लॉकडाऊन: नववा दिवस
शिक्षण संपून नोकरीला लागल्यापासून एक चुकार विचार नेहमी मनात यायचा, ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस या चक्रातून आपली नोकरी करण्याचं वय संपल्यानंतरच सुटका होईल का? अगदी एखादा आठवडा का होईना, अगदी निवांत घरीच राहता येईल का? कुठे जाणं नाही, गर्दी-रहदारीत अडकणं नाही, कसली धावपळ नाही. म्हणजे कसं जगणं मोबाईलच्या एयरोप्लेन मोडप्रमाणे अत्यावश्यक गरजांच्या मोड वर टाकून शांत राहायचं.
हा विचार जसा मनात यायचा, तसाच पटकन निघूनही जायचा. कदाचित त्यालाही कळलेलं असावं की माझं निवृत्तीचं वय बरंच दूर आहे. काही नियोजनपुर्वक निवृत्ती घेणारे भाग्यवान सोडले नोकरी करणार्या अथवा व्यवसाय करणार्या प्रत्येकाच्या मनात हा विचार कधी ना कधी आलाच असेल आणि त्यावर काही पर्याय नाही म्हणून असा विचार मनातून झटकून टाकला असेल.
मात्र अचानक ही वेळ आली. नव्हे नियतीने म्हणा वा निसर्गाने म्हणा, ही वेळ सक्तीने लादली. माझ्यावर, माझ्या नातेवाईकांवर, माझ्या शेजार्यापाजार्यांवर, माझ्या शहरातील, राज्यातील, देशातील प्रत्येकावर. जगातील बहुतांश माणसांवर. काहींना आपल्या धावण्याचा वेग कमी करावा लागला आहे, काहींना आपलं धावणं पुर्णतः थांबवून घरात शांत बसावं लागलं आहे. एखाद्या दिवसाच्या "बंद"नेही विस्कळीत होणारे जनजीवन गेले आठ दिवस नजरकैद अवस्थेत चालू आहे. अर्थात स्थलांतरीत मजुरांसारख्या काही दुर्दैवी जीवांच्या नशीबी ही त्यातल्या त्यात बरी अशी नजरकैदही नाही हे ही तितकेच खरे.
डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या वुहान शहरात पसरलेला कोरोना विषाणू चीनच्या बाहेर पडणार नाही याच भ्रमात सारे जग होते. "काहीही खातात लेकाचे. यांना हा कोरोना गेला की कुकर लावायला शिकवायला हवे" असा विचार आपण करत असतानाच कोरोनाच्या महामारीने जगभर थैमान घातले, आपल्या देशातही शिरकाव केला आणि आपण सावध झालो. राज्य सरकार आणि केंद्र सरकार कार्यरत झाले आणि एक दिवस तोंडाला रुमाल बांधून दबकत दबकत ऑफिसला जाणं बंद होऊन वर्क फ्रॉम होम सुरु झाले सार्यांचे.
या सक्तीच्या स्थानबद्धतेमुळे यापुर्वी मनात येणारा चुकार विचार सत्यात उतरला आहे. अगदीच रीकामा वेळ नसला तरी घराबाहेर पडणंच बंद झाल्याने फावला वेळ मिळत आहे. मनात आलं की बुकशेल्फवरील एखादं पुस्तकं उचलून वाचणं चालू करता येतंय. "पुढे वेळ मिळाला की शिकू" असं म्हणत शिकणं पुढे ढकललेली CSS ही वेबसाईट्सच्या पेजेसना सुंदर बनवणारी भाषा मुळातून शिकतोय. मागे कधीतरी उत्साहात विकत घेतलेला आणि नंतर अडगळीत पडलेला व्हायोलीनही बाहेर काढून युट्युबवरील व्हिडीओ पाहत शिकण्याचा प्रयत्न करुन पाहीला, आणि ये अपने बसकी बात नही हे लक्षात येताच ठेवूनही दिला.
या लॉकडाऊनमध्ये कधी नव्हे तो तो आपल्याला थांबून विचार करायला वेळ मिळाला आहे. संध्याकाळी बाल्कनीत येऊन जेव्हा निर्मनुष्य रस्त्याकडे पाहतो, तेव्हा मनात विचार येतो की शेवटी निसर्गाने माणसाला त्याची जागा दाखवून दिली आहे. अगदी चंद्रावर पाऊल ठेवणार्या माणसाला उघड्या डोळ्यांनीही न दिसणार्या आणि सजीवही नसणार्या विषाणूने त्याला हतबल केलं आहे. लागण होताना त्याने देश, धर्म, जात, पंथ, लिंग, गरीब-श्रीमंत असा कोणताच भेदभाव पाळलेला नाही. स्वतःला प्रगत समजणार्या, आधुनिक वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध असणार्या देशांमध्येही त्याने हजारो बळी घेतलेत. कायम भौतिक प्रगतीच्या मागे ऊर फुटेस्तोवर धावणार्या, संरक्षणाच्या नावाखाली विध्वंसक, संहारक अस्त्रे निर्माण करणार्या माणसाला त्याने सक्तीने थांबायला लावलं आहे, त्याच्या प्राथमिकता काय आहेत याचा विचार करायला लावलं आहे.
चीनमध्ये जसा कोरोना आटोक्यात आला आहे तसा तो इतरत्रही येईल. मात्र प्रश्न हा आहे की इथून पुढे तरी माणूस शहाणा होईल का?
खाली मांडायचे म्हणजे>>> उघडच मांडायचे. उदा. एकाच प्रकारचे ७,८,९. आता अजून एक. समजा एखाद्याने वरील पाने खाली लावली आहेत तर त्यानंतर इतर खेळाडू त्या अलीकडचे/पलीकडचे एकेक पान पण जोडू शकतात. म्हणजे ६ /१०. थोडक्यात इथून पुढे हा खेळ काहीसा ‘ब दा म७’ सारखा होतो.कहीं असली व्हायरस हमही तो नही ?भारी थेअरी आहे. आणखी एक थेअरी घ्या.. ऑक्सिजन माणसावर स्लो पॉयझनिंग करतो आणि एक जीव ७०-८० वर्षात हळू हळू संपवून टाकतो. :D