Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
दिवाळी अंक

दक्षिण गोव्यात, वेताळांच्या राज्यात

प
प्रचेतस
Mon, 11/05/2018 - 19:30
💬 80 प्रतिसाद
H
दक्षिण गोव्यात, वेताळांच्या राज्यात

फार फार वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या निबिड अरण्यात भटकायला गेलो होतो. ठिकाण नेमकं विस्मरणात गेलंय. कदाचित सुधागडच्या पायथ्याचं धोंडसं असावं, तिकोना पेठ असावी, घनगडाच्या आसपासचं येकोले असावं, ताम्हिणीतल्या विंझाई मंदिराचं आवार असावं किंवा थेट रतनवाडी. तेव्हाचे ट्रेक बर्‍याचदा मुक्कामी असत. कारण वाहतुकीच्या सुलभ साधनांची कमतरता. एसटीवरच अवलंबून राहावं लागत असे. अशाच ठिकाणी कधी काळी मुक्काम असताना समोरच्या डोंगरावर एखादा वणवा लागलेला कधीतरी दिसे. अशा वेळी स्थानिक गावकरी म्हणत - "ती पहा वेताळांची सेना दिवट्या घेऊन समोरच्या डोंगरावर नाचत आहे." अशा अनगड ठिकाणांच्या वेताळांच्या दंतकथांशी प्रथम परिचय झाला तो असा. त्यापूर्वीही वेताळांशी परिचय होताच, मात्र तो होता तो चांदोबातील विक्रम आणि वेताळ ह्या सर्वाधिक रोचक कथांमधून आणि फॅण्टमसारख्या कॉमिक्समधून. फॅण्टम चित्रकथांचे मराठी अनुवाद कुठल्याशा दैनिकांतून अथवा मासिकांतून यायचे आणि ते आवडीने वाचले जात असत. फॅण्टम - वेताळ म्हणजे भुतांचा राजा. सज्जनांचा तारणहार, दुष्टांचं निर्दालन करणारा अशी काहीशी प्रतिमा तेव्हा मनात उमटलेली असे. वेताळ पंचविशीचं तर प्रचंड आकर्षण असे. उज्जैन नगरीचा राजा विक्रम, त्याच्यावर एका मांत्रिकाने वेताळाला धरून आणण्याची सोपवलेली कामगिरी, विक्रमाचं मौनव्रत, वेताळाचे विक्रमाला प्रश्न, वेताळाच्या कूटप्रश्नांची उत्तरं माहीत असूनही न दिल्यास मस्तकाची शंभर शकलं होण्याची भीती, तर उत्तर दिल्यास विक्रमाचं मौनव्रत भंग पावून वेताळाचं त्याच्या तावडीतून निसटून जाणं, अशाच पंचवीस विविध बोधप्रद गोष्टी आणि शेवटी वेताळाच्या मदतीने दुष्ट मांत्रिकाचा खात्मा. निव्वळ अद्भुत कथा होत्या त्या. अजूनही मी तत्कालीन अस्सल वेताळ पंचविशी शोधतो आहे. ह्या कथांमधील विक्रम म्हणजेच गुप्त साम्राज्यातील पराक्रमी राजा चंद्रगुप्त दुसरा, अर्थात विक्रमादित्य असावा असं मला नेहमीच वाटतं. ह्यानेच माळव्यातील क्षत्रपांचा संपूर्ण पराभव करून शकांची राजवट संपवली, इंडो-ग्रीक राजांपासून माळव्यात प्रचलित असलेल्या संवत्सराला ह्याच्याच पराक्रमाने 'विक्रम संवत' हे नाव मिळालं. ह्याच्याच पराक्रमाच्या कथा लोकांत झिरपत जाऊन दंतकथा निर्माण झाल्या. सिंहासन बत्तिशीमधल्या राजा भोजाला सिंहासनवरील पुतळ्या कथा सांगतात ते राजा विक्रमादित्याच्याच, वेताळ पंचविशीमधला विक्रमदेखील हाच. असो.

त्यानंतर हळूहळू मूर्तिशास्त्राची आवड वाढत झाली. देवदेवतांच्या मूर्तींबरोबर इतर काही रौद्र स्वरूपाच्या मूर्तींचा परिचय होत गेला. त्यात प्रामुख्याने होत्या त्या भैरव आणि चामुंडा. कालभैरव तर तेव्हा ठिकठिकाणी असत. आजही आहेत. पण इथल्या ज्या काही मूर्ती आहेत ती तांदळा स्वरूपात. अर्थात भैरवाच्या पूर्णाकृतीदेखील आहेत, पण त्या मुख्यतः दिसतात त्या प्राचीन मंदिरांच्या भिंतींवर. नग्न भैरव, हाती कपाल आणि नरमुंड, गळ्यात नरमुंडमाला, कराल दाढा आणि शेजारी त्याचं वाहन कुत्रा अशी लक्षणं. अशाच स्वरूपाच्या विकराळ मूर्ती आहेत त्या चामुंडेच्या. प्रेतवाहना, अस्थिपंजर, लांबट स्तन, पोटात विंचू, कराल दाढा, काही वेळा करंगळी तोंडात घालून वाजवत असलेली शिट्टी अशा स्वरूपाच्या चामुंडेच्या मूर्ती आजही हमखास दिसतात. अशा भयानक मूर्तींबरोबरच वेताळ मूर्तींचाही परिचय होत गेला.

जीवधन किल्ल्यावर पहिल्यांदा गेलो ते साधारण २००१ साली. तेव्हा आपटाळ्याच्या पुढे रस्ता असा नव्हताच. जुन्नर-आजनावळे एसटीने घाटघरला उतरावं लागायचं. जीवधन तेव्हाही दुर्गम होता, आजही दुर्गमच आहे. मात्र आता रस्त्याची परिस्थिती खूपच सुधारल्याने स्वत:च्या वाहनाने जाणं मात्र खूपच सुलभ झालंय. चावंडच्या पुढेच जुन्नर-घाटघर रस्त्यावर पूरचा फाटा आहे. तिथून दोन-तीन किलोमीटर कच्च्या खडबडीत रस्त्याने आत गेल्यावर कुकडेश्वराचं प्राचीन मंदिर लागतं. हे मंदिर बहुधा शिलाहारांनी बांधलेलं असावं. इथला शिलालेख नष्ट झालेला असल्याने ह्या मंदिराचा निर्माता आजही अज्ञात आहे. २००१ साली जेव्हा हे मंदिर प्रथम पाहिलं, तेव्हा ते भग्नावस्थेत होतं. खांब, छत आणि भिंतीवरील काही मोजक्या मूर्ती फक्त अस्तित्वात होत्या. मंदिराचे अवशेष आवारात विखुरलेले होते. ते तसे आजही विखुरलेले आहेत. अगदी आता म्हणजेच ह्या जूनमध्येच कुकडेश्वराला जाऊन आलो होतो. मंदिराचा बर्‍यापैकी जीर्णोद्धार झालाय. बरेचसे विखुरलेले अवशेष मंदिरावर पुन्हा स्थापित करण्यात आले आहेत. मात्र मंदिराच्या पुढ्यातील एका लहानशा घुमटीत असलेल्या वेताळांच्या मूर्ती तेव्हा जशा होत्या तशाच आजही आहेत.

a

हे वेताळ म्हणजेच शिवगण. शंकराचं मूळचं अनार्यत्व अधोरेखित करणारं. फार पूर्वी - म्हणजे जेव्हा दहाव्या-बाराव्या शतकात हे मंदिर निर्मिलं गेलं, तेव्हा ह्यांचं स्थान कदाचित मंदिराच्या प्रवेशद्वारावर असावं, पण कालौघात जशी जशी मंदिराची दुरवस्था होत गेली, तेव्हा त्यांचं स्थान कदाचित ह्या घुमटीत आलं असावं. तसं ह्यांना वेताळ म्हणणंही फारसं योग्य होणार नाही. हे शंकराचे भूतगण. निम्न देवता. डोक्यावर शिरोभूषण, कानांत गोलाकार आणि लांबुळकी कर्णभूषणं, बटबटीत डोळे, हाडांचा संपूर्ण सापळा, हाती धरलेला खंजीर अशी ह्यांची रचना. हे मंदिराचे रक्षक. दुष्प्रवृत्तींना मंदिरात येऊ न देणं हे ह्यांचं काम. केवळ ह्या वेताळमूर्ती इथे असल्यामुळेच हे मंदिर बहुधा शिलाहारांची निर्मिती असावी असं वाटतं. शिलाहार कोकण, कोल्हापूर ह्या प्रांतांचं. कोकणात, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा वेताळांची पूजा आजही चालत असते. देशावर सहसा अशा मूर्ती दिसत नाहीत. दिसतात त्या भैरव, चामुंडा अशा देवतारूपातच. अर्थात ह्याला अपवाददेखील आहेत. रांजणगावजवळील पिंपरी दुमाला येथील मंदिरात अशी वेताळ किंवा शिवगण मूर्ती मी पाहिलेली आहे. मात्र हे मंदिर यादवकालीन आहे. शिलाहारांनी निर्मिलेल्या खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात मात्र भूतगण आहेत.

कुकडेश्वर येथील वेताळ

a

कुकडेश्वर येथील वेताळ

a

पिंपरी दुमाला येथील वेताळ किंवा भूतगण

a

खिद्रापूर कोपेश्वर मंदिरातील भूतगण

a

गोव्यातील वेताळ मात्र वेगळे. तिथे ते गावचे राखणदार किंवा संरक्षक लोकदैवत म्हणून जास्त प्रसिद्ध आहेत. कदंब, शिलाहार राजवटीत गावोगावी ही ग्रामदैवतं स्थापित केली गेली. त्यांची मंदिरं अशी नव्हती. ह्या मूर्ती गावच्या वेशीवर उभ्या असत. कालांतराने हळूहळू ह्या मूर्तींसाठी मंदिरं बांधली गेली. वेताळदेव, बेताल, वेतोबा अशी त्यांची स्थानिक नावं. श्री. राजन पर्रिकर ह्यांनी गोव्यातील कित्येक वेताळ मंदिरांना भेटी देऊन त्यांच्याबद्दल लिहून ठेवलं आहे. गोव्यातील वेताळांबाबत पर्रिकर काय म्हणतात, ते पाहा.

"The ancient deity of Vetal, its iconography and associated rituals, are important elements of, and unique to, Goa‘s Hindu tradition. The deity was most likely worshipped by the Austric Gauda tribe, Goa‘s earliest settlers, and later embraced by the Nath Panthis between the 10th & 13th C. Eventually it came to be absorbed into the larger Hindu pantheon.

A mere 50 or so out of the hundreds of ancient Vetal sites in Goa survived the iconoclasm by the Portuguese. Every single site in the Bardez and Tiswadi talukas was destroyed.

Traditionally the images of Vetal were cast out in the open with provision for a simple roof overhead. After all, as the village protector, he was expected to be out on his nightly patrol. To this day, offerings of footwear are made at his temples. Buffalo sacrifice was once common but is now far less so. Fowl and goat are still routinely offered."

सुदैवाने गोव्यातील वेताळमूर्तींचा मागोवा घेण्याचा योग मला दोन वर्षांपूर्वी केलेल्या एका गोवा वारीमुळे आला. जुन्या गोव्यातील चर्चेसच्या संकुलाच्या (चर्च ऑफ सेन्ट फ्रान्सिस ऑफ असिसी - बॅसिलिका ऑफ बॉम जीझसच्या समोर) एका इमारतीतच गोवा पुरातत्त्व खात्याचं एक संग्रहालय आहे. गोव्यातील कित्येक प्राचीन अवशेषांबरोबरच तिथे वेताळाच्या काही भग्न मूर्तीदेखील आहेत. त्यातील एक प्रमुख आहे ती वेताळभाटीच्या वेताळाची. मूळच्या जवळपास आठ फूट उंच असलेल्या ह्या मूर्तीचे हात-पाय नष्ट झालेले असून सध्या फक्त मस्तक आणि धडाचा भाग शिल्लक आहे. शिरोभूषण, मोठे बटबटीत डोळे, अस्थिपंजर, पोटातील विंचू अशी वैशिष्ट्यं आजदेखील बघता येतात. गोव्याला कधी गेलात तर हे संग्रहालय आणि त्यातल्या ह्या मूर्ती आवर्जून बघण्यासारखंच.

दक्षिण गोव्यात लोलये गावात आजही एका वेताळाची भव्य, नेत्रदीपक अशी मूर्ती आहे ह्याची माहिती मिळाली होती, ती पाहायला निघालो. जवळच असलेल्या पैंगीण गावात वेताळाचं एक मंदिर होतंच, तेही बघायचं होतं. दक्षिण गोव्यातील हा भाग अतिशय सुंदर, नेत्रावलीच्या घनदाट अरण्याच्या आजूबाजूने जाणारा रस्ता अतिशय देखणा. अतिशय शांत भाग. खरं गोवा अनुभवायचं असेल तर ते इथेच. काणकोण तालुक्याचा हा भाग संपताच कारवार लागतं.

पैंगीण गावातलं वेताळ मंदिर शोधणं तसं अवघड नाही. मडगाव-कारवार महामार्गावरून पैंगीण गावात उजवीकडच्या एका रस्त्याने साधारण दोनेक किलोमीटर गेल्यास हे मंदिर रस्त्यालगतच दिसतं. रस्त्यालगतच असलेलं आदिपुरुष मंदिर आणि तिथूनच खोलवणात असलेलं वेताळ मंदिर. कोकणात किंवा गोव्यात आदिपुरुष, ब्रह्मपुरुष, सातेरी अशा लोकदैवतांची मंदिरं विपुल प्रमाणात आढळतात. पैंगीणच्या आदिपुरुषाचं मंदिरही अगदी साधंसं पण सुंदर. आदिपुरुषाची मूर्ती नसून मूर्तीच्या जागी एक स्तंभ उभा आहे.

a

आदिपुरुष मंदिरातून बाहेर आल्यावर काही पायर्‍या उतरून वेताळ मंदिराच्या प्रांगणात आपला प्रवेश होतो.

a

वेताळ मंदिर

a

कोकणातील अथवा गोव्यातील मंदिरांचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे काष्ठमंडप.
पैंगीणच्या वेताळदेव मंदिरातील काष्ठमंडप अतिशय नाजूक अशा कलाकारीने सजलेला आहे. स्तंभांवर, छतावर नक्षीकाम, काही पौराणिक प्रसंग, देवतांच्या मूर्ती, पशुपक्ष्यांच्या आकृती कमालीच्या नजाकतीने कोरलेल्या आहेत.

वेताळदेव मंदिरातील काष्ठमंडप

a

मंदिरातील लाकडी स्तंभ

a

छतावरील नक्षीकाम

a

गर्भगृहातील वेताळाची मूर्ती भयप्रद आहे. उभट चेहरा, बटबटीत डोळे, कपाळी मुकुट, मुकुटावर कीर्तिमुख, नागाकृती कर्णभूषणं, पिंजरलेल्या मिशा, विकराळ दाढा आणि त्यातूनच बाहेर काढलेली जीभ, अस्थिपंज शरीर, बाहूंना नागबंधनं आणि एका हाती कपाल असलेली मूर्ती भयप्रद असूनही कमालीची देखणी वाटते. वेताळाच्या कमरेला धोतर नेसवलेलं असल्याने खालचा भाग नीट ध्यानी येत नाही, मात्र इतर वेताळमूर्तींप्रमाणेच ही मूर्तीदेखील नग्न असावी असा कयास बांधता येतो.

पैंगीणचा वेताळ

a

a

a

वेताळ ही संरक्षक ग्रामदेवता. दुष्प्रवृत्तींपासून गावाचं संरक्षण करण्यासाठी रात्रीचा तो बाहेर पडतो, रानावनात, काट्याकुट्यांतून तो अपरात्री फिरत असल्याने त्याच्या वहाणा झिजतात, म्हणूनच वेताळाला वहाणा अर्पण करायची प्रथा आहे. ह्या मंदिरातदेखील ती दिसते ती भाविकांनी अर्पण केलेल्या वहाणांमुळे. येथील मंदिरात अगदी सामान्य आकाराच्या वहाणांपासून दीडेक फूट लांब असलेल्या वहाणांचा एक भलामोठा ढीगच आहे. ह्याच जोडीला भाविकांनी वेताळदेवाला अर्पण केलेली त्रिशूळ, तलवार अशी शस्त्रास्त्रंदेखील आहेत.

वेताळाला अर्पण केलेली शस्त्रास्त्रं

a

वेताळदेवाचा नैवेद्य, त्याला अर्पण करण्यात येणार्‍या इतर वस्तूदेखील रोचक. त्याचा एक फलकच येथे लावलेला आहे.

a

पैंगीणचं हे वेताळ मंदिर बघून आता वेध लागलेले होते ते लोलयेच्या वेताळाचे.

वेरूळच्या कैलास लेण्याबद्दल बर्जेस म्हणतो,

"It is by far the the most extensive and elaborate rock-cut temple in India, and the most interesting as well as the most magnificent of all the architectural objects which that country possess."

अगदी अशीच काहीशी भावना लोलयेचा वेताळ बघताना होते. गोव्यातील ही वेताळमूर्ती सर्वात भव्य, सर्वाधिक रौद्र, सर्वाधिक सुबक आणि सर्वाधिक प्राचीन, मूर्तिशास्त्रातील एक अद्भुत आविष्कारच जणू.

मात्र हा लोलयेतील वेताळ शोधणं सोपं काम अजिबात नाही. इकडील लोकांना हा वेताळ फारसा परिचित नसावा. बर्‍याच ठिकाणी विचारल्यावर नकारघंटाच ऐकू येते. त्यात दुपारचं सुस्तावलेलं लोलये. लोलये गाव झाडीत लपून गेलेलं आहे. लहान लहान घरांच्या समुदायाच्या स्वरूपात, उंचसखल अशा बर्‍याच जागी विखुरलेलं गाव. बर्‍याच ठिकाणी घरं बंद. कुणी कामानिमित्त बाहेर पडलेले, कुणी घरातच आळसावलेले असे. विचारायलादेखील असं कुणी मिळत नाही. शेवटी एका जणांना विचारल्यावर त्यांनी श्री आर्यादुर्गा मंदिरामागच्या रानात ही वेताळ मूर्ती आहे असं सांगितलं. कुणाला इथल्या वेताळाचा शोध घ्यायचा असेल, तर हे आर्यादुर्गा मंदिर हीच सर्वात मोठी खूण आहे. हे मंदिर रस्त्यालगत असून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. ह्या आर्यादुर्गा मंदिराच्या कमानीतून आत गेल्यावर एका ब्राह्मणाचं सुरेख घर आहे. आर्यादुर्गा मंदिर ही त्यांची खाजगी मिळकत आहे. त्यांचं आडनाव आता आठवत नाही, पण वझे किंवा असं काहीसं असावं. त्या घराच्या अंगणातूनच मागच्या वाडीत जायला पायवाट आहे.

आर्यादुर्गा मंदिराची कमान. उजवीकडे आर्यादुर्गा मंदिर तर डावीकडे मंदिराच्या पुजार्‍यांचं घर, मधल्या बेचक्यातून वेताळमूर्तीकडे जाण्याची वाट आहे.

a

घरासमोरच्याच पायवाटेने आपला वाडीत प्रवेश होतो. रानातच वेताळदेवाला जायला एक लहानशी कमान आहे. गच्च रान माजलेलं, पोफळीही अगदी विपुल. त्या बंबाळ्या रानात भर दुपारीही अंधार पसरल्याचा भास होतोय. पायवाटेने पुढेपुढे जात असतानाच अवचित ती भव्य मूर्ती समोर येतेय, काळीकभिन्न. असं वाटतंय जणू काही वेताळदेव दुष्ट शक्तींना हाकलण्यासाठी सज्ज होऊन उभा आहे.

वेताळदेवाला जाण्यासाठी वाडीतली लहानशी कमान

a

ह्या अशा रानातच वेताळदेव प्रतिष्ठित आहे

a

लोलयेचा वेताळ अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही गोव्यातील ज्ञात असलेली वेताळाची सर्वात प्राचीन मूर्ती, नवव्या-दहाव्या शतकातली. सर्वात उंच, अदमासे सातेक फुटाची, सर्वाधिक देखणी - अर्थात हे देखणेपण रौद्र आहे. त्रिभंग मुद्रेतील ह्या वेताळाचं असितांग भैरवाशी कमालीचं साम्य आहे.

ह्या वेताळाच्या मूर्तीला छत नाही, गाभारा नाही, मंडप नाही, कुठलाही आडोसा नाही. शेकडो उन्हाळे-पावसाळे झेलत ह्या रानात तो आजही उभा आहे. तसं बघायला गेलं, तर वेताळाच्या किंवा राखणदाराच्या मूर्ती ह्या उघड्यावरच असतात. गोव्यातील इतर वेताळ आता मंदिरांमध्ये स्थापित झालेले आहेत, पण लोलयेचा वेताळ आजही रानात उभा राहून गावाची राखण करतो आहे.

a

ह्या वेताळाची मूर्तीदेखील मोठी वैशिष्ट्यपूर्ण. ह्याच्या मस्तकी प्रभावळ आहे. मस्तकी शिरोभूषण असून त्यावर नागबंधन आहे. त्याने लांबुळकी कर्णभूषणं परिधान केली आहेत. त्याचे डोळे खोबणीतून पूर्णपणे बाहेर आलेले असून कपाळी तिसरा डोळा किंवा उभं गंध आहे. त्याच्या नाकपुड्या फेंदारलेल्या असून त्याच्या कराल दाढा तोंडातून बाहेर आलेल्या आहेत.

a

अस्थिपंजर अशा ह्या वेताळाने नरमुंडमाला धारण केलेली आहे. गळ्यातील हारात एक नक्षीदार पदक आहे. त्याच्या एका हातात खड्ग आहे, जे आता भंग पावलेलं आहे तर दुसर्‍या हाताने त्याने कपाल धारण केलेलं आहे. ज्या हातावर कपाल आहे, त्याच हाताच्या एका अनामिकेवर त्याने बकर्‍याचं मुंडकं अडकवलेलं आहे.

a

a

वेताळाला नक्षीदार कंबरपट्टा असून त्याजवर त्याने घंटांची मालाच धारण केलेली आहे. पूर्णपणे नग्न अशा त्याच्या देहावर ही माला विलक्षण खुलून दिसतेय. वेताळाच्या दोन्ही पायांत कंकणं असून पैंजणदेखील आहेत. त्याच्या उजव्या पायाशेजारी एक स्त्री सेविका असून डाव्या पायाजवळ एक खड्गधारी सेवक आहे.

a

वेताळाची ही सर्वात देखणी मूर्ती, अत्यंत भयप्रद, रौद्र. ह्या मूर्तीला कोणी शस्त्रं अर्पण केली नाहीत, कुणी वहाणा अर्पण केल्या नाहीत, कुणी बळी अर्पण केलेला नाही. त्याच्या गळ्यात मात्र कुण्या भाविकाने घातलेले काही पूर्ण सुकलेले तर काही कालपरवाचे असे झेंडूच्या फुलांचे हार आहेत. इतक्या दूरच्या रानात येऊन पोर्तुगीज मूर्तिभंजकापासून ह्या वेताळाने स्वतःचा संपूर्ण बचाव केलेला आहे.

a

a

a

लोलयेतील हा वेताळ एक अद्भुत अनुभूती देतो. केवळ ह्या मूर्तीसाठी इतक्या दूरवर आल्याचं सार्थक होतं. अक्षरशः झपाटून टाकणारी ही वेताळमूर्ती. यासम हीच. आजही लोलयेचा राखणदार म्हणून हा वेताळ उभा आहे माझ्यासारख्या दूरवरच्या मर्त्य मानवाला आकर्षित करत.

H

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 79180 views

💬 प्रतिसाद (80)
क
कंजूस Fri, 11/09/2018 - 23:57 नवीन
कोंकणीत वेताळकथा लिहाव्यात तिकडच्या लोकांनी. भुतांसाठी वेताळ आहेत म्हणून पोर्तृगीज घाबरले नाहीत.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 11/10/2018 - 07:13 नवीन
मस्स्स्स्स्स्स्त! आगोबाच्या वेताळकथा ,असं नाव सुचल वाचता वाचता! =)) बाकि हल्लि आगोबाचे लेख ललिताचि वळणे घेऊ लागलेले आहेत,असे एक न्रिक्षण जाता जाता नोंदवितो. ;)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 11/10/2018 - 18:23 नवीन
असे वळण घेता घेता, वल्ली शेठ बहूदा, एक दिवस तुम्हाला बोलावणार...
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 11/23/2018 - 04:59 नवीन
@एक दिवस तुम्हाला बोलावणार... -- आपल्याला "गाठणार" असं म्हणायच होतं का?
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sat, 11/10/2018 - 10:16 नवीन
वेताळगाथा!
  • Log in or register to post comments
म
मार्गी Sat, 11/10/2018 - 11:27 नवीन
एक वेगळाच व अनवट विषयावरचा जबरदस्त लेख!!!
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Sat, 11/10/2018 - 13:38 नवीन
जबरदस्त मित्रा !!! मस्त लेख !!!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Mon, 11/12/2018 - 08:32 नवीन
अप्रतिम लेखन प्रचेतस.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 11/12/2018 - 14:52 नवीन
सुरेख लेख आणि चित्रे.. स्वाती
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 11/13/2018 - 09:11 नवीन
वल्लीदा, अप्रतिम लेखन! एकदा, गावाच्या नावांविषयी काही दंतकथा प्रचलित असतात, त्यावर असाच एखादा उत्तम लेख येउद्यात. आमच्या गावाच्या नावाची दंतकथा सांगतो. आमच्या गावाचे नाव वीट. तिथे कधी काळी जमिनीखाली खणले की सोन्याच्या विटा मिळायच्या म्हणून गावाचे नाव वीट असे पडले. आता नाही सापडत! नाहीतर कळालं की मिपाकर लागले कुदळ, फावडे, जेसीबी शोधायला. Sandy
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Tue, 11/13/2018 - 09:34 नवीन
धन्यवाद तुमच्यामुळे कळले की वेताळाची मूर्ती असते, देउळ असते वगैरे. वर बेलूरचा फोटो आहे. बेलूरला गेलो होतो या प्रकारातले काहीच कळत नसल्याने फक्त मंदीर बघितले झाल. नवीन माहीती मिळाली.
  • Log in or register to post comments
ज
जुइ Mon, 11/19/2018 - 19:49 नवीन
तुम्ही घेतलेला वेताळांच्या मूर्तिचां शोध उत्कांठावर्धक तसेच माहितीपूर्ण आहे. मूर्तिंचे वर्णनही चांगल्याप्रकारे केले आहे.
  • Log in or register to post comments
अ
अपर्णा वाटवे Fri, 02/01/2019 - 03:53 नवीन
कुकडेश्वर ची हि मूर्ती पहिली होती..पण हे नवीन होते. कोकणातले वेतोबाही ऐकून होते... त्यांचा असा संबंध असेल असा वाटल नव्हते धन्यवाद. अजूनही वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
ग
गिड्डे गुरुवार, 02/21/2019 - 10:23 नवीन
Tumacha Lekha aavadala Majhe gaav Solapur Dist madhil Modnimb he aahe an tithle Gram daivat he dekhil Vetal aahe dar varshi jatra Bharate Mandir aahe aani ho majhya Panajobanche navhi Vetal ch aahe
  • Log in or register to post comments
ग
गिड्डे गुरुवार, 02/21/2019 - 11:00 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Wed, 12/23/2020 - 04:43 नवीन
हा लेख वाचायचा राहून गेला होता. खूप चांगली व नवीन माहिती मिळाली. फोटोही छानच.
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 08/31/2021 - 17:01 नवीन
दक्षिण गोवा फिरणे हा ऑफ बीट तरीहि सुंदर अनुभव आहे... तुमच्या सोबत गोवा फिरावाच असे वाटू लागले आहे साधारण १०-११ वर्षे मिपावर काढली तर तो योगही येईल असे सर कुठेतरी म्हंटले होते... मेरे नशी बमेहै दोस्त गोवाहय के नही
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 08/31/2021 - 20:30 नवीन
ह्या वर्षी जानेवारी अखेर गोव्याला गेलो असताना दक्षिण गोव्यातील बेतुल किल्ल्यावर असलेल्या मंदिरात ही मुर्ती पाहीली. मंदिरावर “||श्री खाणेश्वर प्रसन्न ||” असे लिहीले आहे. सर्वसाधारणपणे नावात ‘श्वर’ असलेली मंदिरे ही शंकरांची असतात पण इथे शंकराच्या मंदीराचे कुठलेही वैशिष्टय आढळून आले नाही. इंटरनेटवर शोध घेतला असताही काहीच माहिती मिळाली नाही. ही पण स्थानिक मान्यते प्रमाणे वेताळाची मुर्ती असावी काय? Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 09/01/2021 - 02:38 नवीन
दोन्ही फोटो दिसत नाहीयेत. प्रायव्हसी सेटिंग्जचा इश्यू असावा.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 09/01/2021 - 05:05 नवीन
आणि चावंड येथे गेलो होतो तेव्हा ते मंदिर डागडुजीसाठी उतरवले होते. पुन्हा जावे लागेल. तिथून खाली कोकणात पळू/ सोनावळे गावात उतरायला घाट आहे असं तिथला पुजारी म्हणाला. तो खालच्या गावातलाच. पण आता तोही एसटीनेच जातो.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 09/01/2021 - 05:42 नवीन
त्या परिसरात बर्‍याच घाटवाटा आहेत. दार्‍या घाट, कामथे घाट, आंबोली घाट, हातवीजवरुन उतरणारी खुटेधार वाट, तिरंगी घाट.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 09/01/2021 - 06:06 नवीन
ढाकोबा पर्वत परिसर.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 09/01/2021 - 08:27 नवीन
आता फोटो दिसत आहेत का? Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 09/01/2021 - 09:13 नवीन
हो आता दिसत आहेत. ही वेताळमूर्ती किंवा शिवमूर्ती नाही. ही अगदी आधुनिक मूर्ती आहे. अगदी गेल्या १०/१५ वर्षातलीच असावी. स्थानिक लोकदैवताची आधुनिक पद्धतीने बनवलेली मूर्ती असावी असे वाटते.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 09/01/2021 - 09:53 नवीन
रोज रात्री ९-५ कामावर जाणारा वाटतोय. टापटिप आहे. देवळातली फरशी छान आहे. वेताळ देव नसल्याने चपला घालतो. पुढे कुणी वुडलँडचे बुटही देतील त्याला. मागे काठ्या आणि मुखवटा आहे.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 09/01/2021 - 10:14 नवीन
पुढे कुणी वुडलँडचे बुटही देतील त्याला. इतक्या वेळ पायाकडे लक्षच गेलं नव्हतं.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 09/01/2021 - 11:03 नवीन
होय, मूर्ती आधुनिक आहे ह्यत शंकाच नाहि! मंदिरात नंदी, कासव आणि पिंडि असे काहिच नसल्याने हे शंकराचे देउळही वाट्त नाही. एका हातात मशाल, दुसर्‍या हातात काठि आणि पायात चपला बघुन ही मूर्ती वेताळाची असावी असे मला वाट्ले होते. ही ग्रामऱक्षक अशी मान्यता असलेल्या स्थानिक लोकदैवताची मूर्तीच असावी हाच निष्कर्ष बरोबर वाटतोय. @कंकाका खरं आहे :) पण मूर्ती घडवली बाकि मस्त आहे!
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 09/03/2021 - 09:41 नवीन
दिसताहेत ! हा खाणेश्वर शंकर नाही आणि एका हातार मशाल आणि दुसर्‍या हातात काठी म्हणजे खाणकामाच्या देवाचे एखादे नविन मॉडेल असावे का ?
  • Log in or register to post comments
म
मित्रहो गुरुवार, 12/23/2021 - 07:03 नवीन
हा लेख आधी वाचला होता आता परत वाचला. खूप छान माहिती आहे. लोलयेची वेताळ मूर्ती भव्य आहे. विदर्भात मी कधी वेताळ मंदीराविषयी ऐकले नाही. याचा अर्थ तिकडे मंदीर नसतील असे नाही पण आसपास कधी ऐकले नाही.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 05/05/2022 - 12:34 नवीन
एकदा अमावस्येला जायला हवे इकडे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 17 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 20 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 24 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा