माणूसकी
माणूसकी
सुमन आज खूप आनंदात होती . का नाही असणार ? तिच्या मैत्रिणीचा मोनाचा फोन आला होता. तिने सुमनला व श्रीधरला भीमाशंकरला सहलीस येण्यास आमंत्रित केले होते . सुमननेही लगेचच होकार दिला. श्रीधर घरी आल्या आल्या तिने मोनाने त्यांना दोघांना निमंत्रण दिले आहे , हे सांगितले. त्यालाही ही कल्पना आवडली, सहलीस जाण्यासाठी सुमनने व मोनाने आवश्यक ती सर्व तयारी केली. ते सर्व इतके आनंदी होते की , सहलीला जाऊन काय करायचे , काय घ्यायचे याची यादी सतत तपासून पाहत होते. सकाळी सकाळी थंडगार वारा अंगावर शहारे आणत होता, इतक्या पहाटे ते सर्वजण भीमाशंकरच्या रस्त्याला लागले. सहलीची मजा ते धमाल , मस्ती , गाणी म्हणत घेऊ लागले. भीमाशंकरचे ते नयनरम्य वातावरण , ती दाट झाडी - झुडपी , तो पक्षांचा किलबिलाट , तो झाडांचा कुजबुजाट , नदीचे झुळझुळणे हे सर्व मनाला प्रसन्न करत होते . खूप सुंदर मनाला प्रसन्न करणारे ते वातावरण होते. सर्वानी महादेवाचे दर्शन घेतले तेथील अभयारण्य पाहिले, तेथील वातावरणाचा आस्वाद घेतला. तसेही त्यांना शहरी वातावरणापासून लांब जायचे होते ते येथे खूप रमले तेथे धमाल केली, सोबत आणलेला फराळ , जेवण फस्त केले.
सूर्य मावळतीच्या वेळेस डोंगरावरून तो खूप छान दिसत होता पण त्यांना लवकर तेथून निघायचे होते . त्यांनी परतीचा मार्ग धरला एका सूनसान रस्त्यावरून गाडी जात होती रस्ता हळूहळू रहस्यमय वाटु लागला, अंधार केव्हा झाला हे कळलंही नाही तितक्यात , त्या गूढ , रहस्यमय रस्यावर सुमनची गाडी बंद पडली . त्या मार्गावर जवळपास कुठेही दुसरे वाहन किंवा राहण्यासाठी हॉटेल , आश्रम काही ही नव्हत . साधी विचारपूस करायला माणूसही दिसत नव्हता , आणि गाडी काही केल्या चालू होतं नव्हती त्यांचा जीव काकुळतीला आला होता . त्या भयाण , गुढ , अंधारमय रस्त्यावर त्यांना भीती वाटू लागली के करावं ते त्यांना सुचत नव्हतं , तेथे आसपास कोणीही दिसत नव्हते त्यामुळे ते अधिकच घाबरले ,कुठे जावे, हे त्यांना कळत नव्हते .श्रीधरने गाडी बाजूला लावली , आणि ते सर्वजण आपला जीव मुठीत धरून त्या गाडीतच जाउन बसले . गाडीच्या काचा नीट लावून घेतल्या. तेवड्यात कुणीतरी दरवाज्यावर थाप मारल्याचे ऐकू आले . ती व्यक्ती काहितरी सांगण्याचा प्रयत्न करत होती . श्रीधरने काच खाली केली , तर एक माणूस हातात कंदील घेऊन उभा होता व तो काच खाली केल्या-केल्या पटकन बोलला , "साहेब घाबरू नगा म्या हाय ना, चला इथन लवकर चला इथल वातावरण लई भयाण हाय , इथं जवळचं माई झोपडी हाय , तुम्हीं समदे काय बी काळजी करू नगा बगा , तुमची समदी यवस्था व्यईल बगा आमच्या वस्थित चला बघू बीगी बीगी . कायतरी विपरित घडण्याच्या आत इथन चला आदी !
त्यांना काय करावं हे सुचत नव्हतं एकिकडे हा अनोळखी माणूस आणि सभोवताली किर्र अंधार , दाट झाडचं झाड आणि वाटत असलेली भीती . त्या माणसावर विश्वास टाकण्यापलिकडे त्यांच्या जवळ काहीच पर्याय नव्हता . मग जराही मनात किंतु न बाळगता त्यांनी त्या माणसाबरोबर जाण्याचं ठरवलं . गाडीतील बॅग सोबत घेतली व गाडीला लॉक केले , बरेच अंतर चालल्यावर त्यांना त्या माणसाची वस्ती दिसली त्या माणसासोबत कंदिलाच्या उजेडात चालत ते सर्वजण त्यांच्या झोपडीत गेले . तेथे त्याची चार मुले बायको होती त्या माणसाने यांची ओळख त्याच्या परिवाराला करून दिली . त्याच्या बायकोने हसतमुखाने यांचे स्वागत केले तिने पटकन चूल पेटवली , त्यावर पिठलं व भाकरी केली व सुमन , श्रीधर , मोना व तिचे पती यांना गरमागरम भाकरी , पिठलं , लोणंच , मिरची , कांदा अस साग्रसंगीत जेवण वाढलं . जेवण झाल्यावर त्या माणसाने यांची झोपडीत झोपण्याची व्यवस्था केली व ते झोपडीच्या बाहेर झोपले . तरीही त्यांना भीती वाटतच होती रात्रभर जीव मुठीत ठेऊन ते झोपी गेले .
सकाळी जाग आल्यावर ते पाहतात तर त्यांच्याजवळचे सर्व सामान गायब , बाहेरही त्यांना कोणीही दिसत नव्हते ते सर्वजण खूप घाबरले कमीत कमी जीव वाचला म्हणून ते देवाचे आभार मानत होते आणि त्यांच्या निर्णयाचा पश्चातापही ते करत होते , ते काही वेळ झोपडीतच बसून राहिले . काही वेळानंतर त्यांना गाडीचा आवाज आला म्हणून ती सर्व काय झाले हे पाहण्यासाठी बाहेर आले . तर सर्व लोक त्यांच्या गाडीभोवती होती व ते दिसताच तो माणूस म्हणाला , " साहेब माफ करा , तुम्ही दमला होता ना म्हणून न्हाय उटीवल . तुमची गाडी सुरू केली बारं का ह्यो आमचा शेजारी राम ह्यानं गाडी सुरू केली बरं का . लई हुशार हाय बगा गडी पण त्याचा इथं काय उपेगच होत न्हाय बगा . जाऊ द्या आमची बडबड सरायची न्हाय तुमचं समदं सामान गाडीत ठिवलय बगा . तपासून बगा काय कमी जास्ती असलं तर आमच्यावर बला यायला नग काय ? "
एवढयावरही सुमन मोनाने सामान तपासून पाहिले सामान बरोबर होते. तेथून निघताना श्रीधरने त्या माणसाच्या हातावर पैसे ठेवले तर त्यांनी ते घेण्यास नकार दिला . सुमनने घरी गेल्यावर परत सामान तपासून पाहिले . ते बरोबर होते . एक अनोळखी माणूस अनोळखी माणसासाठी एवढे सगळं करू शकतो तेही निस्वार्थीपणे कसलाही मोबदला न मागता , असे शहरातले कोणीच करू शकत नाही . हा विचार मनात येऊन सुमन आतल्या आत रडत होती . तिला तिच्या वागण्याचा पश्चाताप होत होता .
सुमन आतल्या आत विचार करू लागली की , खरचं आपण शहरातली माणसं अशी संकुचित व संशयी का असतो ? आपल्याला का नाही बर जमत एखाद्याला जिवापाड मदत करणं , कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता अडचणीत धावून जाणं ......... खरचं का नाही जमत ? आज जे त्या माणसाने आमच्यासाठी केलं त्यालाच तर खरी माणुसकी म्हणतात .
प्राजक्ता योगिराज निकुरे
( Email id.- prajaktanikure@gmail.com )
💬 प्रतिसाद
(6)
य
यशोधरा
Tue, 11/13/2018 - 08:53
नवीन
शहरातसुद्धा चांगली माणसे असतात हो. हे नेहमीचे स्टीरिओटाईप्स वापरायला हवेतच का.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Tue, 11/13/2018 - 11:08
नवीन
+१
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Tue, 11/13/2018 - 10:00
नवीन
सुखद धक्का देणारी कथा .
- Log in or register to post comments
ट
ट्रम्प
Tue, 11/13/2018 - 12:45
नवीन
अशी निस्वार्थ मनाने मदत करणारी माणसं दुर्गम खेड्यातच सापडतील , शहरात हातात कंदील घेऊन शोधली तरी सापडणार नाही !!
कोथरूड MIT कॉलेज जवळ एकदा रस्त्याच्या कडेला दुचाकी थांबवून मोबाईल वर बोलत होतो तर शेजारील बंगल्याच्या खिडकीतून शुक !! शुक !!! असा आवाज आला .
आवाजाच्या दिशेने पाहिले असता एक वयस्कर व्यक्ती मला रागाने डोळ्यांनी खुणावत पुढे जायला सांगत होता , मला त्याच्या त्या खडूस वागण्या बद्दल आश्चर्याचा धक्का बसला व मी एक ही शब्द न बोलता गाडीला किक मारली व चालता झालो . मदत करणे तर दूर शहरातील लोकांना माणसांचा त्रास होतो
- Log in or register to post comments
P
Prajakta Yogir…
Tue, 11/13/2018 - 13:03
नवीन
शहरात अशी माणसे फार कमी असतात अगदी बोटावर मोजण्या इतकीच ग्रामीण भागात अशी लोक सहज दिसून येतात पण आता हा प्रश्न ग्रामीण किव्हा शहरी उरला नाहीये प्रत्येक जण आपल्या कामात खूप व्यस्त असतो कि त्याला आजूबाजूला काय सुरु आहे हे देखील कळत नाही .
- Log in or register to post comments
P
Prajakta Yogir…
Tue, 11/13/2018 - 13:04
नवीन
प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपली आभारी आहे .
- Log in or register to post comments