गावातली चावडी
- डॉ. सुधीर रा. देवरे
गाव तिथं चावडी असायचीच. चावडीवर गावातले अनेक प्रश्न सोडवले जात. वार्षिक भाडे मिळवण्यासाठी सार्वजनिक मालमत्तेचे काही लिलावही चावडीवर होत असत. चावडीवर पंचायत भरायची. पंचायत बोलवणे म्हणजे गावातल्या लोकांची बैठक. आजच्या भाषेत मिटींग. गावात दवंडी देऊन चावडीवर लोक बोलवले जात. गावाच्या भल्यासाठी एखादा निर्णय घ्यायचा झाला तर गावातल्या चावडीवर लोक जमत. चावडीत उलट सुलट चर्चा होऊन योग्य तो निर्णय घेतला जाई.
गावगाड्याचा सर्व प्रकारचा कारभार चावडीत होत असे. चौ – वाडी म्हणजे चारचौघेजण जमण्याचे ठिकाण ते चावडी. चव्हाटी- चावडी. चावडीवर नुसते सरकारी व सार्वजनिक व्यवहारच होत नसत. खाजगी वाद, भानगडीसुध्दा चावडीवरच येत आणि हे वाद पोलीसपाटील सोडवत असे. दोन्ही बाजूच्या व्यक्तींचं काय म्हणणं आहे ते गावकर्यांसमक्ष ऐकलं जायचं. योग्य तो मधला मार्ग काढून न्यायदानाचं कामही या चावडीवर होत असे. पण जातपंचायतीची पध्दत वेगळी आणि चावडीवर सोडवायचे प्रश्न वेगळे. आज चर्चेत असणारी जातपंचायत म्हणजे चावडी नव्हे. जातपंचायतीत परंपरागत अंधश्रध्देतून अनेक प्रतिगामी निर्णय घेतले जातात. तसं चावडीचं कधी झालं नाही. चावडीही गावातल्या व्यक्तीगत भांडणात लक्ष घालत नाही. चावडी ही शासकीय यंत्रणेची व्यवस्था होती. जातपंचायत ही बेकायदेशीर आहे.
आज चावडीवर गावातले प्रश्न हाताळले जात नसले तरी आमच्या गावात चावडी नावाचं विशिष्ट स्थळ अजूनही सुरक्षित- शाबूत आहे. चावडीजवळ असणारी ग्रामपंचायत आता दुसरीकडे गेली. पंचायतीची ही खोलीवजा वास्तू काही काळ धर्मशाळा म्हणूनही कार्यरत होती. आज धर्मशाळा कालबाह्य झाल्या. एखादी वास्तू धर्मशाळा म्हणून अस्तित्वात ठेवली तरी तिचा उपयोग आज कोणी करणार नाही. (पूवीँ लोक धर्मयात्रा करण्यासाठी लांबच्या प्रवासाला निघत. दरम्यान रात्री जे गाव रस्त्यात लागेल तिथल्या धर्मशाळेत असे प्रवाशी विश्राम करत. सकाळ होताच आपला पुढचा प्रवास सुरू करत. आताच्या गतिमान युगात धर्मशाळेत थांबण्याइतका कोणाला वेळ नाही. आणि कुठं थांबायची वेळ आलीच तर अलिशान हॉटेलीत थांबण्याइतके पैसेही आज लोकांच्या हाती आहेत.) या धर्मशाळेत मध्यंतरी हायस्कूलचे वर्गही भरत होते. हायस्कूलची स्वतंत्र इमारत झाल्याने ही खोली आता भग्न अवस्थेत गेली.
चावडीवर निमची भली मोठी चार झाडी होती- अजूनही आहेत. म्हणजे गल्लीच्या एका बाजूला दोन व दुसर्या बाजूला दोन. म्हणून इथं निमच्या चार झाडांचा चौरस तयार झाला. ही झाडं प्रचंड वाढली की पंचायतीतर्फे त्यांची थोडी डहाळणी करण्यात येते. पुन्हा काही दिवसांनी ती झाडी पहिल्यासारखी बहारदार होतात. या झाडांवर अधून मधून हवापालट म्हणून रानावनातून वांदरं येऊन राहायचे. माकडांची गंमत पाहण्यासाठी गावातले पोरे- बाळे चावडीत जमा व्हायची. कोणाच्या घराजवळ माकड आलं तर घरांतून त्याला काही खायलाही दिलं जात होतं.
चावडीवरच्या झाडांखाली घनदाट सावली असायची- अजूनही असते. म्हणून काही किरकोळ विक्रेते या सावलीत आपली दुकानं थाटायची. कल्हईवाला, बुढ्ढीचे बालवाला, चप्पल सांदणारे चर्मकार लोक इथं येऊन बसायचे. गावाच्या वरच्या बाजूला राहणार्या कोकणा पाड्यातून काही बाया चावडीजवळ करवंद, आवळा, पेरू, जांभूळ, सीताफळ, चिंचा, बोरं, टेंभरं, अंजीर विकायला येत असत. ही सर्व फळं अन्नधान्याच्या बदल्यात मिळायची.
सारांश, ग्रामीण भागातली चावडी नावाची संज्ञा आजही सामान्यनाम म्हणून अस्तित्वात आहे. तरीही चावडीचं चावडीपण आजच्या चावडीच्या जागेला राहिलं नाही. उलट चावडी नावाचा उच्चार हा आज तिरकस, उपहासात्मक वा अशिष्ट पध्दतीने केला जातो. उदाहरणार्थ, काही तरूण विशिष्ट जागी कायम गप्पा करत बसले तर त्यांचा उल्लेख ‘चावडी’ असा केला जातो. एखाद्या खाजगी प्रश्नाची चावडी करून टाकणे, असा वाक्प्रचार भाषेत उपयोजित झाला तर खाजगी गोष्टींचा बोभाटा केला असं समजलं जातं. म्हणूनच ‘चावडीवर जाणे’ असा वाक्प्रचार अजूनही भाषेत रूढ आहे.
(या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)
– डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
💬 प्रतिसाद
(5)
म
मार्मिक गोडसे
गुरुवार, 11/01/2018 - 16:48
नवीन
छान माहिती. चावडिबद्दल असलेले माझे अज्ञान दूर झाले.
- Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा…
Fri, 11/02/2018 - 13:05
नवीन
धन्यवाद
- Log in or register to post comments
ब
बापु देवकर
Fri, 11/02/2018 - 05:35
नवीन
छान.. चावडीवर गेलं की गावाची बित्तंबातमी कळायची.
- Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा…
Fri, 11/02/2018 - 13:06
नवीन
धन्यवाद
- Log in or register to post comments
D
dadabhau
Fri, 11/02/2018 - 14:34
नवीन
"चावडीवर निमची भली मोठी चार झाडी होती"- हे चुकीचे लिहिलेय..."चावडीवर निंबाची भली मोठी चार झाडी होती" असे लिहायला हवे... डॉक्टर साहेबांनी कुठे P.Hd केलीये .... हे अश्या "सुद्धलेखनातुन " दिसून येते .....
- Log in or register to post comments