Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

एकच प्याला !!!

क
किल्लेदार
Fri, 12/07/2018 - 17:55
💬 60 प्रतिसाद
एकदा वाचण्यात आलं होतं की तुमचा आवडता मद्याचा प्याला तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल थोडेफार सांगू शकतो... आणि मला एक जुना किस्सा आठवला. मित्राला खोकला झाला म्हणून त्याला घेऊन एकदा ब्रँडी आणायला वाईनशॉप मध्ये गेलो होतो. काउंटरवर ब्रँडी मागतांना, खुद्द गांधींनी केली नसती एवढी याची चुळबुळ चाललेली. बाटली घेऊन पैसे चुकते केल्यावर चेहऱ्यावर जमेल तितकी अजीजी आणून "हमे नशा नही करना है, दवा के लिये ले रहे है" असा डायलॉग जेव्हा त्याने दुकानदाराला मारला, तेव्हा मी मात्र स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला. तस्मात...ब्रँडी हे जरा पापभिरू लोकांचं मद्य असावं. इतरांसारखी ही सहसा कधी कुठल्या ग्लासात विसावत नाही. हिचे मोजमाप झाकणानं नाहीतर चमच्यानं. फारच वाटलं तर कधीतरी प्रवासात असताना हिप-फ्लास्क मधून घोटभर. औषधी गुण असल्यामुळे दारू न पिण्याऱ्यांच्या कपाटात सुद्धा हिला कुठेतरी कोपऱ्यात जागा मिळते. नातवाला खोकला झाला की पूर्वी आजीच्या बटव्यातून कुठलीतरी औषधं निघायची पण ब्रँडीचा उगम हा मात्र आजोबांच्या कपाटातून व्हायचा. पावसाळ्यात शाळेमधून भिजून घरी आलो की कधीतरी एक दोन झाकणं ब्रँडी मिळायची. शरीरभर हळूहळू पसरत जाणारी ती ऊब मस्त वाटायची. अर्थात मद्याचे हे बाळकडू मला ब्रॅंडीमधूनच मिळाले. खरं तर बाळ-कडू असं म्हणणं म्हणजे ब्रॅंडीवर अन्यायच, कारण मुळात वाईन पासून उगम पावलेली ब्रँडी (म्हणजेच बर्न्ट वाईन) ही चवीला निश्चितच मधुर असते. सर्व वारुणींमधे सगळ्यात मोठी (?) बहीण म्हणजे वाईन (? कारण वाईन मोठी का बिअर हा एक वादाचा मुद्दा आहे). वाईनप्रेमी सहसा गोष्टीवेल्हाळ असतात असा समज आहे. घोळवून घोळवून किस्से सांगणे, गॉसिपिंग करणेआणि त्याच प्रकारे ग्लासमध्ये घोळवून घोळवून वाईन (रक्तवर्णी) पिणे हे या लोकांचे ठळक वैशिष्ट्य. यामधूनच कदाचित Grapevine (अफवा पसरवणे) हा शब्दप्रयोग रूढ झाला असावा. 6b038e74a793e00a939ab74e28c6d2f0 हिची सक्खी धाकटी बहीण (म्हणजेच व्हाईट वाईन) हिच्यासारखीच, पण जरा श्रीमंत घरात दिलेली (गोरी आणि स्टायलिश असल्यामुळे असेल कदाचित). गॉसिपिंग करण्याची आवड असली तरी अंदाज एकदम हटके. घोळवून एखादा किस्सा सांगण्यापेक्षा हलकेच एखादी पुडी सोडून त्यावर सुरु झालेला वादविवाद आणि त्याबरोबर हातातल्या वाईनचा आस्वाद यांना प्रिय. जिन आणि वोडका या दोन्ही श्वेतवर्णी बहिणींना छानछोकी आणि नवे नवे मेकअप फार प्रिय. या बहिणी क्वचितच कुठे एकट्या जात असाव्यात. कॉकटेल् पार्टीज, मौजमजा आणि गर्दी मध्ये या जास्त रमतात. Gin and Vodka "मार्टिनी !!! शेकन, नॉट स्टर्र्ड... " हा सुप्रसिद्ध डायलॉग आपल्या जेम्स बॉण्डचा. त्यामुळेच बॉण्डने ग्लॅमर मिळवून दिलेली (जिन)मार्टिनी पिणारे जरा जास्तच शो-ऑफ करणारे असतात असा समज होऊ शकतो (आणि ते खरेही आहे). प्रत्येक बॉन्डपटात "बॉण्ड गर्ल" बदलते, तेच कशाला खुद्द बॉण्डही काही वर्षात बदलतो. पण मार्टिनी... ती वर्षानुवर्षे आहे तशीच आहे. म्हणूनच ही कॅटेगरी गर्दीत असूनही आपल्याच गुर्मीत राहणारी अशी आहे. jamos-bond-martini "रममाण" होणे म्हणजे काय याचा खरा प्रत्यय मला हिमालयात "रम" पितानाच आला. दिवसभराचा हाडं खिळखिळी करणारा प्रवास आणि रात्री तीच खिळखिळी झालेली हाडं गोठवून टाकणारी थंडी, यावर हा एकच "रमबाण" उपाय आहे. कधी सोड्यात, तो नसेल तर थोडं पाणी घालून नाहीतर नुसतीच कोरी रम बेदम झालेल्या गात्रांवर हळुवार फुंकर घालते आणि हळूहळू थोपटत झोपवते. रमचा आस्वाद घ्यायला आजूबाजूला गर्दी लागत नाही. एखादा जिवाभावाचा मित्र असला तर उत्तमच पण नसेल तरीही खुद्द रमदेखील उत्तम सोबत करू शकते. म्हणूनच कदाचित लष्कराचीही सगळ्यात आवडती, रांगडी अशी रमच. रम प्यावी मर्दांनीच. narpoo-rum व्हिस्की ही सगळ्या बहिणींमध्ये जरा अबोल आणि जास्त "म्यॅच्युअर्ड". हिला फार गर्दीही झेपत नाही आणि अगदी एकटेपणाही. अस्सल व्हिस्कीप्रेमी दोन पेग व्हिस्कीबरोबर दोन-तीन तास कुठल्याही विषयावर पण तर्कशुद्ध काथ्याकूट करत सहज घालवतील (मधून मधून डोळे मिटून किंवा "व्वा!!!" एवढंच म्हणून हातातल्या व्हिस्की बद्दल कृतज्ञता व्यक्त करायला विसरणार नाहीत). पिताना अधाशीपणा आणि त्यानंतर येणारा वाचाळपणा हे दोन्ही दुर्गुण यांच्यामध्ये नसतात. यांचा अगदी सहज ओळखू येणारा दुर्गुण एकच. अस्सल व्हिस्कीप्रेमी आणि त्यांचा हा दुर्गुण हुडकून काढायचा असेल तर एखाद्याला तो पीत असताना व्हिस्कीबद्दलच एखादा बाळबोध प्रश्न विचारा. तुम्हाला उत्तराऐवजी नुसता एखादा तुच्छतेचा कटाक्ष मिळाला तर तो अस्सल समजावा. whisky1 पण जशी गवयांची घराणी असतात तशी व्हिस्किचीही असतात बरं. हिची खरी मुख्य घराणी दोन. एक म्हणजे आद्य असं स्कॉचचं आणि दुसरं स्कॉचव्यतिरिक्त इतर सर्व. जसा स्कॉटलंड मध्ये जन्माला आलेली स्कॉच व्हिस्की आणि सर्वच बाबतीत अतिशय काटेकोर असलेले गोरे इंग्लिश साहेब यांचा परस्परसंबंध आपल्याला सहज दिसू शकतो तसाच अघळपघळ अमेरिकन्स आणि तिथे जन्माला आलेल्या बरबर्न, टेनेसी किंवा राई व्हिस्की यांच्यातही दिसतो. अमेरिकन व्हिस्की कोक किंवा कॉकटेल काहीही खपवून घेईल पण स्कॉच व्हिस्कीचं सोवळं फार कडक. साधा बर्फाचा खडा जाऊ देत, पाण्याचा थेंबही कधी कधी वर्ज्य असतो. whisky वयाने सगळ्यात मोठी पण तरीही सर्वात खेळकर, दिलखुलास आणि बबली अशी बिअर. चीन मधली “मीड” (मधापासून बनवलेली वाईन) ही बिअरपेक्षाही प्राचीन आहे असा दावा मला त्या मीड इतकाच बिनबुडाचा (किंवा बिन-बुडबड्याचा म्हणा हवं तर) वाटतो. पाणी आणि चहा नंतर जगात सर्वाधिक प्रिय असे पेय म्हणजे बिअर. बिअरचा जसा हा मित्रपरिवार मोठा तसाच बिअर पिणाऱ्यांचाही. बाटलीबंद बिअर गप्प असते पण एकदा बूच उघडले की बराच वेळ एका लयीत संथपणे पृष्ठभागावर बुडबुडे येत राहतात. बिअर पिणाऱ्यांचाही तसंच. बार काउंटरवर बिअरच्या नळापाशी बसलेला एखादा, बिअरचे दोन-चार घोट घशाखाली घातल्यावर शेजारच्या अनोळखी व्यक्तिबरोबरही तासभर मनमोकळ्या गप्पा मारू शकतो. beer बिअरचा हिशोब असतो लिटर मध्ये. झाकण, लहानसहान ग्लास किंवा मिलिलिटरअसली संकुचित मापं आणि तशीच मनोवृत्ति बिअरला आणि बिअर पिणाऱ्यांना अजिबात मानवत नाही. "अन्न हे पूर्णब्रह्म" हे आपल्या सर्वांना लहानपणापासून ज्ञात आहे. पण सुमेरियन काळात कामगारांना रोजची मजुरी ही "बिअर हे पूर्ण अन्न" म्हणून पुरवली जाई याची किती जणांना कल्पना असेल ? इतका पुरातन सांस्कृतिक वारसा असलेल्या बिअरला "अपेय" आणि तो जपणाऱ्यांना "दारुडा" म्हणणे म्हणजे शुद्ध कृतघ्नपणाच. व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीला धरून प्रत्येक प्रकृतीला मानवेल अशी वारुणी नक्कीच आज जगात असेल. उदाहरणच घ्यायची झालीत तर धसमुसळ्या लोकांसाठी टकीला, जेवण झाल्यावर फक्त स्वीट डिश म्हणून पिणाऱ्यांसाठी मालिबू किंवा बडीशेपेऐवजी पास्तिस. नेहमीच्या आहारात लागणारी आणि म्हणूनच घरच्या घरी बनवली जाणारी हिमाचल मधली "लुगडी" किंवा नेपाळ मधली "छांग", तिबेटसारख्या अतिथंड प्रदेशात आधार देणारी आणि तिथल्या लोकांसारखीच उबदार अशी "तोंगबा", युरोपिअन स्टाईलला साजेशी अशी असंख्य लिक्योर्स. जपानी खाद्य-संस्कृतीशी जुळवून घेणारी अतिशय साधी अशी साके आणि अशा कितीतरी. आपल्याकडे मात्र देवांचे पेय म्हणून समजली जाणारी ही सुरा, असुरासारखी पितात . फक्त "टाईट" होण्यासाठी पिण्याची आपली प्रकृती म्हणूनच पूर्वीपासून वाईट ठरत आली आहे. आपल्या खाद्य-संस्कृतीएवढीच मद्यसंस्कृतीही कधीतरी प्रगल्भ होईल अशी आशा करणे आणि वाट बघणे तेवढेच ते काय सध्या शक्य आहे. सर्व चित्रे आंतरजालावरून साभार......

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 27242 views

💬 प्रतिसाद (60)
क
किल्लेदार Tue, 12/11/2018 - 01:38 नवीन
☺️
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 12/10/2018 - 16:02 नवीन
झकास लेख...मजा आली वाचायला.
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Tue, 12/11/2018 - 01:38 नवीन
☺️
  • Log in or register to post comments
आ
आशुतोष-म्हैसेकर Mon, 12/10/2018 - 21:20 नवीन
लेख एकदम झक्कास झाला आहे, मला तुमची खुशखुशीत विनोदी शैली आवडते, आजीबाईचा बटवा आणि आजोबांचं कपाट ही तुलना आवडली, एकदम फक्कड बेत जमवला आहे, आम्ही घेत नाही पण आज तुमच्या मुले हे सगळे गुण कळाले
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Tue, 12/11/2018 - 01:41 नवीन
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Tue, 12/11/2018 - 01:43 नवीन
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Tue, 12/11/2018 - 03:29 नवीन
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Tue, 12/11/2018 - 04:57 नवीन
न पिणाऱ्यांनाही सम"रस" होता यावे म्हणून छोटासा प्रयत्न ;)
  • Log in or register to post comments
न
निओ Wed, 12/12/2018 - 08:19 नवीन
भारी व्यासंग तुमचा किल्लेदार साहेब :) आवडता विषय नी खुमासदार लेखन शैली. झकास झालाय लेख.
  • Log in or register to post comments
क
किल्लेदार Wed, 12/12/2018 - 12:35 नवीन
:)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा