Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

करोना विषाणू COVID-19 (Coronavirus disease 2019)

स
सुबोध खरे
Wed, 03/04/2020 - 14:25
💬 253 प्रतिसाद
करोना विषाणू हा एक साध्या सर्दीपासून मर्स आणि सार्स (Middle East Respiratory Syndrome (MERS) and Severe Acute Respiratory Syndrome (SARS) सारख्या श्वसनसंस्थेला सूज आणणाऱ्या विषाणूंच्या गटातील एक विषाणू आहे. COVID-19 (Coronavirus disease 2019) हे या विषाणूंचे नाव आहे आणि याचा आपल्याला शोध हा आता हि साथ आल्यामुळे लागला आहे. यामुळे होणाऱ्या रोगाची लक्षणे -- ताप, कोरडा खोकला आणि थकवा येणे. काही रुग्णांना सर्दी, अंग मोडून येणे, नाक बंद होणे, घसा दुखणे आणि काही रुग्णांना डायरिया पण होतो. हि सर्व लक्षणे हळूहळू दिसू लागतात. बऱ्याच लोकांना या विषाणूचा प्रादुर्भाव झाला तरी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत कि कोणताही त्रास होत नाही. ८५ टक्के रुग्ण कोणताही इलाज न करता स्वतःहून बरे होतात. १५ % रुग्णांमध्ये हा रोग गंभीर होतो आणि १ ते २% रुग्ण यात दगावतात. गंभीर आजार आणि मृत्यू हा साधारणपणे वृद्ध, प्रतिकारशक्ती कमी असणारे किंवा मधुमेह, रक्तदाब हृदयविकाराचे रुग्ण यांमध्ये दिसून येतो. रोग प्रसार -- या रोगाने आजारी रुग्ण जेंव्हा खोकतो किंवा शिंकतो तेंव्हा त्यातुन जो फवारा उडतो त्यात असलेल्या सूक्ष्म थेंबातुन हे विषाणू आजूबाजूच्या वस्तूंवर जाऊन बसतात. या वस्तुंना हात लावल्यावर जेंव्हा निरोगी माणूस आपल्या चेहऱ्याला डोळ्यांना नाकाला हात लावतो तेंव्हा हा विषाणू त्याच्या शरीरात शिरतो. यासाठीच आपण बाहेर जाऊन आल्यावर आपले हात साबणाने आणि भरपूर पाण्याने धुतले पाहिजेत आणि सारखा चेहऱ्याला हात लावणे बंद केले पाहिजे. आणि ज्याला खोकला किंवा सर्दी आहे त्याने मोठा हातरुमाल जवळ बाळगून त्यातच आपले खोकणे किंवा शिकणे नियंत्रित करणे आवश्यक आहे. अल्कोहोल आधारित हँड सॅनिटायझर हा साबणासारखेच काम करतो. (खरं तर साबण जास्त चांगला आहे). कोणताही साबण चालतो. डेटॉल किँवा सॅवलॉन सध्या साबणापेक्षा जास्त परिणामकारक असतो असा कोणताही पुरावा आढळलेला नाही. बहुसंख्य लोकांना हा रोग अतिशय कमी प्रमाणात होतो परंतु हे विषाणू त्यांच्या श्वसन मार्गात असल्यामुळे कोणीही( वारंवार निरोगी दिसणाऱ्या माणसानेही) खोकताना किंवा शिंकताना हातरुमालातच शिंकणे आवश्यक आहे. करोना विषाणू पासून आपला बचाव-- १) बाहेर जाऊन आलयावर प्रत्येक वेळेस आपण आणि आपल्या घरच्यांना साबण आणि पाण्याने हात धुण्याची सवय लावणे २) खोकला किंवा सर्दी असलेल्या माणसापासून १ मीटर दूर उभे राहणे ३) ज्याला खोकला किंवा सर्दी आहे त्याने मोठा हातरुमाल जवळ बाळगून त्यातच आपले खोकणे किंवा शिकणे नियंत्रित करणे. हि गोष्ट आपल्या माहितीतील सर्व लोकांना सांगणे आपल्याला हा रोग होण्याची शक्यता --आपण चीन इटली किंवा तशा रोगप्रसार झालेल्या देशात जाऊन आला नसाल तर हा रोग होण्याची शक्यता सध्या तरी फारच कमी आहे. हा विषाणू जन्य रोग असल्यामुळे या रोगावर प्रतिजैविके ( Antibiotics) काम करत नाहीत. अजून तरी यावर लास तयार झालेली नाही परंतु लवकरच ती उपलब्ध होईल अशी आशा आहे. आरोग्य कर्मचारी आणि ज्यांना खोकला किंवा सर्दी आहे अशानीच तोंडावर मुखवटा घेणे आवश्यक आहे. सामान्य माणसांनी मुखवटा घेणे हे अगोदरच कमी असलेल्या साधनसामग्रीचा अपव्यय आहे. चीन मधून आलेल्या पॅकेटमधून हा विषाणू येण्याची शक्यता फारच कमी आहे कारण शरीराच्या बाहेर हा विषाणू फार तर ४८-७२ तास जिवंत राहू शकतो ते सुद्धा थंड तापमानात अत्यंत महत्त्वाची गोष्ट --या रोगापासून काळजी घेणे हे योग्य आहे परंतु याबद्दल चिंता करणे(ANXIETY) किंवा घबराट पसरवणे ( PANIC) हे चूक ठरेल सार्स(२००३) मध्ये मृत्यूची शक्यता १० % होती . स्वाईन फ्लू( २००९) मध्ये मृत्यूची शक्यता ४.५ % होती इबोला(२०१४) मध्ये मध्ये मृत्यूची शक्यता २५ % होती तर करोना मध्ये हि १-२ % आहे मग आज इतकी भीती का पसरली आहे ? सार्स स्वाईन फ्लू किंवा इबोलाच्या वेळेस सोशल मीडियाचा ( आणि त्यामुळे गैरसमज आणि अफवांचा) प्रसार इतका झालेला नव्हता. आज जगात सोशल मीडिया ३०० कोटी लोक वापरतात. त्यामुळे अफवा दोन दिवसात जगभर पसरल्यामुळे या बद्दल अफवा आणि त्यामुळे घबराट फार लवकर पसरली आहे. भारतात या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता खूपच कमी आहे कारण हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये ( हिमाचल काश्मीर, उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) सोडल्यास इतर राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता फारच कमी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जसे तापमान वाढते तसे लोक अतिथंडीमुळे घरात बसून राहतात त्याऐवजी बाहेर पडतात जेथे तापमान जास्त असते यामुळे विषाणूची वाढ कमी होते. वरील लेखातील बहुतेक साहित्य हे जागतिक आरोग्य संघटनेच्या अद्ययावत पत्रकातून घेतलेले आहे. यावर अजून संशीधन चालू आहे आणि अजून बरीच माहिती मिळणे बाकी आहे. हा लेख माझ्या नावासाहित किंवा नावा शिवाय पाठवले तरी चालेल. ही माहिती मी जागतिक आरोग्य संघटनेच्या अद्ययावत पत्रकावरूनच घेतलेली आहे. त्यात माझे कर्तृत्व काही नाही. पण जर लोकांना माहितीच्या स्रोता बद्दल खात्री वाटत नसेल तर खाली डॉ सुबोध खरे एम डी असे लिहिले तरी चालेल. लोकांमध्ये निर्माण होणारा "भयगंड"दूर करणे आणि आरोग्याची योग्य काळजी घेणे एवढाच माझा हेतू आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 147811 views

💬 प्रतिसाद (253)
क
कळस Fri, 03/27/2020 - 13:43 नवीन
शेतमालाचे नुकसान होईल , परंतु अवकाळी पाऊस ह्यावेळी कमीतकमी जीवितहानी टाळण्यासाठी तरी लाभदायक ठरेल असे दिसतेय...रविवारी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे..
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 03/27/2020 - 15:46 नवीन
सकरमत्मक आणि बिलकुल तिखड मीठ न बातम्या देण्याची सवय मीडिया लागेल लागेल तो जगा साठी सुदिन च म्हणायचं. किती लोकांना covid 9 ची लागण झाली आहे ह्याची बातमी जेव्हा देता तेव्हा किती लोक बरे झाले आहेत,किती लोकांना उपचार ची गरज पडली आहे किती लोक उपचार न करता बरे झाले आहेत ही पण आकडेवारी द्यावी म्हणजे पूर्ण माहिती मिळेल . खूप धक्कादायक मुंबई मध्ये 170 लोक बाधित अशा प्रकारच्या बातम्या नसाव्यात. काय माहित प्रतेक व्यक्ती ची तपासणी केली तर आता corona बाधित लोकांची संख्या लाखो मध्ये असावी . शरीरात असंख्य रोग निर्माण करणारे विषाणू सापडतील प्रतेक व्यक्तीच्या शरीरात पण ते रोग ग्रस्त होत नसतील . तसाच हा व्हायरस शरीरात असू शकेल..
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 03/27/2020 - 16:32 नवीन
भारतात टेस्ट चा रिपोर्ट येण्यास 2 दिवसा पेक्षा जास्त वेळ लागत असेल तर मीडिया आज आलेल्या रिपोर्ट निकाल च आधार घेवून आज एवढ्या लोक वाढली अशी अर्धवट माहिती का देते. सरळ शुद्ध शब्दात ते सांगू शकतात ना 3 दिवसा पूर्वी samples test la dile hote त्याचा आज हा रिपोर्ट आला आहे.
  • Log in or register to post comments
व
विनोद१८ Fri, 03/27/2020 - 18:05 नवीन
धन्यवाद डॉक्टरसाहेब, अतिशय उत्तम व माहितीपुर्ण उपयोगी लेख, बरीच भीती नाहीशी झाली. पुन्हा एकदा धन्यवाद....!! विनोद१८
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 03/29/2020 - 21:16 नवीन
ब्राझीलचे अध्यक्ष बोलसोनारो म्हणतात की ब्राझीली लोकं नैसर्गिकरीत्या प्रतिकारक्षम ( = naturally immune ) असावेत : https://www.telesurenglish.net/news/Bolsonaro-suggested-Brazilians-are-naturally-immune-to-COVID-19--20200327-0010.html लेखाच्या मते याचा अर्थ सामाजिक अलगीकरण तितकंसं महत्त्वाचं नाही. अतिस्वच्छता नसल्याने भारतीयांची प्रतिकारशक्ती ब्राझीली लोकांसारखीच नैसर्गिकरीत्या बळकट झालेली आहे. भारतातही अलगीकरण संपुष्टात आणलं पाहिजे. -गा.पै.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Mon, 03/30/2020 - 05:55 नवीन
जगातील स्वच्छ ते मध्ये अग्रेसर असलेल्या देशातच जास्त प्रकोप झाला आहे corona cha. असे बतम्यावरून तरी दिसत आहे. अस्वच्छ ,घाणेरडे देश कमी बाधित आहेत. असे तरी सध्या चित्र आहे. हा व्हायरस ची बाधा खूप लोकांना झाली असावी जेवढे आकडे दिसत आहेत त्या पेक्षा पण प्रचंड आकडा असावा बाधित लोकांचा . पण खूप लोकांत कोणतीच लक्षण दिसत नसल्या मुळे टेस्ट केली जात नाही . महाराष्ट्रात बाधित लोकांमधील 104 लोकांमध्ये कोणतीच लक्षण दिसत नाहीत रोगाची. ही आरोग्य मंत्राचे स्टेटमेंट त्याला पुष्टी देत आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 03/30/2020 - 10:25 नवीन
इटलीच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेचं (की रुग्णालयाचं) अधिकृत संकेतस्थळ हे आहे : www.epicentro.iss.it त्यांनी एक ६ पानी छोटा अहवाल प्रकाशित केला आहे : https://www.epicentro.iss.it/coronavirus/bollettino/Report-COVID-2019_17_marzo-v2.pdf या अहवालाचं इंग्रजीत भाषांतरित शीर्षक (सौजन्य गूगल) : Report on the characteristics of patients with COVID-19 deposits in Italy The report is based on the data updated on 17 March 2020 यानुसार करोना रुग्णांची १७ मार्च पर्यंतची स्थिती सर्वसामान्य होती. करोना विषाणू अंगात उपस्थित असतांना जे मृत्यू झालेत त्या मृतांचे आरोग्य आधीपासूनच डळमळीत होते. ५० वर्षांखालील जे २ रोगी मेले त्यांपैकी एकास कर्करोग तर दुसऱ्यास मधुमेह होता. जिज्ञासू गूगल भाषांतराच्या सहाय्याने हा अहवाल वाचू शकतात. करोना हा प्रसारमाध्यमांचा गलबला म्हणजेच फुगवलेली बेडकी आहे. -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 04/12/2020 - 22:08 नवीन
बर्लिनचे क्षेत्रीय महापौर स्तेव्हन फॉन दासेल यांनी स्वत:च्या शरीरात प्रतिपिंडे निर्माण करायचा निर्णय घेतला आहे. अशा रीतीनेही विषाणूस आळा घालता येतो. हा पर्यायी मार्ग का चाचपून पाहिला गेला नाही ? कृपया तत्ज्ञांनी अधिक प्रकाश टाकावा. धन्यवाद! अधिक माहिती : https://www.ndtv.com/offbeat/why-a-german-mayor-infected-himself-with-coronavirus-on-purpose-2205546 करोनाचे ९५ % रुग्ण स्वत:हून बरे होत असतील तर त्या पार्श्वभूमीवर उपरोक्त मार्ग आशादायी वाटतो. -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 04/27/2020 - 11:26 नवीन
नवीन काही अपडेट्स संशोधन आणि नियंत्रणाच्या बाबतीत काही नवीन घड़ामोड़ी ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 04/28/2020 - 17:03 नवीन
करोना विषाणू सद्य स्थिती हा धागा काढल्याला आता ५४ दिवस होऊन गेले आहेत. अजूनही या रोगावर नक्की असे औषध सापडलेले नाही आणि लस सुद्धा अजून कमीत कमी तीन महिने ते सहा महिने दूर आहे. जगात आजमितीला ३० लाखाहून अधिक लोक या आजाराचे शिकार झाले असून यातील २ लाख १२ हजार दुर्दैवी यात मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि ९ लाख ३५हजार लोक यातून बरे झालेले आहेत. भारतात जगाच्या मानाने रुग्ण संख्या २९ हजार असून त्यातील ९३९ लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. म्हणजे एक कोटी लोकांमागे फक्त ७ लोक मरण पावले आहेत. हाच एकदा अमेरिकेसाठी ३०५८० आणि स्पेनसाठी ५० हजाराच्या जवळ आहे. म्हणजेच जगाच्या मानाने आपण खूप सुदैवी आहोत. याची अनेक कारणे असतील / आहेत त्या कारणात सरकारने वेळेत घेतलेला लॉक डाऊनचा निर्णय हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. बाकी आपला देश एकंदर उष्ण कटिबंधात आहे, आपल्याकडे असलेला क्षयरोगाच्या लसीकरणाचा कार्यक्रम आणि एकंदर अस्वच्छतेमुळे आपली असलेली प्रतिकार शक्ती असे अनेक घटक या सुदैवाला कारणीभूत आहेत /असावेत. फ्लॅटनिंग द कर्व्ह चा अर्थ काय आहे? आपल्याकडे दर एक कोटी लोकसंख्येसाठी जर ५० व्हेंटिलेटर /अतितीव्र उपचार (इंटेन्सिव्ह केअर बेड्स ) खाटा असतील तर आपल्या रोग्यांची संख्या आपल्याला दर एक कोटी लोकसंख्येसाठी १००० पेक्षा कमी ठेवणे आवश्यक आहे. कारण यातील ५ टक्के लोकांना गंभीर स्वरूपाचा आजार होऊन त्यांना व्हेंटिलेटरची गरज पडेल. या ५० व्हेंटिलेटर असणाऱ्या रुग्णांपैकी १० दुर्दैवी रुग्ण मृत्युमुखी पडतील. परंतु इतर ४० रुग्ण १४ दिवसात बरे होऊन घरी जातील तोवर हेच व्हेंटिलेटर पुढच्या ५० रुग्णांसाठी कामी येतील. याऐवजी जर आपण अनिर्बंधपणे बाहेर फिरत राहिलो असतो आणि आपली रुग्ण संख्या १००० ऐवजी ५००० झाली असती तर आपल्याला एक कोटी लोकांसाठी २५० व्हेंटिलेटरची ( ५ %) गरज भासली असती. एवढे व्हेंटिलेटर(इंटेन्सिव्ह केअर बेड्स ) आपल्याकडे नसल्याने आपल्याकडे पहिले ४० बरे झालेले सोडले तर १० दुर्दैवी आणि अधिक २०० लोक केवळ व्हेंटिलेटर/ इंटेन्सिव्ह वैद्यकीय उपचार न मिळाल्याने मृत्युमुखी पडले असते. म्हणजेच १३० कोटी लोकसंख्येच्या देशात २७ हजारापेक्षा जास्त मृत्यू झाले असते. कदाचित आपल्याकडची लोकसंख्या किंवा गर्दी आणि कमी सामाजिक अंतर लक्षात घेतले तर हीच संख्या पाच किंवा १० पट सुद्धा( दीड ते अडीच लाख) झाली असती. हर्ड इम्म्युनिटी/सामूहिक प्रतिकारशक्ती -- याचे सोपे उदाहरण अणुबॉम्ब विरुद्ध अणुभट्टी याचे देता येईल. अणुबॉम्ब मध्ये युरेनियमच्या एका अणूचे विभाजन झाले तर त्यातून तीन न्यूट्रॉन बाहेर पडतात ते पुढच्या तीन अणुकेंद्रकांना फोडून त्यातून प्रत्येकी तीन न्यूट्रॉन बाहेर पडतात. म्हणजेच हि साखळी १-३-९-२७-८१-२४३-७२९-२१८७ अशी वेगाने वाढत जाऊन अणुबॉम्बचा स्फोट होतो. याऐवजी अणुभट्टीत बाहेर पडणाऱ्या तीन न्यूट्रॉन पैकी दोन न्यूट्रॉन हे ग्रॅफाइटमध्ये शोषले जात असल्यामुळे हि साखळी १-१-१-१-१-१ अशीच चालू राहते. आपण हर्ड इम्युनिटी किंवा सामूहिक प्रतिकारशक्ती कशी तयार होते ते पाहू. सुरुवातीला आपण लॉकडाऊन केले त्यात आपण संपूर्ण लोकसंख्येला या रोगापासून दूरच ठेवले. आता लॉकडाऊन उघडले कि फक्त तरुण आणि सशक्त (प्रत्यक्ष काम करणारे) लोकांना बाहेर फिरायची परवानगी दिली जाईल आणि वृद्ध आणि इतर आजार (फुप्फुस/ हृदयविकार रक्तदाब, मधुमेह) असणाऱ्या लोकांना घरीच राहण्यास सांगितले जाइल. यामुळे फक्त तरुण लोकांना हा आजार होइल परंतु त्यांना होणार हा आजार हा सौम्य स्वरूपाचा असून त्यांची मृत्युसंख्या खूप कमी असेल. काही आठवडयांनी या सर्व तरुणांची प्रतिकार शक्ती तयार झाल्यामुळे त्यांना परत संसर्ग झाला तरी त्यांना हा आजार लगेच परत होणार नाही म्हणजेच त्यांचे काम ग्रॅफाइट सारखे असेल. जसजसे जास्तीत जास्त लोकसंख्या या रोगाच्या संसर्गात येईल तसतशी त्या लोकसंख्येत प्रतिकारशक्ती निर्माण होईल. हा आकडा जसजसा लोकसंख्येच्या ६०-७०% पर्यंत पोहोचेल तसतसा या आजाराचा प्रसार नगण्य होत जाईल. या वेळेपर्यंत एक तर औषध किंवा लस तयार झालेली असेल म्हणजेच उरलेल्या ३० टक्के मुख्यत्वे वृद्ध किंवा इतर आजार असलेल्या लोकांना प्राधान्याने हि लस/ औषध देऊन आपण त्यांना या रोगाला बळी पडण्यापासून वाचवू शकू. यासाठी कोणतेही अनमान न करता सरकारला सहकार्य करणे आवश्यक आहे. जितके तुम्ही नियम पाळाल तितके आपण आपल्या वरिष्ठ नागरिकांना दीर्घायुष्य देऊ शकू. काही शहाणे आम्हाला काही होणार नाही म्हणून निष्काळजीपणा दाखवतील त्यांना हात जोडून विनंती आहे - मान्य आहे कि आपल्याला आजार झाला तरी तो सौम्य असेल किंवा कोणतीही लक्षणे दिसणार नाहीत परंतु हा आजार आपण आपल्या वृद्ध आईवडिलांना/ नातेवाईकांना संक्रमित केला तर त्यांच्या मृत्यूला आपणच कारणीभूत ठराल.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 04/29/2020 - 14:38 नवीन
आवडला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ऋ
ऋतुराज चित्रे Tue, 04/28/2020 - 17:58 नवीन
ही तरुण लोकं घरी आल्यावर घरातील वृद्धांना संसर्ग होणार नाही का?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 04/29/2020 - 15:29 नवीन
एक म्हणजे जे लोक पोटासाठी आपल्या घरापासून लांब आहेत ते साधारण तरुणच लोक आहेत. त्यामुळे शहरात दाटीवाटीने राहणाऱ्या लोकांत जास्त करून तरुणच आहेत. इतर ठिकाणी खेड्यात लहान मोठ्या शहरात सुद्धा या तरुणांना आणि लहान मुलांना वृद्ध लोकांपासून १ मीटर अंतर ठेवण्याचे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे ( जे सात आपल्या मोबाईल पासून टीव्ही रेडिओ आणि सार्वजनिक न्यासावर कानी कपाळी ओरडून सांगितले जात आहे. त्यातून वृद्ध लोकांना पण लागण होणारच आहे परंतु एकदम हजारो लाखो लोकांना अतिदक्षता विभागात हलवायला लागले तर त्यांच्यावर उपचार करण्याच्या पायाभूत सुविधा आपल्याकडे अजून नाहीत म्हणूनच या रोगाचा प्रसार हळूहळू होईल अशा तर्हेने आपल्याला आपली जीवन पद्धती बदलायला लागणार आहे.
  • Log in or register to post comments
P
Prajakta२१ Tue, 04/28/2020 - 18:22 नवीन
स्वीडन मध्ये lockdown न करता herd immunity च्या जोरावर साथ आटोक्यात आणण्याचे प्रयत्न चालू आहेत ह्यातून ज्ये ना आणि मधुमेह किन्वा तत्सम रोग असणाऱ्यांना वगळले आहे
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 04/28/2020 - 19:57 नवीन
दक्षिण कोरियाने लॉकडाऊन नाही केलेले पण तरी कोरोनाबाधितांच्या संख्येवर प्रचंड नियंत्रण मिळवले आहे. लॉकडाउन मुळे फार काही साध्य होत नाही. ईटली मध्ये ९ मार्च पासून लॉकडाऊन आहे पण तरी तिथे बाधितांची संख्या ९ मार्च पासून आज २८ एप्रिल पर्यंत ९ हजारांपासून दोन लाखांवर गेली आहे. भारतातही २५ मार्च पासून आता पर्यंत ६५० पासून सुमारे ३० हजार पर्यंत वाढली आहे. बरं लस यईपर्यंत लॉक डाऊन करुन ठेवावं हे ही शक्य नाही. तसं करायचं तर अजून ४-६ महिने किंवा त्याहूनही अधिक काळ लॉकडाऊन करुन ठेवावं लागेल. अर्थव्यवस्था पुर्णतः थांबेल, अनेक कामे अडकून पडल्याने ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांचेही जीवनमान खालावेल. आणि लॉकडाउन उघडले तर कोरोनाचा धोका पुन्हा वाढणारच आहे (आताही तो शून्यावर नाहीच, रोज नवे रुग्ण सापडतातच). फक्त वैद्यकीय व्यवस्था, तपासणी सुविधा वाढविण्याकरिता पुरेसा अवधी इतकंच काय ते लॉकडाऊनचं महत्व मान्य करता येईल. पण मग खरेच याकाळात वैद्यकिय सुविधा अनेक पटींनी वाढविण्यात आली का ? व्हेंटिलेटर, अतिदक्षता कक्ष अनेक पटींनी वाढवलेत का ? याबद्दल निश्चित माहिती माझ्याकडे नाही. पण तसे झाले असल्यास चांगलेच नाहीतर तेलही गेले आणि तूपही गेले असेच म्हणावे लागेल (लॉकडाउन नंतरचा कोरोनाने मृत्यू होण्याचा धोकाही कायम आणि अर्थव्यवस्थेला मोठा धक्काही ..)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 04/29/2020 - 15:36 नवीन
फक्त वैद्यकीय व्यवस्था, तपासणी सुविधा वाढविण्याकरिता पुरेसा अवधी इतकंच काय ते लॉकडाऊनचं महत्व मान्य करता येईल. आपण वरील प्रतिसादात "फ्लॅटनिंग द कर्व्ह" हा मुद्दा परत एकदा वाचून पाहावा अशी आपल्याला विनंती आहे. याशिवाय भारतातील मार्च मधील सरासरी तापमान आणि एप्रिलच्या शेवटी असलेले तापमान यातील फरक समजून घ्या. A study by the National Environmental Engineering Research in Nagpur has found a “very strong” correlation — up to 85% — between the increase in the average day temperature and the reduction in Covid-19 spread for select cities in the country and for states like Maharashtra and Karnataka as a as a whole. https://timesofindia.indiatimes.com/india/85-correlation-between-temperature-rise-cut-in-virus-spread-study/articleshow/75439996.cms याचा अर्थ सुद्धा समजून घ्या.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 04/29/2020 - 17:46 नवीन
आपण वरील प्रतिसादात "फ्लॅटनिंग द कर्व्ह" हा मुद्दा परत एकदा वाचून पाहावा अशी आपल्याला विनंती आहे.
हो वाचला आणि मान्यही आहे म्हणूनच मी हा मुद्दा मांडला ना.
पण मग खरेच याकाळात वैद्यकिय सुविधा अनेक पटींनी वाढविण्यात आली का ? व्हेंटिलेटर, अतिदक्षता कक्ष अनेक पटींनी वाढवलेत का ? याबद्दल निश्चित माहिती माझ्याकडे नाही. पण तसे झाले असल्यास चांगलेच
हे मी म्हंटले आहे.. जर अशी क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली असेल तर लॉकडाउन खर्‍या अर्थाने सत्कारणी लागला असे म्हणता येईल. नाहीतर व्हेंटिलेतरची कमतरता वगैरे मुद्दे लॉकडाऊन नंतरही कायम राहिलेत तर लॉकडाउनने फक्त आजचं मरण उद्यावर ढकललं जाईल इतकंच. असो. खाली दुसर्‍या एका प्रतिसादात म्हंटल्याप्रमाणे मला लॉकडाउनच्या चर्चेपेक्षा विषाणू बद्दल अधिकाधिक माहिती जाणून घेण्यास जास्त आवडेल.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 04/29/2020 - 10:25 नवीन
प्रचंड लोकसंख्या,पायाभूत सुविधा ची कमतरता. ह्या मुळे lockdown shivay dusra marg भारताच्या जवळ नाही. लोकसंख्येचा प्रमाणात डॉक्टर ची संख्या सुद्धा खूपच कमी आहे. परत डॉक्टर जे आहेत ते सर्व मोठ्या शहर मध्येच एकवटले आहेत . उपचाराच्या सुविधा वाढवणे,बेड वाढवणे,ह्या साठी आपल्याला मर्यादा आहेत. Lockdown kele nahi tar prachand लोकसंख्येला बाधा होईल आणि त्या सर्वांना मेडिकल सुविधा देण्याची आपली क्षमता नाही . जास्तीत जास्त लोकांना बाधा झाली तर त्यांच्या शरीरात covid १९ ला विरोध करण्याची क्षमता निर्माण होईल आणि ते रोगाला बळी पडणार नाहीत हे १००% सिद्ध झालेलं नाही. परत परत बाधित होण्याची उदाहरणे जगात आहेत . त्या मुळे विषाची परीक्षा नको. लस उपलब्ध होई पर्यंत रुग्ण संख्या कमी ठेवणे हाच एकमेव मार्ग आहे.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 04/29/2020 - 13:10 नवीन
लॉक डाऊन हवंच किंवा लॉकडाऊनला पर्याय नाही असं म्हणणार्‍यांना एकच प्रश्न.. लस येईपर्यंत लॉकडाऊन चालू ठेवायचं का मग ? सहा महिने वा जास्त कालावधी लागला तरी ?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 04/29/2020 - 13:49 नवीन
आता कितीदिवस अशा अवस्थेत राहायचं ? जिंदगी तुम्हाला पूर्ववत सुरु करायचा निर्णय एक दिवस घ्यावाच लागेल आणि अचानक हे सुरु कारावे लागेल असे नाही तर त्याचे काही प्लान्सही असले पाहिजेत. आज आठबजेसे लॉकडाऊन नही रहेगा असे म्हणून चालणार नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 04/29/2020 - 15:06 नवीन
बरोबर आणि लॉकडाउन नसले तरी स्केल्ड डाउन (किंवा असाच काही शब्द देता येईल) चालू ठेवावे लागेल. म्हणजे कारखान्यात , ऑफिसमध्ये, बसमध्ये , शाळेत , महाविद्द्यालयात, उपहारगृहांत (आणि अशा इतर अनेक ठिकाणी) बसण्याच्या /कामाच्या सुविधांमध्ये आवश्यक ते बदल करुन आवश्यक ते शारिरिक अंतर (सोशल डिस्टन्सिंगपेक्षा फिजिकल डिस्टन्सिंग जास्त बरं वाटतं) ठेवता येईल अशी व्यवस्था करणे गरजेचे असेल. खरे तर लॉकडाऊनच्या काळातच याबद्दल योग्य त्या सुचाना देवून हे करायला हवे होते. गरजेप्रमाणे वस्तू, फर्निचर वारंवार सॅनिटाईज करणे हे व्हायला हवे. यामुळे वेळ व पैसा खर्च होईल आणि कार्यक्षमता कमी होईल हे मान्य पण पुर्ण बंद राहण्यापेक्षा कमी कार्यक्षमतेवर कामकाज चालू राहणे बरे. तसेच लग्न , अंत्यविधी ई कार्यात मात्र जास्तीत जास्त किती पाहुणे बोलवता येतील त्यावर बंधन कायम असावे. खासकरुन अंत्यविधीकरिता, तर लग्नाकरिता कार्यालयाच्या आकारानुसार किती लोक बोलवता येतील यावर बंधन घालावे. काल एक चित्रफीत पाहिली दुबईमध्ये लॉकडाउन उघडल्यानंतरचे व्यहवार यात एक जोडपे दागिन्यांच्या दुकानातून दागिने खरेदी करताना दिसत आहे. ग्राहक (अर्थात मास्क लावून ) आल्यावर त्याचे थर्मल स्कॅनिंग केले गेले , बिलींग होवून ग्राहक निघून गेल्यावर दुकानदाराने काउंटरवरील जागा, कार्ड स्वाइप करण्याचे यंत्र, ग्राहकाने हाताळलेले पेन ई लगेच सॅनिटाईज केले. तर दरवानाने दाराचे हँडल सॅनिटाईज केलेले दिसते आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 04/29/2020 - 15:39 नवीन
आता

लॉकडाऊन उघडले कि

फक्त तरुण आणि सशक्त (प्रत्यक्ष काम करणारे) लोकांना बाहेर फिरायची परवानगी दिली जाईल आणि वृद्ध आणि इतर आजार (फुप्फुस/ हृदयविकार रक्तदाब, मधुमेह) असणाऱ्या लोकांना घरीच राहण्यास सांगितले जाइल. यात लॉकडाऊनला पर्याय नाही असे कुठे तरी आपल्याला आढळले का? यामुळे फक्त तरुण लोकांना हा आजार होइल परंतु त्यांना होणार हा आजार हा सौम्य स्वरूपाचा असून त्यांची मृत्युसंख्या खूप कमी असेल. काही आठवडयांनी या सर्व तरुणांची प्रतिकार शक्ती तयार झाल्यामुळे त्यांना परत संसर्ग झाला तरी त्यांना हा आजार लगेच परत होणार नाही म्हणजेच त्यांचे काम ग्रॅफाइट सारखे असेल.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 04/29/2020 - 17:41 नवीन
फक्त तरुण आणि सशक्त (प्रत्यक्ष काम करणारे) लोकांना बाहेर फिरायची परवानगी दिली जाईल आणि वृद्ध आणि इतर आजार (फुप्फुस/ हृदयविकार रक्तदाब, मधुमेह) असणाऱ्या लोकांना घरीच राहण्यास सांगितले जाइल.
हे तर आताही करता आलं अयामुळे फक्त तरुण लोकांना हा आजार होइल परंतु त्यांना होणार हा आजार हा सौम्य स्वरूपाचा असून त्यांची मृत्युसंख्या खूप कमी असेल.
काही आठवडयांनी या सर्व तरुणांची प्रतिकार शक्ती तयार झाल्यामुळे त्यांना परत संसर्ग झाला तरी त्यांना हा आजार लगेच परत होणार नाही म्हणजेच त्यांचे काम ग्रॅफाइट सारखे असेल.सतं.. लॉकडाऊन न करता ही.
हो पण या सगळ्यात लॉकडाऊनचे योगदान काय ? असो.. धागा विषाणू बद्दलचा असल्याने विषाणू बद्दल अधिक चर्चा झाली तर ज्ञानात भर पडेल. लॉकडाउन गरजेचे की नाही हा पुर्णतः वेगळा विषय असू शकतो.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 04/29/2020 - 17:53 नवीन
पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट ४ कोटी लशींची निर्मिती करणार आहे. ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठाने शोधली आहे. याबद्दल अधिक काही माहिती आहे का ?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 04/29/2020 - 18:22 नवीन
अमेरिकेत तरुण व्यक्ती नी ग्रफाईड चे काम केले आहे का? ,इटली मध्ये केले आहे का? व्हायरस नी सर्व वयातील व्यक्तीला यमसदनी धाडले आहे. तरुण वाचतील असे काही नाही. प्रतिकार शक्ती वयावरून ठरते हे तरी सत्य आहे का?(ह्या मध 60 वर्ष आतील लोकांचाच विचार करा) निरोगी शरीर असणे ह्याचा पूर्ण संबंध वयाशी नाही.
  • Log in or register to post comments
ध
धनावडे Fri, 05/01/2020 - 19:07 नवीन
ज्यांना लक्षण दिसत नाहीत आणि प्रतिकारशक्ती ज्यांची चांगली आहे ते स्वतःहून बरे झाल्याची उदाहरणे आहेत का?
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 05/07/2020 - 16:59 नवीन
गेली अनेक वर्षे लसीचा शोध लावण्याचा प्रयत्न केला तरीही एड्स, नागिण, सार्स, डेंग्यू इ. आजारांवर लस शोधता आलेली नाहीय, त्या संबंधी कोविड१९ च्या लशीवर चर्चा करणारा गिरीश कुबेर यांचा रोचक लेख: कोविडोस्कोप : आपली नाही ती लस..!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/07/2020 - 17:26 नवीन
प्रतिसाद माहितीपूर्ण. आणि आपण डोळे लावून बसलोय की लस कधी येईल. सुरक्षित अंतर ठेवून काळजी घेऊन पुढची वाटचाल करा असा आशय व्यक्त करणारा वास्तवपूर्ण प्रतिसाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 05/08/2020 - 04:16 नवीन
रोचक, हे एक रोचक वृत्त हिंदुस्तान टाईम्सवर
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 05/08/2020 - 04:18 नवीन
* (स्वगतः) रोचक पेक्षा माहितीयूक्त असा शब्द प्रयोग अधिक योग्य ठरला असता का?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 05/08/2020 - 06:58 नवीन
गिरीश कुबेर यांची यात काय महत्ता/ अधिकार आहे कि त्यांनी लस या विषयावर आपली मुक्ताफळे उधळावीत? केवळ आपल्याला संपादक पदाच्या खुर्चीवर बसवले म्हणजे आपल्याला सर्वच ज्ञान आले असली वृत्ती असलेल्या माणसांबद्दल कमी बोलावे तितकेच थोडे. उद्या हि लस खरंच तयार झाली कि हे दीड शहाणे मी चुकलो म्हणून सार्वजनिक माफी मागतील काय? असंतांचे संत हा लेख मागे घेताना याना लाज वाटली नाही. एकतर नागीण हा रोग काय आहे हे त्यांना माहिती नाही. नागीण हि आपल्याला लहानपणी कांजिण्या होतात त्याचे जंतू आपल्या मज्जासंस्थेत लपून राहतात (स्लीपर सेल सारखे) आणि आपली प्रतिकारशक्ती अशक्त झाली कि तेच जंतू त्या नसेत परत सक्रिय होतात. नागीण (herpes zoaster) हा रोग नसून ते एक लक्षण आहे. आणि कांजिण्यांवर ती होऊच नये म्हणून अतिशय परिणामकारक लस आहे हे या उंटावरच्या शहाण्याला माहिती आहे काय? Varicella vaccine, also known as chickenpox vaccine, is a vaccine that protects against chickenpox. One dose of vaccine prevents 95% of moderate disease and 100% of severe disease. Two doses of vaccine are more effective than one. https://en.wikipedia.org/wiki/Varicella_vaccine या दुव्यातच नागीण(herpes zoster) बद्दल हि माहिती आहे. सर्व जगातील अक्कल आपल्याला आहेच असा आव आणणाऱ्या माणसाने लस तयार होणारच नाही म्हणून समाजात (विशेषतः वरिष्ठ नागरिकांमध्ये ज्यांना हर्ड इम्युनिटी चा फायदा तेवढा होणार नाही आणि त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण बरेच जास्त आहे) घबराट पस्रवल्याबद्दल याना तुरुंगात खडी फोडायला का पाठवू नये?
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 05/08/2020 - 14:00 नवीन
डॉ. खरे सर, सदर लेखाच्या शेवटी
तात्पर्य : प्रयत्न सुरू आहेत म्हणून लस तयार करण्यात यश येतंच असं नाही.
असे वाक्य आहे. म्हणजे "लस तयार होणारच नाही" असं लेखक म्हणत नाहीये तर लस तयार होईलच असं म्हणता येणार नाही असं त्यांचं म्हणणं दिसतंय. मला वाटतंय ते वास्तवाला धरुनही आहे. नागीण खेरीज लेखकाने एड्स , डेंग्यू, सार्स इत्यादींचाही उल्लेख केला आहेच. मला वाटतंय इथे मुद्दा इतकाच आहे की प्रत्येक विषाणूजन्य आजारवर लस निर्माण करता येईलच का हे कुणीच छातीठोकपणे सांगू शकणार नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 05/08/2020 - 16:02 नवीन
जगात सर्वत्र प्रचंड छळणारा आजार म्हणजे नागीण.हर्पिस नावानं ओळखला जाणारा हा आजारही असाच विषाणूजन्य. जगातले वैद्यकतज्ज्ञ गेली तब्बल ४० वर्ष झगडतायत. पण या आजाराला रोखणारी लस अजूनही काही तयार होऊ शकलेली नाही. वैद्यकीय ज्ञानाबद्दल अज्ञान असला तरी बेलाशक ठोकून दिलंय. कांजिण्यांनी माणसं अशी सहज मरत नाहीत म्हणून त्याच्या लसी बद्दल सर्वत्र उदासीनता दिसून येते. सार्सची लस जवळजवळ तयार झाली होती परंतु तोवर ती साथच संपली. त्यामुळे त्याचे संशोधन तेथेच थांबले. संशोधनावर अफाट खर्च होतो तो कुणी करायचा? कारण पुढची पायरी म्हणजे निरोगी मानवी स्वयंसेवकांमध्ये ती लस टोचून त्यानंतर त्यांना सार्सचा संसर्ग घडवून आणायचा आणि त्यांना रोग होतो कि नाही हे पाहायचे. साथ संपल्यावर निरोगी लोकांना असे तोफेच्या तोंडी द्यायला कोणती कंपनी तयार होईल? परंतु हेच संशोधन आता कोव्हीडच्या आजारात उपयोगी होत आहे. A SARS vaccine was developed in response to the 2002 outbreak, but was never sold since public health measures got the disease under control before it was ready https://www.discovermagazine.com/health/sars-vaccine-could-be-stopgap-measure-against-the-new-coronavirus-study एड्स ची लस का तयार होऊ शकली नाही याची कारणे फार वेगळी आहेत. डेंग्यू ची लस तयार होऊ शकली नाही हि पण

लोणकढी थाप

त्यांनी मारलीच आहे. In May 2019, Dengvaxia® was approvedexternal icon by the U.S. Food and Drug Administration (FDA) in the United States for use in children 9-16 years old living in an area where dengue is common (the US territories of American Samoa, Puerto Rico and the US Virgin Islands), with laboratory confirmed prior dengue virus infection. https://www.cdc.gov/dengue/prevention/dengue-vaccine.html कुठे आहे ती बस.. आपली नाही ती बस.. यात बस या शब्दाच्या जागी लस हा शब्द घालायचा.. बाकी सर्व तेच. याचा अर्थ पाचवीतील मूल सुद्धा सांगू शकेल. महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तपत्रात अग्रलेख लिहून संपादक इतक्या थापा एखादा मारू शकेल यावर सहजासहजी कुणाचा विश्वास बसणार नाही.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 05/08/2020 - 16:49 नवीन
कुबेरांची लेखनशैली वादातीत नाहीच.. आणि काही मुद्दे (नागीण, डेंग्यू संदर्भातले) कदाचित चुकलेले असतीलही. (पण एडस् ..कारणे काहीही असली तरी एडस् ची लस नाही हे खरेच) आणि कोरोनावर लस लवकरात लवकर मिळावी असे सगळ्यांनाच वाटते आहे. सध्याच्या काळात अतिशय आशावादी असायलाही हवं. (एडस् वर लस येवो वा न ये..पण कोरोनाची लस तर यायलाच हवी) परंतू तरीही पाचवीतील मूल असो वा तज्ञ डॉक्टर कुणाच्याही मनात प्रश्न असेल की प्रत्येक विषाणूजन्य आजारवर लस निर्माण करता येईलच किंबहूना योग्य वेळेत येईल (चार-पाच वा दहा वर्षांनी नव्हे) याची ग्वाही कुणी देवू शकतो का ? आणि ज्याच्या मनात ह्याबद्दल अजिबात शंका नाही त्यांनी अगदी खात्रीने "अमूक कालावधीत लस उपलब्ध होईल" असे सांगण्यास काय हरकत असावी ?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 05/09/2020 - 09:33 नवीन
ज्याच्या मनात ह्याबद्दल अजिबात शंका नाही त्यांनी अगदी खात्रीने "अमूक कालावधीत लस उपलब्ध होईल" असे सांगण्यास काय हरकत असावी ? ज्याच्या मनात ह्याबद्दल अजिबात शंका नाही त्यांनी अगदी खात्रीने लग्न झाल्यावर अमूक इतक्या कालावधीत मूल होईलच असं असे सांगण्यास काय हरकत असावी ?
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Sat, 05/09/2020 - 14:32 नवीन
ज्याच्या मनात ह्याबद्दल अजिबात शंका नाही त्यांनी अगदी खात्रीने लग्न झाल्यावर अमूक इतक्या कालावधीत मूल होईलच असं असे सांगण्यास
अगदी अगदी.. म्हणूनच लग्न झाल्यावर मूल होईलच अशी खात्री कुणीही देवू शकत नाही.. असो.. :)
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 05/08/2020 - 17:19 नवीन
लस म्हणजे प्रतिबंधात्मक औषध असा अर्थ सामान्य लोक घेतात आणि तोच अर्थ योग्य आहे. म्हणजेच त्या आजाराची लस घेतली की भविष्यात तो आजार होणारच नाही. देवी,पोलिओ, हे रोग तर लसीकरण मुळे नष्ट झाले. रेबीज हा आजार वर पण लस आहे पण ती वन्य प्राण्यांनी चावा घेतला नंतर द्यायची असते अगोदर नाही. आणि ती लस पण बर्या पैकी यशस्वी आहे. Tb chi las aahe. Pan ti 100% result det nahi. Maleria, कॉलरा ह्यांची लस नाही पण उपचार यशस्वी आहेत. त्या मुळे corona var las निर्माण नाही झाली म्हणून आकाश कोसळणार नाही. उपचार निर्माण झाले तरी हेतू साध्य होत. आणि corona bara करणारे औषध नक्कीच शोधाल जाईल.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 05/09/2020 - 09:40 नवीन
रेबीज हा आजार वर पण लस आहे या लसीमुळे प्रतिकारशक्ती साधारण फक्त एक वर्ष पर्यंत टिकते. यामुळेच हि लस सरसकट सर्वाना टोचता येत नाही.( पाच इंजेक्शने उगाच कुणालाही टोचण्यात काय हशील आहे?
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Sat, 05/09/2020 - 14:34 नवीन
त्या मुळे corona var las निर्माण नाही झाली म्हणून आकाश कोसळणार नाही. उपचार निर्माण झाले तरी हेतू साध्य होत.
मुद्दा योग्यच आहे..आणि लसपेक्षाही औषध जास्त गरजेचे. कारण लस काही कारणाने घेण्याचे राहून गेले आणि रोग झाला तरी औषधाने बरा करता येईल
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 05/09/2020 - 09:41 नवीन
करोना वर लस जर दोन महिन्यात निर्माण झाली तर? कुबेर याना लस निर्माण होणारच नाही अशा तर्हेचे वक्तव्य करण्याची अजिबात गरज नव्हती. सामान्य माणसांना आपण सांगतो कि करोना मुळे अशाच लोकांचा मृत्यू होतो ज्यांचे वय जास्त आहे किंवा ज्यांना हृदयरोग फुफ्फुस रोग मधुमेह किंवा रक्तदाब आहे. पण माझ्या सारखया डॉक्टरांना वरिष्ठ नागरिक विचारतात डॉक्टर मला मधुमेह आणि रक्तदाब आहे आणि माझे वय ७५ आहे. त्यांना मी लस काही तयार होणार नाही तेंव्हा आता तुम्ही लटकलात असं सांगायचं का? लष्करात एक कायम शिकवले जाते कि NO FIGHT IS LOST TILL YOU HAVE STOPPED FIGHTING त्या ऐवजी येथे मराठी कथालेखक लस तयार होणारच नाही हे कुबेरांचे वक्तव्य समर्थन करत आहेत हे पाहून आश्चर्य वाटते.
  • Log in or register to post comments
म
मोदक Sat, 05/09/2020 - 10:50 नवीन
सोडा हो डॉक.. मी एक सुचवू का? कुबेर किंवा त्यांच्या अहो रूपम.. अहो ध्वनी फेम समर्थक लोकांना फाट्यावर मारा. ते त्यांच्या स्वतःची मते थोडीच मांडतात..? बाकी माहितीपूर्ण प्रतिसाद वाचत आहेच - त्याबद्दल अनेक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 05/09/2020 - 11:47 नवीन
ते केवळ शक्यता व्यक्त करीत आहेत. ते संशोधन आहे. यशस्वी होईल न होईल त्याचा योग्य अशी ठरलेली तारीख नाही, यशस्वीतेची आज तरी कोणती अधिकृत खात्री नाही, लोकांनी सावधानता बाळगावी लसीवर विसंबून राहण्यात आज तरी अर्थ नाही. बाकी जाऊ द्या तुमच्या धाग्यावरील तुमचे नवे माहितीवरील आधारित प्रतिसाद वाचत आहोत. आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Sat, 05/09/2020 - 14:43 नवीन
त्या ऐवजी येथे मराठी कथालेखक लस तयार होणारच नाही हे कुबेरांचे वक्तव्य समर्थन करत आहेत हे पाहून आश्चर्य वाटते.
जाऊ द्या डॉक्टर साहेब इथे वैद्यकीय ज्ञानापेक्षा मला वाटते मराठी भाषेचे ज्ञान जास्त महत्वाचे आहे. मी काही कुबेर यांचा चाहता नाही. पण "लस येइलच असे नाही इतकंच ते म्हणत आहेत" आणि त्यांच्या म्हणण्यातून तुम्ही "लस येणारच नाही असं कुबेर म्हणत आहेत" असा तुम्ही निष्कर्ष काढत आहात. कदाचित कुबेरांवर काही राग असेल, हरकत नाही ,कुबेरांना बाजूला ठेवा "लस येईलच" (म्हणजे योग्य वेळेत येईल) असे ठामपणे म्हणता येईल का इतकाच मुद्दा आहे.. बाकी कुबेरांचे अग्रलेख मागे घेणे वगैरे गोष्टी तशा अवांतरच म्हणाव्यात ना (तसं. थोडं अवांतर म्हणजे तरीही तो अग्रलेख लाखो लोकांपर्यंत पोहोचलाच आणि आजही बहूधा ई पेपरमध्ये उपलब्ध असावा ..पण ते सगळं असो)
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Sat, 05/09/2020 - 14:52 नवीन
लष्करात एक कायम शिकवले जाते कि NO FIGHT IS LOST TILL YOU HAVE STOPPED FIGHTING
अगदी योग्य.. पण लस आली नाही म्हणून "लढाई हरलो किंवा हरु" असंही नाही..योग्य ती काळजी, प्रभावी उपचार यांच्या सहायाने आजार दूर ठेवता येईल किंवा झाला तरी रुग्ण बरा होईल. मला पुन्हा पुन्हा द. कोरियाचे नाव घ्यावेसे वाटते. त्यांची रुग्णसंख्या ३ एप्रिलपासून दहा हजारांच्या आसपास आहे. या काळात त्यांनी सार्वत्रिक निवडणूकाही घेतल्यात. लस हवीच आहे.. पण ती येईपर्यंत हतबल होण्याची गरज नाही आणि लॉकडाऊन नको आहे. लस आणि लॉकडाऊन दोन्हीच्या अभावातही रोगापासून दूर राहता यायला हवे.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sat, 05/09/2020 - 14:56 नवीन
त्यांच्यासारखी शिस्त आपल्या लोकांत येईल याबद्दल तुम्ही आशावादी आहात काय ?
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Sat, 05/09/2020 - 15:08 नवीन
का नाही ? योग्य शिक्षण मार्गदर्शन , नियमावली , इतर पोषक गोष्टी असल्यात की का नाही शिस्त येणार.. आपण "भारतीय लोक बेशिस्त" ही नकारात्मक मानसिकता बदलायला हवी. मी स्वतः कधी गेलो नाही, पण गँग्टोक येथील स्वच्छता वगैरे बद्दल खूप ऐकून आहे. हे भारतातच आहे ना ? मला स्वतःला पन्हाळागडावरील स्वच्छताही नक्कीच स्पृहणीय (अगदी आदर्श नसेल कदाचित) वाटली.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 05/10/2020 - 14:07 नवीन
आपला आशावाद आवडला !
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Sat, 05/09/2020 - 15:15 नवीन
झालंच तर भारतीयच काय तेवढे बेशिस्त आहेत असं नाही. कोरोना व्हायरस पार्टीबद्दल तुम्ही ऐकलं आहे का ? https://en.wikipedia.org/wiki/Coronavirus_party
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 05/10/2020 - 17:43 नवीन
कुबेरांच्या लेखाचा उद्देश कदाचित सावधगिरीचा असावा, त्यांच्या लेखावर माझा तेवढा आक्षेप नाही पण उपरोक्त चर्चेत २ तार्कीक उणीवा जाणवल्या १) दुसर्‍यांच्या चुकीने आपल्या चुकीचे (म्हणजे युरोपीयनांच्या चुकीने भारतीयांच्या चुकीचे समर्थन होत नाही) २) अपवादाने नियम सिद्ध होत नाही, शिस्तबद्ध सार्वजनिक वर्तनात स्वच्छता पालन इत्यादीत भारतीयांचे रेकॉर्ड सर्वसाधारणपणे आदर्श समजावे असे राहीलेले नाही किंवा कसे.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Sun, 05/10/2020 - 20:35 नवीन
दुसर्‍यांच्या चुकीने आपल्या चुकीचे (म्हणजे युरोपीयनांच्या चुकीने भारतीयांच्या चुकीचे समर्थन होत नाही)
काहीही.. मी समर्थन वगैरे केले नाही.. फक्त इतकंच म्हणत आहे की भारतीय समाजच तेवढा बेशिस्त असं वगैरे काही नाहीये (कारण असं मानलं की पुढे येते ती निराशा, भारतात काही धड होवू शकणार नाही वगैरे निराशावाद) ...तर प्रत्येकच समाजात कमी अधिक प्रमाणात बेशिस्तीचा गुण आढळतो. जपानसारख्या देशात असा बेशिस्तपणा फारच अभावाने आढळेल कदाचित तर फ्रान्स , स्पेनसारख्या देशात काही अधिक प्रमाणात (कदाचिता भारतीय समाजाशी तुलना होवू शकेल)
अपवादाने नियम सिद्ध होत नाही
हा ज्याचा त्याचा दृष्टीकोन आहे. जिथे गोष्टी खराब आहेत तिथे आपण निराश होतो आणि जिथे चांगल्या आहेत त्याकडेही "नियमाला अपवाद" म्हणून बघतो. मला वाटते हा नकारात्मक दृष्टीकोन होईल. ..त्यापेक्षा जिथे गोष्टि चांगल्या आहेत त्याकडे एक चांगले उदाहरण , रोल मॉडेल वा "होय आम्ही ही हे करु शकतो " या दृष्टीने पाहिले आणि जिथे गोष्टी खराब आहेत तिथे "सुधारणेस बराच वाव आहे" असे म्हंटले तर गोष्टी सुधारु शकतात... वेळ लागेल , पण सुरुवात तर व्हावी.. पण "चांगले काही होणारच नाही" असा नकारात्मक दृष्टीकोन ठेवला तर मग अजिबातच होणार नाही.
कुबेरांच्या लेखाचा उद्देश कदाचित सावधगिरीचा असावा, त्यांच्या लेखावर माझा तेवढा आक्षेप नाही पण उपरोक्त चर्चेत २ तार्कीक उणीवा जाणवल्या
कुबेरांच्या लेखावरील प्रतिसाद आणि वरील माझा प्रतिसाद यांचा काही संबंध नाही. दोन्ही वेगळे विषय आहेत.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा