मिलिंदमिलन
नशिबात पापण्यांच्या मिटणे अजून नाही
धुरळाही द्वारकेचा का दारात येत नाही
ग्रीष्मात वाहते यमुना भिजे विरहात ओली
नयनांत राधिकेच्या अश्रू दिसणार नाही
"क्षण एक आसवांचा झेलू अशी कशी मी
अवचित येई स्वारी पाहू त्याला कशी मी?
हृदयातल्या रणाला थांबवू आता कशी मी
झाकूनही दिसावी त्या मूर्तीस लपवू कशी मी?"
मग कृष्णही महाली तुळशीस काही सांगे
अंगणात राधिकेच्या रुजले नवीन धागे
देहात पाकळ्यांच्या सजली अशी कळी ती
गोकुळीचे सुगंधी श्वास द्वारकेस जाती
माया त्याची स्वयंभू भ्रमरात कृष्ण होई
गुंजारवे अलिच्या बासरीच ऐकू जाई
गात्रीं येता गहिवर हृदयाची होई घाई
किरणे टाकीत मागे हरी वृंदावनी येई
येता मिलिंदमाधव कळी आसवांत न्हाली
थबके काळही थोडा युगं क्षणांची लोटली
गळल्या पाकळ्या साऱ्या राधाही न उरली
'मी'पणास त्यागुनी ती श्रीहरीमनीं मुरली
- अभिजीत
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सावरकर सावरकर सावरकर