Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

जय जवान !

व
वन
गुरुवार, 12/20/2018 - 14:44
🗣 86 प्रतिसाद
काही दिवसांपूर्वी एका पेपरात खालील बातमी वाचली: ‘रेल्वेतील जागेच्या वादावरून जवानांच्या गटात झटापट आणि एकाचा मृत्यू’. वाचून मनोमन वाईट वाटले आणि त्याचबरोबर काही वर्षांपूर्वी मी प्रवासात अनुभवलेली घटना डोळ्यांसमोर उभी राहिली. तेव्हा आम्ही काही मित्र एका अभ्यासदौऱ्यासाठी झेलम एक्सप्रेसने दिल्लीस निघालो होतोने. आम्ही द्वितीय श्रेणीच्या स्लीपर वर्गाचे आरक्षण केले होते. तेव्हा दिवाळीच्या सुटीचे दिवस असल्याने गाडीस प्रचंड गर्दी होती. आम्ही व्यवस्थित आरक्षण केले होते आणि सर्वांची तिकीटे निश्चित झालेली होती. गाडी येण्यापूर्वी जेव्हा आम्ही फलाटावर पोचलो तेव्हा तिथे पाय ठेवायलाही जागा नाही अशी तोबा गर्दी. त्यात सामान्य प्रवाशांबरोबरच जवानांच्या अनेक पलटणी होत्या. याच्या जोडीला त्यांच्या मोठाल्या अवजड ट्रंका. तेव्हाच जाणीव झाली की बिगर आरक्षितांच्या गदारोळातच आपल्याला गाडीत चढायची कसरत करावी लागणार आहे. अखेर गाडी आली आणि प्रचंड चेंगराचेंगरीतून आम्ही कसेबसे डब्यात शिरलो. pict त्यानंतरचे दृश्य तर चीड आणणारे होते. आमच्या आरक्षित आसनांवर आमच्या आधीच अनेक जवान स्थानापन्न झाले होते. त्यांना उठवताना जे काही तीव्र संवाद हिंदीतून झाले ते आता आठवायलाही नको वाटतात. त्याचा निष्कर्ष एवढाच होता की आम्ही आरक्षित प्रवाशांनी ‘चुप्प’ बसायचे आहे ! आम्ही आमच्या आसनावर कसेबसे अंग चोरून बसलो आणि आमच्या शेजारी चक्क अंगावर रेलून जवान मंडळी बसली. डब्यात सर्व आसनांवर हीच स्थिती. एकंदरीत सर्व डब्यात हवे तसे वावरण्याचा प्रथम हक्क जवानांचा आणि आम्हीच विस्थापित अशी अवस्था होती. आमच्यातील ज्या एकदोघांनी जवानांशी नियमानुसार वाद घातला. पण त्यांना तर झटापट करून त्यांनी गप्प बसवले. गाडी सुटली. चालत्या गाडीबरोबर आम्ही थोडा मोकळा श्वास घेऊ लागलो. पण तो आनंद काही फार टिकला नाही. पुढच्या २ स्थानकांत जवानांच्या अजून पलटणी त्यांच्या ट्रंकासह डब्यात शिरल्या. आता तर आमच्या पाय ठेवायच्या जागी अजून ट्रंका आणि त्यावरही ते बसलेले अशी स्थिती झाली. म्हणजे त्या ‘३ टीअर’च्या डब्यात आता हा चौथा टीअर निर्माण झाला होता ! कहर तर यापुढे झाला. जेव्हा त्यांच्या ट्रंका डब्यात मावेनात तेव्हा त्यांनी त्या डब्याच्या एका बाजूच्या संडासात एकावर एक अशा ठेऊन दिल्या आणि तो संडास बाहेरून देखील ट्रंका लावून बंद करून टाकला. नंतर जेव्हा काही सामान्य प्रवासी लघवीसाठी तिकडे पोचले तेव्हा जवानांनी त्यांना अत्यंत उद्धटपणे, “ये बंद है, उस साइडमें जाव” असे फर्मावले. आता सर्व गर्दी तुडवत विरुद्ध बाजूस जाताना काय यातना झाल्या ते आम्हीच जाणो. सर्वांचीच खूप चिडचिड झाली. “काय तरी तक्रार करायला पाहिजे” असे हताश पुटपुटणे फक्त चालू होते. आता एवढ्या ओसंडून वाहणाऱ्या गाडीत रेल्वे-पोलीस तरी कशाला यायची तसदी घेईल? त्या काळी ‘१३८’ वगैरे तक्रारीचे फोननंबरही नव्हते आणि तिकीट तपासनीसाचे काम फक्त तिकीट पाहणे एवढेच असते. तेव्हा गुमान बसायला पर्याय नव्हता. त्याकाळी झेलामचा प्रवास म्हणजे अगदी दिव्य असायचे. गाडी ५ तास उशीरा पोचणे हे “नॉर्मल” धरले जायचे. त्यापुढे जो काय उशीर होइल तोच फक्त मोजायचा असे ! त्यात आमचे दुर्दैव बघा. आम्हाला दिल्लीस जायचे तर सर्व जवान थेट जम्मूपर्यंत जाणार होते. त्यामुळे संपूर्ण प्रवासात आम्हाला हायसे वाटायचा प्रश्नच नव्हता. गर्दीची ही परिस्थिती दिवसा होती तर रात्री काय झाले असेल याची कल्पनाच केलेली बरी. डब्यातील एकमेव चालू संडासात जायच्या कल्पनेनेच अंगावर काटा आला.त्यात जमिनीवर झोपायचा ५वा टीअर निर्माण झालेला ! अखेर एकदाची दिल्ली आली आणि आम्ही उतरलो. आमच्या अभ्यास दौऱ्याची सुरवात अशा “भारतीय समाज-अभ्यासाने”च झाली होती खरी. एकूण परिस्थिती शाब्दिक हमरीतुमरीपर्यंतच राहिली हे नशीब. नंतर काही विचार मात्र मनात येऊन गेले. जवानांच्या सुखदुख्खाची जाणीव आपल्याला असते. पराक्रमी आणि धारातीर्थी पडलेल्या जवानांचा यथोचित गौरव समाज नेहमी करतोच. परंतु, जवान जेव्हा आपल्या बेशिस्त व बेताल वर्तनाने सामान्य नागरिकांना सळो की पळो करून सोडतात तेव्हा काय म्हणायचे? एक आरक्षित प्रवासी म्हणून आम्हाला काहीच किमान हक्क नसतात का? असो....

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 28241 views

🗣 चर्चा (86)
S
Sanjay Uwach गुरुवार, 12/20/2018 - 17:56 नवीन
वास्तविक जवान लोकांच्या साठी झेलम एक्सप्रेसला एक किंवा दोन स्वतंत्र डबे जोडलेले असतात. संडासात एकावर एक बॅग ठेवून संडास अडवणे हे मी देखील अनुभवले आहे. आपली अडचण सांगितल्यावर आम्ही डोळे झाकतो तुम्हाला आत काय करायचे ते करा असे उत्तर मिळे. दुर्दैवाने आपण एक आशा समाज व्यवस्थेचे भाग आहोत की जिथे शिस्त लागायला आणखीन वेळ लागेल असे मनात समजायचे नी पुढे जायचे. डब्याच्या बाहेर रिझर्व्हेशन करणाऱ्यांची नावे देखील अशी चमत्कारिक लिहली असतात की कळत देखील नाहीत. उदाहरणात वागळे सुनील एकनाथ हे नाव w.s.eknath असे लीहले असते. अर्थात् ह्या माझ्या जुन्या आठवणी आहेत. कदाचीत आता खुप सुधारणा नक्कीच झाल्या असतील.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 12/20/2018 - 18:18 नवीन
दुर्दैवाने आपण एक आशा समाज व्यवस्थेचे भाग आहोत की जिथे शिस्त लागायला आणखीन वेळ लागेल>>>>+ ११ सर्वच क्षेत्रांत भयानक बेशिस्त आहे. रस्ता वाहतुकीत तर बोलायलाच नको.
  • Log in or register to post comments
व
विशुमित गुरुवार, 12/20/2018 - 18:24 नवीन
""देशासाठी एक दिवस ऐडजस्ट करायला कोणी तयार नाही."" ... एवढे बोलून मी येथून पळ काढ्तो.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 12/20/2018 - 19:17 नवीन
भयानक अनुभव घेतलाय तुम्ही....कल्पनाच करवत नाही.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 12/21/2018 - 03:28 नवीन
"सैन्यात उच्च पदावर जायची आवड असेल तरच जा.. सैनिक वगैरे झालास तर ट्रंका घेऊन ट्रेनमधून फिरावे लागेल" असा सल्ला ह्यांना लहानपणीच मिळाला होता. असो. फारच क्लेषदायक अनुभव.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 12/21/2018 - 06:45 नवीन
बहुसंख्य सैनिक उत्तर भारतातुन भरती होतात. तेथे रेल्वेची स्थिती अशीच असते.उत्तर प्रदेश बिहार येथे आरक्षितच नव्हे तर वातानुकूलित डब्यातही असंख्य अनारक्षित /विना तिकीट लोक चढतात. मग तुम्हाला आरक्षण आहे तर बसायला जागा मिळाली आहे ना मग गप्प बसा हे ऐकवले जाते. वातानुकूलित दुसरा दर्जा (AC II TIER) येथे आलेले माझे असे अनेक अनुभव (लखनौ, पाटणा, बिहटा इ ठिकाणी जाताना) आहेत. यातून "धट्टाई खाई मिठाई" असेच तत्व शिकलेले हे उत्तर भारतातील तरुण जेंव्हा लष्करात भरती होतात त्यांना अशी "शिस्त लावणे" हे कर्मकठीण काम आहे. त्यातून मे आणि दिवाळीच्या सुटीत बदली झालेल्या जवानांना लषकरी कोट्यातून आरक्षण मिळवणे अशक्य असते. बदली झाली कि २ महिन्यात हजर व्हावेच लागते आणि आरक्षण (साधे किंवा लष्करी कोटा) ४ महिने अगोदरच संपलेले असते. या प्रकारातून जवान दंडेली केली तरच आपल्याला जायला मिळेल हे "शिकतात". त्यातून लष्करासाठी आरक्षित डब्यात असंख्य नागरिक प्रवास करत असतात. पुणे मुंबई डेक्कन एक्स्प्रेस मधून या डब्यात प्रवास करताना निदान ५० % तरी प्रवासी लष्करातील नसतात हा अनुभव आहे. प्रत्येक वेळेस जरबेच्या आवाजात बोलल्याशिवाय मला तेथे जागा मिळालेली नाही कारण हे लोक यार्डातूनच बसवून येत असत. जवानांचे असे वागणे हे अजिबात समर्थनीय नाही. परंतु बहुसंख्य लोक केवळ नाईलाजाने करत असतात हि सुद्धा वस्तुस्थिती आहे. केवळ नाण्याची दुसरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न आहे. गणपती उत्सवाच्या दिवसात कोकणात जाणाऱ्या गाड्यात प्रवास करण्याचा प्रयत्न करून पहा. आपल्या बर्थ वर चार ते पाच माणसे बसलेली आढळतील आणि पोलीस नावाला सुद्धा दिसणार नाही. हि मुंबईतील स्थिती आहे. अति लोकसंख्या हा देशाला मिळालेला शाप आहे कोणतीही नागरी सुविधा पुरी पडत नाही हि वस्तुस्थिती आहे.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Fri, 12/21/2018 - 11:51 नवीन
गणपती उत्सवाच्या दिवसात कोकणात जाणाऱ्या गाड्यात प्रवास करण्याचा प्रयत्न करून पहा. आपल्या बर्थ वर चार ते पाच माणसे बसलेली आढळतील आणि पोलीस नावाला सुद्धा दिसणार नाही. हि मुंबईतील स्थिती आहे.
६ डिसेंबरच्या आसपास महाराष्ट्रातुन कुठुनही मुंबईला जाणार्या ट्रेन्समध्येही हा प्रकार दिसेल.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sun, 12/23/2018 - 15:57 नवीन
गणपती उत्सवाच्या दिवसात कोकणात जाणाऱ्या गाड्यात प्रवास करण्याचा प्रयत्न करून पहा. आपल्या बर्थ वर चार ते पाच माणसे बसलेली आढळतील आणि पोलीस नावाला सुद्धा दिसणार नाही. हि मुंबईतील स्थिती आहे. -- कोकण रेल्वे सर्वसामन्य प्रवाशांसाठी गणपती, दिवाळी किंव्हा मे महिन्यात जश्या हॉलीडे स्पेशल ट्रेन सोडतात तसे गर्दीच्या वेळी जवानांसाठी स्पेशल ट्रेन का सोडत नाहीत. मुंबई, पुणे किंव्हा नाशिकवरुन अश्या ट्रेन सुट्टीच्या सिझनला सोडल्यास इतर प्रवाशांना होणारा त्रास(!) वाचेल व जवानांची देखील सोय होईल. -- अश्या प्रकारे ट्रेन सुरु करायला आजवर कुणी प्रयत्न केला असल्यास जाणून घ्यायला आवडेल. संरक्षण मंत्रालयाने हस्तक्षेप केल्यास, हे सहज शक्य आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 12/24/2018 - 04:52 नवीन
लष्कराने असे प्रयत्न केले होते. सुरुवातीला रेल्वेने आमच्याकडे डबेच नाहीत म्हणून हात वर केले. एकदा अशी गाडी सोडली होती पुणे ते जम्मू तावी. ती भोपाळ पर्यन्त सुखरूप गेली यानंतर केवळ लष्करासाठी गाडी असून त्यात इतरांना प्रवेश नाही या कारणाने झाशीच्या आसपास गाडीवर दगडफेक झाली. यानंतर रेल्वेने परत आमच्याकडे डबेच नाहीत म्हणून हात वर करायला सुरुवात केली.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 12/21/2018 - 06:53 नवीन
अति लोकसंख्या हा देशाला मिळालेला शाप आहे कोणतीही नागरी सुविधा पुरी पडत नाही हि वस्तुस्थिती आहे.>>>>+ १
  • Log in or register to post comments
व
वन Fri, 12/21/2018 - 08:17 नवीन
सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद. लोकसंख्या, ‘त्यांच्या’अडचणी हे सगळे मान्य आहे.पण वरील घटनेत सर्व आमच्याही सहनशक्ती पलीकडे गेले होते.
  • Log in or register to post comments
ट
ट्रम्प Fri, 12/21/2018 - 13:35 नवीन
तुमच्याबद्दल सहानुभूति आहे पण !!!! तुमच्या जागी दूसरे कोणीही असले तरी त्याने सुद्धा वैयक्तिक विचारच करून सैनिकाना शिव्याच घातल्या असत्या . सीमेवर कर्तव्यपूर्ति करण्यासाठी जाण्याची सोय लोकसंख्या च्या भस्मासुर मुळे सरकार करु शकली नाही म्हणून शेवटी त्या जवानाना आरक्षित जागा बळकाव्या लागल्या . तुमच्या या लेखा मुळे अफ़ग़ानिस्तान मध्ये कर्त्तव्य निभावुन घरी परतणाऱ्या यु एस सोल्जर्स चे सामान्य प्रवासी विमानतळ वर टाळ्या वाजवून कसे स्वागत करतानाचा व्हाट्सएप वर पाहिलेला विडिओ अठवला .
  • Log in or register to post comments
S
Sanjay Uwach Fri, 12/21/2018 - 18:35 नवीन
या विषयात समोरील व्यक्ती हि "सैनिक " असल्या मुळे इथे थोडी भावनिक कसरत झाली आहे . हीच ट्रेन जेव्हा थोडी पुढे जाते व सोनिपत ,पानिपत हि स्टेशन्स लागतात ,तसे हरियानातील बाबू लोक भेटू लागतात .मग कोणीही असू दे ,ते समोरच्या लोकांची परवा करीत नाहीत .रिझर्वेशन आहे असे त्यांना सांगितले तर "रिझर्वेशन रात दस के बाद " म्हणून नवा कायदा सांगतात . म्हणूनच मी आधी हेच म्हटलो आहे कि "आपण एक अशा दुर्दैवी समाजाचे भाग आहोत कि तिथे ,सुधारणा या फारच कुर्म गतीने चालतात . श्री. खरे यांचे लोक संख्या वाढीचे कारण हे कांही अंशी बरोबर आहे ,पण त्या अनुषंगाने ज्या सुधारणा आवश्यक आहेत ,त्या कुठेच दिसत नाहीत . तसे पहिले तर भारता शिवाय इतर सर्व देशाची लोकसंख्या हि वाढतच आहे .चीन तर आपल्या पुढे एक पाऊल आहे पण तिथे अशा प्रकारच्या समस्या कमी असाव्यात . एक उदाहरण म्हणून रेल्वे खाते घेतल्यास , गेल्या सत्तर वर्षात फक्त मीटर गेज चे ब्रॉड गेज झाले व कांही ठिकाणी अलीकडे डिझेल इंजिन ऐवजी इलेक्ट्रिकल इंजिन्स आली आहेत.माझ्या मते कुठलाही व्यवसाय योग्य प्रकारे करण्यास सरकार अयशस्वी ( ना -लायक ) ठरले आहे ,त्यांनी स्वतः असले उद्योग करण्या पेक्षा खाजगी करणातून ह्या गोष्टी कराव्यात व त्यावर प्रामाणिक पणाने फक्त आणि फक्त नियंत्रण ठेवण्याचे काम करावे .हे माझे वैयक्तिक मत आहे. मग ती वाहतूक सेवा असो कि दूरसंचार सेवा असो किव्हा इतर कोणतीही सरकारी सेवा असो .मग कदाचित " या ठिकाणाचा आरसा चोरीला गेला आहे " या सारखे निवेदन रेल्वेच्या डब्यात वाचायला मिळणार नाही किव्हा सैनिकाच्या वॉरंट वरच (रजेच्या अर्जावर ) त्यांचा रेल्वे प्रवासाच्या रिझर्वेशनचा नंबर असेल . शिस्त असेल तर आपली मानसिकता हि बदलेल .
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 12/22/2018 - 02:36 नवीन
समोरील व्यक्ती हि "सैनिक " असल्या मुळे इथे थोडी भावनिक कसरत झाली आहे . >>>> + ११ निव्वळ लोकसंख्या हे कारण नाही, या मतास अनुमोदन. मुरलेली बेशिस्त हा भाग अधिक वाईट आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 12/22/2018 - 05:57 नवीन
मुरलेली बेशिस्त हा भाग अधिक वाईट आहे. बेशिस्त का मुरते? कोकणात जाणाऱ्या गाडयांमध्ये इतर वेळेस आरक्षित जागेवर कोणीही बसले असले तरी उठवल्यास उठवतात. परंतु गणपती उत्सवाचे वेळेस कितीही गाड्या सोडल्या तरी त्या अपुऱ्या पडतात मग जसे जमेल तसे जिथेमिळेल तिथे बसून लोक प्रवास करतात यात आरक्षित डब्याचा पण समावेश असतो. तेथे येणारी गर्दीच इतकी जास्त असते कि पोलीस किंवा रेल्वे कर्मचारी अपुरे पडतात. हीच स्थिती १२ महिने उत्तर भारतात आहे. अशी स्थिती दक्षिण भारतात नाही. तात्पर्य -- अति लोकसंख्या ज्यामुळे मूलभूत सुविधेवर पण अतोनात ताण पडतो तेच बेशिस्तीचे मूळ कारण आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 12/22/2018 - 11:23 नवीन
अति लोकसंख्या ज्यामुळे मूलभूत सुविधेवर पण अतोनात ताण पडतो तेच बेशिस्तीचे मूळ कारण आहे. सहमत. पण यापुढे जाऊन अजून काही फार महत्वाची कारणेसुद्धा आहेत. त्यातील काही अशी आहेत... १. सरकार : गेल्या सात दशकांत, काही सन्माननिय अपवाद वगळता, सर्व स्तरांवरच्या (देश, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था) बहुतेक सरकारी कांमांचे सर्वोच्च ध्येय "दीर्घकालीन उत्तम सुविधा निर्माण करणे" हे नसून, "नेते, बाबू व त्यांचे साथीदार यांचे (आर्थिक व राजकिय) हितसंबंध सांभाळणे" हेच असल्याचे दिसते. सरकार व बाबू यांच्यात बुद्धी, कौशल्य किंवा नियोजन यांची कमी असते असे नाही. पण त्यांची बहुतेक सगळी क्षमता हेच उद्येश साध्य करण्यात खर्च होते... पुढच्या २०, २५, ५० वर्षांच्या अंदाजाने सुविधा निर्माण करण्यात नाही. या सरकारी पद्धतीला मी, "उत्तम नियोजनाने केलेले कुप्रबंधन (Well planned mismanagement)" असे म्हणतो. २. जनता : भारतियामंमध्ये "वसुधैव कुटुंबकम्" हे तत्व खोलवर रूजलेले आहे व विकसित देशांमधील लोक फारच स्वकेंद्रित आहेत असा माझा समज होता. मात्र, भारताबाहेर पडल्यानंतर काही वर्षांतच हा गोड गैरसमज दूर झाला. अनेक दशकांच्या भारत व विकसित देश यांच्या सतत संपर्कात आल्यानंतर मी खात्रीने असे म्हणू शकतो की, विकसित देशांमधील बरेच लोक वैयक्तिकरित्या संकुचित (रिझर्व्ह्ड) असू शकतील, पण सार्वजनिक/सामाजिक भलेपणाची (कॉमन गुड) जाणीव त्यांच्यातील बहुसंख्यांत खूप प्रमाणात असते. त्याविरुद्ध, बहुसंख्य भारतियांच्या विचाराची मजल "स्वतः, स्वतःचा खिसा" यापलिकडे फार तर नातेवाईक, कंपू व धर्म/जात या कुंपणापर्यंत जाऊन थांबते. माझा परिसर, गाव/शहर, राज्य आणि देश हे दुसरे कोणी (बहुदा सरकार) बघून घेतील, मला काय त्याचे, असेच त्यांचे मत असते. भ्रष्टाचार, बेशिस्त आणि अस्वच्छतेच्या मागे मुख्यतः ही मानसिकता आहे असे मला वाटते. उदा : ...(अ) विकसित देशांत... * सार्वजनिक संसाधनांचा अथवा जागेचा दुरुपयोग करणे अभावानेच आढळते. * मला सार्वजनिक जागेवर हवा तसा, हवा तेथे, हवा तितका कचरा करायचा आधिकार आहे, सरकारने तो साफ करायची व्यवस्था करावी, अशी बहुसंख्य भारतिय लोकांची धारणा आहे. * सार्वजनिक जागेचा विनापरवाना उपयोग आणि दुरुपयोग करणे जनतेला आवडत नाही व त्यासंबंधी सामान्य लोकही तक्रार करतात. विकसित देशांत, जनता हे वरचे सर्व आणि इतर बरेच काही, बेजबाबदारपणाचे लक्षण समजते. त्याबद्दल कायद्याचा बडगा वापरून प्रशासन कडक शिक्षा करते तेव्हा हिटलरशाही, अन्याय झाला, व्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला, इत्यादी ओरडा केला जात नाही आणि तथाकथित विचारवंतानाही करून दिला जात नाही. कोणत्याही कारणासाठी सार्वजनिक संसाधनांची मोडतोड / जाळपोळ हा मोठा गुन्हा समजला जातो. त्याची शिक्षाही जबर असते व त्वरीत मिळते. ...(आ) जपानमध्ये त्सुनामी आली होती तेव्हा व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणारी एक क्लिप, "सार्वजनिक भले (कॉमन गुड)चे", सार्वकालीक उत्तम उदाहरण ठरावे अशी होती. त्यावेळी जपानच्या आपत्तीग्रस्त भागातली वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती आणि आठवड्याभरानेही सुरू होईल याची शास्वती नव्हती. सुपरमार्केटसमोर मोठ्या रांगेत शांतपणे उभे राहून, गर्दीगडबड होणार नाही केवळ इतक्याच संख्येच्या गटांनी, आपत्तीग्रस्त लोक आत जात होते आणि विनाअपवाद एका दिवसाला पुरेल इतकेच खाद्यसामान आणि पाणी खरेदी करून बाहेर येत होते. याचे तेथे असलेल्या पाश्चिमात्य वार्ताहराला आश्चर्य वाटले आणि त्याने विचारले, "पुढचा अन्नपाण्याचा साठा केव्हा येईल हे माहित नसताना तुम्ही बरीच खरेदी का करत नाही?" सगळ्या जपानी लोकांचे उत्तर साधारणपणे, "मी असे केले तर रांगेत असलेल्या इतरांचे काय?", अश्याच अर्थाचे होते. ...(इ) सिंगापूर, जपान, युरोप, अमेरिकेत फिरताना (कायद्याचा बडगा पाठीत बसेल या भितीने) सार्वजनिक जागी कचरा न होण्याची खबरदारी घेणारे भारतिय लोक मायदेशाच्या विमानतळावर परतल्यावर ती स्वच्छतेची सवय विसरून जातात, हे काही विरळ नाही. मात्र, परदेशातील स्वच्छता आणि शिस्तीची तारीफ करताना याच मंडळीची जीभ थकत नाही ! :( ३. अर्थकारण : उत्तम संसाधन आणि सेवा प्रत्यक्षात आणण्यासाठी व चालू ठेवण्यासाठी जास्त खर्च येतो, हे सगळ्यानाच माहीत असते. मात्र, त्यांच्या उपभोक्त्याला तिची योग्य किंमतही मोजणे जरूर असते, हे मात्र सोईस्करपणे विसरले जाते. विकसित देशांतील आरामदायक व नियमित वाहतूकीसारख्या सार्वजनिक सेवा आपल्याकडे नाहीत याची खंत वाटणार्‍यांनी, जालावर सहज उपलब्ध असलेली तेथिल आणि भारतातील दरपत्रके चाळून पहावी व त्यातील दरफरकांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या भाड्यात १०-१५ रुपयांची वाढ झाल्यावर होणारी आंदोलने, चक्का जाम, जाळपोळ, इ. पहावे. मॉलमध्ये, रेस्टॉरंतमध्ये निमूटपणे महिना शेपाचशे ते काही हजार खर्च करण्याची ताकद व शिरस्ता असलेल्या भारतियाच्या काळजात, सरकारी सेवेचे दर तुलनेने किंचितसे वाढले तरी, सणकून कळ येते आणि तो सरकारच्या गलथान कारभारावर सडकून टीका करतो. भारतियांना सरकारी सेवा जागतिक स्तराची हवी असते, पण ती कमीत कमी दरात किंवा शक्यतो मोफतच असायला हवी असते ! ४. राजकिय नेते : लोकशाहीत जनतेला तिच्या दीर्घ फायद्याचा उत्तम मार्ग सांगणारे नेते विरळ असतात आणि त्या मार्गावरून जनतेने जावे असा आग्रह धरणारे त्याहून विरळ असतात. कारण, त्यांचे प्राधान्य निवडून येण्यालाच असते... किंबहुना, निवडून आल्याशिवाय, नेत्याच्या मनात खरोखरच असलेल्या सर्व योजना केवळ हवेतच राहतील ही वस्तूस्थिती आहे. मात्र, दीर्घ फायद्याचा उत्तम मार्ग कधीच सहज सोपा नसतो. त्याकरिता जनतेलाही आपल्या हाव/लालसा/लोभ/भय इत्यादीवर ताबा ठेवून व प्रसंगी वैयक्तिक त्रास भोगून सार्वजनिक भल्याला (कॉमन गुड) प्राधान्य देणे जरूरीचे असते. त्याविरुद्ध, जनतेतील हाव/लालसा/लोभ/भय यांचा उपयोग जनतेची दिशाभूल करून मते मिळवणे सोपे असते... जे सर्वसाधारण राजकिय नेते भारतात करताना दिसतात. जनतेची ही हाव कशी पुरवली जाते ?... जनतेने दिलेल्या करातूनच. हे फुकट वाटले जाणारे फायदे (कर्जमाफी, सबसिडी, इ) जनतेच्याच पैशातून दिले जातात; नेत्याच्या किंवा त्याच्या पक्षाच्या तिजोरीतून नाही. याचा सरळ अर्थ असा की जनतेकडून वसूल केलेल्या पैशांपैकी काही तिच्याच तोंडावर फेकण्याच्या आश्वासनांवर, नेते दिमाखाने मते गोळा करत असतात ! प्रगल्भ लोकशाहीत बहुसंख्य जनता सामाजिक भल्याचा विचार करून मते देते... पक्षी, माझे कर्ज माफ होईल, माझा वशिला लागेल, मला वैयक्तिक आर्थिक फायदा होईल, इत्यादी लालसा बाजूला सारून सार्वजनिक भले (पक्षी : स्वच्छता, रस्ते, वीज, पाणी, सांडपाण्याची व्यवस्था, शिक्षण, वैद्यकिय सेवा, व्यवसाय/नोकरीच्या संधी, इ) करणार्‍या गोष्टींबाबत आग्रही असते. अर्थातच, नेत्याला तेच करावे लागते... जनतेचे भले करावे म्हणून करायचे नसले तरी मते मिळविण्यासाठी करावेच लागते !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 12/22/2018 - 12:12 नवीन
विकसित देशांमधील बरेच लोक वैयक्तिकरित्या संकुचित (रिझर्व्ह्ड) असू शकतील, पण सार्वजनिक/सामाजिक भलेपणाची (कॉमन गुड) जाणीव त्यांच्यातील बहुसंख्यांत खूप प्रमाणात असते. >>>> + १११
  • Log in or register to post comments
व
विशुमित Sat, 12/22/2018 - 12:27 नवीन
'सरकार, अर्थकारण अणि नेते' याबाबत थोडे अधिक आपले मतभेद असतील पण """जनता """ लय वंगाळ आहे, याबाबत 100% सहमत. .... समाजामधे कसे वागावे हे संस्कार कधीच घरी शिकवले जात नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोक (चांगली प्रतिष्ठित सुद्धा) बाहेर खुपच हव्र्या सारखी वागतात. कधी न मिळल्या गत. दम धीर च नसतो.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Sun, 12/23/2018 - 03:25 नवीन
* मला सार्वजनिक जागेवर हवा तसा, हवा तेथे, हवा तितका कचरा करायचा आधिकार आहे, सरकारने तो साफ करायची व्यवस्था करावी, अशी बहुसंख्य भारतिय लोकांची धारणा आहे.
अशीच धारणा विकसीत देशांमधल्या नागरीकांची देखील असते. फरक फक्त हा कि त्यांच्या धारणेची योग्य काळजी घेतली जाते. विकसीत देशात भारतापेक्षा कमी कचरा तयार होत नाहि. किंबहुना तिथे प्रमाण जास्तच असावे. पण कचरा व्यवस्थापन उत्तम असल्यामुळे ते जाणवत नाहि.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 12/23/2018 - 15:04 नवीन
"अशीच धारणा विकसीत देशांमधल्या नागरीकांची देखील असते"
नेमके कुठले देश या निकषांत येतात हे जाणून घ्यायला आवडेल
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Mon, 12/24/2018 - 20:51 नवीन
.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/24/2018 - 23:50 नवीन
माझे मत, वाचन आणि २ ऊत्तर अमेरिकेन व ४ युरोपिय देशांमधील प्रत्यक्ष अनुभवावरून बनलेले आहे. याशिवाय, सिंगापूर, जपान यांच्याबद्दल सांगायला नकोच. पण, श्रीलंका, व्हिएतनाम, कंबोडिया येथेही लोकांच्या सार्वजनिक स्वच्छतेसंबंधीच्या चांगल्या सवयींमुळे ते देश बऱ्यापैकी स्वच्छ दिसतात. 'बेजबाबदारपणे अनिर्बंध अस्वच्छता' हा स्थाईभाव असणारे नागरिक असलेला कोणताही देश सतत स्वच्छ ठेवण्याइतके संसाधन सधन देशांकडेही (अगदी तेलाचे भाव गगनाला भिडले असतानाही खाडी देशांकडेही) नसते. तुमच्या माहितीत असा देश असल्यास त्याचे नाव वाचायला जरूर आवडेल.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/24/2018 - 23:57 नवीन
महत्वाचे : "देशात प्रतिमाणसी कचऱ्याचे प्रमाण जास्त असणे" आणि "नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी बेजबाबदारपणे कचरा करण्याची सवय असणे" या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 12/25/2018 - 00:10 नवीन
म्हणुनच मी सिलेक्टीव्ह रिडींगबद्द्ल अगोदरच माफी मागितली आहे :प
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 12/25/2018 - 09:19 नवीन
साहेब, माफिची अजिबात गरज नाही. मुद्दा समजला आणि पटला, इतके पुरेसे आहे.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 12/25/2018 - 00:07 नवीन
भारत :ड माझा प्रतिसाद "मला सार्वजनिक जागेवर हवा तसा, हवा तेथे, हवा तितका कचरा करायचा आधिकार आहे, सरकारने तो साफ करायची व्यवस्था करावी" या धारणेवर आहे, अस्वच्छतेच्या स्थाईभावावर नाहि. विकसीत देशांतले लोक्स पॅकेजींग, मेल्स, अन्नादी कन्स्युमेबल गोष्टी, सफाई सुवीधेत वापरायच्या गोष्टी, हायजीन प्रॉडक्ट्स... इ. अनेक गोष्टींचा अगदी मनसोक्त कचरा करतात... फक्त तो एफीशियण्टली मॅनेज होतो, म्हणुन त्याची घाण होत नाहि. मुळात कचरा निर्माणच होऊ नये, किंवा कमितकमि निर्माण व्हावा याबद्दलची खबरदारी घेतल्याचं मी तरी वीकसीत देशांत बघितलं नाहि. माझं मत दोन अमेरीका खंडातले देश आणि एक युरोपीय देशांतल्या थोड्या काळच्या वास्तव्यावर बनलं आहे.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 12/25/2018 - 00:27 नवीन
विकसीत देशांतले लोक्स पॅकेजींग, मेल्स, अन्नादी कन्स्युमेबल गोष्टी, सफाई सुवीधेत वापरायच्या गोष्टी, हायजीन प्रॉडक्ट्स... इ. अनेक गोष्टींचा अगदी मनसोक्त कचरा करतात... फक्त तो एफीशियण्टली मॅनेज होतो, म्हणुन त्याची घाण होत नाहि. मुळात कचरा निर्माणच होऊ नये, किंवा कमितकमि निर्माण व्हावा याबद्दलची खबरदारी घेतल्याचं मी तरी वीकसीत देशांत बघितलं नाहि.
याचे मुख्य कारण लोक कचरा कचरापेटीतच टाकतात (आणि तो सुद्ध्धा वर्गवारी केलेल्या कचरापेट्यांतच) हे आहे.....अमेरिका आणि युरोपात एकूणच सार्वजनीक जागी कचरा टाकू नये याबाबत लहानपणापासून घरात आणि शाळेत असे दोन्हीकडे संस्कार होतात...अर्थात याला काही जागा थोड्याफार अपवाद आहेत पण त्या नावापुरत्याच भारतात फक्त इतके जरी केले तरी आपल्याकडे कचरा मॅनेजमेंट बेताचे असूनही चालून जाईल
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 12/25/2018 - 05:28 नवीन
इतर देशांशी तुलना चालू आहे तर माझे अजून दोन पैसे: रस्ता-वाहतुकीबाबत आशियाई परदेशातला हा अनुभव. समजा एखादी कार रस्त्यावर पळते आहे आणि समोर पादचारी रस्ता ओलांडायला आलाय. तर इथे चक्क कारवाला थांबतो, डीपर देतो आणि ते पाहून पादचारी आधी रस्ता ओलांडतो आणि मग कारवाला पुढे जातो. तसेच जर दोन कार्स समोरासमोर आल्या तर एकजण डीपर देतो व त्याचा अर्थ असतो की दुसऱ्याने आधी पुढे जावे ! अशा वेळेस दुसरा पहिल्याकडे पाहून कृतज्ञतापूर्वक हात हलवतो. ... आता नुकताच महाराष्ट्रातील एक अनुभव. मी एकटा एका गावाहून टुरिस्ट कारने यायला निघालो. मी चक्रधराच्या शेजारी बसलो अन बसताक्षणी माझा सीटबेल्ट लावला. त्याने काही तसे बिलकूल केले नाही. त्यावर मी म्हणालो, “तुम्ही पण लावा की”. त्यावर तो, “न्हाई, इकडं कोनी बघत नाय”. त्यावर मी, “अहो, पोलिसाचे जाऊदेत, हे आपल्या जिवासाठीच चांगले आहे”. त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता त्याने गुटख्याचा तोबरा भरत गाडी चालू केली. म्हणजेच ही बेशिस्त अंगभूत (की जनुकीय?) आहे. इथे आपण सुशिक्षित अथवा सरकार काय करणार कपाळ? असा अनुभव बरेच वेळा आलेला आहे. असो....
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 12/25/2018 - 06:02 नवीन
Google Pay वरुन माझे पण 2 रुपये.. एका ठिकाणी कागदी डिश मधे वडापाव खात होतो. शेजारी आणखी एक खात होता. जवळच कचराकुंडी ठेवली होती. त्या व्यक्तिचा वडापाव खाऊन झाला अणि त्याने ती डिश कचराकुंडीत न टाकता तिच्या शेजारीच टाकली. मी पण आणखी त्वेषा ने माझी डिश कचराकुंडी च्या बाहेर टाकली. अन त्याला मस्त मिस्टर बीन सारखी स्मयिल दिली. असा चाकटला! .... दरोंतो एक्सप्रेस ला सगळा क्रौड बर्यापैकी सुशिक्षित असतो. उठुन 4 पाऊले कचरा टाकायला पण त्याच्या जीवावर येते. ते पण कचराकुंडी उपलब्द असुन देखील. .... खोड आहे बाकी काही नाही.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Tue, 12/25/2018 - 06:52 नवीन
गडकरी म्हणाले, जवाहरलाल नेहरु म्हणायचे भारत हा देश नाही, लोकसंख्या आहे. या देशाचा प्रत्येक व्यक्ती देशासाठी प्रश्न आहे, समस्या आहे. त्यांचं हे भाषण मला खूपच आवडतं. त्यांमुळे मी इतकं जरुर करु शकतो की, देशासमोर मी समस्या बनून राहणार नाही.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 12/25/2018 - 07:02 नवीन
जवाहरलाल नेहरु म्हणायचे भारत हा देश नाही, लोकसंख्या आहे. >>>> माझ्या मते हे मूळ वाक्य चर्चिल यांचे आहे: India is not a nation, it is only population.
  • Log in or register to post comments
व
वन Tue, 12/25/2018 - 08:24 नवीन
वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे याला तर अनेक सुशिक्षित भारतीयही बळी पडलेले आहेत. त्याला कोणी वावगे मानत नाही ही दुखाची गोष्ट आहे. मी बऱ्याच टुरिस्ट ड्रायव्हरना सांगून पहिले आहे की तुम्ही वाहन चालवतानाचा फोन घेण्यासाठी हस्तमुक्त कानाचे यंत्र वापरा. पण ऐकतंय कोण?
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 12/26/2018 - 10:56 नवीन
हस्तमुक्तकानयंत्र लावून वहान चालवणे अत्यंत धोक्याचे आणि तितकेच बेकायदेशीर पण आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 12/26/2018 - 16:58 नवीन
+१०० हस्तमुक्तकानयंत्र वापरून चाललेल्या संभाषणामुळे चित्त समोरच्या व आजूबाजूच्या गोष्टीवरून ढळून अपघात होऊ शकतो. ते यंत्र वापरून अप्रिय संभाषण होत असल्यास त्यामुळे ढळलेल्या मनःशांतीमुळे अपघाताची शक्यता अजूनच वाढते.
  • Log in or register to post comments
व
वन गुरुवार, 12/27/2018 - 03:39 नवीन
माफ करा, मला ‘हस्तमुक्त’ म्हणजे मोबाइलमध्ये पिन खुपसून कानाला लावायचे फोन्स एवढेच म्हणायचे होते. ‘त्या’ इलेक्ट्रोनिक यंत्राचा काहीही अनुभव/ माहिती नाही. धन्यवाद. वाहन चालवताना कुठलाच फोन वापरू नये असे मात्र वाटते. मी ते कटाक्षाने पाळतो.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/27/2018 - 15:57 नवीन
ऐकता-बोलताना लक्ष विचलित होण्यामुळे अपघातांचा धोका वाढतो. त्यामुळे, वायरने जोडलेले यंत्र असो की वायरलेस... धोका तितकाच असतो.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 12/25/2018 - 06:05 नवीन
लहानपणापासून घरात आणि शाळेत असे दोन्हीकडे संस्कार होतात हि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 12/25/2018 - 09:34 नवीन
+१ जपानी मुलांना, स्वावलंबनाचे, एकमेकाला सहकार्य करण्याचे आणि स्वच्छतेचे शिक्षण प्राथमिक शाळेपासून कसे मिळते हे कळण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ... असे काही भारतातल्या शाळांत कोणी केले तर निदान शहरी भागांत तरी "आमच्या मुलांना काय कामकरी समजता की काय?" असा आक्षेप घेऊन पालकांचे मोर्चे शाळा प्रशासनाकडे जातील.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 12/25/2018 - 09:48 नवीन
अमेरिकेतही, "व्हॉलंटियरिंग" ही खोलवर रुळलेली प्रथा आहे. संग्रहालये, ग्रंथालये, पार्क्स, इत्यादींमध्ये व्हॉलंटियर म्हणून काम करणारे लोक ५०% किंवा जास्त काम करताना दिसणे विरळ नाही. हे काम स्वागतकक्ष, तिकिटविक्री, इत्यादींपासून ते कष्टाची व सफाईची कामे करण्यापर्यंत कोणतेही असून शकते. काही शिक्षणसंस्था प्रवेश देताना आणि व्यापारी संस्था नोकरी देताना व्हॉलंटियरींग हा बायोडेटाचा महत्वाचा भाग समजतात. भारतात अगदी मध्यमवर्गातही सरंजामशाही व सामाजिक स्तरांची जाणीव इतकी भिनलेली आहे की कोणतेही कष्टाचे आणि/अथवा सफाईचे काम करणे कमीपणाचे समजले जाते... मात्र, अश्या लोकांना बेजबाबदारपणे कचरा करण्यास अजिबात शरम वाटत नाही ! :(
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 12/25/2018 - 09:58 नवीन
भारतात अगदी मध्यमवर्गातही सरंजामशाही व सामाजिक स्तरांची जाणीव इतकी भिनलेली आहे की कोणतेही कष्टाचे आणि/अथवा सफाईचे काम करणे कमीपणाचे समजले जाते.>>> + १११११११ साधी ही तुलना बघा. अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेणारा अमेरिकी विद्यार्थी आणि भारतातून तिथे शिकायला गेलेला वि. पहिला स्वतः शैक्षणिक कर्ज काढतो व 'कमवा व शिका' अनुसरतो. दुसरा सहसा कष्टाची कामे करत नाही (अपवाद सोडून). ( ही माहिती बरेच जणांकडून ऐकली आहे ; प्रत्यक्ष अमेरिकी पाहिलेला नाही. तरी चू भू दे घे ).
  • Log in or register to post comments
व
वन Tue, 12/25/2018 - 10:13 नवीन
त्या विडीओसाठी. लय झ्याक हाये राव ते जपानमधले शिक्षण. शाळेतली मुले स्वत बटाटे पिकवण्यापासून ते जेवणाची ताटे धुणे व फरशी पुसायची कामे करता ना पाहून धन्य जाहलो. मोठेपणी ही मुले स्वयंशिस्त नागरिक होणार यात नवल ते काय !
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 12/25/2018 - 15:34 नवीन
आणि हा व्हिडिओ भारतिय लोकांच्या मानसिकतेवरची बोलकी टिप्पणी आहे...
  • Log in or register to post comments
व
वन Tue, 12/25/2018 - 15:56 नवीन
त्यातले हे वाक्य भावले: 'आम्ही विदेशी कपडे घालतो, भारी मोबाईल वापरतो, त्यांच्यासारखी उच्च भाषा बोलतो.... पण..... आम्हाला नागरी जाणीव आहे का? '
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 12/26/2018 - 09:27 नवीन
चित्रफिती उत्तम आहेत. या चर्चेचे सार म्हणता येतील.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 12/26/2018 - 09:49 नवीन
पहिल्या चित्र फितीत शिक्षक चमच्याने खात आहे हे पाहून कॅमेर्‍यामागच्या मंडळींनी त्याला प्रश्न विचारून चॉपस्टिक्स आणण्यास भाग पाडले हे लक्षात आले का ? भारतात असे काही झाले असते तर, "बुरसटलेल्या प्रथा पाळण्याची शिक्षकावर सक्ती केली", "शिक्षकाच्या निवड/मानवी अधिकाराची पायमल्ली केली जात आहे", "आता आम्ही कसे जेवावे हे पण सरकार सांगणार काय?", "यात सरकारचा राजकिय अजेंडा आहे?" अश्या प्रकारच्या मथळ्यांवर महिनाभर तरी सगळ्या माध्यमांतून गदारोळ झाला असता ! :)
  • Log in or register to post comments
N
nanaba Tue, 12/25/2018 - 07:52 नवीन
Ani avdala
  • Log in or register to post comments
व
वन Sat, 12/22/2018 - 05:56 नवीन
संजय उवाच, तुमचे विश्लेषण आवडले. कुमार१, तुमचा बेशिस्तीचा मुद्दा पटला. आता माझे काही मुद्दे: १. रेल्वे प्रवासात कायम बिगर-आरक्षण/विनातिकीट प्रवास करणारे, भाई-दादा लोक वगैरे एका बाजूस आणि सैनिक दुसऱ्या बाजूस असे धरूया. तर या दोन गटांत काहीच गुणात्मक फरक असू नये का? पहिला गट हा ’सामान्य बेशिस्त नागरिक’ असा आहे. उलट सैनिकांनी असे वागणे हे ‘लष्करी शिस्तीत’ कसे काय बसते? संडासात ट्रंका ठेवून तो बंद करणे हा बेशिस्तीचा कळस झाला. २. वर चर्चेत अन्य देशांशी तुलनेचा मुद्दा आला आहे. माझ्या वृत्तपत्र वाचनावर आधारित दोन उदा. देतो. * जपानमध्ये दर चौ.किमी. मध्ये भारतापेक्षा जास्त माणसे राहतात. तेव्हा त्यांचे नियोजन छान असते हे मानावे लागेल. सतत “लोकसंख्या, सरकार” अशी कारणे देऊन आपण आपले नियोजनाचे अपयश झाकतो. * चीनमध्ये एका राष्ट्रीय सुटीच्या दिवशी एका ट्रेनला मरणाची गर्दी असते. खूप लोक तेव्हा आपापल्या गावी जात असतात. किमान प्रवास साधारण ४-५ तास असतो. ती गर्दी इतकी असते की प्रवासी डब्यातील संडासजवळ जाऊच शकत नाहीत (अगदी त्या दाराजवळचे सोडून). यावर सर्वांनी मिळून तोडगा काढला आहे. सर्व प्रवासी आपापल्या अंतर्वस्त्राच्या आत चक्क डायपरचे pad बांधतात. त्यामुळे जर प्रवासात लघवी लागली तर न लाजता त्यातच करायची ! त्या देशात आपल्याहून जास्त लोकसंख्या असली तरी अशी ‘सामूहिक समज’ आली आहे हे मला विशेष वाटते. अंगभूत बेशिस्त हा आपला खरा प्रश्न आहे
  • Log in or register to post comments
म
मनो Sat, 12/22/2018 - 06:20 नवीन
चीन (बीजिंग) मधला प्रत्यक्ष अनुभव - आपण रांगेत शिस्तीत उभे असलो तरी इतर लोक धक्का मारूनही पुढे घुसतात आणि आपल्या आधी बस मध्ये शिरायचा प्रयत्न करतात. परदेशी माणूस पाहून तर अजूनच कारण आपण भाषेच्या अडचणीमुळे तक्रार नाही करू शकत . हे एखाद्या वेळी नाही तर 15 दिवस पाहिलंय. तसंच स्वच्छ रस्त्यावर कचरा करणे, उलट्या दिशेने बाईक नेणं असे अनेक प्रकार तिथेही होतात. तो एकच देश जिथे अगदी घरच्यासारखं वाटतं ... (खरेदी करताना बायकोने 10% किमतीत बॅग भरून वस्तू जमवल्या, घासाघीस अगदी मुंबईच्या वर आणि नाटकं फार, हात पकडणे, calculator वर किमती टाईप करणे, तसच सगळं) परत बीजिंग विमानतळावर जाताना टॅक्सीवाल्यांने खरी नोट बदलून खोटी परत केली, अजून आहे ती घरी आठवण म्हणून. एकूण काय तर आपण एकटेच काही बेशिस्त नाही, मनुष्य स्वभाव आहे तो, घरोघरी मातीच्याच चुली ....
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 12/22/2018 - 06:06 नवीन
* जपानमध्ये दर चौ.किमी. मध्ये भारतापेक्षा जास्त माणसे राहतात. चुकीची माहिती आहे. जपान मध्ये एका चौरस किमी मध्ये ३४८ माणसे राहतात आणि भारतात ४५५ म्हणजे ३० % जास्त. सिंगापूर मध्ये एका चौरस किमी ७९०९ माणसे राहतात. भारताचे क्षेत्रफळ ३३ लाख चौरस किमी तर जपानचे ३. ७ लाख म्हणजे एक दशांश आणि सिंगापूरचे क्षेत्रफळ आहे ७२१ चौरस किमी त्यातून भारत हा विविध जाती धर्माचे आणि शैक्षणिक स्तराचे लोक आहेत जपान त्या मानाने एकसंध संस्कृतीचा देश आहे. जितका मोठा देश आणि जितका विविधतेचा तितकं त्यावर नियंत्रण ठेवणे अशक्य आहे. दोन मुलांवर नियंत्रण ठेवणे २० मुलांवर ठेवणे आणि २०० मुलांवर (ती सुद्धा विविध जाती धर्माची) नियंत्रण ठेवणे यात असलेला हा फरक आहे.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sat, 12/22/2018 - 06:31 नवीन
एक दुसरा अनुभव बहुदा इथे मिपावरच वाचला होता. कारगिल युध्दाची जेव्हा संभाव्य सुरुवात होऊ लागली तेव्हा सगळ्या सैनिकांच्या रजा कॅन्सल करुन त्यांना कामावर रुजु होण्याची ऑर्डर आली तेव्हा सर्व कल्पना देऊन आरक्षित डब्यात चढ्ण्याची अनुमती मागणार्या एका सैनिकाकडुन २०० रू ची लाच टी.सी ने घेतली होती. वर असेही ऐकवले होते कि अशाच पध्दतीने आम्ही कमाई करु शकतो. प्रत्येकाला सूट देऊ गेलो तर कुणाकडुनही घेऊ शकणार नाही. असा अनुभव आल्यानंतर "मरोत ते नागरिक" असा विचार एका सैनिकाच्या मनात आला तर त्यात काही वावगे वाटण्याचे कारण नाही.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा