तुझे शहर
तुझ्या नकळत तुझे शहर फिरून आलेय –
डोळे न उघडता तुला पाहून आलेय
रस्ते ओलांडताना तुझा हात धरला आहे –
तुझा हात घामेजला आहे
मंदिरातले कासव ओलांडले आहे –
तुझ्या हातावर तीर्थ ठेवले आहे
दर्ग्यातल्या जाळीतून डोकावले आहे –
लोबानचा गंध दरवळत आहे
मिठाईच्या दुकानात इमरती घेतली आहे –
हात चिकट, तोंड गोड झाले आहे
भर बाजारात चिक्कीच्या बांगड्या घेतल्या आहेत –
तुझे डोळे चमकत आहेत
रसवंतीत पांढऱ्या मिशीचा रस प्याले आहे –
तुझा रुमाल पुढे, हसू मागे आहे
त्या झाडाखाली क्षणभर थांबलो आहोत –
तू सावली, मी नि:श्वास झालो आहोत
लाचा घेताना मी गोंधळले आहे –
तू म्हणतोस, रंग जाऊ दे, आठवणी राहू देत
‘हेच तुझे घर का?’ मी विचारले आहे –
हातात हात घेऊन तू मौन राखले आहेस
अर्ध्यामुर्ध्या नदीत मी पाय सोडले आहेत –
तू डोळ्यांत नदीला वाट दिली आहेस
‘मी वर्तमानात बोलते’ मी उगाच म्हणते –
‘तू कुठे माझा भूतकाळ आहेस!’ तुझा खोल श्वास बोलतो
तुझ्या नकळत तुझे शहर फिरून आलेय –
डोळे न उघडता तुला पाहून आलेय
-शिवकन्या
तू डोळ्यांत नदीला वाट दिली आहेसहे खास आवडले