Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

आ..आ... च्छी ! अर्थात अ‍ॅलर्जिक सर्दी

ह
हेमंतकुमार
Mon, 12/31/2018 - 05:29
💬 66 प्रतिसाद
सध्या आपल्याकडे थंडी पडली आहे. पहाटे व रात्री एकदम थंड तर दुपारी बऱ्यापैकी गरम असे विषम हवामान अनेक ठिकाणी आहे. आता पुढचे ३ महिने हवेतील अ‍ॅलर्जिक सूक्ष्मकणांचे प्रमाण वाढत जाईल. मग या लेखाच्या शीर्षकात लिहिल्याप्रमाणे बऱ्याच जणांना फटाफट शिंका येत राहतील. त्यापुढे जाऊन सर्दी अथवा नाक बंद होणे, डोळे चुरचुरणे आणि एकूणच बेजार होणे अशा अवस्था येऊ शकतील. एकंदर समाजात या त्रासाचे प्रमाण लक्षणीय आहे आणि दिवसेंदिवस ते वाढतच आहे. या आजाराची कारणमीमांसा, लक्षणे, तपासण्या आणि उपचार या सर्वांचा आढावा या लेखात घेत आहे. pict या आजाराचे शास्त्रीय नाव Allergic Rhinitis असे आहे. Rhino = नाक व itis = दाह. ‘सर्दी’ होण्याचे हे समाजात सर्वाधिक आढळणारे कारण आहे. हवेतील सूक्ष्मकण नाकात जातात आणि मग त्यांचे वावडे (allergy) असलेल्या व्यक्तीस नाकाच्या आतील पातळ आवरणाचा(mucosa) दाह होतो. परिणामी त्या व्यक्तीत खालीलपैकी काही लक्षणे दिसतात: १. शिंका येणे २. नाक चोंदणे व खाजणे ३. नाकातून सर्दी वाहणे ४. डोळे चुरचुरणे ५. घसा खवखवणे ६. कान अथवा कपाळ दुखणे कारणमीमांसा साधारणपणे असा त्रास होण्यास हवेतील काही पदार्थकण कारणीभूत ठरतात. त्यामध्ये धूळ, परागकण, बुरशीचे बीजकण (mold spores) आणि पाळीव प्राण्यांच्या संपर्कातून आलेले कण (mites) यांचा समावेश होतो. परागकण हे विविध झाडे, गवत आणि तण यांच्यातून येतात. भौगोलिक स्थानानुसार यांचे प्रमाण काही ऋतूंत वाढते. भारतात डिसेम्बर ते मार्च या काळात झाडांची पानगळ खूप होते. त्यातून सूक्ष्मकण हवेत पसरतात. अगदी घरातही गालिचे, सोफ्याची आवरणे, उशांचे अभ्रे आणि पडदे अशा अनेक वस्तूंतून धुलीकण हवेत पसरतात. याव्यतिरिक्त काही व्यावसायिकांना त्यांच्या रोजच्या कामामुळे असा त्रास सहन करावा लागतो. यात सुतारकाम, रासायनिक प्रयोगशाळा व कारखाने, शेती आणि जनावरांचे दवाखाने असे व्यवसाय येतात. जर अशी व्यक्ती धूर, प्रदूषण किंवा तीव्र वासांच्या संपर्कात आली तर तिची लक्षणे अजून वाढतात. मुळात एखाद्याच्या शरीरात अ‍ॅलर्जिक प्रवृत्ती निर्माण व्हायला त्याची जनुकीय अनुकुलता असावी लागते. आता अशा कणांच्या (allergens) श्वसनातून नाकात पुढे काय होते ते पाहू. अ‍ॅलर्जिची शरीरप्रक्रिया: आपल्या प्रतिकारशक्तीचा एक भाग म्हणजे आपल्या रक्त आणि इतर स्त्रावांत असलेली प्रतिकार-प्रथिने अर्थात इम्म्युनोग्लोब्युलिन्स (Ig). त्यांचे ५ प्रकार असतात आणि त्यातला अ‍ॅलर्जिच्या संदर्भातला प्रकार आहे IgE. प्रथम अ‍ॅलर्जिक कण नाकात शिरतो. त्यावर प्रतिकार म्हणून विशिष्ट IgE तयार होते. नाकाच्या आतील आवरणात विशिष्ट पांढऱ्या पेशी असतात. हे IgE त्या पेशींवर चिकटते. आता या पेशी उत्तेजित होतात आणि काही रसायने बाहेर सोडतात. त्यातली दोन प्रमुख रसायने आहेत Histamine व Leukotrienes. ही रसायने आवरणातील म्युकस-ग्रंथींना उत्तेजित करतात आणि मग तिथे भरपूर द्रव तयार होतो. ह्यालाच आपण ‘सर्दी’ म्हणतो. मग तेथील चेतातंतू उत्तेजित होतात आणि त्यामुळे शिंका येणे व नाक खाजणे ही लक्षणे दिसतात. ही प्रक्रिया नाकापुरती मर्यादित नसते. ती पुढे जाऊन सायनसेस, कानातील नलिका, घसा आणि डोळे इथपर्यंत पसरते. या भागांतील पेशींत (रक्तातील) पांढऱ्या पेशी उत्तेजित होऊन लढू लागतात. परिणामी दाह होतो. नाकातील द्रवाचे प्रमाण खूप वाढल्यास त्याची धार (postnasal drip) तयार होते आणि ती आपसूक खालील श्वसनमार्गात उतरते. दीर्घकालीन परिणाम : अ‍ॅलर्जिक सर्दी वारंवार झाल्यास त्यातून नाकाच्या आजूबाजूच्या इंद्रियांच्या समस्या निर्माण होतात. या रुग्णांना पुढे कानाचा अतर्गत दाह होतो आणि Eustachian नलिकेचा बिघाड होतो. तसेच विविध सायनसेसचेही दाह (sinusitis) होतात. बऱ्याचदा या रुग्णांना दमा आणि त्वचेचा अ‍ॅलर्जिक दाह बरोबरीने असल्याचे दिसते. जेव्हा विशिष्ट मोसमात अ‍ॅलर्जिक सर्दी होते तेव्हा हे आजार अजून बळावतात. एकंदरीत असे रुग्ण त्रस्त व चिडचिडे होतात. रुग्णतपासणी: वर वर्णन केलेले या आजाराचे स्वरूप बघता रुग्णाने योग्य त्या तज्ञाकडून नाक, घसा, कान व डोळे यांची प्रामुख्याने तपासणी करून घ्यावी. अशा तपासणीत साधारणपणे खालील गोष्टी आढळतात: १. नाक: पातळ आवरणाचा भाग सुजलेला आणि निळसर-करडा दिसतो. कधी तो लाल देखील असतो. २. घसा: सूज आणि रेषा ओढल्यासारखे दृश्य दिसते. टॉन्सिल्स आकाराने मोठे व सुजलेले असू शकतात. ३. कान ; दाहाची लक्षणे. ४. डोळे: लालबुंद, काहीशी सूज आलेली आणि अश्रूंचे प्रमाण वाढते. गरजेनुसार अशा रुग्णाची छाती व त्वचेची तपासणी करतात. प्रयोगशाळा आणि अन्य तपासण्या अ‍ॅलर्जिचे निदान करण्यासाठी यांची मदत होते. सामान्यतः खालील दोन चाचण्या केल्या जातात: १. रक्तातील eosinophil या पांढऱ्या पेशींचे प्रमाण मोजणे : अ‍ॅलर्जिक रुग्णात यांचे प्रमाण बऱ्यापैकी वाढते. २. रक्तातील IgE या प्रथिनाचे प्रमाणही वाढलेले असते. या दोन्ही चाचण्या अ‍ॅलर्जिच्या निदानासाठी पूर्णपणे खात्रीच्या (specific) नाहीत. पण त्या करण्यास सोप्या आहेत व सामान्य प्रयोगशाळांत होतात. रुग्णाचा इतिहास, तपासणी आणि या चाचण्यांचे निष्कर्ष असे सर्व एकत्रित अभ्यासल्यास रोगनिदान होते. बहुतेक रुग्णांच्या बाबतीत हे पुरेसे असते. काही विशिष्ट मोजक्या रुग्णांसाठी याहून वरच्या पातळीवरील चाचण्या करण्याची गरज भासते. त्या अशा आहेत: १. त्वचेवरील अ‍ॅलर्जिक तपासणी: ही करण्यासाठी विशेष प्रशिक्षित तज्ञ लागतो. रुग्णाचा इतिहास आणि राहायच्या ठिकाणानुसार ठराविक अ‍ॅलर्जिक पदार्थांची निवड केली जाते. मग असे पदार्थ इंजेक्शनद्वारा सूक्ष्म प्रमाणात त्वचेत टोचले जातात. त्यानंतर काही वेळाने टोचल्याच्या जागेवर काय प्रतिक्रिया (reaction) दिसते ते पाहतात. जेव्हा ही प्रतिक्रिया तीव्र स्वरूपाची असते, तेव्हा त्या पदार्थाची रुग्णास अ‍ॅलर्जि आहे असे निदान होते. २. असे पदार्थ रुग्णास टोचल्यानंतर त्याच्या रक्तातील IgEचे प्रमाण मोजणे. परंतु या चाचणीचे निष्कर्ष पहिल्या चाचणीइतके विश्वासार्ह नसतात. एक लक्षात घेतले पाहिजे. या विशिष्ट चाचण्या करूनही रुग्णास नक्की कशाची अ‍ॅलर्जी आहे याचा शोध दरवेळी लागेलच असे नाही. बऱ्याचदा ‘अमुक इतक्या पदार्थांची अ‍ॅलर्जी नाही’ असा नकारात्मक निष्कर्षच हाती पडतो ! म्हणूनच उठसूठ या चाचण्या करीत नाहीत. उपचार : यांचे ३ गटांत विवेचन करतो: १. अ‍ॅलर्जिक कणांचा संपर्क टाळणे २. नेहमीचे औषधोपचार ३. इम्युनोथेरपी अ‍ॅलर्जिक कणांचा संपर्क टाळणे: तसे पाहता हा उपाय सर्वोत्तम ठरेल. अर्थात हा सांगायला सोपा पण आचरायला महाकठीण आहे ! तेव्हा जेवढे शक्य आहे तेवढे टाळावे असे म्हणतो. भारतात डिसेंबर ते मार्चदरम्यान पहाटे व सकाळच्या वेळेत अशा कणांचे प्रमाण जास्त असते. त्या वेळात घराबाहेर पडणे टाळावे. तसेच धूर, धूळ व तीव्र वासांपासून जमेल तितके संरक्षण करावे. बाहेर पडताना गरजेनुसार तोंडावरील ‘मास्क’चा वापर करावा. घरात साठणाऱ्या धुळीसाठी योग्य ते स्वच्छतेचे उपाय केले पाहिजेत. उशीचे अभ्रे, पडदे, अंथरूण आणि गालिचे यांची योग्य निगा राखणे महत्वाचे. परागकणांची अ‍ॅलर्जी असणाऱ्या रुग्णांना मात्र वरील काळजी घेऊनही ठराविक मोसमात त्रास होतोच. तो कमी करण्यासाठी औषधोपचार गरजेचे असतात. औषधोपचार साधारण जेव्हा ‘सर्दी’चा त्रास सुरु होतो तेव्हा रुग्ण प्रथम घरगुती उपचारांचा अवलंब करतो. मात्र ही सर्दी जर अ‍ॅलर्जिक असेल तर त्यांचा फारसा उपयोग होत नाही. हळूहळू हा त्रास वाढू लागतो आणि रुग्णास बेजार करतो. अशा वेळेस वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक ठरते. अ‍ॅलर्जिक सर्दीसाठी अनेक उपचारपद्धतींची औषधे उपलब्ध आहेत. या लेखाची व्याप्ती आधुनिक वैद्यकातील औषधांपुरती मर्यादित आहे. त्यामुळे त्यांची जुजबी माहिती देत आहे. (ज्या वाचकांना अन्य उपचारपद्धतींची माहिती वा अनुभव असतील त्यांनी ते प्रतिसादात जरूर लिहावेत. त्याचा आपल्या सर्वांनाच फायदा होईल). खालील सर्व औषधे ही वैद्यकीय सल्ल्याविना कोणीही घेऊ नयेत ही सूचना. औषधांचे प्रमुख गट: १. Antihistamines : ही गोळ्यांच्या रुपात वापरतात. अ‍ॅलर्जीमुळे शरीरात जे Histamine तयार होते त्याचा ती विरोध करतात. ही औषधे सुमारे ५० वर्षांपासून वापरात आहेत. त्यातील पहिल्या पिढीच्या गोळ्यांमुळे रुग्णास गुंगी येत असे. आता दुसऱ्या पिढीची औषधे ही त्या बाबतीत सुधारित आहेत. तरीही काहींना त्यामुळे तोंडाचा कोरडेपणा आणि त्वचेवर पुरळ येऊन खाजणे असे दुष्परिणाम जाणवतात. यावर मात करण्यासाठी आता या औषधांचे नाकात मारायचे फवारे निघाले आहेत. त्यांच्यामुळे संपूर्ण शरीरातील दुष्परिणाम फारसे होत नाहीत. मुळात अ‍ॅलर्जीविरोधी औषधे म्हणून ही विकसित झाली; पण त्यांच्या वापरानेसुद्धा काहींना (वेगळी) अ‍ॅलर्जी होऊ शकते हा विरोधाभास आहे ! ‘सर्दी’च्या अन्य काही प्रकारांसाठी ती स्वतःहून उठसूठ घेऊ नयेत. २. Decongestants : ही औषधे चोंदलेले नाक मोकळे करतात. ती वरील गटाच्या बरोबर देतात. अलीकडे या दोन्ही गटाच्या औषधांचे मिश्रण उपलब्ध आहे. ३. नाकातील Steroidsचे फवारे: जेव्हा हा आजार दीर्घकालीन होतो तेव्हा वरील औषधांपेक्षा हे फवारे उपयुक्त ठरतात. ही औषधे आता विकसित होत तिसऱ्या पिढीत पोचली आहेत. पहिल्या पिढीतील औषधांचे नाकातून रक्तात शोषण होई व त्यामुळे शरीरभरातील दुष्परिणाम होत. आता तो भाग बराच सुधारला आहे. या औषधांमुळे रुग्णाच्या शिंका, नाक खाजणे, नाक चोंदणे आणि वाहणे ही सर्व लक्षणे कमी होतात. त्यामुळे ती वरील दोन गटांपेक्षा अधिक फायद्याची आहेत. अर्थात त्यांच्यामुळे डोळ्यांची खाज मात्र कमी होत नाही. या फवाऱ्यामुळे नाकात चुरचुरणे किंवा रक्त येणे असे तात्पुरते दुष्परिणाम होऊ शकतात. ४. Steroids च्या पोटातून घ्यायच्या गोळ्या: जेव्हा रुग्णास हा त्रास असह्य होतो व निव्वळ वरील औषधे व फवाऱ्यानी आटोक्यात येत नाही तेव्हाच याचा विचार अगदी थोड्या कालावधीकरता केला जातो; ही उठसूठ घ्यायची नसतात. ५. Antileukotrienes : वर पाहिल्याप्रमाणे अ‍ॅलर्जी प्रक्रियेत तयार होणारी अन्य एक रसायने आहेत leukotrienes. ही औषधे त्यांच्या विरोधी कार्य करतात. Antihistaminesना पर्याय म्हणून ती वापरता येतात. औषधोपचाराबरोबर गरम पाण्याची वाफ घेणे इत्यादी पूरक उपचार उपयुक्त ठरतात. (वरील सर्व औषधांची माहिती सामान्यज्ञान होण्याइतपतच दिली आहे. त्यांपैकी कुठलेही औषध वैद्यकीय सल्ल्याविना घेऊ नये). इम्युनोथेरपी हे उपचार काहीसे लसीकरणासारखे आहेत. ज्या रुग्णांना अ‍ॅलर्जीचा असह्य त्रास होतो त्यांच्या बाबतीत याचा विचार केला जातो. पण त्यासाठी रुग्णास नक्की कुठली अ‍ॅलर्जी आहे हे त्वचा-अ‍ॅलर्जी चाचणीने सिद्ध झालेले असले पाहिजे. समजा एखाद्याला गवतातून उडणाऱ्या सूक्ष्मकणांची अ‍ॅलर्जी आहे. तर या व्यक्तीसाठी त्या कणांपासून तयार केलेले अर्क (allergen extract) उपलब्ध असतात. त्या अर्काच्या गोळ्या जिभेखाली ठेवून घेतात. संबंधित अ‍ॅलर्जीचा मौसम सुरु होण्याच्या ४ महिने अगोदर हे उपचार सुरु करतात. हे उपचार दीर्घकाळ घ्यावे लागतात. त्याने फरक पडल्यास पुढे काही वर्षे चालू ठेवतात. समारोप अ‍ॅलर्जिक सर्दी हा समाजात बऱ्यापैकी आढळणारा आजार आहे. साधारण ३०% लोकांना तो असतो. मुलांतील त्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. हा आजार वरवर दिसायला साधा वाटला तरी प्रत्यक्षात तसा नसतो. या त्रासाने पिडीत रुग्ण त्या मोसमात अक्षरशः पिडलेला असतो. त्या त्रासाने त्याच्या कामावर व दैनंदिन जीवनावर आणि कौटुंबिक स्वास्थ्यावरही बऱ्यापैकी परिणाम होतो. काहींना तर दर ३ सेकंदांना एक अशा वेगाने शिंका येतात. अशा रुग्णांना त्या संपूर्ण मोसमात नैराश्य येते. हा आजार नाकापुरता मर्यादित न राहता अन्य इंद्रियांवर परिणाम करू शकतो. काही जणांना याच्या बरोबरीने दम्याचाही त्रास असू शकतो. म्हणून त्याकडे वेळीच लक्ष देणे आणि योग्य ते उपचार करून घेणे आवश्यक ठरते. ********************************************************************** लेखातील प्रातिनिधिक चित्र जालावरून साभार.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 37193 views

💬 प्रतिसाद (66)
ह
हेमंतकुमार Wed, 01/12/2022 - 13:50 नवीन
या प्रकारच्या त्रासात अनुवंशिकता असू शकते. तुम्ही नाक कान घसा तज्ञांचा सल्ला घ्यायला हरकत नाही. पण औषधांच्या बाबतीत 'आयुष'पैकी जी शाखा तुम्हाला पसंत असेल त्याची औषधे घेऊन बघा असे सुचवेन. औषधे बऱ्यापैकी दीर्घकाळ घ्यावी लागतात म्हणून असे सुचवत आहे. एलर्जी स्पेशालिस्ट ह्यात मात्र फारसा अर्थ नाही. त्यातून विशेष शोध असा लागत नाही. बऱ्याच जणांचा अनुभव आहे की, तुम्हाला अमुक इतक्या दहा-वीस गोष्टींची एलर्जी नाही असा निष्कर्ष हाती पडतो. नक्की कशाची आहे हे शोधणे तितके सोपे नसते ! बाकी धूळ, धूर, जुनी पुस्तके, माळे आवरणे या सर्वांपासून लांब राहणे..... 😀
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 01/12/2022 - 14:23 नवीन
बाकी धूळ, धूर, जुनी पुस्तके, माळे आवरणे या सर्वांपासून लांब राहणे...
आता हे कारण सांगून दरवर्षीच्या दिवाळी सफाईमधून यशस्वी अंग काढून घेण्यात येईल, फक्त पुस्तके सोडून, डबल मास्क लावेन पण जुनं उत्तम पुस्तक सापडलं तर धूर झटकत फडशा हा पाडणारच, लवकरच कान नाक घसा तज्ञ डॉक्टरांना नक्की भेटेन. &#129321 &#129321 &#129321 &#129321
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 01/12/2022 - 14:33 नवीन
जुनी पुस्तके
मलाही असा त्रास आहे. याच कारणास्तव मी काही वर्षांपूर्वी वाचनालय बंद केले. कारण प्रत्येक वेळेस गेल्या दीड वर्षातले नवे पुस्तक आपल्याला मिळेल याची खात्री नसते. आता वर्षाकाठी दोन-तीन पुस्तके विकत घेतो आणि दर तीन वर्षांनी त्यातली काही रद्दीत देतो. घरी फार साठा करणे मला परवडणार नाही
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Wed, 01/12/2022 - 22:13 नवीन
हा माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय. आधी पण प्रतिसाद दिला होता त्यात या वर्षीची भर घालते. मला दरवर्षी ऋतू बदलला कि हवेतील परागकणांमुळे ऍलर्जी चा त्रास होतो. भारतात धुळीचा व्हायचा अमेरिकेत परागकणांचा होतो. सध्या नाकारला फवारा आणि प्रिस्क्रिपशन शिवाय मिळणार (over the counter ) औषध घेऊन फायदा होतो. पण जर औषध घ्यायला उशीर झाला किंवा त्रास जास्त होऊन सर्दी झाली तर अजून एक त्रास होतो. तो म्हणजे सायनस मध्ये साठलेली सर्दी घशात येऊन प्रचंड खोकला होतो. हा त्रास मला गेल्या वर्षीपर्यंत होता. या वर्षी त्यात अजून एक भर पडली. वरील दोन्ही औषध घेऊन मला बराच फायदा होतो, पण या वर्षी घसेदुखी मुळे डॉक्टर ने ऍन्टीबीओटीक दिली, त्यामुळे ऍसिडिटी वाढली, त्यामुळे, नाक, आणि सायनस साफ असताना सुद्धा पोटातून कफ वर येऊन खोकला झाला. हा मुद्दामून प्रतिसाद देण्याचं कारण कि, माझा डॉक्टर मला सर्दीचीच जास्त परिणामकारक औषध देत होता, आणि त्याने ऍसिडिटी वाढून जास्त खोकला येत होता. ऍसिडिटी मुले खोकला होऊ शकतो हेच मला माहित नव्हतं. इथे कोणाला यासारखी लक्षण असतील तर तुमच्या डॉक्टर ला ऍसिडिटी मुले खोकला होतोय का हे पण नक्की विचारा.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 01/13/2022 - 02:43 नवीन
सर्दी झाल्यास - तासातासाने नाकाचा भाग साबण पाण्याने धुवायचा. काढे, औषधं नाही घ्यायची. पुस्तके वगैरे झटकायच्या अगोदर ओलसर कापडाने हलकेच पुसून घ्यायची.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 01/13/2022 - 08:09 नवीन
**पुस्तके वगैरे झटकायच्या अगोदर ओलसर कापडाने हलकेच पुसून घ्यायची. >>चांगला उपाय
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Mon, 01/17/2022 - 13:10 नवीन
डॉ. कुमार, आपले खूप धन्यवाद. मला अशा प्रकारचे निदान हौऊन सव्वा वर्ष झाले. ऑगष्ट २०२० मध्ये आधी वास गेला पण चव होती. त्यावेळी कोवीड अगदी भरात असल्याने विलगीकरण केले होते, पण अनेक महीने झाले तरी वास काही येत नव्हता. आयुष्यात कधी झाली नव्हती अशी गंभीर सर्दी झाली. खूप शिंका येत. मग होमिओपॅथीचे औषध घेतले, फारसा परिणाम झाला नाही. मग नाक कान घसा तज्ञाकडून तपासणी व सिटी स्कॅन केल्यावर नाकात सायनसमुळे पॉलिप्स वाढली आहेत असे समजले. आजाराचे कारण जरी अॅलर्जी असे सांगितले तरी अलर्जी तपासणी करून फारसे काही हाती लागत नाही असेही सांगितले. तीन महिने औषधे घेतली - मुख्यत: नाकात आणि घशातले स्प्रे. त्यांनी स्प्रे मारत रहा व नंतर तीन महिन्यांनी स्कॅन करू, जर पॉलिप्स कमी झाली नाहीत तर मात्र शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले. तरीही एखाद्या दिवशी अशी काही सर्दी खवळायची की पहाटेपर्यंत झोपू शकत नसे. मग आयुर्वेदाचे औषध सुरू केले, ते सध्या सुरू आहे. बराच आराम पडला आहे, पण अजून वास आजिबात येत नाही. वेगवेगळ्या पॅथीचे डॉक्टर्स दुसर्या पॅथीबद्दल काही बोलत नाहीत. तूर्त आयुर्वेदाचे औषध घेत आहे. बरोबरीने जॉगिंगचा व्यायाम आणि प्राणायामही करत आहे. निदान भयंकर शिंका येणे व छातीतून घरघर येणे बरेचसे कमी झाले आहे. माझा एक प्रश्न असा, की सायनस डोऴ्यांच्या आजूबाजूला कपाळात वगैरे ‘साठतो’ हे खरे आहे का? तो सगळा हळूहळू काढून टाकला की विकार बरा होईल असे काहीसे सांगितले जाते. जरी आराम वाटत असला, तरी आयुर्वेद वाले स्कॅनिंग करून अगर नाकाची तपासणी वगैरे करत नाहीत. त्यामुळे नक्की सूज व पॉलिप्स कमी झाले आहेत का, हे पाहिले नाही. एकूण हा बराच चिवट विकार आहे आणि पूर्ण बरे होण्याची आशा आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 01/17/2022 - 13:30 नवीन
स्वधर्म, तुमचा प्रश्न चांगला आहे. आपल्या नाकातोंडाभोवती काही सायनसेस असतात. निरोगी अवस्थेत त्यांच्यामधून जो स्त्राव निघतो तो त्यांच्या एका बारीक भोकाद्वारे नाकात म उतरतो. निरोगी अवस्थेत हा स्त्राव नेहमी एकेरी मार्गानेच पुढे प्रवास करतो. त्यामुळे सायन्सेस मोकळ्या व स्वच्छ राहतात. जेव्हा ऍलर्जीचा त्रास होतो किंवा पॉलीप वगैरेमुळे स्थानिक अडथळा निर्माण होतो, तेव्हा सायन चे भोक सुजल्यासारखे होऊन काहीसे बुजते. त्यामुळे सायनसमध्ये स्त्राव साठू लागतो. असे जर दीर्घकाळ झाले तर तिथे जंतुसंसर्ग होतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार चालू ठेवा. आजार किचकट, क्लिष्ट व दीर्घकालीन असतो. नियंत्रणात राहण्यासाठी शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Mon, 01/17/2022 - 16:04 नवीन
माहितीपूर्ण लेख आणि प्रतिसादांबद्दल खूप धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म गुरुवार, 01/25/2024 - 15:55 नवीन
बर्याच दिवसांनी हा धागा वर आला व माझा अनुभव लिहावा असे वाटले. जेंव्हा वरील प्रतिसाद लिहिला, तेंव्हा आयुर्वेदीक उपचारांना सुरूवात केली होती. पुण्यातील राजाराम पूलाच्या टोकाला असलेल्या प्रसिध्द आयुर्वेद तज्ञाकडून उपचार घेतले होते. चार महिने व भरपूर खर्च करूनही काही गुण आला नाही. त्रास वाढला व त्यातून त्या वैद्यराजांचा व आयुर्वेदाचा एकूण अप्रोचच काही काम करत नाही असे वाटले. त्यावर खरे तर एक अनुभवच लिहिता येईल. मग आधुनिक वैद्यकाकडे जाण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. तिकडे गोळ्या व फवारे सुरू केले.  अ‍ॅलर्जीची त्वचा चाचणीही पुण्यात करून घेतली, आणि नंतर रक्ताची चाचणी परदेशात करून घेतली. एकदा अ‍ॅलर्जी आहे असे तर एकदा नाही असे निकाल आले. त्रास नियंत्रणात आला पण गोळ्या व फवारे घेण्यास पर्याय नाही अशी सध्या अवस्था आहे. डॉ.नी पॉलिप्सचे ऑपरेशन करून घ्यायला सांगितले आहे, पण तातडीने केलेच पाहिजे असे नाही. वासही येत नाही. किती वर्षे गोळ्या, फवारे घ्यायचे म्हणून आता मार्च महिन्यात ऑपरेशन करून घेण्याचा विचार आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 01/25/2024 - 16:25 नवीन
डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे योग्य ते उपचार करीत राहावेत. एलर्जी चाचणीचे निष्कर्ष बऱ्यापैकी वादग्रस्त असतात. शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
ज
जेपी Mon, 01/17/2022 - 18:32 नवीन
मला सर्दी चा बराच वेळेस होतो. Seson बदलला की लगेच. एकदा कान फुटून बराच पुस गेला . तेव्हा dr. सोबत बोल्यावर त्यांनी सायनस आहे. Operation करावे लागेल असे सांगितल. Ct scan केला. आणी रिपोर्ट घेऊन दुसऱ्या dr. कडे गेलो. सेकंड ओपनियन घेतल्यावर दुसऱ्या dr. ने एक स्प्रे दिला नाकात मारायला. त्या नंतर आजतागायत सर्दी झाली झाली नाही. नेमक काय झालं होतं माहीत नाही अजून .
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 03/01/2022 - 14:42 नवीन
भारतात एलर्जीचा मोसम आता ऐन भरात आहे. झाडांची बारीक पानगळ आता वाढत जाईल. गेल्या चार वर्षांपासून ऋतुचक्र एक महिना पुढे सरकल्याचे अगदी व्यवस्थित जाणवते. पूर्वी जानेवारी अखेरीस हा मोसम चालू व्हायचा. आता तो फेब्रुवारी संपताना ऐन भरात येतो.
  • Log in or register to post comments
स
सुचिता१ गुरुवार, 03/03/2022 - 19:32 नवीन
Dr चे आणि प्रतिसाद कर्त्या चे ही शत:श आभार!! खुप च उपयुक्त लेख आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 03/19/2023 - 08:21 नवीन
गेल्या तीन वर्षांची तुलना करता पश्चिम महाराष्ट्रात यंदाचा ऍलर्जीक मोसम बऱ्यापैकी सुसह्य होता. झाडांची पानगळ पूर्वीपेक्षा कमी प्रमाणात जाणवली. तसेच हवेतील सूक्ष्मकणांचे प्रमाणही कमी वाटले. पानगळीच्या जोडीने होणारी वावटळ देखील कमी होती. त्यामुळे बऱ्याच जणांचे डोळे तुलनेने कमी खाजले. श्वसनमार्गाचा दाह देखील कमी वाटला. बहुदा मार्च अखेर हा मोसम संपेल अशी आशा वाटते. गेल्या तीन-चार वर्षात असे जाणवले आहे की निसर्गाचे ऋतुचक्र एक दीड महिन्याने पुढे गेलेले आहे. पूर्वी जानेवारीच्या सुरुवातीस सुरू होणारा हा त्रास आता जवळजवळ फेब्रुवारीच्या मध्यावर चालू होताना दिसतो.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 01/25/2024 - 11:43 नवीन
सालाबादप्रमाणे सध्या भारतातील ऍलर्जीचा हा मोसम. घराघरांत शिंकांचे आवाज घुमू लागले आहेत.... मुलांमधील वाढत्या प्रमाणातील ऍलर्जीची जनुकीय कारणे शोधण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. त्या दृष्टिकोनातून एक मोठा संशोधन प्रकल्प चालू आहे : मूल गर्भावस्थेत असताना जर त्याच्या आईच्या फुफ्फुसांमध्ये eicosanoid या प्रकारातील विशिष्ट मेद पदार्थ जास्त असतील तर ते त्या मुलामध्ये संक्रमित होतात. त्याच्या भविष्यातील ऍलर्जीशी त्यांचा संबंध असावा या गृहीतकावर हे संशोधन चालू आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा