Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

"मराठ्यांचा गौरवशाली इतिहास सांगणारी डोंगरयात्रा"

द
दिलीप वाटवे
गुरुवार, 03/14/2019 - 18:29
💬 18

'आंबेनळी ऊर्फ उंबरखिंड आणि कुरवंडा घाट'

खरं म्हणजे दर महिन्याला तुम्ही कितीही ट्रेक करत असलात ना तरीसुद्धा तुमचा एखादा ड्रीम ट्रेक असा नक्की असतो की, तुम्ही कितीही ठरवलंत तरी तुमचा तो नाही म्हणजे नाहीच होत. आमच्या उंबरखिंडीच्या ट्रेकचंही अगदी असंच झालं होतं. खरं तर जिथून हा ट्रेक सुरु होतो ते कुरवंडे गाव घरापासून तासाभराच्या अंतरावर. त्यामुळं वनडे शॉट सहज शक्य होता. तरीसुद्धा या ट्रेकला काही केल्या मुहूर्त लागत नव्हता. पण यावेळी मात्र हट्टाला पेटून हा ट्रेक करायचाच असं ठरवलं आणि हां हां म्हणता एकोणीस जण तयार झाले. मग या ट्रेकसाठी दिवसही लवकरचाच ठरला, रविवार, १० मार्च. नऊ मार्चला संध्याकाळी निघून कुरवंड्यात मुक्काम करायचा आणि दहा मार्चच्या सकाळी लवकर नागफणी ऊर्फ नागरगिरी पहायचा. आंबेनळी घाटवाट उतरून उंबरखिंडीच्या स्मारकापर्यंत जायचं आणि कुरवंडे घाटाने परत कुरवंड्यात यायचं असा एकंदरीत साधा सोपा प्लॅन ठरला होता. ट्रेकच्या आठवडाभर आधी, किती वाजता निघायचं? कसं जायचं? कुठं रहायचं? जेवणाखाण्याच्या सोयी वगैरे गोष्टींवर आम्ही चिंचवडकर मंडळींनी एकत्र भेटून चर्चा केली होती. त्यावेळी या ट्रेकला निदान लोणावळ्यापर्यंत तरी लोकलने जाऊया असं सर्वानूमते ठरलं होतं. अगदी सुरवातीच्या काळातलं माझं स्वतःचं ट्रेकींग हे एसटी, लोकलनेच व्हायचं. पण नंतरच्या काळात स्वतःची गाडी घेऊन ट्रेकला जाणं परवडायला लागल्यावर बाकी या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा विसरच पडला होता. ट्रेकसाठी घरून पाठीवर सॅक घेऊन निघायचो त्यावेळी आजूबाजूचे लोक अगदी वळून वळून पहात. त्यांच्या नजरेत 'हा अजब काहीतरी करतोय' असंच दिसत असे. एवढंच नाही तर पीएमटीत अगदी सॅकचा चुकून धक्का जरी लागला तरी सगळेच समजून घेत. बऱ्याचवेळा तर काही जण स्वतः उठून बसायलाही जागा करून देत. पीएमटीचा तो प्रवास करून एसटी स्टँड वेळेत गाठायचं आणि मग स्टँडवर एसटी लागली की तिच्यात सर्वात आधी घुसून जागा पकडायची हे सगळं म्हणजे एक मोठा 'टास्क' च असायचा. फायद्याची गोष्ट ही की ज्या एसटीतुन आम्ही जायचो त्या एसटीतल्या स्थानिकांना आम्ही त्यांच्यातलेच वाटत असू त्यामुळं त्या भागातले पाणवठे, नवीन वाटा, राहण्याची ठिकाणं वगैरे माहिती त्यांच्याकडून अगदी सहज समजत असे. करमणूक म्हणून गाडीत भेंड्यांचा फड जमवणं, ट्रेक संपल्यावर धावतपळत शेवटची एसटी पकडून वेळेत घर गाठणं आणि एवढे सगळे उपद्व्याप करून दुसर्‍या दिवशी न चूकता कामावर हजर राहणं हे कुठंतरी हरवलं होतं. त्यामुळं पूर्वीच्या 'त्या' दिवसांची थोडीतरी आठवण पुन्हा यावी म्हणून या ट्रेकला लोणावळ्यापर्यंतचा प्रवास तरी लोकलने करायचं ठरवलं होतं. शनिवारी संध्याकाळी पुणे स्टेशनवरून लोणावळ्याला जाणार्‍या सातच्या लोकलला सगळे भीडू आपापल्या सोयीस्कर स्टेशनवर बसले. तसं तर सगळेजण एकाच डब्यात बसूया असं ठरवलं होतं पण गर्दी एवढी होती की ते काही शक्य झालं नाही. नाही म्हणायला आम्हा चिंचवडकरांना बाकी एकाच डब्यात घुसायला जागा मिळाली. लोकल जसजशी लोणावळ्याकडे जाऊ लागली तसतशी गर्दी कमी होऊ लागली आणि हळूहळू ट्रेकच्या गप्पांना सुरूवात झाली. मग काय आजूबाजूचे पुर्वाश्रमीचे ट्रेकर प्रवासी हळूहळू जागे झाले आणि आमच्या गप्पांमधेही सामील झाले. त्यामुळं मग लोणावळा कधी आलं ते काही समजलंच नाही. . आधीच फोन करून ठेवल्यामुळं आम्हाला कुरवंड्याला घेऊन जाणार्‍या प्रविणच्या दोन सुमोही स्टेशनबाहेर तयार होत्या आणि कुरवंड्यात पोहोचल्यापोहोचल्या विलास बोरकरांकडे गरमागरम घरगुती जेवणाची ताटंही. हे कुरवंडे गाव तसं सुधारलेलं असल्यामुळं लोकसंख्याही बर्‍यापैकी, त्यामुळं सकाळच्या आन्हीकासाठी थोडं लांबवर जावं लागणार होतं. जेवणानंतरची शतपावली करताकरता सकाळची 'सोय' पाहून आलो आणि नवीनच बांधलेल्या मारूती मंदीरात पथार्‍या पसरल्या. रविवार सकाळची आन्हीकं उरकून बरोबर सहा वाजता बोरकरांकडे नाश्त्यासाठी डेरेदाखल झालो. गरमागरम पोहे आणि वर 'अद्रकवाली चाय' पिऊन बोरकरांचा निरोप घेतला. . मारूती मंदीरात नेहमीप्रमाणे आरती केली. . नागफणीच्या आधी बर्‍याच वार्‍या केल्यामुळं कुठेही न चुकता डचेज खालच्या पठारावर पोहोचलो. तिथे काही फोटो काढून नागफणीवर पोहोचलो. . . . नागफणीला अजूनही काही स्थानिक लोक नागरगिरी म्हणतात. त्याच्या माथ्यावरून आम्ही आज करणार असलेल्या ट्रेकचा मार्ग आणि आजूबाजूचा परिसर पाहिला. तसं वातावरण धुरकटलेलं असल्यामुळं फार लांबचं काही दिसलं नाही तरी सुद्धा राजमाची किल्ला, मांजरसुंबा, ढाक, भाम डोंगररांग, भातराशी, विसापुर, लोहगड, तुंग, मोरगिरी, कोरीगड, सालतरचा डोंगर आणि त्याच्या थोडं खाली उजव्या बाजूला तैलबैलाची एक भिंत, मोराडी, आंबेनळीवाडी आणि घाटवाट, घोटावडे तलाव, चावणी, कुरवंडा घाट, गारमाळ, दस्तुरी, प्रबळगड, माथेरान वगैरे व्यवस्थित दिसत होतं. . . आजूबाजूचा सर्व परिसर पाहून नागफणीच्या पायथ्याशी आलो तर समोरच डी.आर.डी.ओ.चं कुंपण दिसलं. ते कुंपण डावीकडे ठेवून पुढं गेलो तसं एका पदरावर उतरलो. त्या पदरावरच थोडी पुढे आंबेनळीवाडी दिसत होती. वाडीच्या थोडं अलिकडं डाव्या बाजूच्या घाटमाथ्यावरच्या खिंडीतून एक नाळ उतरत होती, हीच आंबेनळी ऊर्फ उंबरखिंडीची घाटवाट. . . या आंबेनळीच्या ओढ्यातून खिंडीच्या दिशेने थोडं अंतर चालून गेल्यावर उजव्या बाजूला ऐन घाटवाटेत असलेलं पाण्याचं बांधीव टाकं लागलं. टाक्याच्या पुढे झाडीभरली नाळ चढून जाताना दिसत होती पण ती माथ्यावर आय.एन.एस. शिवाजीच्या कुंपणाजवळ जात होती. खरं तर प्राचीन आंबेनळी घाटवाट नागफणीच्या थोडी दक्षिणेकडून याच नाळेच्या वाटेने आंबेनळीवाडीत उतरते. पण सध्या तिथल्या नौसेनेच्या संरक्षण क्षेत्रामुळं त्या नाळेत काही जाता येत नाही. एवढंच काय तर वाडीतल्या कातकर्‍यांनाही लाकूडफाट्यासाठीही त्यांचे रखवालदार जवळपास फिरकू देत नाहीत. त्यामुळं आता आंबेनळी घाटात जायचं असेल तर कुरवंडा आणि आंबेनळी घाटांच्या एकत्र वाटांनी खालच्या पदरापर्यंत यावं लागतं. पदरात उतरल्यावर पहिली उजवीकडची वाट लागते ती कुरवंडा घाटाची तर सरळ आंबेनळीवाडीकडे जाणारी आंबेनळी घाटाची. वाडीच्या पुढे गेल्यावरही एक वेगळी वाट पाच टाक्यांवरून भेलीव-फल्याणकडे उतरते. आंबेनळीतुन आलेल्या ओढ्याला खालच्या बाजूला एक मोठा दुतोंडी धबधबा आहे त्यामुळं या ओढ्यातुन खाली चावणीला जाता येत नाही. त्यासाठी थोडं पुढं जाऊन आंबेनळी गाठली. . पहिल्या वाडीपासून थोडं पुढं गेल्यावर दुसरी वाडी लागली. . . . . वाडीतल्या घरांपासून खालच्या पठारावर उतरलो. पठाराच्या उजव्या टोकाकडून वाट दाट जंगलातुन खाली उतरू लागली. वाट दिसत होती तरीपण ती फारशी वाहती नसावी. घसाराही खुप होता. . . . त्या वाटेने काळजीपुर्वक उतरून पुढच्या तासाभरात नदी ओलांडुन चावणी गाव गाठलं. . गावात कुठेही न थांबता पुढे डांबरी रस्त्यावरून स्मारकाकडे निघालो. हा रस्ता चावणीतुन उंबरामार्गे पाली-खोपोली रस्त्यावरच्या शेमडी गावात जातो. खरं सांगायचं तर कोकणातल्या उन्हात अशा डांबरी सडकेवरुन चालणं म्हणजे एक शिक्षाच असते. त्या कंटाळवाण्या वाटेवरून दोन-अडीच किलोमीटर चालून गेल्यावर उंबरखिंड स्मारक आलं. लोणावळ्याच्या शिवदुर्ग मित्र आणि चावणी ग्रामस्थांनी एकत्रितपणे हे सुंदर स्मारक उभारलं आहे. . . . . या उंबरखिंडीत मोगल आणि मराठ्यांच्यात फेब्रुवारी १६६१ मधे एक लढाई झाली. ज्या लढाईत मराठ्यांनी मोगलांना चारही मुंड्या चीत केलं. अतिशय तुटपुंज्या असलेल्या मराठ्यांनी सर्वच बाबतीत बलाढ्य असलेल्या मोगलांविरूद्ध विजय मिळवला. कसं काय शक्य झालं हे? काय कारण होतं याचं? तर याचं उत्तर फक्त एकच 'सह्याद्री, सह्याद्री आणि फक्त सह्याद्री'. नेमक्या ज्या ठिकाणी ही लढाई लढली गेली तिथेच सोबत्यांना या लढाईचा प्रसंग डोळ्यासमोर उभा रहावा म्हणून लढाईची पार्श्वभुमी समजावून सांगितली आणि कविंद्र परमानंदकृत शिवभारतातल्या या लढाईसंदर्भातल्या १२९ श्लोकांचा अर्थही समजावून दिला. ज्या ठिकाणी असा गौरवशाली इतिहास घडलाय नेमक्या त्याच ठिकाणी जर तो समजावून सांगितला तर तो जास्त चांगला प्रकारे समजतो असा निदान माझा तरी अनुभव आहे. शास्ताखानाची दक्षिणेचा सुभेदार म्हणून नेमणूक झाल्यावर चाकणचा भुईकोट किल्लाच काय तो फक्त जिंकू शकला होता, तोही अगणित खर्च करून ५६ दिवसानंतर. त्यामुळं चाकणच्या आलेल्या अनुभवावरुन जिंकण्यास अवघड अशा डोंगरी किल्ल्यांच्या नादी लागण्यापेक्षा कोकणपट्टी ताब्यात आणली तर आपोआपच मराठ्यांचं आरमार संपूष्टात येईल अशी शास्ताखानाची अटकळ होती. त्यासाठी त्यानं नुकताच परांड्यावर विजय मिळवून आलेल्या कारतलबखानाला या कोकणाच्या मोहिमेवर नामजाद केलं. हा कारतलबखान शास्ताखानाच्या आज्ञेने कोकणातल्या चौल, कल्याण, भिवंडी, पनवेल आणि नागोठणे वगैरे भाग मोगली अंमलाखाली आणण्यासाठी मोहिमेवर निघाला. त्याच्या सोबत कछप व चव्हाण, अमरसिंह, मित्रसेन आणि त्याचा भाऊ, सर्जेराव गाढे, रायबागीण, जसवंत कोकाटे आणि जाधव असे सरदार मिळून भली मोठी फौज होती. सोबत हत्ती, सामान-सुमान, तोफा आणि उंटही होते. शाहिस्तेखानाच्या मुख्य तळापासून ही फौज तुंगारण्यातुन उंबरखिंडीत आली आणि लढाईला तोंड फुटलं. एका बाजूला मराठ्यांचा सेनापती (नेतोजी?) तर दुसर्‍या बाजूला स्वतः महाराज वाट अडवून उभे होते. आता मात्र कारतलबखानाचं सैन्य कात्रीत सापडलं. खरंतर तुंगारण्यातले लोहगड वगैरे किल्ले मराठ्यांच्याच ताब्यात होते. कारतलबखानाच्या सैन्याला तुंगारण्यातुन जाताना का प्रतिकार झाला नाही? बरं पुरेसे पाणीसुद्धा उपलब्ध नसलेली, अत्यंत अडचणीची, दाट जंगलाची, अरुंद, निर्जन अशी उंबरखिंडीची अवघड घाटवाट त्याला कोकणात उतरायला कुणी सुचविली? एवढ्या मोठ्या सैन्याला ती योग्य होती का? हे त्याला कळलं कसं नाही? आपल्या विरुद्ध मराठ्यांचे मोठे सैन्य उंबरखिंडीत आधीच दबा धरुन बसलेय हे कारतलबखानाला कसं कळू नये? सैन्यासोबत असणारे त्याचे हेर नेमके काय करत होते? तर या सर्व प्रश्नांचं उत्तर एकच आणि ते म्हणजे 'महाराजांचे अजोड डावपेच आणि त्यांचे युध्दकौशल्य'. स्वतःची क्षमता ओळखून शत्रू कल्पनाही करु शकणार नाही असे अजोड डावपेच आखणं आणि ते जसेच्यातसे प्रत्यक्षात उतरवणं. या सर्व गोष्टी त्यांच्या अंगी असलेल्या दूरदृष्टी, प्रगल्भता आणि कल्पनातीत डावपेच आखण्याची क्षमता या गुणांची पुष्टीच देतात. युद्धशास्त्रानुसार आपले उद्दिष्ट साधण्यास अनुकूल असलेले रणक्षेत्र निवडून काढणे व तेथे शत्रूशी लढाई देणे हे सेनापतीचे मुख्य काम व युध्दशास्त्रातील धोरणांच्या अनेक अंगापैकी एक मुख्य अंग आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या मुत्सद्दीपणाने ते साधून घेतलं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. राजकारणाचा युध्दकौशल्याशी किती व कसा निकटचा संबंध असतो याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. कविंद्र परमानंद गोविंद नेवासकरांनी लिहिलेल्या शिवभारतात या लढाईचे सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात... अथ पन्थानमाश्रित्य लोहाद्रेर्द्क्षिणोत्तरम् l वीतभी: स वतारेभे सह्यशैलावरोहणम् ll ६५ ll अर्थ - नंतर लोहगडाच्या दक्षिणोत्तर मार्गाने तो (कारतलबखान) निर्भयपणे सह्याद्री उतरु लागला. एकपद्या तया यान्ती नलिकायंत्रतुल्यया l अभूदतीव स्थगिता वाहिनी सा पदे पदे ll ६६ ll अर्थ - नलिकायंत्रासारख्या(बंदुक) त्या पाऊल वाटेने जात असतां ती सेना पदोपदी अतिशय कुंठीत झाली. अस्मादवाङ्मुखीभूता पताम इति निश्चिता: l नरास्ताम्राननचमूचरा: सह्यमवातरन् ll ६७ ll अर्थ - "ह्या वाटेवरुन अधोमुख होऊन आपण पडूं" अशी खात्री झालेले मोंगल सैन्यांतील लोक सह्याद्रीवरुन खाली उतरले. या युद्धात शेवटी जे व्हायचं तेच झालं. रायबागीणच्या सांगण्यावरुन शरण आलेल्या कारतलबखानाने महाराजांकडे पाठवलेला दुत काय म्हणतो हे एकोणतीसाव्या अध्यायात परमानंदांनी सांगितलेले आहे. हंत द्वित्राण्यहान्यतत्र मया लब्धंन जीवनम् l तस्मादभयदानेन देहि मे मम जीवनम् ll ३१ ll अर्थ - काय सांगावे! दोन तीन दिवस मला येथे पाणीसुद्धा प्यावयास मिळालें नाही; म्हणून अभयदान देऊन मला जीवदान दे. तलातलमिवासाद्य सह्याचलतलस्थलम् l विररामश्चिरं चित्ते विस्म्रामश्च पौरुषम् ll ३२ ll अर्थ - सह्याद्रीच्या जणूं काय पाताळासारख्या खोल तळास येऊन आम्ही मनांत दीर्घ काळ स्तिमित झालों आहोंत व पराक्रमसुद्धा विसरलो आहों! तद् वितीर्थ स्वसर्वस्वमात्मनमनवस्करम् l चिकीर्पामि महाबाहो जीवन् जिगमिषामि च ll ३६ ll अर्थ - म्हणून, हे महाबाहो, मी आपलें सर्वस्व आपणास अर्पण करुन आपल्या अपराधाचें क्षालन करुं इच्छितों आणि जिवंतपणे जाऊं इच्छितों. अशा या उंबरखिंडीच्या युद्धात शाहिस्तेखानाच्या सैन्याने सपाटून मार खाल्ला. हा तडाखाच इतका जबरदस्त होता की पुढची दोन वर्षे म्हणजे अगदी महाराजांनी लालमहालावर छापा घालेपर्यंत त्याने अजिबात डोके वर काढले नाही. 'युद्धस्य कथा रम्या' हे कितीही बरोबर असलं तरीसुद्धा इतिहासातुन वर्तमानात तर यावंच लागणार होतं. घड्याळ अकरा वाजल्याचे दाखवत होते त्यामुळं आता बाकी घाई करावी लागणार होती. आमचा अर्धा ट्रेक या ठिकाणी पूर्ण झाला होता आणि परतीचा प्रवासाला आता सुरूवात करायची होती म्हणून आल्या वाटेनेच परत फिरून चावणी गाठलं. गावात पोहोचल्यावरच जेवण करायचं ठरवलं होतं त्यामुळं एक गोष्ट चांगली होणार होती ती म्हणजे जेवल्यावर संपलेल्या बाटल्यांमधे पुन्हा पाणी भरून घेता येणार होतं. घाट चढून जायचा असल्यामुळं पिण्यासाठी पाणी प्रचंड लागणार होतं. एकदा का चावणी सोडलं की पुढं आम्हाला कुरवंडेपर्यंत ते अजिबात मिळणार नव्हतं. गावात पोहोचलो तेव्हा गावातल्या मंदीरासमोर काही मुलं क्रिकेट खेळत होती. त्यांना जेवायला कुठं बसता येईल विचारल्यावर त्यांनी समोरच असलेला गावकीचा हॉल उघडून दिला, स्वच्छ आणि डोक्यावर पंखे असलेला. तिथे गृहलक्ष्मीने 'प्रेमाने' दिलेल्या सुग्रास जेवणाचा आस्वाद घेतला. . . जेवणं झाल्यावर थोडी वामकुक्षी पण घेतली कारण पुढली घाटवाट चढून जाण्यापूर्वी ते अत्यंत गरजेचं होतं. . ट्रेकमधे आम्ही जाता-येता शक्यतो वेगवेगळ्या मार्गांचा वापर करतो. त्यानं होतं काय की दोन्ही वाटा पाहता येतात. येताना आम्ही आंबेनळी ऊर्फ उंबरखिंडीच्या वाटेने उतरून आलो होतो आणि आता घाटमाथ्यावर चढून जाताना कुरवंडा घाटाच्या मार्गाने जाणार होतो. त्यामुळं चावणीतुन बाहेर पडून कुरवंडा घाटाच्या मार्गाला लागलो. या कुरवंडा घाटालाच स्थानिक लोक 'भवनकण्याची वाट' म्हणतात. आपल्या शरीरात पाठीचा कणा जसा आधार देण्याचं काम करतो ना तसं हे कणे जणूकाही सह्याद्रीलाच आधार देत आहेत असं कोकणातुन पाहताना वाटतं. घाटमाथ्यापासून कोकणात एखाद्या कण्याप्रमाणे जे दांड किंवा डोंगरधारा उतरल्या आहेत त्यावरच्या घाटवाटांच्या नावात 'कणा' आहे. भोर जवळच्या वरंध घाटाजवळ जसे 'चिकणा' आणि चोरकणा' आहेत ना, तसंच इथं 'भवनकणा' आहे. बळीराजाचं पेरणीपूर्वी भातखाचरं भाजून घेणं सुरू झालं होतं. ठिकठिकाणी धुराचे लोट आकाशात झेपावताना दिसत होते. ते ओलांडून भवनकण्याच्या पायथ्यात पोहोचलो. . . घाटवाटेकडे पाहिल्यावर एकूणच ही वाट चढून जाताना त्रासदायक होणार हे नक्की होतं. त्याचं कारणही तसंच होतं. एकतर आम्ही दुपारच्या टळटळीत उन्हात, जवळजवळ साठ अंशाचा कोन असलेल्या आणि वाटेवर झाडी अजिबातच नसलेल्या डोंगरसोडेंवरून चढून जाणार होतो. दुसरं असं की या संपूर्ण घाटवाटेवर 'गेल इंडीया' नी खोदकाम करून गॅसची पाइपलाईन टाकली आहे आणि कुणी तिला धक्का लावू नये म्हणून त्यावर काँक्रीट पण अंथरलं आहे. त्यानं झालं काय की वरून सुर्यरावांचा चटका नी खालून तापलेलं काँक्रीट. बरं वाट तरी चांगली होती, तर तीही काँक्रीटची वाळू जागोजाग निघून आल्यामुळं घसरडी झाली होती. एवढं सगळ्यात निदान वारं तरी होतं? छे, तेही बहूदा दुपारचं वामकुक्षी करायला गेलं होतं. शंभर पावलं चालून गेलो नाही तर थांबावं लागत होतं. उठत-बसत पाण्याचे, पन्ह्याचे घोट घेत हळूहळू चढून जात होतो. . . घाटाच्या पायथ्याशी टोपीत ठेवलेली हिरवीगार झाडाची पानं दोन तासातच पूर्णपणे वाळून गेली होती. प्यायचं पाणीही अंघोळ करता येईल इतकं गरम झालं होतं. त्यामुळं वाट कधी एकदा संपतीये अगदी असं झालं होतं. मजल-दरमजल करत असं चारएक तास चालल्यावर घाटमाथ्यावर नागफणीच्या पायथ्याशी असलेल्या डेरेदार झाडाखाली विश्रांतीसाठी थांबलो. थांबलो काय लवंडलोच. . घड्याळात पाहिलं तर सव्वाचार वाजले होते. इथून पुढं थोडी घाई केली तर ०५.२५ ची लोणावळा-पुणे लोकल मिळू शकत होती. सोबत्यांना याबद्दल कल्पना दिली तर सर्वांनीच ती लोकल पकडण्याची गोष्ट उचलून धरली. घाईघाईत कुरवंडे गाठलं. चहा पिण्यासाठी सुद्धा वेळ न घालवता सुमोतुन लोणावळा स्टेशनात आलो तर समोरच लोकल उभी असलेली दिसली. तिकीट काढलं आणि धावतपळत जाऊनच ती पकडली. सगळे बसत नाही तोवरच ती सुटलीसुद्धा. पण या सगळ्या केलेल्या धावपळीमुळं आमचा एक तास नक्कीच वाचला होता. त्यामुळं कधी नव्हे ते सगळेजण ट्रेक करून 'सातच्या आत घरात' होते. लोकलमधून घरी परतताना उंबरखिंडीबद्दल मनात बरेच प्रश्न घोळत होते. उंबरखिंडीतली लढाई नेमकी कुठल्या ठिकाणी झाली? शिवभारतातल्या संदर्भाशी ताडून पाहिलं तर सध्या जिथं स्मारक आहे ती जागा विसंगत वाटते. मग सध्या जिथं स्मारक आहे त्या एकाच जागेवरून चावणी परिसरातुन बाहेर पडता येतं. बाकी चहूबाजूंनी चावणीला डोंगरांनी वेढले आहे. मग बरोबर स्मारकाच्याच ठिकाणी लढाई झाली की दुसरीकडे कुठे? ही लढाई फेब्रुवारीत झाली त्यावेळी तीन दिवस मोगलांचे पाण्याविना हाल झाले असं शिवभारतात दिलंय. पण आम्ही मार्चमधे जाऊनही अंबा नदीत भरपूर पाणी होतं. लढाईनंतर कारतलबखानाचे हत्ती आणि घोडे महाराजांना मिळाले असं दिलंय. आजही आंबेनळीवाडीतली गुरंढोरं उन्हाळ्यात पाण्यासाठी चावणीत उतरून येतात त्यामुळं उंबरखिंडीतुन घोडे आणणं ठिक आहे पण हत्ती उतरून येणं अशक्य वाटतं. अर्थात या गोष्टीला जवळजवळ ३५०-४०० वर्ष लोटली आहेत त्यामुळं त्यावेळच्या आणि आत्ताच्या परिस्थितीतही बराच फरक पडला असेल. लढाई नेमकी कुठं आणि नेमकं तिथं काय झालं असावं? या आणि असा सर्व सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला दोनचार वेळा तरी उंबरखिंडीत जावं लागणार असं दिसतंय. बघूया आता यावेळी केव्हा मुहूर्त लागतोय ते... . संदर्भ - १) शिवभारत/अनुपुराण - कविंद्र परमानंद गोविंद नेवासकर.(अध्याय २८ श्लोक ५२ ते अध्याय २९ श्लोक ६५. एकूण १२९ श्लोक) २) राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे. ३) शिवराजमुद्रा - माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 12822 views

💬 प्रतिसाद
य
यशोधरा Fri, 03/15/2019 - 03:39 नवीन
आवडला लेख. स्मारक सुरेख आहे.
  • Log in or register to post comments
द
दिलीप वाटवे Fri, 04/05/2019 - 10:12 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 03/15/2019 - 04:10 नवीन
मस्त ट्रेक, फक्त ते घसारा शब्दाचे बघा. मराठीत त्याला घसरणी, उतार किंवा निसरडा म्हणतात. घसारा हा शब्द डिप्रेसिशन साठी वापरतात.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 03/15/2019 - 06:21 नवीन
घसारा अचूक शब्द आहे. scree घसारा म्हणजे फुटलेली, माती मुळे धोकादायक झालेला उतार
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 03/15/2019 - 06:34 नवीन
राजे तुमच्याकडून नाही अशी अपेक्षा. घसाराचा अर्थ कुठेही हुडकून पहा. मी कित्येक वर्षे घसारा हा शब्द फक्त बँकाच्या अहवालात वाचतोय. ;) ट्रेकवाल्यांचा प्रचलित शब्द असे म्हणू नका.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 03/15/2019 - 06:55 नवीन
डोंगरभाषेतला शब्द आहे दादा. तसं तर मग तुम्ही पदर, दांड, नाळ, छाती, खळगा, आडवी ह्या शब्दांचाही तुम्ही शब्दशः अर्थ घ्याल.
  • Log in or register to post comments
द
दिलीप वाटवे Fri, 04/05/2019 - 09:56 नवीन
घसारा म्हणजे डिप्रेसिएशन हे तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. भाषा शुद्ध असली पाहिजे, त्याच्याशिवाय ती प्रमाण राहू शकत नाही हेही खरे आहे पण भाषा हा एकमेकांच्या मनातल्या भावनांचा, विचारांचा परस्पर अर्थबोध व्हावा याचं माध्यम आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्याचा प्रमाण अर्थ लावणे गरजेचे नसते. घसारा ह शब्द एखाद्या ट्रेकरसमोर उच्चारला तर तो पहिल्यांदा त्याचा प्रचेतस म्हणतात तसा 'घसारा म्हणजे फुटलेली, माती मुळे धोकादायक झालेला उतार' हाच अर्थ घेईल पण ट्रेकींगशी संबध नसलेल्या एखाद्या accountant समोर उच्चारला तर तुम्ही म्हणता तसा डिप्रेसिएशन असाच घेईल. हा लेख भटकंती विषयाशी संबधीत असल्यामुळे लेखातला 'घसारा' शब्द योग्यच आहे. घसारा शब्दांसारखीच प्रचेतस यांनी सांगितलेल्या शब्दांव्यतिरिक्त अजूनही बरीच उदाहरणे सांगता येतील. उदाहरणार्थ - पाटी, टप्पा,
  • Log in or register to post comments
म
मनो Fri, 03/15/2019 - 05:57 नवीन
तुमच्या शंकांची काही उत्तरे अशी असू शकतात. 1) तीन दिवस मोगलांचे पाण्याविना हाल झाले असं शिवभारतात दिलंय. पण आम्ही मार्चमधे अंबा नदीत भरपूर पाणी होतं. मराठ्यांच्या सैन्याने पाण्याकडे जाण्याची वाट अडवून धरली असेल? 2) आजही आंबेनळीवाडीतली गुरंढोरं उन्हाळ्यात पाण्यासाठी चावणीत उतरून येतात त्यामुळं उंबरखिंडीतुन घोडे आणणं ठिक आहे पण हत्ती उतरून येणं अशक्य वाटतं. खान उतरला ती वाट आणि लढाईची जागा निश्चित नसल्यामुळे हत्ती उतरतील की नाही हे नक्की सांगणे अशक्य आहे. मी स्वतः कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात जंगली हत्ती किंवा आम्ही बसलो होतो ते पाळीव हत्ती आरामात अवघड वाट चढून जाताना आणि उतरताना पाहिले आहेत, त्यामुळे हे फार अवघड आहे असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
द
दिलीप वाटवे Fri, 04/05/2019 - 10:11 नवीन
१) जिथे खिंड आहे तिथूनच नदी वाहते आणि जी खिंडीच्या दोन्ही बाजुला आहे. त्यामुळे अलिकडे किंवा पलिकडे कुठेही पाणी उपलब्ध होऊ शकतं. पाणी लांब असेल तर पाण्याची वाट अडवून धरता येईल पण युद्धक्षेत्र नदीपात्रात असेल तर मात्र ते अशक्य आहे. २) मी स्वत: कार्बेट राष्ट्रीय उद्यानात गेलेलो नाही पण प्रत्येक ठिकाणची जंगले वेगवेगळी असतात. उंचीच्या फरकामुळे कार्बेटची आणि सह्याद्रीतल्या जंगलांची तुलना होऊ शकणार नाही. सह्याद्रीतल्या घाटवाटा अतिशय अडचणीच्या, उताराच्या, घसार्‍याच्या आणि माणसांनाही वेडंवाकडं होऊन जावे लागेल अशा आहेत म्हणून त्या वाटांवरून हत्ती कसा काय जाऊ शकेल? अशी शंका आली.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 03/15/2019 - 07:00 नवीन
नेहमीप्रमाणेच सकस आणि ओघवते लिखाण.
  • Log in or register to post comments
द
दिलीप वाटवे Fri, 04/05/2019 - 10:15 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Fri, 03/15/2019 - 08:38 नवीन
सुंदर धागा. छान लिहीलयं. पु.ले. शु.
  • Log in or register to post comments
द
दिलीप वाटवे Fri, 04/05/2019 - 10:15 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Mon, 03/18/2019 - 16:00 नवीन
मुळात उंबरखिंडीत लढाई फारशी झालीच नाही, महाराजांनी वाट अडवून धरल्याने खान हतबल झाला, बहुदा दोन्ही बाजूने तोंड दाबल्या गेल्याने लढाई न करता तह करणे खानाने पसंत केले असावे. आज जिथे स्मारक आहे तिथे महाराज थांबले असावे. अशीच न लढता जिंकलेली दुसरी मोठी लढाई म्हणजे पालखेडची लढाई, पहिला बाजीराव आणि निजामाची. लढाईच्या जय पराजयात शौर्यापेक्षाही सैन्याचे अचूक संचालन महत्वाचे असते.
  • Log in or register to post comments
ग
गावठी फिलॉसॉफर Fri, 03/29/2019 - 17:14 नवीन
नेस्ट टाइम मला बी घेऊन चला....!!!
  • Log in or register to post comments
द
दिलीप वाटवे Fri, 04/05/2019 - 10:28 नवीन
नक्कीच.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Sat, 03/30/2019 - 07:35 नवीन
काही विचारणा करत आहे. कृपया निरसन करावे...
आय.एन.एस. शिवाजीच्या कुंपणाजवळ जात होती. खरं तर प्राचीन आंबेनळी घाटवाट नागफणीच्या थोडी दक्षिणेकडून याच नाळेच्या वाटेने आंबेनळीवाडीत उतरते. पण सध्या तिथल्या नौसेनेच्या संरक्षण क्षेत्रामुळं त्या नाळेत काही जाता येत नाही. एवढंच काय तर वाडीतल्या कातकर्‍यांनाही लाकूडफाट्यासाठीही त्यांचे रखवालदार जवळपास फिरकू देत नाहीत. त्यामुळं आता आंबेनळी घाटात जायचं असेल तर कुरवंडा आणि आंबेनळी घाटांच्या एकत्र वाटांनी खालच्या पदरापर्यंत यावं लागतं. पदरात उतरल्यावर पहिली उजवीकडची वाट लागते ती कुरवंडा घाटाची तर सरळ आंबेनळीवाडीकडे जाणारी आंबेनळी घाटाची.
जरा गूगल नकाशावरून दाखवता आले तर आवडेल
त्या वाटेने काळजीपुर्वक उतरून पुढच्या तासाभरात नदी ओलांडुन चावणी गाव गाठलं.
ही नदी कोणती अंबा?
येताना आम्ही आंबेनळी ऊर्फ उंबरखिंडीच्या वाटेने उतरून आलो होतो आणि आता घाटमाथ्यावर चढून जाताना कुरवंडा घाटाच्या मार्गाने जाणार होतो. त्यामुळं चावणीतुन बाहेर पडून कुरवंडा घाटाच्या मार्गाला लागलो. या कुरवंडा घाटालाच स्थानिक लोक 'भवनकण्याची वाट' म्हणतात. आपल्या शरीरात पाठीचा कणा जसा आधार देण्याचं काम करतो ना तसं हे कणे जणूकाही सह्याद्रीलाच आधार देत आहेत असं कोकणातुन पाहताना वाटतं. घाटमाथ्यापासून कोकणात एखाद्या कण्याप्रमाणे जे दांड किंवा डोंगरधारा उतरल्या आहेत त्यावरच्या घाटवाटांच्या नावात 'कणा' आहे. भोर जवळच्या वरंध घाटाजवळ जसे 'चिकणा' आणि चोरकणा' आहेत ना, तसंच इथं 'भवनकणा' आहे.
खालून वर साधारण उंची किती मीटर असावी?
घाटवाटेकडे पाहिल्यावर एकूणच ही वाट चढून जाताना त्रासदायक होणार हे नक्की होतं. त्याचं कारणही तसंच होतं. एकतर आम्ही दुपारच्या टळटळीत उन्हात, जवळजवळ साठ अंशाचा कोन असलेल्या आणि वाटेवर झाडी अजिबातच नसलेल्या डोंगरसोडेंवरून चढून जाणार होतो. दुसरं असं की या संपूर्ण घाटवाटेवर 'गेल इंडीया' नी खोदकाम करून गॅसची पाइपलाईन टाकली आहे आणि कुणी तिला धक्का लावू नये म्हणून त्यावर काँक्रीट पण अंथरलं आहे. त्यानं झालं काय की वरून सुर्यरावांचा चटका नी खालून तापलेलं काँक्रीट. बरं वाट तरी चांगली होती, तर तीही काँक्रीटची वाळू जागोजाग निघून आल्यामुळं घसरडी झाली होती. एवढं सगळ्यात निदान वारं तरी होतं? छे, तेही बहूदा दुपारचं वामकुक्षी करायला गेलं होतं. शंभर पावलं चालून गेलो नाही तर थांबावं लागत होतं. उठत-बसत पाण्याचे, पन्ह्याचे घोट घेत हळूहळू चढून जात होतो.
स्मारकाच्या पासून या चढावरून कुरवंड्याला वर यायला किती वेळ लागला व अंदाजान किती किमी अंतर असावे?
चहा पिण्यासाठी सुद्धा वेळ न घालवता सुमोतुन (कुरवंड्याहून) लोणावळा स्टेशनात आलो तर समोरच लोकल उभी असलेली दिसली.
हे अंतर किती आहे?
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Sat, 03/30/2019 - 08:02 नवीन
मिलिटरी कमांडरांच्या नजरेतून या धारावाहिकातून यावर प्रकाश टाकायचा प्रयत्न केला आहे. Image removed. Image removed.
उंबरखिंडीबद्दल मनात बरेच प्रश्न घोळत होते. उंबरखिंडीतली लढाई नेमकी कुठल्या ठिकाणी झाली? शिवभारतातल्या संदर्भाशी ताडून पाहिलं तर सध्या जिथं स्मारक आहे ती जागा विसंगत वाटते. मग सध्या जिथं स्मारक आहे त्या एकाच जागेवरून चावणी परिसरातुन बाहेर पडता येतं. बाकी चहूबाजूंनी चावणीला डोंगरांनी वेढले आहे. मग बरोबर स्मारकाच्याच ठिकाणी लढाई झाली की दुसरीकडे कुठे? ही लढाई फेब्रुवारीत झाली त्यावेळी तीन दिवस मोगलांचे पाण्याविना हाल झाले असं शिवभारतात दिलंय. पण आम्ही मार्चमधे जाऊनही अंबा नदीत भरपूर पाणी होतं. लढाईनंतर कारतलबखानाचे हत्ती आणि घोडे महाराजांना मिळाले असं दिलंय. आजही आंबेनळीवाडीतली गुरंढोरं उन्हाळ्यात पाण्यासाठी चावणीत उतरून येतात त्यामुळं उंबरखिंडीतुन घोडे आणणं ठिक आहे पण हत्ती उतरून येणं अशक्य वाटतं. अर्थात या गोष्टीला जवळजवळ ३५०-४०० वर्ष लोटली आहेत त्यामुळं त्यावेळच्या आणि आत्ताच्या परिस्थितीतही बराच फरक पडला असेल. लढाई नेमकी कुठं आणि नेमकं तिथं काय झालं असावं? या आणि असा सर्व सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला दोनचार वेळा तरी उंबरखिंडीत जावं लागणार असं दिसतंय.
लढाई नेमकी कुठं आणि नेमकं तिथं काय झालं असावं? वरील प्रश्नांकरिता व युद्धातील आणखी एका महत्वाच्या प्रश्नावर प्रकाश टाकाला गेला आहे.... सध्याच्या सिंहगडावरील लढाईच्या मांडणी नंतर विचारणा केली गेली तर ते नाट्य सादर करता येईल
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 8 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 8 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 8 hours ago
  • सुंदर !!
    1 day 8 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा