मुंबईचे धडे - १
२००५ साली बी कॉम ची परीक्षा दिली नि मी नवीन कोर्स करिता कोकणातून मुंबईला येऊन दाखल झाले. ठाण्याला काकांकडे राहण्याची सोय झाली. स्टेशनपासून काकांचं घर अगदीच जवळ होतं. तशी मुंबईला राहायची आणि मुंबईची सवय करून घायची हि पहिलीच वेळ. याआधी कधीतरी फिरायला म्हणून कुणाबरोबर तरी मी मुंबई पाहिलेली. मुंबई बाहेरची असल्याने लोकल जिथपर्यंत जाते त्याला सगळ्याला मुंबई म्हणायचे. माझा क्लास विद्याविहार स्टेशन जवळ होता. तेव्हा रोज ठाणे ते विद्याविहार रोज लोकलचा प्रवास करावा लागणार होता. पूर्णपणे अनोळखी वातावरणात माझ्याबरोबर होती माझी मैत्रीण केतकी जीला थोडी तरी मुंबईची माहिती होती.
क्लासची फी वगैरे भरून वेळ वगैरे सगळी ठरली. आता माझी परीक्षा होती ती मुंबईची, लोकलची माहिती करून घेणे नि सवय करणे. सुरवातीला काकू बरोबर जाऊन महिन्याचा पास काढला. काकूबरोबर येऊन, पास काढण्यासाठीच ऑफिस, कुठल्या क्लासचा पास किती रुपये, तिथे लिहिलेले बोर्ड वाचणे, अर्थ समजावून घेणे या गोष्टी केल्या. काकूने साधारण रोज लागणारे इंडिकेटर कसे वाचायचे समजावून सांगितलं त्याचप्रमाणे साधारण कुठल्या प्लॅटफॉर्म वर कुठे जाणारी गाडी येते हे देखील सांगितलं. जेवढं जमेल तेव्हढं लक्षात ठेवलं. केतकीला यातली माझ्यापेक्षा जास्त माहिती होती. त्यामुळे ती बरोबर असल्याने मी थोडी निवांत होते. ठाण्याला काकांचं घर प्लॅटफॉर्म नंबर १ च्या इथून अगदी जवळ होत. मग केतकी नि मी एक जागा भेटण्याची ठरवून घेतली. २/३ वेळा काकूबरोबर येऊन नक्की रस्ता, स्टेशन यांची माहिती करून घेतली.
क्लास सुरु झाला. हळूहळू रोजची सवय व्हायला लागाली. क्लास दुपारी ४ ते रात्री ८ असायचा त्यामुळे दुपारी लोकलने जायला अजिबात गर्दी नसायची. आरामात बसून जायचो. पण येताना मात्र सुरवातीला काही दिवस भरलेली लोकल बघून सोडून द्यायचो. शक्यतो ठाणे लोकल पकडायचो. कि त्यातल्या त्यात कमी गर्दी. विद्याविहारला तशाही सगळ्या स्लो लकात थांबत असल्याने फास्ट लोकलचा संबंध नव्हता. केतकी आधी मुंबईत राहिली असल्याने तिला लोकल मध्ये चढण्याचा, गर्दीत घुसण्याचा कॉन्फिडन्स खूप लवकर आला. मीच जरा वेळ घेतला. मुबईची गर्दी टीव्हीवर बघायचे पण अनुभव पाहिल्यान्दाच होता. पण हळूहळू सवय व्हायला लागली.
क्लास आमचा जुलै मध्ये सुरु झाला. पावसाळ्याचे दिवस. थोडे दिवसात पाऊस पडून ट्रेन चुकणे,उशिरा येणे, बंद पडणे वगैरे नेहमीचे सोपस्कार सुरु झाले. अर्थात आमची काही ठरलेली लोकल नव्हती. स्टेशनला आल्यावर मिळेल ती लोकल पकडून जात असू.
एकदा असाच सकाळपासून पाऊस सुरु होता पण पाणी भरल्याची कुठे बातमी नव्हती. स्टेशनवर आलो तेव्हा ट्रॅक वर पाणी होते. पण ट्रेन उशिरा का होईना धावत होत्या. आम्ही १ नंबर ला ट्रेन पकडली. ट्रेनला फारशी गर्दी नव्हती. लेडीज डब्यात जेमतेम १०/१२ बायका होत्या. घाटकोपर सोडल्यावर आम्ही विद्याविहारला उतरायचे म्हणून दारात येऊन उभे राहिलो. स्टेशन जवळ आलं आणि अचानक गाडी ट्रॅक बदलून फास्ट ट्रॅक वर गेली. स्टेशन दिसतंय म्हणता म्हणता प्लॅटफॉर्म आमच्यापासून दूर जाऊ लागला. मी घाबरले. माझ्यासाठी पहिलाच असा प्रसंग.
"आता काय करायच?" मी केतकीला म्हटलं "पुढचं स्टेशन कुर्ला.आणि आपल्याला तर काहीच माहित नाही." मी पॅनिक झाल्याने फारच मोठ्या आवाजात हे म्हणाले. सगळ्यात आधी केतकीने मला कोपराने ढोसून शांत व्हायला नि आवाज खाली करायला सांगितला. पॅनिक होऊ नको, आणि उगाच आपल्याला काही माहित नाही हे बोंबलत फिरू नको म्हणून पुटपुटली. पुढे कुर्ला स्टेशनवर गाडी थांबली नि आम्ही उतरलो. मी तर पूर्ण गोंधळून गेले होते. केतकीने माझा हात पकडलंन नि जिना चढायला लागली. वरआडव्या ब्रिज वर गेल्यावर इंडिकेटर बघितलंन. प्लॅटफॉर्म १ ला ठाणे लोकल येत होती. सुदैवाने प्लॅटफॉर्म दाखवणारे बोर्ड जागेवर लावलेले होते. आम्ही तीच लोकल पकडून ठाण्याला परत आलो नि मी हुश्श केलं.
त्या दिवशी घेतलेला महत्वाचा धडा म्हणजे काही झालं तरी आपल अज्ञान नको तिथे पाजळायचं नाही. गैरफायदा घ्यायला आजूबाजूला लोक टपलेले असतात. अशा प्रसंगी आपण पण घाबरलेलो असतो नि मग लोकांच्या खोट्या बोलण्याला फसतो. अर्थात हे ज्ञान येताना मला केतकीने दिलंन. आणि मग मी ते अगदी पक्क मनाशी घोकून ठेवलं. तसंच आपला, गावात बोलण्याचा आवाज नि शहरात बोलण्याचा आवाज पण वेगवेगळा असावा. गावात ज्या टोनमध्ये नि जेव्हढ्या मोठ्याने सहजपणे बोलतो तसं शहरातून चालत नाही हे देखील कळलं.
पदवीधर झालेली व्यक्ती लोकलमध्ये फक्त एक दोन स्टेशन पुढे उतरावे लागेल या कल्पनेने एव्हढी घाबरते?<< तुमच्या मते, भितीची व्याख्या एकाद्याच्या शैक्षणिक क्षमतेवरुन ठरत असेल तर मुंबईत निरक्षर लोकांचे, भितीने काय हाल होत असतील ह्याचाच विचार करतोय.शहरात घाबरलेले न दाखवता घाबरून राहाणे उत्तम.एकदम सहमत