर परसाई म्हणतात:
जब तान छिड़ी, मैं बोल उठा
जब थाप पड़ी, पग डोल उठा
औरों के स्वर में स्वर भर कर
अब तक गाया तो क्या गाया?
सब लुटा विश्व को रंक हुआ
रीता तब मेरा अंक हुआ
दाता से फिर याचक बनकर
कण-कण पाया तो क्या पाया?
जो वर्तमान ने उगल दिया
उसको भविष्य ने निगल लिया
है ज्ञान, सत्य ही श्रेष्ठ किंतु
जूठन खाया तो क्या खाया?
माझ्या मते, स्वतःला गुणी, ज्ञानी समजणार्या माणसाला लावलेली चपराकच आहे ही!
आणखी एक म्हणजे, आजच्या वाढत्या महागाईच्या काळात म्हणा किंवा स्वतःहून लादून घेतलेल्या धकाधकीच्या, धावपळीच्या, ताणतणावाच्या जीवनाला कंटाळून जेव्हा एक मुलगा आपल्या वडिलांना मला जन्म का घातला असा प्रश्न करतो. मागे बातम्यांमध्ये तर एकाने आईवडिलांवर कोर्टात केसही ठोकल्याचे पाहिले असेलच सर्वांनी. असो, तर त्या परिस्थितीला त्रासलेल्या मुलाला वडील एक सर्वकालीन सत्य समजावून सांगत असतानाच त्यालाच अशक्य असे आव्हान देतात. हरिवंशराय बच्चन यांची ही अफलातून रचना आहे जी प्रत्येकाने वाचली तर परिस्थितीला सामोरे जाण्याची नवी उर्मी मिळू शकते.
ज़िन्दगी और ज़माने की
कशमकश पहले भी थी,
आज भी है, शायद ज्यादा…
कल भी होगी, शायद और ज्यादा…
तुम ही नई लीक रखना,
अपने बेटों से पूछकर
उन्हें पैदा करना.
आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंतच सर्वकाही आहे, सर्वकाही म्हणजे स - र्व - का - ही, तरी पण थोडक्यात सांगतो बघा की म्हणजे त्यात सगळंच आलं, जसं की सकाळी उठून दात घासण्यापासून ते बड्डे सेलिब्रेट करताना नाचणे, फिरायला जाणे, नवनवीन पदार्थ चाखणे, हादडणे, आजारी पडणे - दवाखाना, शिव्या खाणे, देणे, कुणावर तरी प्रेम करणे, आपली मुले, राजकारण, चंद्रयान, कुंभमेळा, पुस्तके, टीव्ही, गाडी धुणे, सर्व्हिसिंगला टाकणे, प्रमोशन आणि पगारवाढीची वाट, बँकाचे ईएमआय, शेअर मार्केट, अंबानी, टाटा, मोदी-राहुलबाबा-ट्रम्प-पुतिन-किम जोंग, माऊंट एव्हरेस्ट, ट्राएथलॉन, ऑलिम्पिक, क्रिकेट, फुटबॉल, सिनेमा, कोपर्यावरचा न्हावी, दूधवाला, पेपरवाला, देव, अल्ला, जीझस, वाहेगुरू इत्यादी इत्यादी.. थोडक्यात स - र्व - का - ही! फिरोज खान या कवीचे यावर साध्या शब्दांत सांगणे आहे की,
मेरे मरते ही मर जाएगा
ये शहर
ये वतन
ये दुनिया मर जाएगी मेरे मरते ही
स्मृतियाँ मर जाएँगी
मर जाएँगी मेरी प्रेमिकाएँ
मेरी माँ मर जाएगी
जिसके मरने का सताता रहा है डर
वो पिता मर जाएगा
मेरे मरते ही
वे सब मर जाएँगे
जिनके जीने की दुआएँ की थीं
मैं एक खंडहर हूँ
या कि हूँ एक ईश्वर
ढह जाऊँगा एक रोज मैं
मर जाऊँगा
मेरे मरते मर जाएगा
ईश्वर भी!
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चालत राहणे महत्वाचे असते. पण, बर्याचदा असे प्रसंग येतात की का चालावे? कशासाठी करायचा सारा आटापिटा किंवा तोचतोचपणामुळे मनाला येणारी मरगळ काही काळ का होईना थांबण्यास भाग पाडते. अशी मरगळ माझ्यासाठी ही कविता अगदी सहजपणे झटकून टाकते. रॉबर्ट फ्रॉस्ट या कविची ही सुंदर, चित्रदर्शी रचना आहे.
The woods are lovely, dark, and deep,
But I have promises to keep,
And miles to go before I sleep,
And miles to go before I sleep.
ही कविता अत्यंत प्रेरणादायी आहे, नक्की शोधून वाचून पहा.
लेख आधिक न लांबवता मला शेवटची कविता आपणांसमोर ठेवावी वाटते ती कविवर्य मंगेश पाडगांवकरांची आहे. ह्या कवितेने मला नेहमीच सर्व संकटांशी सामना करण्याचे धैर्य दिले आहे. प्रतिकूल परिस्थितीला शरण न जाता त्या परिस्थितीबरोबर झगडण्याची स्फूर्ती दिली आहे.
जरी तुझिया सामर्थ्याने
ढळतील दिशाही दाही
मी फूल तृणातील इवले
उमलणार तरीही नाही
आजच्या या कोरोनाच्या विषाणूलाही आपण, तुझ्या सामर्थ्याने दहा दिशा ढळू देत पण मी तृणातले इवले पाते तुला विरूद्ध जाण्यास तयार आहे असे ठणकावून सांगूयात. अर्थात, घरी बसूनच! घरी रहा, स्वस्थ रहा, काळजी घ्या.
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Tu Hi Hai Aashiqui... :- Dishkiyaoonगेले ते निसटले, पुढचे पुढेच राहिले आत्ताच्या या क्षणी, मी जीवनासी पाहिले..सुंदर..!!