ओढ....
इंजिनिअरिंगला असणारा १९ वर्षांचा सुयश इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित माहितीचा चांगला जाणकार समजला जातो.त्यातला किडाच म्हणा ना! ५ वर्षांचा असल्यापासून साध्या ड्रायसेलवर LED बल्ब लावण्यापासून सुरु झालेला प्रवास आता हाय एंड सेरीजच्या बिघडलेल्या म्युझिक सिस्टीम्स लीलया दुरुस्त करण्यापर्यंत येऊन ठेपला आहे.
इलेक्ट्रॉनिक्समधला हवा तो संदर्भ विचारा.पटकन् सांगेल,अगदीच दुर्मिळ असेल तर आंतरजालावरुन झटकन शोधून सांगेल.घरातली वीजेवर चालणारी एकही अशी वस्तू नसेल जी त्यानं खोलून बघितली नसेल.शेकडो खोलल्या,शेकडो दुरुस्त केल्या.त्याबदल्यात काही वेळा अोरडून घ्यावं लागलं,मारही खावा लागला घरच्यांचा,काहीवेळा इजाही झाली.पण पठ्ठ्याने कास सोडली नाही.झोपेचे ६ तास सोडले तर बाकीचे १८ तास हातात आणि मेंदूत फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉनिक्सच!त्याच्या खोलीत गेल्यावर तर एक छोटं वर्कशॉपचं दिसतं आपल्याला.नजर जाईल तिकडे वीजेवर चालणार्या वस्तू खोललेल्या!
निनाद आत्ता कुठे १० वर्षांचा आहे.पण जवळपास १७ वाद्ये कुशलतेने वाजवतो.तबला,मृदूंग,बासरी,सॅक्सोफोन असं बरंच काही.घरासमोरच एक संगीतकलेची शिकवणी होती.तिथून वेगवेगळया वाद्यांचे स्वर अगदी सहज ऐकू यायचे.या शिकवणीच्या शेजारच्या घरात एक प्रसिद्ध चित्रकार काका राहतात.ते निनादच्या बाबांचे आणि त्यामुळेच निनादच्याही अोळखीचे पण निनादला चित्रकला काही भावली नाही.भावला तो वाद्यांचा आवाज!
वय बसत नसतानाही हट्टाने शिकवणीच्या सरांच्या मदतीने निरनिराळी वाद्ये वाजवायला शिकला.एवढंच काय तर हेच नाद संगणकावर वापरुन मिक्सिंग करुन नवनवीन आवाज,ध्वनी निर्माण करायला शिकला.अगदी आई बाबांच्या स्मार्टफोनवरही त्यानं निरनिराळ्या वाद्यांच्या अॅप्स घेऊन ठेवल्या आहेत.निनादला पंडीतजींच्या कार्यक्रमासाठी त्यांच्याच आग्रहावरुन तबला वाजवायचाय पण आईबाबा 'इतक्यात नको' म्हणतात म्हणून गप्प बसलाय.पण अधूनमधून पुन्हा पुन्हा विषय काढतोच.शहरातली वाद्यांची दुकानं ही त्याची आवडती ठिकाणं.तिथले काका लोक तर नवीन वाद्य आलं की आधी निनादला कळवतात.तोही लगोलग जाऊन ते वाद्य निरखून,वाजवून येतो.काकांनाही बदल्यात या नवीन वाद्याचा 'परफॉर्मन्स' समजतो.
पहिलीत ही दोन उदाहरणे? या मुलांना केवळ जुजबी आवड नाहीये.चांगली तज्ञ वाटावीत इतपत त्यांची तयारी आहे.अशी बरीचशी उत्कट(पॅशनेट) मुलं/माणसं तुमच्याही पाहण्यात असतील.कोणत्याही उद्देशाविना कुतूहलाने भारावल्यासारखी कणाकणाने आपल्याला भावणार्या क्षेत्रातली माहिती गोळा करत असतात.सतत भावणार्या विषयाच्या संपर्कातच असतात.
हाच विषय आणि काही प्रश्न घेऊन आलो आहे.
कुठून येते ही विशिष्ट गोष्टीबद्दलची अोढ?आजुबाजूला इतक्या गोष्टी असतानाही विशिष्ट गोष्टीकडेच एखाद्याचं अवधान का जातं? निनादला चित्रकला न भावण्याची कारणं कोणती? सुयशला वाद्य वादनाची आणि निनादला इलेक्ट्रॉनिक्सची आवड का नसावी?
या अोढीमागे कोणती मानसशास्त्रीय कारणं असतात?
अनुवांशिकता हा घटक यात महत्वाची भुमिका बजावतो.पण फक्त अनुवांशिकताच महत्वाची ठरते का? परीणाम करणार्या अन्य गोष्टी कोणत्या? या लोकांना सतत आवडीच्या विषयाच्या संपर्कात राहण्याची स्वयंप्रेरणा मिळते तरी कुठून?
दुसरं असं की हे सगळं नैसर्गिक आहे.न मागता मिळालेलं असं आपण म्हणतो.पण हीच अोढ,आवड बाह्य साधनांद्वारा निर्माण करता येईल का?
बाह्य साधने वापरुन निनादला सुयशसारखी इलेक्ट्रॉनिक्सची आवड लावता येईल का? किंवा सुयशमधे बाह्य साधनांद्वारे निनादसारखी वाद्य वादनातली अोढ निर्माण करता येईल का?
अनुवांशिकता हा घटक यात महत्वाची भुमिका बजावतो.असं वाटत नाही कारण चांगल्या प्रथितयश कलाकारांची वा खेळाडूंची अपत्ये मात्र त्या त्या क्षेत्रात चमकताना फार कमी दिसतात. त्या मुलांना कदाचित लहानपणापासून आई किंवा वडील जी कला सादर करतात किंवा जे खेळतात ते बघून थोडीफार आवड निर्माण होणे पर्यंत ठीक आहे. पण त्याच क्षेत्रात आई किंवा वडिलांइतकी वा जास्त प्रगती फार थोडी अपत्ये करतात. एकाआड एक पिढी हुशार असते असं म्हणतात.पण हीच अोढ,आवड बाह्य साधनांद्वारा निर्माण करता येईल का?माझ्या मते असे करता येणार नाही. अजून तरी माणसाच्या वृत्तीमध्ये किंवा नैसर्गिक जडणघडणीमध्ये बाहेरून फेरफार करता येतील असे तंत्र नाहीये असं मला वाटतं. पुढेमागे जरी हे साध्य झालं तरी नैसर्गिकरित्या जे मिळालं आहे त्याइतकं कृत्रिमरित्या टाकलेलं करेल असं वाटत नाही.सुनिल गावस्कर - रोहन गावस्कर किंवा अमिताभ बच्चन - अभिषेक बच्चनमी स्वतः रोहन ला कधीच खेळताना बघितलं नाहीये, त्यामुळे तो किती प्रतिभावान आहे हे सांगता येणार नाही. पण अमिताभ आणि अभिषेक दोघांनाही काम करताना बघितलेलं आहे. माझ्या मते तरी अभिषेक बऱ्यापैकी अभिनेता आहे पण कदाचित वडिलांबरोबरच्या तुलनेमुळे तो मागे पडला असावा असं वाटतं. पण परत प्रश्न तोच आहे ना की जर अनुवांशिकरित्या कलाकार होणं त्याच्याकडे आलं असेल तर मग त्याने स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करायला पाहिजे होतं. पण मग अभिनयातच का? हरिवंशराय बच्चन कवी होते पण अमिताभ मात्र अभिनेता आहे. कदाचित अभिषेककडे दुसरी कुठलीतरी कला असेल, जी त्याने एक्सप्लोर केलीच नाहीये! हे गणित धंद्याच्या बाबतीत थोडं वेगळं आहे. जर तरुण मुलाने पिढीजात धंदा पुढे चालू ठेवायचे म्हणले तर त्याला आयता सेटअप मिळतो. आहे ते पुढे चालू ठेवायचे किंवा वाढवायचे ते त्या मुलाच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे. पण सर्वसाधारणपणे असं दिसून आलं आहे की फारसे कष्ट न करता मिळालेल्या गोष्टीची कदर सहसा नसते.याउलट आईन्सटाईन मात्र त्याच्या गणितज्ञ वडीलांच्या तुलनेत कैकपट अधिक हुशार निघालाएकाआड एक पिढीचे लॉजिक लागू झालेलं दिसतंय. पण आपल्याला आईन्स्टाईनच्या आजोबांबद्दल काहीच माहिती नाही. मला तर त्यापेक्षाही मोठा प्रश्न पडलाय. इथे तुम्ही ज्यांना आपला कल कुठे आहे ते समजलंय अश्यांबद्दल बोलताय, पण बहुसंख्य जनता अशी आहे की त्यांना स्वतःचा कल कळतच नाही. अश्यांचं काय? कदाचित आईन्स्टाईनचे वडील आईन्स्टाईनपेक्षाही हुशार असू शकतील पण त्यांना तशी संधी मिळाली नसेल किंवा योग्य परिस्थिती मिळाली नसेल तर? कदाचित गणित त्यांना आवडतही नसेल पण वडिलांनी म्हणा किंवा इतर कोणी अर्धवट कळत्या वयात सांगितल्यामुळे त्यांनी गणित निवडला पण त्यांची आवड दुसरीच असेल तर?