बोका ए आझम ओंकार पत्कीची एक्झिट
मिसळपाववरच्या श्री गणेश लेखमालेतील लेखाच्या निमित्ताने पहिल्यांना व्यनिमध्ये भेटलास आणि कळलं, आपण एकमेकांपासून एक किलोमीटरहूनही कमी अंतरावर राहतोय. मग काय, आपण दुस-याच दिवशी शिवाजी पार्काजवळच्या गोल्डनमध्ये ऐन गणपती मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर गप्पा ठोकायला भेटलो. तेव्हाच कळलं की माझे आजोबा तुझ्या आईचे शिक्षक आणि तुझी आई नि माझी आत्या वर्गमैत्रीणी, आपलं मैत्रही तिथेच पक्क जुळलं.
मिसळपाव डाॅट काॅमच्या माध्यमातून जुळलेलं मैत्र पुढे गाढंच होत गेलं. रात्रं रात्रं चालणा-या चर्चा, वाद, गप्पा, तुझ्याकडच्या माहितीच्या खजिन्यामुळे कधीच कंटाळवाण्या झाल्या नाहीत. या माहितीचा आणि तुझ्या निरनिराळ्या कार्यक्षेत्रातल्या अनुभवांचा वापर करून तू निर्मिलेल्या स्केअरक्रो, मोसादविषयक लेखमालांचं अख्खं मिपा फॅन असलं तरी मी तुझं मिपाबाह्य-लिखाणही वाखाणलं गेलेलं पाहिलंय.
गेल्या शनिवारी नूलकरकाकांबरोबर तुला भेटलो तेव्हा तुला तुझ्या राहिलेल्या मोसाद आणि इतर लेखमालिकांच्या पूर्तीसाठी आठवण केली तेव्हा प्रकृती अस्वास्थ्यातही तुझ्या चेह-यावर उमटलेलं हलकंसं स्मित फार छान दिसलेलं, वाटलं, काहीतरी शिजतंय डोक्यात.
त्यावेळी दोन वर्षांपूर्वी हनुवटीवर उमटलेली गाठ तुला आमच्यातून इतक्या तडकाफडकी हिरावून नेईल असं अजिबात वाटलं नव्हतं...
मदनबाण.....