Nandini's Diary
किती महिने झाले असावेत? सात, आठ? ख्रिसमसची सुट्टी संपून नुकतंच क्लिनिक पुन्हा सुरु झालं होतं. स्कॉटलंडमधल्या या लहानश्या शहरात ख्रिसमसच्या काळात सगळं ठप्पच असतं. जानेवारीत आळोखे पिळोखे देत शहर पुन्हा जागं होतं. त्याच दरम्यान कधीतरी ती पहिल्यांदी आली. रोज घरी जाण्याआधी पुढच्या दिवसाच्या पेशंट्सच्या फाईल्स वरून नजर फिरवते तशी तिचीही फाईल बघितली. वय पन्नाशीच्या पुढे, एका फार्मास्युटिकल कंपनीत काम करणारी एलिझाबेथ - लिझ. तिच्या घराच्या बाजूला एक रेस्टॉरंट होतं. तिथे येणारे बरेच लोक त्या रस्त्यावर आजूबाजूला गाड्या पार्क करत. आसपास राहणार्या लोकांना हा तसा त्रासच होता. अश्याच एका माणसाने लिझच्या घरासमोर गाडी पार्क केली. त्यावरून त्याच्याशी बाचाबाची झाली. तेव्हा रागाने हिने बाजूचा दगड उचलून त्याच्यावर फेकून मारला. तो वाचला पण दगड गाडीवर जाऊन आदळला. पोलीस कम्प्लेंट झाली. लिझला नुकसान भरपाई तर द्यावी लागलीच पण अजूनही शिक्षा झाली असती. फक्त आधी काहीही क्रिमिनल रेकॉर्ड नसल्याने एक चान्स म्हणून सायकोथेरपीच्या कंपल्सरी सेशन्सच्या अटीवर ती सुटली. बाकी सारे तपशील वाचताना एका ठिकाणी येऊन मी अडखळले. Gay (खरंतर स्त्री असल्यामुळे लेस्बियन, पण गे आणि लेस्बियन दोन्हींसाठी सरसकट वापरला जाणारा शब्द म्हणजे गे). युकेमधे येऊन आता पंधरा वर्ष झाली तरीही मी अजून या गोष्टीला कशी काय बिचकते!
दुसर्या दिवशी लिझ आली. मध्यम उंची. सगळ्याच युरोपीय लोकांचा असतो तसा पांढराफटक रंग. अगदी लहान बॉयकट सारखे केस, निस्तेज ओढलेला चेहरा. पण हिरवे, घारे डोळे मात्र चमकदार, किंचित करारी धार असणारे. तिला इथे जबरदस्ती पाठवलंय हे तिच्या चेहर्यावरून स्पष्टच होतं. अश्या पेशंट्सना बोलतं करणं कठीण असतं. बरेचदा ज्यांच्याकडे सांगण्यासारखं खूप असतं तेच लोक अशी चुप्पी घेऊन बसतात. पण मीही आता अश्या जबरदस्तीने आलेल्या लोकांना निर्ढावले आहे. पूर्वी जेव्हा पेशंट्स असे शांत राहत तेव्हा मला ते माझंचfailure वाटत असे. पण हळूहळू अनुभव वाढू लागला तेव्हा कळलं की everything is not always about ‘me’. समोरच्याला समजून घ्यायला या ‘me’ ला मागे सोडावं लागतं. पुढे असंही वाचनात आलं की डॉ. प्रकाश आमटे जेव्हा हेमलकसाला गेले तेव्हा दोन वर्षं तिथले आदिवासी लोक त्यांच्याकडे फिरकलेच नाहीत, त्यांना मदत करूच देत नव्हते. एवढ्या थोर लोकांची ही तर्हा. मला तर एखाददोन सेशन ताटकळावं लागतं. कधीकधी गोष्टींना वेळ द्यावा लागतो. लिझ नेही बोलतं व्हायला वेळ घेतला. पहिल्या सेशनमधे नुसती ओळखपाळख, जुजबी बोलणं,आणि त्या दगड फेकण्याच्या घटनेचं अगदी त्रोटक वर्णन झालं. माझ्या प्रश्नांना तिची minimalistic तेवढ्यापुरती उत्तरं.... त्यातून निष्पन्न काहीच निघालं नाही.
पुढच्या सेशनला सुद्धा सुरुवात तशीच. पहिली दहा मिनिटं ती नुसतीच घुम्यासारखी शांत बसून राहिली. गोगलगायीला जर काडीने टोचलं तर ती स्वतःला अधिकच आत ओढून घेते. कधी कधी पेशंट्सचंही तसंच होतं. म्हणून असे एकतर्फी संवाद सुरु करताना मी ते बोचरे होणार नाहीत याची काळजी घेते. शोभेच्या दगडांनी भरलेली एक डिश समोरच्या टेबलवर होती. लिझ शून्य नजरेने त्या डिशकडे बराच वेळ बघत होती. मी उचलून ती डिश आमच्या मधे ठेवली आणि तिला विचारलं, “यांतला कुठलाstone तू आहेस?”. तिने सगळे गुळगुळीत, रंगीत खडे सोडून एका राखाडी रंगाच्या ओबडधोबड खड्याकडे बोट दाखवलं. चला, सुरुवात तर झाली......
“काय साम्य आहे तुझ्यात आणि याच्यात?”
“हा वेगळा आहे, पण वेगळा आणि छान नाही, वेगळा आणि कसातरीच...”
Low self esteem, possible loneliness मी मनातल्या मनात नोंद करत होते. पुढे हळूहळू ती बोलू लागली. होता होता मोकळेपणानेही बोलू लागली. एकदा तिची कहाणी सांगताना रागाने लालबुंद झालेला तिचा चेहरा आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे.
“राग राग राग..... नुसता संताप भरलाय माझ्या आत. असं वाटतं की बॉम्बसारखा माझा स्फोट होईल एक दिवस. आणि तसा झाला ना तर हे ... हे सगळे पहिले जळतील त्यात”
“हे....?” मी विचारलं.
“हे ... माझी फॅमिली, आई, भाऊ, बहीण. माझे वडील आधीच गेले. मी नऊ वर्षांची होते तेव्हा. ते ड्रग्स घ्यायचे. पण मला माहीतच नव्हतं. ते होते तेव्हाही घरात असून नसल्यासारखे स्वतःच्या धुंदीतच असत. खरं तर माझ्या मनात त्यांच्याबद्दल काहीच आठवणी अशा नाहीयेत. पण ते गेले तो दिवस मला लख्खं आठवतो. रविवार, शाळेच्या सुट्टीचा दिवस होता. बहीण, भाऊ आणि मी खाली हॉलमधे होतो. माझ्या आईच्या घरात वरती बेडरूम्स होत्या आणि खाली हॉल आणि किचन. अचानक आई एकदम वेड लागल्यासारखी जिन्यावरून किंचाळत धावत खाली आली. आज इतक्या वर्षांनीही ते आठवून माझ्या पोटात गोळा येतो. आईचा तो अवतार बघून आम्ही तिघंही पुरते भांबावलो. धाकटी बही जी चारएक वर्षांची होती ती भोकाड पसरून रडू लागली. मोठा भाऊ वर काय झालंय ते बघायला जिन्याकडे धावला. मीसुद्धा त्याच्या मागे धावले. जिन्याच्या समोरच आमच्या आईवडलांची खोली होती. अर्धा जिना चढला तरी खोलीचा काही भाग दिसत असे. आम्ही पाच सहा पायर्या वर चढलो असू, तर समोरच खोलीमध्ये छपराच्या आढ्याला लटकलेलं वडलांचं प्रेत दिसलं. पुढे असलेल्या माझ्या भावाने ते आधी पाहिलं आणि आपसूक तो दचकून मागे सरकला, तो जिन्यावरून पडला, त्याचं डोकं आपटलं, खोक पडली आणि त्यातून भळाभळा रक्त वाहू लागलं. आई काहीतरी करेल म्हणून मी तिच्याकडे बघितलं तर ती दगडी मूर्तीसारखी सुन्नं होती. छोटी बहीण रडत होती पण ते आईला ऐकूही येत नसावं. तसाही तिचा स्वभाव खूप तापट होता. त्यात आत्ताच आधी तिला किंचाळताना आणि नंतर असं फ्रीझ झालेलं बघून मी तिच्या जवळ जायची हिम्मतच केली नाही. मी पळत किचनमधे गेले, तिथला फोन उचलला, आणि ९९९ नंबर फिरवला. पुढे मी काय बोलले, काय सांगितलं यातलं काहीच मला आठवत नाही. पण लगेचच आमचं घर पोलीस, अँम्ब्युलंसचे लोक, डॉक्टर, फोटोग्राफर सगळ्यांनी भरून गेलं. पुढे त्या दिवसात काय झालं हे मला कधीच नीट आठवत नाही, माझ्या स्मरणशक्तीवर जणू पडदा ओढला आहे. पण हा एवढा भाग मात्र माझ्या मेंदूवर कोरल्यासारखा राहिला आहे.” हे सारं सांगतानाही लिझ थरथरत होती. तिच्या डोळे डबडबले होते. ती पुढे बोलतंच राहिली. “वडील जिवंत असतानाही आईवडलांची सतत भांडणं होत. पैशांच्या दृष्टीने आमचं ठीकठाक चाललं होतं पण घरात शांती सुख असं कधी नव्हतंच. एखाद्या एकसंघ सुखी कुटुंबासारखे आम्ही कधी असल्याचं मला आठवतच नाही. वडील अगदी अलिप्त आणि आई सदैव चिडलेली. वडील गेल्यावर तर ते अधिकच वाढलं. बेतास बात राहण्याइतके पैसे वडील मागे ठेऊन गेले होते. रोज केक खात नसलो तरी आम्ही कधी उपाशीही राहत नव्हतो. चणचण अशी नव्हती, पण तीन मुलांना एकटीने वाढवायला ज्या मनोबलाची गरज होती ते मनोबल आईकडे नक्कीच नव्हतं. आल्या गेल्या कोणाही समोर आणि आमच्या समोर तर सततच ती तिच्यावर तीन मुलांची जबाबदारी टाकून स्वतः खुशाल गळफास लावून निघून गेलेल्या नवर्याचा उद्धार करत असे. हे इतकं होतं की कित्येक वर्ष मला वाटायचं की आम्हां भावंडांचीच काहीतरी चूक असली पाहिजे. आम्हांला कंटाळून आमच्या वडलांनी आत्महत्या केली आणि म्हणूनच आई आमच्यावर सतत चिडत असते. वडलांच्या ड्रग्स अॅडीक्शनबद्दल मला खूप उशिरा कळलं. आईला आपल्या दुर्दैवाबद्दल नेमकं कोणाला दोषी ठरवावं हे न कळल्याने ती सर्वांचाच राग करत असे. ती इतकी संतापी होती की तिचं कोणाशीही पटत नसे. ना मित्रमंडळी, ना शेजारीपाजारी, ना नातेवाईक. दुःखाच्या गर्तेतले ते दिवस आम्ही कसे काढले कोण जाणे! मी युनिव्हर्सिटीत शिक्षणासाठी जायच्या निमित्ताने त्या घरातून बाहेर पडले, ती पुन्हा मागे वळून कधी गेलेच नाही.
अधून मधून सुट्ट्यांमध्ये जाणं व्हायचं पण ते पाहुण्यांसारखं, उपरं. दरम्यान भावाने तो लग्न करणार नाही म्हणून जाहीर करून टाकलं होतं. माझा कुणी बॉयफ्रेंड आहे का म्हणून चौकशी व्हायची पण मला माझा कल कळायला लागला होता. फार्मसीचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत मला स्वतःची निश्चित कल्पना आली. मी आणि लिंडा आता एकत्र येऊनही एक वर्षं झालं होतं. मला नोकरी लागली होती, मी माझ्या भाड्याच्या घरात रहात होते. एका ख्रिसमसला घरी गेले. माझ्या गे असण्याबद्दल घरच्यांच्याही कानावर आलं असावं. आई, भाऊ आणि बहीण तिघांनीही माझ्यावर आगपाखड सुरु केली. मी तोंड काळं केलं होतं, त्यांचं नाक कापलं होतं वगैरे वगैरे. कधी ना कधी हे होणारच याची मला कल्पना होती. मीही तेव्हढ्याच रागात त्यांना सांगून टाकलं की जा... पाहिजे ते करा... इतक्या वर्षांत पहिल्यांदी मला प्रेम मिळालं आहे, मलाacceptance मिळाला आहे, मी आणि लिंडा पुढच्या वर्षी लग्न करणार आहोत. त्यांच्यावर तो बॉम्ब टाकून मी निघून गेले. दोन वर्षं, पूर्ण दोन वर्षं त्यांनी माझ्याशी सारे संबंध तोडले. मी फोन केला तर माझा आवाज ऐकून फोन ठेऊन देत. भावंड तर राहूच दे पण माझ्या स्वतःच्या आईने मी जिवंत आहे की मेले हेसुद्धा त्या दोन वर्षांत कधी ढुंकून बघितलं नाही. बहीण, भाऊ तर अजूनही जेवढ्यास तेव्हढेच असतात. ख्रिसमस आणि ईस्टरला आईच्या घरी भेट होते तेव्हढीच. एकमेकांच्या करपलेल्या बालपणाचे मूक साक्षीदार! आम्ही तिघंही एकमेकांना टाळतो. माझं कमनशीब असं की पुढच्या वर्षी लग्न तर दूरच, लिंडाच्या घरून इतका विरोध झाला की शेवटी आमचं ब्रेकअप झालं. पुन्हा मी एकटीच होते. वर्षानुवर्ष. अगदी काही वर्षांपूर्वी डेब्राला भेटेपर्यंत. चाळीशीनंतर आम्ही लग्न केलं. अर्थातच माझ्या परिवारातलं कोणीच त्याला आलं नाही. बाकी सारं मी समजू शकते. समाज आमच्याकडे कश्या नजरेने बघतो हे मला ठाऊक आहे आणि मी ते स्वीकारलंय. पण माझ्या आईने कधीही मला समजून घ्यायचा प्रयत्न केला नाही, हे मला पचवता येत नाही. अगदी इतका खडतर काळ आम्ही एकत्र काढला तरीही माझ्या आनंदासाठी तिची सगळी तत्त्व, मूल्य फक्त एक दिवस बाजूला ठेवावी आणि मला समजून घ्यावं असं कधी वाटलंच नाही तिला? माझ्या गे असण्याचा त्यांना अर्थाअर्थी काहीही त्रास नाही. आम्ही भेटतोच वर्षा काठी दोन वेळा. मग हा दुस्वास कशासाठी?या छोट्याश्या शहरात माझा माझेच आपले लोक माझा दुःस्वास करतात, ते कधीही रस्त्यात, इथे तिथे मला समोर दिसतील अशी सतत धास्ती वाटते मला. स्टेशन जवळ एक कॅफे आहे, माझी आई आणि बहीण बरेचदा तिथे जातात. कधी मला जर तिथे जायची वेळ आली तर मला पाल्पिटेशन्स होतात, काळजात धडधडतं, भर थंडीत घाम येतो. भाऊ कधी रस्त्यात समोर आला तर न बघितल्यासारखं करून पुढे निघून जातो. मी जशी आहे तसं त्यांनी मला कधीच स्वीकारलं नाही, ते एक वेळ ठीक आहे. पण मी त्यांचं काहीही बिघडवलं नसतानाही त्यांनी सदैव माझा तिरस्कार केला. तो बोलण्यातून आणि वागण्यातूनही वेळोवेळी दाखवला. भावाबहिणीकडून माझी तशी फारशी अपेक्षाही नव्हती म्हणा. पण आई, तिनेसुद्धा माझा तिरस्कार करावा? स्वतःच्या पोटच्या मुलीला समजून घेण्यात आई इतकी कमी कशी पडू शकते? मी तिला कधीच माफ करणार नाही, कधीच नाही...” रागाने लाल झालेल्या लिझच्या डोळ्यांमधून घळाघळा पाणी येत होतं. “And you know what आता या माझ्या सार्या त्राग्याचा काहीच उपयोग नाही. गेल्या महिन्यात आई गेली. अख्ख्या आयुष्यात जर एकदा म्हणाली असती की it’s ok. मी आहे ना तुझ्याबरोबर......” बांध फुटल्यासारखी लिझ रडतच होती.
माझं मन पिळवटलं. काय बरोबर आहे काय नाही मला खरंच ठाऊक नाही. पण unconditional loveबिनाशर्त प्रेम, आपल्या सगळ्यांनाच याची आस असते ना! ते मिळंत नाही, अगदी जवळच्या लोकांकडूनही नाही, तेव्हा या भरलेल्या जगातही किती एकटं वाटत असेल! कित्येक रागावलेल्या चेहर्यामागे अशीच कुठलीतरी, कधी अनाठायीही पण भीती असते, दुःख असतं. त्यानंतरच्या आठवड्यांमध्ये लिझ बरोबर anger management च्या काही exercises केल्या. हळूहळू फरक पडत होता. आई बद्दलचा राग, त्याचं आता फारसं काही करणं शक्य नव्हतं, तो मधून मधून वर येत होता. कदाचित रागापेक्षा आई गेल्याचं दुःखंही अश्या रूपात वर येत असेल. जवळची व्यक्ती गेल्यानंतर त्या दुःखाचे पडसाद वेगवेगळ्या रूपात उमटतात. तशीही शक्यता होती.
एका वेळी ती आली तीच तणतणत. आल्या आल्या तिने मला आपले बूट दाखवले. त्यांच्या लेस कुरतडलेल्या दिसत होत्या. लिझ तावातावाने सांगू लागली, “सगळं जग तर माझ्या विरुद्ध आहेच. किमान माझी जोडीदार डेब्रा तरी मला समजून घेणारी होती. पण आता तीसुद्धा माझं डोकं फिरवतेय. तिला कुठेतरी वाटेत एक कुत्र्याचं पिल्लू थंडीने कुडकुडताना दिसलं, तर ही बिचारं बिचारं म्हणून त्याला घरी घेऊन आली. आता ते सारखं भुंकतं, घरात घाण करतं,दिसेल ते कुरतडत सुटतं, त्याचे केस जिथे तिथे पडतात,शिवाय वारा पाऊस काहीही असलं तरी त्याला घेऊन बाहेर जावं लागतं ते वेगळंच. तरी बहुतेकदा डेब्राच त्याला बाहेर घेऊन जाते पण बाकी सारा त्रास तर मला आहेच ना.” लिझची तक्रारीची यादी संपल्यावर मी तिला एक कागद दिला आणि सांगितलं की “आता या कागदावर कुत्राच्या पिल्लाला सांभाळताना लिझ आणि डेब्राला होणारे त्रास असं heading दे आणि त्या खाली तुला जे काही सुचेल ते लिहून काढ.” पाचेक मिनिटात कागद पूर्ण भरून लिझने मला परत दिला.
लिझची कंपल्सरी सेशन्स आता संपत आली होती. मी तिला विचारलं, “मला तुझ्यात फरक वाटतोय,पण तुला स्वतःला काय वाटतं?”
“माझ्यात इतका राग भरून राहिला होता, आईला रागीट, भांडखोर म्हणता म्हणता मीही अगदी तिच्यासारखीच झाले होते. पण तुझ्याशी बोलून माझ्या मनात दाबून ठेवलेल्या आणि सारख्या वर उसळणार्या रागाचा निचरा झाला. तूexactly काय करतेस, माहीत नाही पण डेब्राही म्हणते हल्ली, की गेले काही महिने मी हळूहळू निवळले आहे. असं कसं?” जॉन बॉवलबीने याचं उत्तर आधीच देऊन ठेवलंय. मनुष्याला empathy (समजून घेणं, दया किंवा सहानुभूती नव्हे), आणि unconditional positive regardमिळालं तर त्याचं आयुष्य बदलू शकतं. लिझ अख्खं आयुष्य acceptance साठी तडफडत राहिली, ज्याचं रूपांतर पुढे अनियंत्रित रागात झालं. तिच्या रागावरचं नियंत्रण आता पूर्वीपेक्षा चांगलंच होतं. तरीही तिला signoff करण्या आधी मला अजून एक गोष्ट करून पहायची होती. सेशनच्या शेवटी ती निघताना मी तिच्या हातात एक कोरी वही ठेवली. आणि तिला सांगितलं, “पुढच्या पंधरा दिवसांत तुला एक homework आहे. तू स्वतःला, तुझी आई (कै.) late मिसेस मॅकेंझी आहेस असं समजून या वहीत मिसेस मॅकेंझीना जे काही वाटेल (असं तुला वाटतं) ते लिहायचं आहे. जेव्हढं अधिक लिहिशील तेव्हढं उत्तम.” गोंधळून गेलेल्या तिने ती वही घेतली आणि ती गेली. पुढे ती वही भरून तिने लिहिलं, ती पुन्हा एक दोन वेळा आली. आणि मग मी तिला आता ती ठीक आहे म्हणून सर्टीफिकेट देऊन साईन ऑफ सुद्धा केलं.
त्यानंतर चार दिवसांनी आज तिने एक वाईनची बाटली, फुलांचा गुच्छ, एक आभारचं ग्रीटिंग कार्ड आणि एक पत्र पाठवलं होतं.
.......... माझ्या कुटुंबाने, माझ्या आईने मला कधीच स्वीकारलं नाही. त्या रिजेक्शनमुळे मी सतत तिचा राग राग केला. तिचाच काय, सार्या जगाचा राग केला. तू दिलेल्या वहीत लिहायला घेतलं तेव्हा सुरुवातीला तिच्या नावानेसुद्धा मी, मी म्हणूनच लिहीत होते की मी लिझशी खूप चुकीची वागले. पण हळू हळू मी खरोखरीच तिच्या भूमिकेत शिरले. मी तिच्या लहानपणाबद्दल अजून माहिती गोळा केली. ती स्वतःच एका मोडलेल्या कुटुंबात वाढली होती. नवर्याचं ड्रग अॅडीक्शन नंतर आत्महत्या, तरुण वयातच एकटीवर तीन मुलांची जबाबदारी या सार्याने ती मोडून गेली होती. आमच्यावर रागावणं हा नक्कीच चुकीचा, पण तिचाcoping mechanism होता. चार दिवस कुत्राच्या पिल्लाला तेही डेब्राच्या मदतीने सांभाळताना, मी पाच मिनिटांत पानभर तक्रारी लिहिल्या. ती तर आम्हा तिघांना एकटी सांभाळत होती. आम्ही दुःख भोगलं हे खरंच पण तिचा हेतू तसा नसावा. कदाचित ती तिच्या परीने प्रयत्न करतही असेल. भलेही आमच्यासाठी ते पुरत नव्हते. फुटक्या मडक्यासारखं तिचं आयुष्य होतं, त्यात काय भरणार आणि आम्हांला काय देणार! त्यात माझ्या गे असण्याने तर तिच्या मनस्तापात आणखीनच भर पडली. मला आहे तसं न स्वीकारणं या बाबतीत तिची थोडी चूकच झाली खरी पण तसंच तीसुद्धा उठून म्हणू शकते की मी हा चुकीचा मार्ग निवडला. पण ती आता उठून कधीच काहीच म्हणणार नाही..... मी तिला खूप मिस करते गं. राग करायला तरी ती असायला हवी होती.
आमच्या कुत्राच्या पिल्लाला आता नाव मिळालं आहे. स्टॅनली लेन वरती तो सापडला म्हणून स्टॅनली. त्याचं कुरतडणं थोडं कमी झालं आहे आणि भुंकण्याची आता मला सवय होते आहे.
तुझ्या टेबलवरच्या त्या खड्यांच्या डिशसाठी एक खडा पाठवला आहे. तो जवळ धरून बघ त्यातून निळा प्रकाश येतो असं वाटतं. तो खडा तू आहेस. Thank you so much
लिझ
डॉ. माधुरी ठाकुर
💬 प्रतिसाद
(38)
प
पद्मावति
Tue, 10/02/2018 - 09:55
नवीन
खुप सुरेख लिहिलंय.
- Log in or register to post comments
श
श्वेता२४
Tue, 10/02/2018 - 10:48
नवीन
खूप खूप आवडलं
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Tue, 10/02/2018 - 11:02
नवीन
आवडलं
- Log in or register to post comments
अ
अथांग आकाश
Tue, 10/02/2018 - 11:31
नवीन
खूप आवडला लेख!

- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Tue, 10/02/2018 - 12:06
नवीन
अप्रतिम. मानवी मनोव्यापाराचे सुप्त कंगोरे छान उलगडून दाखवले आहेत.
धन्यवाद.
- Log in or register to post comments
स
सदस्य११
Tue, 10/02/2018 - 14:00
नवीन
खूप आवडला हा लेख
- Log in or register to post comments
स
सुमित्रा
Tue, 10/02/2018 - 14:25
नवीन
खूप छान लिहिलंय...आवडलं.
- Log in or register to post comments
अ
अनिंद्य
Tue, 10/02/2018 - 14:53
नवीन
डॉ. माधुरी ठाकुर,
दुर्लक्षित विषयावरले लेखन आवडले. लिझसारखे अनेकांना आपला राग-नैराश्य-वेदना नेमक्या काय आणि कश्यामुळे आहेत हे articulate करता येत नाही. उपाय वगैरे तर पुढची पायरी.
मानसिक आरोग्य मिळवण्या-राखण्यासाठी तुमच्यासारखे सारथी मदत करताहेत हे खूप समाधान देणारे आहे.
तुमच्या पोतडीतील आणखी अनुभव वाचायला आवडतील, अवश्य लिहा.
शुभेच्छा,
अनिंद्य
- Log in or register to post comments
र
रांचो
Tue, 10/02/2018 - 15:05
नवीन
+१११
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 10/02/2018 - 15:39
नवीन
फारच सुंदर
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Tue, 10/02/2018 - 15:50
नवीन
छान लेखन!
स्वाती
- Log in or register to post comments
P
palambar
Tue, 10/02/2018 - 16:47
नवीन
महत्वाचा विषय, आजूबाजूला आपण असे अनेक लोक पाहतो.
कुठल्याही टोकाच्या भावनेचे व्यवस्थापन कसे करायचे याबद्दल लिहिले तर आवडेल.
- Log in or register to post comments
व
वीणा३
Tue, 10/02/2018 - 17:19
नवीन
खूप सुंदर लेख. प्लिज हि डायरी पुढे अशाच लिहीत रहा. आपल्या आसपासच्या माणसांबरोबर मायेने वागायचं सतत प्रयत्न करणं किती महत्वाचं आहे ते कळतं राहील.
- Log in or register to post comments
स
स्वाती२
Tue, 10/02/2018 - 23:57
नवीन
फारच सुंदर लेख!
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Wed, 10/03/2018 - 00:55
नवीन
.
- Log in or register to post comments
र
रुपी
Wed, 10/03/2018 - 01:30
नवीन
काय सुरेख!
खूप दिवसांनी तुमचं लेखन दिसलं.. लिहीत रहा :)
- Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर
Wed, 10/03/2018 - 03:20
नवीन
ओघवत्या भाषेतले प्रत्ययकारी लिखाण धबधब्यासारखे अंगावर आले. आवडले.
एक वितंडवाद घालायच्या सवयीमुळे गावाने नाकारलेला चाळिशीतला एक अविवाहित माणूस मला हल्लीच सफ्टेंबर महिन्यात वैताग देऊन गेला. मी त्याच्याशी सहानुभूतीने वागत असे. गेल्या महिन्यात तो मला एका सरकारी कार्यालयात भेटला. मी आत जात होतो आणि तो बाहेर येत होता. अधिकारी मोकळा असल्यामुळे मी आत गेलो. हा माझ्या बाजूला येऊन बसला. याला नको तिथे नाक खुपसायची सवय. मी त्याला सांगितले की तुमचे काम झाले असेल तर बाहेर जा, नसेल तर मी बाहेर बसतो. तो म्हणाला माझे काम झाले आहे पण मी तुमच्याबरोबर बसतो. मी पुन्हा त्याला नम्रपणे सांगितले की कृपया माझ्या या कामात मला तुमचा सहभाग नको आहे, कृपया बाहेर जा. तो ऐकायला तयार नाही. तो मधे बोलून माझे काम बिघडवण्याची शक्यता फार मोठी होती. ती रिस्क मी घेऊ शकत नव्हतो आणि हा अधिकारी नंतर आठवडाभर भेटला नसता. माझे काम धोक्यात अले होते. शेवटी माझा संयम संपला आणि मी त्याला दम देऊन बाहेर घालवला.
नंतर त्याने मला मोबाईलवर अनेक नको असलेले धार्मिक टेक्स्ट मेसेजेस पाठवले आणि दहा एक वेळा फोन केला. त्याला कृपया असे मेसेजेस पाठवू नको म्हणून पचसहा मेसेजेस पाठवले तरी त्याचे मेसेजेस येत राहिले. शेवटी त्याचा आलेला एक फोन घेतला आणि पुन्हा माझ्याशी फोन वा मेसेज करून संपर्क ठेवायचा नाही नाहीतर कायदेशीर कारवाई करीन असा दम देऊन फोन ठेवला. फार वाईट वाटले परंतु तो मधे बोलून माझे काम बिघडवण्याची शक्यता फार मोठी होती. ती रिस्क मी घेऊ शकत नव्हतो. हा माणूस दलित समाजातील असल्यामुळे त्याच्याशी फार सांभाळून वागावे लागते. त्याने खोटे आरोप केले तर मी ऍट्रॊसिटीखाली गोत्यात येऊ शकतो.
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
Wed, 10/03/2018 - 04:58
नवीन
लेखन!
मन घनदाट वन,
त्याचे कैसे आरण्यक!
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Wed, 10/03/2018 - 05:21
नवीन
हृदयस्पर्शी.
- Log in or register to post comments
ख
खिलजि
Wed, 10/03/2018 - 09:05
नवीन
" एका उजव्या लेखनाने, मनाची डावी बाजू मांडणे " हे असं काहीसं तुम्ही प्रत्ययकारी लिहिलेलं आहे . दंडवत स्वीकारा ताई ....
सिद्धेश्वर विलास पाटणकर
- Log in or register to post comments
र
रागो
Wed, 10/03/2018 - 10:24
नवीन
सुंदर लेख!
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Wed, 10/03/2018 - 13:27
नवीन
अनावश्यक डोलारा नसलेले, मोजक्या पण अचूक शब्दातले आणि अभिनिवेश रहित लेखन म्हणून भावले.
- Log in or register to post comments
स
सविता००१
Wed, 10/03/2018 - 18:26
नवीन
अतिशय आवडलं हे लेखन
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 10/03/2018 - 18:59
नवीन
सुंदर लेखन ! स्वतःचा अनुभव दुसर्याच्या डोक्यावर इतक्या सहजपणे रिकामा करणे सोपे नाही !
मेडिकलच्या सुरुवातीच्या काळातच आम्हाला शिकवलेले एक तत्व आयुष्यभर डोके ताब्यात ठेवण्यासाठी कामी आलेले आहे, "डॉक्टरमध्ये सिंपथी असणे हे त्याचे आवश्यक कर्तव्य असते, त्याचबरोबर एम्पॅथी टाळणे हे त्याचे आवश्यक कौशल्य असते". तुम्हाला अजून काय सांगावे ?
- Log in or register to post comments
A
aanandinee
Wed, 10/03/2018 - 23:39
नवीन
आपण सार्यांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल खरंच मनःपूर्वक आभार
माधुरी
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 10/04/2018 - 02:51
नवीन
पण असे लोक पेशंट म्हणता येणार नाही पण व्यथित लोक नाही गेले मनोवैज्ञानिकाकडे किंवा परवडत नसेल तर काय मोठा फरक पडणार आहे?
- Log in or register to post comments
ए
एमी
गुरुवार, 10/04/2018 - 02:55
नवीन
छान लिहलंय.
> युकेमधे येऊन आता पंधरा वर्ष झाली तरीही मी अजून या गोष्टीला कशी काय बिचकते! > कशी काय? का? तेपण डॉक्टर/मानसोपचारतज्ञ असून? बिचकण्यासारखं काय आहे यात?
> बरेचदा ज्यांच्याकडे सांगण्यासारखं खूप असतं तेच लोक अशी चुप्पी घेऊन बसतात. > खरं आहे.
> everything is not always about ‘me’. समोरच्याला समजून घ्यायला या ‘me’ ला मागे सोडावं लागतं. > सहमत.
> पण आई, तिनेसुद्धा माझा तिरस्कार करावा? स्वतःच्या पोटच्या मुलीला समजून घेण्यात आई इतकी कमी कशी पडू शकते? मी तिला कधीच माफ करणार नाही, कधीच नाही...” > आई, आईपणा आणि आईचे निरपेक्ष प्रेम वगैरे गोष्टी फारच गृहीत धरलेल्या आणि ओवररेटेड आहेत. आणि मिडियामधून, मंद लोकं या गृहितकाना सतत खतपाणी घालत रहातात.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 10/04/2018 - 13:23
नवीन
डॉक्टर खूप तरल आणि सुंदर लिहीलंय.
माझ्या पहाण्यात एक केस होती तो मुलगा ( वय १७/१८) त्याच्या वडीलांना मारहाण करीत असे. त्याबद्दल नंतर त्याला खूप वाईटही वाटत असे
खूप रागीट होता. रागावर काहीच नियंत्रण नव्हते
- Log in or register to post comments
र
राघव
गुरुवार, 10/04/2018 - 16:06
नवीन
आवडले. इतरांचे अनुभव आपल्यालाही बरंच काही देवून जातात. लिहित्या रहा.
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 10/04/2018 - 16:45
नवीन
आवडलं हे स्फुट लेखन.
गर्दीतही एकाकी असणं अत्यंत क्लेषदायक,व निराशाजनक कडेलोट करणारे असतं हे अगदी जवळून अनुभवलं आहे.
उपेक्षित रानफूल असूनही पूर्वसंचित असल्यानेच माणसाळलेला नाखु
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
गुरुवार, 10/04/2018 - 17:53
नवीन
नाखू शेठ आजची स्वाक्षरी खूप आवडली.
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
गुरुवार, 10/11/2018 - 09:07
नवीन
+१११
- Log in or register to post comments
A
aanandinee
Mon, 10/15/2018 - 10:10
नवीन
नाखूशेठ आपली स्वाक्षरी खरंच आवडली.
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
Fri, 10/05/2018 - 22:58
नवीन
खूप छान लिहिलंय.
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
गुरुवार, 10/11/2018 - 09:07
नवीन
सुंदर लेख!
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Tue, 08/11/2020 - 06:37
नवीन
खरंय. हे तर सार आहे सगळ्याचं.
ज्याचा आपल्याला राग येतो, त्याला समजून घेण्यात आपण नक्कीच कमी पडतो. त्यामुळेच आपला राग दिवसेंदिवस वाढतच जातो. पण जर या रागावर आपण काही कारणाने थोडाफार ताबा मिळवू शकलो, तर मात्र त्याच माणसाचे निरनिराळे कंगोरे आपल्या लक्षात यायला लागतात. त्यामुळे आपला राग आणखीन आटोक्यात आणणे शक्य होते. इतकेच नव्हे तर पुढे पुढे त्या माणसांत अवगुणांबरोबर काही गुणही असल्याचे लक्षात यायला लागते. मग मात्र त्या माणसाबाबत नकारात्मक विचार मनात येण्याचे पूर्णपणे थांबते. तो माणूस जसा आहे तसा स्विकारायला मन तयार झाल्याने, मन खूप मोकळे होऊन जाते. तसेच त्या माणसापासून किती अंतर ठेऊन राहावयाचे याचाही अंदाज येतो.
मी यातला तज्ञ नाही. पण मला तरी तसा अनुभव आला खरा.
प्रतिक्रिया देताना, हा धागा वर यावा हाही उद्देश होताच म्हणा.
:)
- Log in or register to post comments
व
वीणा३
Tue, 08/11/2020 - 22:35
नवीन
empathy (समजून घेणं, दया किंवा सहानुभूती नव्हे) >>
बहुतेक संत ह्या गुणामुळेच संतपदाला पोचले. संत जाऊदे एक चांगली व्यक्ती बनायला सुद्धा ह्या गुणांची अतिशय आवश्यकता आहे. सोपं नाहीये पण खूप अवघड पण नाहीये.
उत्तम काम आणि उत्तम लेख, लिहीत राहा
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Wed, 08/12/2020 - 04:53
नवीन
छान ओघवत्या शैलीतील लेख आवडला.
- Log in or register to post comments