फोटोग्राफीतले तीन काळ
२००० साला आधी फोटोग्राफरची काम करण्याची पद्धत वेगळी होती. त्यानंतर २०१२ पर्यंतची वेगळी आणि आता तर खूपच वेगळी. येत्या काही वर्षात काय होणारय देव जाणे.
मी फोटोग्राफीला सुरवात केली नव्हती तेव्हा म्हणजे २००० पुर्वी फोटोग्राफरला लग्न लागायच्या वेळी बोलवायला/घ्यायला यायचे म्हणे. आणि लग्न झाल्यावर सोडायलाही.
नंतर आले डिजीटल कॅमेरे. रोल संपणार नाही आणि फोटो लगेच दिसणार. म्हणून फोटोग्राफर लोक कितीही फोटो काढायचे आणि चांगले ठेऊन बाकीचे उडवायचे. त्यांच्या याच वृत्तीचा गैरफायदा ग्राहकवर्गाने घेतला. तो असा, सकाळीच मांडवपुजेपासून बिदाई, गृहप्रेवेशापर्यंत फोटोग्राफर लग्नघराच्या दावणीचा बैलच झाला. काढायला हजार फोटो काढायचा अन निवडले जायचे शेदोनशे.
तेव्हा मी नव्यानेच व्यवसायात उतरलेलो. जोडप्यांचे फोटो घेण्यासाठी खूपच आग्रही असायचो. पण वडीलधारे मंडळी लग्न लागण्याआधी उपाशी, ताटकळलेल्या वऱ्हाडाची काळजी करुन आम्हाला म्हणायचे फुटूवाले तुम्ही फोटो नंतर काढा आधी नवरदेवाला मांडवात आणा. लग्न लागल्यानंतर विधी आटोपून वऱ्हाडाला परत पाठवायची गरबड. अशा परिस्थितीही समाधानकारक फोटो मिळत असल्याने व्यवसाय आवडायला लागला. तेव्हा लोकं लग्नानिमीत्ताने एकत्र आले की एकमेकांचे सुख-दुख: सांगायचे, ऐकायचे. एकूणच कार्यक्रमाचा आनंद लुटायचे.
२०१२ नंतर आले स्मार्टफोन. सगळी रुपरेषाच बदलून गेली तेव्हापासून. आम्ही कष्टाने काढलेले फोटो व्हाट्सॲपवर मागवायला लागले. त्याहून प्रिंट करतील अन उर्वरीत रक्कम देण्यासाठी आणि अल्बम घेण्यासाठी परत येईल का नाही भितीपोटी आम्ही मग वाटरमार्कचा पर्याय काढला. तोंडावर भलं मोठ नाव टाकून व्हाट्सॲप करायला लागलो. तरीही बरेच जणांच मन भरत असल्याने प्रिंटींगचे प्रमाण कमी झाले काही प्रमाणात.
एवढ्यावर थांबले नाहीत हे स्मार्टफोन. नंतर फोटोग्राफरच्या पुढे उभे राहू लागले अन फोटो काढायला सुरुवात केली यांनी. आयुष्यभर जपून ठेवता येईल असे अनमोल क्षण आम्ही कॅमेऱ्यात कैद करायच्या विचारात मरमर करत असतो तोच मध्येच एखादा स्मार्टफोन घेऊन येतो अन त्या क्षणाची वाट लावतो. असा राग येतो त्यावेळी की सांगूच शकत नाही. पण करणार काय? सुटाबुटातल्या माणसाला माझ्यासारख्या कमी शिकलेल्याने अक्कल शिकवणे योग्य वाटत नाही.
बरं हे झालं आमचं नुकसान. आता दुष्परिणाम ही पाहा. लग्नात वरमाला घालण्याच्यावेळी नवरानवरीला उचलायची पद्धत काही टुकारांनी चालू केली. ते आमच्या सांगण्यावरुन थांबत नसल्याने आम्ही सांगणेही टाळतो. पण ते उचलताना काही अपघात घडला तर? आम्ही जिम्मेदार असल्याने ती क्लिप उडवणार हे नक्की. पण या स्मार्टफोनवाल्यांनी पसरवली तर किती नाचक्की.
एकदा तर अक्षरश: एका स्मार्टफोनवाल्याच्या छाताडात बुक्का दिला होता मी. घडलं असे की नवरीला हळदीची आंघोळ घालताना व्हिडीओ शुटींग करायला बोलवले. मी शुटींग करताना लक्षात आलं की माझ्या बाजूला कोणीतरी मोबाईलमधेये शुटींग करतोय. काहीच विचार ना करता जोराचा धक्का दिला. त्यांना हुकच भरली. ते आला मला भांडायला. मी त्यांना समजवलं की “ अहो काका, आंघोळ घालतायत नवरीला. चुकून पदर सरकला तर ती क्लिप कशाला पाहिजे मोबाईलमध्ये? तुम्ही काका आहेत हे मला आत्ता कळतय. पण कोणी टुकाराच्या मोबाईल मध्ये अशी क्लिप गेली तर परिणाम काय होऊ शकतात याचा विचार केलात का?”
का लोकं विचार करत नसतील या परिणामाचा?
अलीकडच्या दोन तीन वर्षात तर हे स्मार्टफोन भलतेच बावचळलेत. काळानुरूप आमच्या व्यवसायातही बदल झालेत खूप सारे. आता एका लग्नात पाच सहा जणांची टोळी असते. कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण एका मोठया एलएडी वाॅलवर दाखवायला सुरुवात झाली. मंडपाच्या/लाॅंस च्या प्रवेशद्वारापासून जेव्हा नवरा-नवरीचा प्रवेश होतो. तो प्रत्येकजण विशेष अन वेगळ्या देखाव्यासह करतो. काही जण बुलेट गाडी वापरतात त्यासाठी तर काही जण शोले मधली स्कूटर. ट्राॅली, जहाज, डोली अशा एकाहून चढ एक आकर्षक वाहनांतून प्रेवश करतात. पण हे पाहणारे लोक त्यांचे फोटो काढण्यात व्यस्त असतात. ते काढले तर काढले पण आमच्या कॅमेऱ्याच्या समोर आल्याने प्रक्षेपणात या स्मार्टफोन वाल्यांचा पिछवाडाच येतो.
काही दिवसांपुर्वी एका पंचतारांकीत हाॅटेल मधल्या लग्नात तर लैच भयानक अनुभव आले. दहा गुरुजींची फोज होती मंत्रोच्चारासाठी. मग आम्ही थांबा ना म्हणता जे जसं चाललय तसच कॅमेऱ्यात कैद करत होतो. नाहीतर ईतर वेळी इकडे बघा म्हणायची सवय असते आम्हाला. यावेळी ते आम्ही म्हटलं नाही. स्मार्टफोनवाला बोलला थांबा गुरुजी फोटो काढूद्या.(गुरुजी आणि आम्ही कपाळावर हात मारला)
समुह फोटो काढतानाही तेच करतात. मागे पाच पन्नास जण शुभेच्छा देण्यासाठी ताटकळत थांबलेले असुनही आम्ही फोटो काढला की सेल्फी घ्यायचा असतो स्मार्टफोनवाल्यांना. बरं एक जण सेल्फी घेऊन प्रकरण थांबत नाही. दुसरा म्हणतो माझ्याकडे ड्युअल कॅम आहे. मी काढतो थांबा.
कोणी तरी आशिर्वाद देत असते माईकवरुन पण ते ना ऐकता सगळे लोकं व्हाट्सॲप स्टेटस टाकण्यात व्यस्त असतात. कहर तर तेव्हा जेव्हा स्टार्टर मध्ये आलेला पनीरचा तुकडा दंतकाडीच्या सहाय्याने तोंडाजवळ धरतात अन वाकडे तिकडे तोंड करुन सेल्फी घेतात. लगेच स्टेटस “ Enjoying starter in taj hotel @wedding”!!
मला तर जाम हसायला येतं अशा लोकांच. कधी थांबतील की नाही? अजून पूढच्या काळात काय काय करतील?
देव जाणे!!
पण कोणी टुकाराच्या मोबाईल मध्ये अशी क्लिप गेली तर परिणाम काय होऊ शकतात याचा विचार केलात का?”-- यावर काय उत्तर दिले त्या काकांनी ?