जावे फेरोंच्या देशा - भाग ७ : अबू सिम्बल
भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ भाग १२ भाग १३ भाग १४
२३ सप्टेंबर २०१८
पहाटे ३ वाजता रिसेप्शन वरून फोन आला, "तुमची अबू सिम्बल टूर ची बस २० मिनिटात पोहोचते आहे. वेळेत खाली येऊन थांबा.' आठव्या मिनिटाला आम्ही दोघे खाली येऊन थांबलो. तिथे आमचा नाश्ता पाकिटांत भरून तयार ठेवला होता. ३:२५ पर्यंत बस आली. छोटीशी आपल्या १७ सीटर TT पेक्षा पण लहान अशी. बऱ्यापैकी सगळ्या सहप्रवाश्यांना गोळा करून मग आम्हाला घेऊन अबू सिम्बल च्या दिशेने पळू लागली. रस्ता फार छान होता. एक दोन चेकपोस्ट मागे टाकून मुख्य रस्ताला लागलो. ३ तासाच्या प्रवासात उरलेली झोप वसूल केली आणि बस अबू सिम्बल गावामध्ये शिरतांनाच जाग आली. छोटेखानी नीटनेटकं गाव मागे पडलं आणि गाडी अबू सिम्बल मंदिराच्या आवारात शिरली. तिकीट घेऊन सिक्युरिटी चेक झाल्यावर एका टेकडीसमोर आलो आणि आखून दिलेल्या रस्त्याने चालू लागलो. उजव्या हाताला निळाशार नासर लेक डाव्या हाताला टेकडी. थोडं पुढे आल्यावर मंदिराची समोरची बाजू दिसू लागली. इजिप्तचा सर्वात जास्त म्हणजे ९० वर्षांपर्यंत जगलेल्या फेरोने, रॅमसिस दुसरा याने बांधलेलं हे स्वतःचं मंदिर. सुरवातीलाच त्याचे ४ पुतळे आयुष्याच्या ४ अवस्था दर्शवतात; बाल्य, तारुण्य, प्रौढ आणि वृद्ध (चारही पुतळ्यांमध्ये रॅमसिस मात्र सारखाच दिसतो हा भाग वेगळा). चार पैकी एका पुतळ्याचा चेहरा दगडात चीर जाऊन बऱ्याच वर्षांपूर्वी केव्हा तरी खाली पडलेला आहे. या चार पुतळ्यांशिवाय अजूनही काही पुतळे आहेत. रॅमसिसची पट्टराणी नेफरटारी, आई टुया आणि त्याची लेकरं वगैरे. पण कोणाच्याही मूर्तीची उंची रॅमसिसच्या गुढघ्यापेक्षा जास्त नाही. फेरोंना सर्वोच दाखवण्याचा हा अजून एक नमुना. अशी उदाहरणे संपूर्ण इजिप्तभर पाहायला मिळतात.
आत गेल्यावर मोठ्या हॉल मध्ये 'ओसायरिस' गॉड ऑफ अंडरवर्ल्ड (अर्थात मृत्यूनंतरच्या साम्राज्याचा देव) च्या ४-४ मूर्त्या दोन्ही बाजुंना उभ्या दिसतात. छतांवरील बार्स रिलीफ मधून काही युद्धाचे प्रसंग दाखवले आहेत ज्यात फेरो (साहजीकच) विजयी होतं आहे. मुख्य हॉल मधून पलीकडे अजून काही खोल्या आहेत ज्यात रॅमसिस आणि नेफरटारी वेगवेगळ्या देवांना नैवेद्य, भेटवस्तू देतांना दाखवले आहेत. अतिशय सुंदर काम आहे हे. मंदिराच्या सगळ्यांत शेवटच्या दालनात आहे अमुन, रॅमसिस, रा आणि प्ताह यांच्या मूर्ती. मंदिराची रचना अशी केली गेली होती कि २१ फेब्रुवारी रॅमसिसचा जन्मदिवस आणि २१ ऑक्टोबर रॅमसिसचा राज्याभिषेकाचा दिवस या दोन्ही दिवशी पहिली सूर्यकिरणे थेट अमुन, रॅमसिस आणि रा यांच्या चेहऱ्यावर पडतील आणि प्ताह पाताळाचा देव असल्याने कायम अंधारात असेल. मला कोल्हापुरातील किरणोत्सवाची आठवण झाली. आणि भारतीय-इजिप्शियन संस्कृती मधील अजून एक समान धागा सापडला.
रॅमसिसच्या मंदिराशेजारीच थोड्या अंतरावर नेफरटारी आणि देवी हॅथॉरचं मंदिर दिसतं. इजिप्त मध्ये राण्यांची मंदिरे फार कमी दिसतात. सर्वांत पहिले मंदिर फेरो आखेनतेन याने आपली राणी नेफेर्तीती साठी बांधलेले आढळते. अबु सिम्बल येथील हे दुसरे मंदिर. या मंदिराच्या आत सुद्धा सुंदर बार्स रिलीफ आहेत. काही ठिकाणी रॅमसिस इजिप्ती देवतांना भेटवस्तू देताना तर काही ठिकाणी देवता त्याला आशिर्वाद देतांना. खांबांवर ठिकठिकाणी हॅथॉरचे मुखवटे लावलेले आहेत. हॅथॉर हि सौंदर्य, प्रेम आणि मातृत्वाची देवता. हिला इजिप्त मध्ये काही ठिकाणी गायीच्या स्वरूपात पण दाखवले जाते आणि बाकी ठिकाणी तिच्या मुखवट्याला गायीचे कान असतात. रिलिफ्स मधून हॅथॉरच्या मुकुटावर गायीची शिंगे, मधोमध सूर्य आणि भोवतीने साप असे दाखवले आहे.
निळ्याशार नासर लेक ने तीन बाजूने मंदिराला घेरलं आहे. पण हे मंदिर इथे आलं कसं याची गोष्ट फार रोचक आहे. आफ्रिकेची जीवनदायिनी नील नदीवर असलेल्या जुन्या आस्वान धरणाच्यावर अजून एक नवीन मोठं धरण बांधायचा निर्णय प्रेसिडेंट नासर यांनी घेतला. वीज निर्मिती आणि शेतीसाठी हा प्रोजेक्ट फार महत्वाचा होता. पण धरणाच्या बॅक वॉटरमुळे आस्वानच्या दक्षिणेकडील जवळपास ५५० किलोमीटरचा प्रदेश पाण्याखाली जाणार होता, आणि यात समाविष्ट होती अनेक पुरातन मंदिरे आणि एक संपूर्ण नुबीयन संस्कृती. नुबीया मधील लोकं आपली राहती घरं सोडून आस्वान मध्ये स्थायिक होणार होते. पण मंदिरांचं काय? मंदिरांच्या पुनर्वसनासाठी नासर यांनी युनेस्को कडे मदत मागितली. युनेस्को ने जगभरात आवाहन केल्यावर जवळपास ३० देश इजिप्तच्या मदतीला आले.
या प्रोजेक्टच्या अंतर्गत अबू सिम्बल इथली रॅमसिस आणि नेफरटारीची मंदिरे, आस्वान हाय डॅम च्या एका बाजूस वसवलेलं फिलाई मंदिर, आणि दुसऱ्या बाजूला वसवलेलं कलाबशा मंदिर या मोठ्या मंदिरांसोबतच अजून ३ लहान मंदिरे धरण क्षेत्रातून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली. प्रत्येक मंदिर हे मोठ्या तुकड्यांत कापून, त्या प्रत्येक तुकड्याला नंबर देऊन, नवीन ठिकाणी नेऊन परत जोडलं आहे. आणि हे काम इतक्या शिफातीने केलं आहे कि ना कुठे मंदिराचे दगड कापल्याच्या खुणा आहेत ना कुठे ड्रिल केल्याच्या खुणा आणि कुठेही दगडांना जोड दिल्याचं दिसतं. हि मंदिरे हलवतांना प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी ठेवली गेली आहे. अगदी रॅमसिसच्या ४ पैकी एका पुतळ्याचा पडलेला चेहरा सुद्धा जसा पूर्वी त्याच्या पायथ्याशी होता, हुबेहूब इथे ठेवला आहे. या संपूर्ण प्रोजेक्टला संपायला ५ वर्ष लागली. इथे सापडलेल्या काही मूर्त्या कैरोच्या इजिप्तशियन म्युसिअम मध्ये ठेवण्यात आल्या तर इतर ४ मंदिरे इजिप्तने या प्रोजेक्ट मध्ये मोठ्या प्रमाणात मदत केलेल्या स्पेन, नेदरलँड, इटली आणि अमेरिका या ४ देशांना भेट दिले. नॅटजिओच्या वेबसाईटवर या प्रोजेक्टची फार छान माहिती दिली आहे ती इथे नक्की बघा.
https://www.nationalgeographic.com/archaeology-and-history/magazine/2019/07-08/egyptian-temples-excavation-abu-simbel/
मंदिरे पाहून झाल्यावर आम्ही ब्रेकफास्ट बॉक्स उघडला. तोच लांबुळका ब्रेड, बटर आणि जॅम, सोबतीला फ्रुट ज्युस आणि उकडलेली अंडी असं सगळं रिचवून आम्ही मंदिराच्या आवारात चक्कर मारली. अबू सिम्बल मधून बाहेर पडायला १०:३० वाजले, १ पर्यंत परत आस्वान. जातांना मात्र झोपलो नाही. आजूबाजूचा रस्ता आणि वाळवंटी प्रदेश बघत होतो. ठिकठिकाणी चेक पॉईंट्स होते आणि प्रत्येक चेकपॉईंट वर सध्याच्या राष्ट्रपतींचा अब्देल फत्ताह अल-सिसी यांचा मोठा फोटो दिसला. मुस्तफाने सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती मिलिटरी बॅकग्राऊंडचे असल्याने सेनेचा अंमल जरा जास्तंच जाणवतो, आणि ते या चेकपॉइंट्स वर दिसून येत होतं.
१ च्या सुमारास हॉटेलवर पोहोचलो आणि तडक रुफटॉप रेस्टॉरंट गाठलं. इथून दिसणारा नील नदीचा नजारा फार सुंदर होता. मध्यान असली तरी नदीवरून येणारा गार वारा सुखावत होता. नुबीयन जेवण आणि सोबत चिकन आणि फिश ग्रील मागवले. जेवण झाल्यावर थोडी ताणून दिली आणि ५:३० वाजता परत नदीचा किनारा गाठला. मुस्तफाने एक फेलुका आधीच बुक करून ठेवली होती. फेलुका चालवणाऱ्याचं नाव पण मुस्तफाच होत. एक म्हातारा नुबीयन. ज्याला नदीवर, धरणावर राग नव्हता तर प्रेमचं होतं, जरी त्याचं घर जमीन सध्या पाण्याखाली गेलं असलं तरी.
फेलुका नदीच्या पाण्यावर तरंगू लागली, आणि जणू तीच आणि नदीचं हितगुज सुरु झालं. लहान लहान लाटांवरून फेलुकाचा प्रवास सुरु होता, अगदी शांततेत. अधून मधून गल पक्षी फेरी मारून जात होते. एलिफंट बेटाला संपूर्ण फेरी मारून परत येई पर्यंत सूर्यास्ताची वेळ झाली होती. दीड तास कसा गेला कळलंच नाही.
संपूर्ण दिवसात जे बघितलं होत, मानवाच्या कामाच्या विविध छटा अनुभवल्या होत्या, त्यामुळे फार समाधानी वाटत होत.
उरलेलं आस्वान दुसऱ्या दिवशी मुस्तफा सोबत बघायचंच ठरवून, we called it a day!
क्रमश:
२३ सप्टेंबर २०१८
पहाटे ३ वाजता रिसेप्शन वरून फोन आला, "तुमची अबू सिम्बल टूर ची बस २० मिनिटात पोहोचते आहे. वेळेत खाली येऊन थांबा.' आठव्या मिनिटाला आम्ही दोघे खाली येऊन थांबलो. तिथे आमचा नाश्ता पाकिटांत भरून तयार ठेवला होता. ३:२५ पर्यंत बस आली. छोटीशी आपल्या १७ सीटर TT पेक्षा पण लहान अशी. बऱ्यापैकी सगळ्या सहप्रवाश्यांना गोळा करून मग आम्हाला घेऊन अबू सिम्बल च्या दिशेने पळू लागली. रस्ता फार छान होता. एक दोन चेकपोस्ट मागे टाकून मुख्य रस्ताला लागलो. ३ तासाच्या प्रवासात उरलेली झोप वसूल केली आणि बस अबू सिम्बल गावामध्ये शिरतांनाच जाग आली. छोटेखानी नीटनेटकं गाव मागे पडलं आणि गाडी अबू सिम्बल मंदिराच्या आवारात शिरली. तिकीट घेऊन सिक्युरिटी चेक झाल्यावर एका टेकडीसमोर आलो आणि आखून दिलेल्या रस्त्याने चालू लागलो. उजव्या हाताला निळाशार नासर लेक डाव्या हाताला टेकडी. थोडं पुढे आल्यावर मंदिराची समोरची बाजू दिसू लागली. इजिप्तचा सर्वात जास्त म्हणजे ९० वर्षांपर्यंत जगलेल्या फेरोने, रॅमसिस दुसरा याने बांधलेलं हे स्वतःचं मंदिर. सुरवातीलाच त्याचे ४ पुतळे आयुष्याच्या ४ अवस्था दर्शवतात; बाल्य, तारुण्य, प्रौढ आणि वृद्ध (चारही पुतळ्यांमध्ये रॅमसिस मात्र सारखाच दिसतो हा भाग वेगळा). चार पैकी एका पुतळ्याचा चेहरा दगडात चीर जाऊन बऱ्याच वर्षांपूर्वी केव्हा तरी खाली पडलेला आहे. या चार पुतळ्यांशिवाय अजूनही काही पुतळे आहेत. रॅमसिसची पट्टराणी नेफरटारी, आई टुया आणि त्याची लेकरं वगैरे. पण कोणाच्याही मूर्तीची उंची रॅमसिसच्या गुढघ्यापेक्षा जास्त नाही. फेरोंना सर्वोच दाखवण्याचा हा अजून एक नमुना. अशी उदाहरणे संपूर्ण इजिप्तभर पाहायला मिळतात.
डावीकडील रॅमसिसचे उजवीकडील नेफरटारीचे
रॅमसिसचे मंदिर प्रवेश्द्वार
ओसायरिस
मंदिरातील रिलिफ्स
मंदिरातील रिलिफ्स
मंदिरातील रिलिफ्स
अमुन, रॅमसिस, रा आणि प्ताह
नेफरटारीचे मंदिर
मंदिरातील रिलिफ्स
मंदिरातील रिलिफ्स
मंदिरातील रिलिफ्स
खांबांवरील हॅथॉर
रॅमसिस, हॅथॉर आणि नेफरटारी
नासर जलाशय
नील नदी रुफटॉप रेस्टॉरंट मधून
नुबियन जेवण आणि ग्रील
फेलुका
सूर्यास्त
क्रमश:
न इंजिनची घरघर न अजून मशीनचा आवाज न प्रदूषण!अगदी. फक्त हलक्या लाटांचा चुबुक चुबुक आवाज. आणि इंजिन नसल्याने पाण्यावर तेलकट थर सुद्धा नसतो. तो पिटा ब्रेडचा भाऊ आईश बलादी आहे. दिसायला पिटा सारखा असला तरी चवीत जरा फरक असतो, कारण यात गव्हाच्या लोंब्याची पूड घातलेली असते.