Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

क्राईम डायरीज : एक शापित नातं: भाग ९

क
कलम
Fri, 11/23/2018 - 09:51
💬 14 प्रतिसाद

Book traversal links for क्राईम डायरीज : एक शापित नातं: भाग ९

  • ‹ क्राईम डायरीज : एक शापित नातं: भाग ८
  • Up
  • क्राईम डायरीज : एक शापित नातं: भाग १० ›
आयुष्यात आपण खूप चुका करतो... काही लहान सहान, काही खूप मोठ्या तर काही माफी सुद्धा नसणाऱ्या. आपण करतच जातो त्या चुका, कारण काहीही असो.. कधी त्या चुका करणं हि आपलीच चूक असते, कधी परिस्थितीची गरज असते तर कधी जाणून बुजून आपण ते सर्व करतो. चुका कुठल्याही असोत, आयुष्यात झालेली प्रत्येक चूक आपली सावली बनते आणि आपण सरणावर जाईपर्यंत आपला पिच्छा करते...सगळा वेळ, आपल्याही नकळत. आपण एखादी चूक सुधारतो, सुधारण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला वाटतं कि सगळं कसं पूर्वीसारखं ठीक होईल, पण नाही.. केलेल्या चुकांचे फास आपल्याला कधीतरी आवळतातच... कुठंतरी, कुठल्यातरी वळणावर आपल्या समोर उभे ठाकतातच. आपण कुठंच पळू शकत नाही मग. केलेल्या चुकांनी बरबटलेला भूतकाळ आणि त्यांच्या परिणामांमुळं काळवंडलेला भविष्यकाळ यात आपलं आजचं अस्तित्वच हरवून जातं कधी कधी..... 'आज पर्यंत आपण किती तरी वेळा अमित बरोबर मजा करायला गेलो, किती तरी रात्री त्यासोबत घालवल्या. त्या दिवशी मात्र मनापासून पश्चाताप होऊन सगळं तोडून टाकायला गेलो आणि तेव्हाच हे सगळं घडायचं होतं का? नियती इतकी कशी क्रूर असू शकते?. अर्थात आपण गेलो नसतो तरी पण आपण अडकलोच असतो म्हणा. केलेल्या गुन्ह्यांना शिक्षा हि होणारच. त्या दिवशी इन्स्पेक्टर सांगत होते कि ते अमितचा मोबाईल चेक करणार. त्यात आपले आणि अमित चे मेसेजेस आहेत, ते पण अगदी वाचू नयेत असे. बऱ्याचदा रेसॉर्टचं किंवा हॉटेल्सचं बुकिंग आपणच केलंय, ते पण क्रेडिट कार्डने, प्रत्येक हॉटेल मध्ये CCTV असतोच, त्यावरूनही पोलिसांना सगळं कळेल.आपले आणि अमित चे विवाहबाह्य संबंध होते हि गोष्ट इतक्या वाईट प्रकारे बाहेर येईल असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं. कितीदा तरी हे सगळं अथर्वला कळेल असं वाटायचं आपल्याला पण तेव्हा अमितवर किती विश्वास ठेवायचो आपण, तो सांगायचा 'घाबरू नको शांभवी, असं काही झालं तर मी अथर्वशी बोलेन, त्याला समजावेन आणि हे सगळं सांगूनही त्याला नाही कळलं तर मी तुझ्याशी लग्न करेन.' पण मग परवा रेसोर्ट मध्ये त्यानं आपल्याला असं कसं झिडकारून टाकलं. इतकं मन दुखण्यासारखं बोलत होता अमित, जणू काही त्याच्या आयुष्यात त्याच्या लेखी आपली काहीच किंमत नाही. खरंच काय होता अमित? काहीही असो आपण मूर्ख होतो' शांभवी टेरेस वर उभी राहून विचार करत होती. ------------------------------------- दुपारी चार वाजता रिसॉर्टच्या गेस्ट रूम मधल्या खुर्चीवर बसून वर फिरणाऱ्या पंख्याकडं बघत इन्स्पेक्टर पाटील विचार करत होते. डायविंग टीमने जवळपास ४ तास हुडकून देखील त्यांना तलावात काहीच मिळालं नव्हतं. विचार करता करता त्यांना डोळा कधी लागला हे त्यांचं त्यांना कळलं नाही. "सर, मी आत येऊ का?" दरवाज्यावर नॉक करत सब इन्स्पेक्टर राऊत बोलले. "या राऊत" इन्स्पेक्टर पाटील थोड्या त्रासिक आवाजातच म्हणाले. "सर, नाईट शिफ्ट वर त्या रात्री असलेल्या स्टाफशी बोलणं झालं. रात्री १० वाजता अमितच्या रूम मधून खाण्याची ऑर्डर आली होती. ते देण्यासाठी बबन मोरे नावाचा वेटर गेला होता. त्याच्याशी बोलल्यावर कळलं कि अमित आणि ती बाई यांच्यात कसलंतरी भांडण चाललं होत. ती बाई रडत होती. आवाज बाहेरपर्यंत येत होता. अमितनं वेटर ला रूमच्या आत येऊच दिल नाही. त्यानं बाहेरूनच जेवणाचा ट्रे घेतला." "हम्म.. रात्री अज्ञात व्यक्तीला किंवा अमितला बाहेर पडताना बघितलं का कुणी?" "नाही. सगळा स्टाफ जवळपास १२च्या दरम्यान रेस्ट रूम मध्ये आराम करायला जातो कारण बारानंतर खूप कमी कस्टमर सर्विस साठी फोन करतात." "म्हणजे रात्री कॉटेज बाहेर जाताना अमितला कुणीच बघितलं नाही?" "नाही सर." "आणि रात्री खोलीत एवढी झटापट होत असतानाही कुणीच काही ऐकलं नाही?" "सर सगळी कॉटेजेस एकमेकांपासून दूर असल्यानं आवाज ऐकू गेला नसेल." राऊत बोलले. "असं कसं शक्य आहे राऊत? एवढा शांत परिसर आणि कुणालाच आवाज ऐकू येऊ नये? परत एकदा सगळ्यांना विचार. कुणीतरी नक्कीच खोटं बोलतंय . अमितच्या कॉटेज शेजारची कॉटेज ज्यांनी बुक केली होती त्यांनाही विचारा... आणि हो, आता इशा केतकर बोलण्याच्या अवस्थेत असतील तर त्यांना कळवा कि मी त्यांना भेटायला येतोय. काल रिसॉर्ट मध्ये एन्ट्री केलेल्या प्रत्येक गेस्टची माहिती हवीय मला. जर ही बाई अमितबरोबर आली नाही तर कुठून आली नक्की? बघा एकदा, रिसॉर्ट मध्ये शिरायचा दुसरा कुठला मार्ग आहे का ते." " ठीक आहे सर ." "आणि राऊत, काहीतरी पॉसिटीव्ह बातमी सांगा बरं. काहीच कसं काय मिळत नाहीये आपल्याला?" "सर, केससंदर्भात लीड तरी मिळालीय पण ती कितीशी उपयोगाची आहे ते बघावं लागेल" सब इन्स्पेक्टर राऊत हातातील फाईल टेबलावर ठेवत म्हणाले. "सर, हे अमित केतकरांच्या मोबाईल चे मागच्या सहा महिन्यांचे डिटेल्स. खून झालेल्या ठिकाणापासूनच त्याचा फोन स्वीच ऑफ झाला आहे तो आत्तापर्यंत कुठंही ऑन झालेला नाही. पण मागच्या सहा महिन्याचे फोन डिटेल्स पहिले तर डोकं भणाणून जाईल. हा अमित केतकर दिसतोय तेवढा साधा माणूस नाही हे नक्की. रात्री अपरात्री बऱ्याच बायकांबरोबर ह्याचं बोलणं होत असलेलं दिसतंय. त्यातल्या बर्याचश्या कॉल गर्ल्स आहेत. मी दोघी चौघीना फोन केला तर कळालं कि त्या सगळ्या एका एस्कॉर्ट एजन्सी मध्ये काम करतात. मग त्या एजन्सी च्या मालकाशी बोललो. अमित केतकर हा त्याचा नेहमीचा कस्टमर. कुठलाही नवीन माल आला तर सगळ्यात पहिल्यांदा तो अमित केतकर कडं जाणार हे जणू काही अलिखित समीकरण होतं. वेगवेगळ्या हॉटेल्स मध्ये, रिसॉर्ट्स मध्ये तर कधी ह्याच्या बिजनेस ट्रिप मध्ये "कंपनी" देण्यासाठी हि एस्कॉर्ट एजन्सी मुली पुरवत असे. ह्या सगळ्याच पेमेंट कॅशनच होत असे." "हम्म.. म्हणजे हि जी बाईची बॉडी मिळाली आहे ती पण त्यातलीच एखादी असली पाहिजे." "नाही सर, एजन्सीच्या मालकाप्रमाणं त्या दिवशी मात्र त्याने कुठलीच सर्विस दिली नव्हती अमित केतकरला." "एखादी कुणीतरी एजन्सीतर्फे न जाता एकटीच जाऊ शकते ना?" "त्या एजन्सीत काम करणाऱ्या थोड्या मुलींना बोलावलंय बॉडी identify करायला. काही मुली कस्टमर्स बरोबर दोन चार दिवसांच्या आउटिंगला गेल्यात. त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचं काम पण चाललंय. हेड काउन्ट कमी भरला तर तीच "ही"समजायला हरकत नाही." 'पण ह्या सगळ्यात लीड काय आहे राऊत, तुम्ही दिलेल्या माहितीनुसार तर आधीच गुंतागुंतीची असलेली केस अजूनच अवघड झाल्यासारखी वाटतीय." सब इन्स्पेक्टर राऊत समोरच्या खुर्चीवर बसले आणि त्यांनी हातात असलेली दुसरी फाईल काढून इन्स्पेक्टर पाटलांना दाखवली. त्यासरशी पाटलांच्या चेहऱ्यावर कालपासून प्रथमच हसू आलं. "मग आपण वाट कसली बघतोय राऊत , गाडी काढा आधी." --------------------------------------------------------------------------------- "मॅडम तुम्हाला भेटायला इन्स्पेक्टर आलाय." शेवंतानं धावत येऊन सांगितलं तसं शांभवीच्या हृदयात हलकीशी कळ आली आणि हातपाय थरथरू लागले. सगळ्यात आधी एक ग्लास पाणी पिऊन ती थोडा वेळ बेड वर बसली. 'हो, झालीय चूक आपल्या हातून, आणि त्याची शिक्षा भोगू आपण, मग ती काही का असेना. पण आत्ता या क्षणी असं कमकुवत झालो तर आपल्यालाच ह्या सगळ्याचा गुन्हेगार समजून पकडतील. शांभवी, पूर्वार्ध काहीही असो, पण तू खंबीर पणे उभं राहायलाच हवंस.' शांभवी जागेवरून उठली. बाथरूम मध्ये जाऊन तिनं खसखसून तोंड धुतलं, समोरच्या आरश्यात केस ठीक केले आणि जिन्यावरून खाली हॉल मध्ये आली. सोफ्यावर इन्स्पेक्टर पाटील आणि अजून कुणी एक पोलीस इन्स्पेक्टर बसला होता. "या मिसेस शांभवी सरपोतदार, एकाच दिवसात परत एकदा तुम्हाला भेटायला मिळेल असं वाटलं नव्हतं." "काय झालं इन्स्पेक्टर?" शांभवी उसनं अवसान आणत म्हणाली. "आता आम्ही काय सांगायचं मिसेस सरपोतदार. सगळी शिदोरी तर तुमचाकडंच आहे. तीच उघडायला मदत व्हावी म्हणून आम्ही आलोय इकडं" "म्हणजे?" "हे बघा, काही न कळल्याचं नाटक करू नका. चुपचाप सांगा, तुमच्यात आणि अमित मध्ये नक्की काय नातं होतं?" "मागच्या वेळी सांगितलं ना तुम्हाला, की तो आणि मी चांगले मित्र होतो, मी आणि तो एका प्रोजेक्ट वर काम करत होतो. ह्या पलीकडे माझा आणि अमितचा काहीच संबंध नाही" "असं असेल तर मग तुम्ही काय फावल्या वेळेत एस्कॉर्ट एजेन्सी मध्ये कॉल गर्ल म्हणून काम करायचा का?" इन्स्पेक्टर पाटलांनी दरडावून विचारले. क्षणभर काहीच न कळल्याने शांभवीच्या तोंडातून शब्द फुटेना. "काहीही तोंडाला येईल ते बोलू नका इन्स्पेक्टर." शांभवी सगळी शक्ती एकवटून बोलली. "तोंडाला येईल ते? तुमचे आणि अमितचे अविरत चालणारे कॉल्स, मेसेजेस, आणि बऱ्याचदा रात्री अपरात्री दोघांचे एकाच ठिकाणी असणारे फोन लोकेशन्स काहीतरी वेगळच सांगतायत. बऱ्याचदा अमितच्या फोन चं लोकेशन तुमच्या घरात दिसतंय ते पण अख्खी रात्र, कधी तुमच्या दोघांचं लोकेशन कुठल्यातरी रिसॉर्ट मध्ये दिसतंय तर कधी चार चार दिवस-रात्र एकत्र दिसतंय. संबंध नसताना त्याच्या बरोबर रात्र घालवत असाल तर मग मी म्हणतो तसं एस्कॉर्ट एजेन्सी मध्ये कॉल गर्लच असणार तुम्ही." आता मात्र शांभवीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. "हि नाटकं पुरे झाली आता मिसेस सरपोतदार, पटपट बोला काय ते." आता काहीच लपवून उपयोग नाही ह्याची पुरेपूर जाणीव शांभवीला झाली. "माझ्या आणि अमित मध्ये मैत्रीपलीकडं पण एक नातं होतं . आमचं एकमेकांवर प्रेम होत. तुम्ही आत्ताच सांगितलं तसं मी आणि अमित बऱ्याचदा एकत्र असायचो, तुम्हाला म्हणायचंय तसे आमच्यात शारीरिक संबंधही होते. हि गोष्ट अर्थातच कुणालाच माहित नाही आणि तुम्ही पण हि गोष्ट कुणालाही सांगू नये अशी माझी विनंती आहे." "सांगायचं कि नाही ते आमचं आम्ही बघतो. तुम्ही आम्हाला ते शिकवायची गरज नाही" सबइन्स्पेक्टर राऊत चिडून बोलले "मी तुम्हाला फक्त विनंती करतीय कारण माझ्या चुकीमुळं माझं कुटुंब मोडू नये असं मला वाटतं. आणि हे सगळं मला आज अचानक अमित गेलाय म्हणून वाटत नाहीये तर मी केलेल्या चुकीचा मला पश्चात्ताप झाला होता आणि म्हणूनच त्या दिवशी सकाळी मी रिसॉर्ट मध्ये हे सगळं संपवायलाच गेले होते." "आणि तुम्ही ठरवल्याप्रमाणे अमितला संपवला." "काय बोलताय तुम्ही इन्स्पेक्टर? त्या दिवशी सांगितल्याप्रमाणं मी फक्त त्याच्याशी बोलून निघून आले होते" "खोटं बोलताय तुम्ही मिसेस सरपोतदार, कारण खुनाच्या रात्री तुमच्या फोनचं लोकेशन त्या रिसॉर्ट मध्येच होतं, ते पण रात्री २.३० ते ४ च्या दरम्यान." -------------------------------------------- "हॅलो डॉ शहा, कसा चाललाय तपास?" घरी पोचल्यावर रात्री इन्स्पेक्टर पाटलांनी डॉ शहांना फोन लावला. "आमचं काम मृतदेहांबरोबर, जन्माला आल्यापासनं विश्वास ठेवण्याजोगा माणसाचा एकच अवतार आणि तो म्हणजे त्याचा मृतदेह. डेड बॉडीज खोटं बोलत नाहीत इन्स्पेक्टर." "मग काय खरं सांगितलं तुम्हाला त्या मृतदेहांनी?" "हम्म.. आपण अमित केतकरपासून सुरु करूयात. खून रात्री तीन ते चारच्या दरम्यान झालाय. . खून करताना वापरलेला चाकू हा किचन मध्ये वापरायचा चाकू आहे, आणि तो पण अगदी नवीन. चाकूवर कुठलेही ठसे मिळाले नाहीत. पाठीमागनं येऊन अचानक पाठीत वार केल्यानं झटापटीला किंवा प्रतिकार करायला वेळच मिळाला नाही. चाकूचा वार इतका खोल आहे कि केतकरला लगेचच मूर्च्छा आली असावी. खूप रक्तस्त्राव झाल्यानं मृत्यू झालाय. आणखी एक सांगायचं झालं तर खून कुणी अश्या व्यक्तीनं केलाय ज्याची उंची अमितपेक्षा कमी आहे कारण वार खालून वर झालेत. खुनी उजव्या हाताचा वापर करणारा आहे." "आणि जे आपल्याला बुटांचे ठसे मिळाले त्याबद्दल काय?" तलावाकाठची माती ओली असल्यानं बुटांचे ठसे अगदी स्पष्ट आहेत. काही ठसे अमितच्या चपलांचे आहेत तर दुसरे आठ नंबरच्या बुटांचे?" "म्हणजे पुरुषाचे?" इन्स्पेक्टर पाटलांनी आश्चर्यानं विचारलं. "हो, पुरुषाचेच. आणि त्या व्यक्तीच वजन अगदी योग्य प्रमाणात असले पाहिजे, म्हणजे ना जास्त जाड, ना सडपातळ कारण ठसे खूप खोल नाहीत किंवा अगदी उथळ पण नाहीत. खुनी तलावापर्यंत कसा आला हे समजणं थोडं अवघड आहे कारण तलावाशेजारी खूप गवत आहे आणि त्यावर पायांचे ठसे मिळणं मुश्किल आहे, तसेच बऱ्याच गाडीच्या चाकांचे मार्क्स हि मिळालेत. त्यामुळं त्याबद्दल मी निश्चितपणे सांगू शकणार नाही." "काही हरकत नाही डॉक्टर, इतकी माहिती पुरेशी आहे. आणि त्या बाई बद्दल? "अमितप्रमाणेच तिचाही खून किचन मध्ये वापरल्या जाणाऱ्या चाकूनेंच जवळपास त्याच वेळी केला गेलेला आहे. चाकूवर कुठलेच ठसे नाहीत. तसेच खोलीत इतरत्र ही संशय यावेत असे ठसे मिळालेले नाहीत. मेलेली बाई जवळपास २५ वर्षाची असावी. तिचा चेहरा बिघडवण्यासाठी वापरलेली वस्तू मात्र कुठल्यातरी दगडाची असावी कारण बाथरूम मध्ये अगदी बारीक दगडाचा भुगा मिळालाय. खोलीत दोन चार ठिकाणी समुद्राची वाळू पण मिळाली आहे. ह्या बाईचा मृत्यू मात्र डोक्यात झालेल्या वारामुळं झालाय." "ती बाई सेक्स वर्कर असावी असं वाटतंय का तुम्हाला?" "इन्स्पेक्टर, एखाद्या डेड बॉडी वरून बाईचा व्यवसाय हुडकून तसं अवघड असतो. कधी कधी आम्हाला मृतदेहाच्या अंगावर जुने व्रण सापडतात, कधी सिगारेट चे चटके तर कधी हाणामारीचे व्रण तर कधी एखादी बाई तसल्या रोगांनी ग्रस्त असते. ह्या आणि असल्या बऱ्याच गोष्टींमुळं आम्ही आडाखे बांधतो कि कदाचित ती बाई वेश्या देखील असू शकेल. ह्या बाईच्या अंगावर आम्हाला असले काहीच सापडले नाही पण ह्याचा अर्थ ती प्रॉस्टिट्यूट नाही असाही होऊ शकत नाही." "हम्म... I can understand. दोन्ही खुनांमध्ये आणखी काही साम्यता आहे का?" "खुनी एकच असण्याची शक्यता आहे. चाकूचा वार करण्याची पद्धत एकसारखी आहे. अमित आणि त्या बाईच्या पोटात न पचलेलं अन्न मिळालं आहे. दोघांच्यामध्ये आदल्या दिवसात आणि खुनाच्या रात्रीला शरीर संबंध झालेले आहेत. परंतु कुठल्याही पद्धतीची जबरदस्ती झालेली नाही." "डॉक्टर ह्या सगळ्यावरून तुम्हाला काय वाटतं ? खुनी एखादी स्त्री असावी का पुरुष? कारण आम्हाला एका स्त्री वर संशय आहे." "वेल, खुनी एक स्त्री असण्याची शक्यता बरीच कमी आहे. कारण ज्या प्रकारचे चाकूचे वर केले गेले आहेत, ते करायला एका बाईची शक्ती नक्कीच कमी पडेल. तसेच एखादी अवजड वस्तू उचलून तिथं पर्यंत आणणे, ती उचलून त्यानं एखाद्याच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा करणे आणि ती वस्तू धुवून, पुसून परत घेऊन जाणे हे एका स्त्री ला अशक्य नसलं तरी बरंच अवघड आहे. आणि परत खुनाच्या जागी पुरुषाच्या बुटांचे ठसे मिळालेत हे विसरूनही चालणार नाही." थोडा वेळ विचार करून इन्स्पेक्टर मम्हणाले, "डॉक्टर, मी तुम्हाला वाळूची काही सॅम्पल्स पाठवतो, तुम्हाला खोलीत मिळालेल्या वाळूच्या बरोबर ती एकदा मॅच करा. आणखी एक, मिसेस शांभवी सरपोतदार, जी आमच्यासाठी प्राथमिक संशयित आहे तिच्या बोटांचे ठसेही एकदा तुम्हाला स्पॉट वर मिळाल्या ठश्यांशी मॅच करून बघावेत हि विनंती आहे. आणखी काही मिळालं तर नक्की फोन करा, मी वाट पाहीन." "नक्कीच." असं म्हणून डॉ शहांनी फोन ठेवू दिला फक्त फोन खुनाच्या जागी मिळणं हा सबळ पुरावा असू शकत नाही. खून सिद्ध करायला संशयित खुनाच्या जागी हजर होता किंवा त्याचा त्यात सहभाग होता हे सिद्ध करणे तितकेच महत्वाचे असते. शांभवीचा फोन रिसॉर्ट मध्ये असला तरी तिने हा खून केलाय हे सिद्ध होण्याजोगे अजूनही काहीच मिळत नव्हते. इंस्पक्टर पाटलांनी घराच्या बाल्कनीतून बाहेर बघितलं तेव्हा सगळं जग आपापल्या घरात शांत झोपलं होतं... कदाचित खुनी सुद्धा. एक दिवस संशयाचं जाळं विणत रात्रीच्या कुशीत सामावला होता. क्रमशः (अस्वीकरण: ह्या कथेतील सर्व पात्रे, प्रसंग, घटना आणि विचार हे निव्वळ काल्पनिक आहेत. केवळ मनोरंजन म्हणून त्या स्वीकाराव्यात आणि वाचाव्यात.)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 11230 views

💬 प्रतिसाद (14)
श
श्वेता२४ Fri, 11/23/2018 - 10:13 नवीन
पुभा प्र
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 11/23/2018 - 13:24 नवीन
जिचा खून झाला तीच खरी शांभवी असावी.. आणि आता अथर्व सोबत असलेली खरी शांभवी नाहीच मूळी :)
  • Log in or register to post comments
व
विनिता००२ Sat, 11/24/2018 - 06:14 नवीन
खूनी इशा किंवा तिचा एखादा माणुस असू शकतो. पुलेशु
  • Log in or register to post comments
स
सिफर चि आई Tue, 11/27/2018 - 07:42 नवीन
कथा छान चालू आहे. पुढील भागाच्या प्रतीक्षेत!!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Tue, 11/27/2018 - 14:18 नवीन
मस्तच. पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments
ह
हवालदार Tue, 11/27/2018 - 14:55 नवीन
अशी शन्का आली :-)
  • Log in or register to post comments
अ
अमरप्रेम गुरुवार, 11/29/2018 - 10:00 नवीन
अथर्व ला अमित आणि शांभवी च्या नात्याबद्दल माहीत पडल्याने अथर्व ने अमित चा खून करून शांभवी ला त्यात अडकवण्याचा प्रयत्न केला असावा.
  • Log in or register to post comments
द
दिपुडी Sun, 12/02/2018 - 11:27 नवीन
पुढचा भाग कधी
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Sun, 12/02/2018 - 13:00 नवीन
मस्त.... एका दमात सगळे भाग वाचले! पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments
म
मास्टरमाईन्ड Mon, 12/03/2018 - 15:26 नवीन
२३ नोव्हेंबरलाच हा भाग वाचून संपला.
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे गुरुवार, 12/06/2018 - 09:47 नवीन
पुढे?
  • Log in or register to post comments
श
शित्रेउमेश Fri, 12/07/2018 - 03:38 नवीन
पुढे काय झाल?? लवकर टाका पुढचा भाग.....
  • Log in or register to post comments
व
विक्रम चव्हाण Sun, 12/09/2018 - 17:52 नवीन
लवकर येऊद्यात....खुपच लांबणीवर पडला हा भाग.. पुढचे देखील पटपट येउद्यात
  • Log in or register to post comments
P
Prathamesh Joshi Mon, 12/10/2018 - 13:23 नवीन
पुभाप्र
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 week ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 week ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 week ago
  • सुंदर !!
    1 week ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 week ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा