'उरी- द सर्जिकल स्ट्राईक'
काल 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक' पाहिला, एक चित्रपट म्हणून चांगला आहे. भारतीय सैन्यावरचा आदर यामुळे वाढत असला, तरी 'उरी' मध्ये झालेला हल्ला आपल्या इंटेलिजन्स चं अपयश होतं हे खुबीने लपवलं आहे. सर्जिकल स्ट्राईक बद्दल आज मिडियाच्या कृपेने भरपूर माहिती आहे, त्यामुळे यातल्या फॅक्टस कोणी नाकारू शकणार नाही. अभिनयाच्या बाबतीत नेहमीप्रमाणे 'विकी कौशल' ने भारी कौशल्य दाखवलं आहे. चित्रपटातपण नरेंद्र मोदी 'मित्रो' असं कधीपण म्हणतील की काय असं सारखं वाटतं राहते. उरी मधली आवडलेली गोष्ट म्हणजे यात यामी गौतम आणि विकी कौशल याचं कुठेही अफेयर वगैरे दाखवलं नाही. काही ठिकाणी सिनेमॅटिक लिबर्टी घेतलेली खटकते खरं, पण भन्साळ्याने काशीबाई आणि मस्तानी एकत्र पिंगा घालतांना दाखवली ते बाजीरावांच्या प्रेमापोटी सहन केलं, त्यापुढे हे काहीच नाही असो. राफेल वर वाद सुरू असतांना हा चित्रपट आलाय याचा भाजपा निवडणुकीच्या तोंडावर प्रचंड फायदा होणार आहे हे निश्चित. 'उरी' हा प्रपोगंडा कॅटेगरीत मोडतो कि नाही हा वादाचा विषय होवू शकतो, या बद्दल प्रत्येकाचं मत वेगवेगळं असेल. यातले संवाद पाहता माझ्या मते हा एक उत्कृष्ट प्रचारभान असलेला चित्रपट आहे.
आता थोडासा फ्लॅशबॅक :
१९९७ साली जेव्हा बॉर्डर रिलीज झाला तेव्हा अगदी लहान होतो, त्यामुळे 'सनी देओल' चं दात ओठ खावून बोलणं खूप भारी वाटायचं, युद्ध तोंडावर आल्यावर पळून जाणाऱ्या 'मथुरादास' ला मारायला हात शिवशिवायचे. पाकिस्तानी गोळ्यांनी छातीची चाळण झाली तरी हातात माईन्स घेवून टँक कडे जाणारा 'भैरोसिंग' अजून जिवंत कसा ? हा प्रश्न कधीच पडला नाही. बॉर्डर मध्ये 'कुलदीपसिंग' जी जीप घेऊन फिरतांना दाखवला आहे तिला 'रिकॉईललेस mounted जीप' असं म्हणतात हे आता आता कळालं, नाहीतर या आधी 'तोफ वाली जीप' असंच म्हणायचो. त्यामानाने आजची पिढी बरीच हुशार म्हणावी लागेल, माझ्या सीटच्या बाजूला बसलेलं पोराच्या तोंडून 'स्नायपर' पाहिल्या पहिल्या 'ड्रॅगनाव' असा शब्द निघाला.
बऱ्याच अर्थानी 'उरी' हा बॉर्डर-२ म्हणायला हरकत नाही. फरक फक्त एकच, सिनेमा संपल्यावर बाहेर पडतांना 90's वाल पब्लिक 'भारत माता की जय' अश्या घोषणा देत बाहेर पडत होतं , तर लहान कार्टी आर्मी च्या संबंधित वेगवेगळे प्रश्न विचारून.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Seeing in the dark :- ADGPI-INDIAN ARMY