हिंदू खतरे में
बाकी कुठलाही देश नसेल पण भारत हा एक असा देश आहे की जिथे हिंदू खतरे में आहे. हिंदूंना हिंदू म्हणून जगणे या देशामधे मुश्किल झालेले आहे. गणपतीचा उत्सव आला की स्पीकर्स लावायचे नाहीत. रस्त्यावर खड्डे खणायचे नाहीत. रस्त्याच्या मधे मांडव घालायचे नाहीत. अशी अनेक बंधने हिंदूंवर घातली जातात. आता थोड्या दिवसात नवरात्र येईल. नवरात्रीच्या वेळेलासुद्धा हिंदूंच्या व्यक्त होण्यावर, अभिव्यक्तीवर बंदी येईल. नऊ दिवस हिंदूंनी दांडिया खेळायचा नाही. पुन्हा एकदा आवाज करायचा नाही वगैरे वगैरे सुरू होईल.
नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीमधे काही गणपती मंडळांनी स्पीकर्स डॉल्बी लावल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
याउलट अहिंदूंच्या बाबतीत मात्र वेगळा न्याय लावला जातो. ते कित्येक आठवडे त्यांचे सण साजरे करतात. मोठ मोठ्याने लाऊडस्पीकर लावून गाणी म्हणतात, आठवडेच्या आठवडे ढोल ताशे वाजवून सण साजरे करतात. त्या पूर्वी कित्येक महिने ते ढोल-ताशांची प्रॅक्टिस सुरु असते.
दुसरी गोष्ट म्हणजे हे अहिंदू लोक आपल्या मोठ-मोठ्या मिरवणुका हिंदूंच्या वस्तीतूनच काढतात आणि हिंदी चित्रपटातली गाणी मोठ-मोठ्याने लावतात. त्यावर नाचतात सुद्धा. त्यांच्या रस्त्यात चालणार्या अशा नाचाने ट्रॅफिक जाम होतो. हिंदूंना कामावर जायला उशीर होतो. तेव्हा मुद्दाम हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी कामावर जायला उशीर झायलाsss हे गाणे वाजवले जाते.
याउलट हिंदूंना मात्र आपले सण समारंभ साजरे करण्यावर अगदी अगदी बंदी आहे. केले तरी अगदीच लपून-छपून करावे लागतात. माध्यमेसुद्धा हिंदूंच्या भयंकर विरोधात आहेत असे दिसते. कुठेतरी एखादा स्पीकर लावलेला असेल तर स्पीकरच्या भिंती म्हणून वर्णन केले जाते.
हिंदूंच्या विरोधात सगळ्यांचाच हा दुष्टपणा कमी आहे की काय म्हणून दिवाळीमधे सुद्धा अभिव्यक्तीवर पुन्हा एकदा घाला घातला जातो. दिवाळीमधे फटाक्यांचा आवाज करायचा नाही, धूर करायचा नाही असे ऐकवले जाते. वास्तविक पाहता धर्मामधे जे जे सांगितलेले आहे त्याचे पालन झालेच पाहिजे. मग फटाके का बरे नकोत ? कुणीही हिंदू मनुष्य स्वतःच्या हौशीसाठी फटाके उडवीत नाही. केवळ धर्माचरण हेच एकमेव कारण असते.
खरं तर फटाक्यामुळे समाजामधे आनंद, चैतन्य उत्साह पसरतो. वाजवतो एक जण पण आजूबाजूचे अनेक जण आनंदित होऊन जातात. पण तसे न करता फटाक्यांमुळे होणाऱ्या धुराच्या राईचा पर्वत केला जातो. जणू काही अहिंदूंच्या वाहनांचा धूर होतच नाही. त्यांच्या औद्योगिक क्षेत्रातल्या गिरण्यांचा धूरही होतच नाही ?
मग हिंदूंच्याच धुरावर आक्षेप का ?
हिंदू कुठेही सण साजरे करायला लागले की सुरुवातीला पोलीस हस्तक्षेप करतात त्यानंतर मग न्यायव्यवस्था. एकूण काय तर हिंदूंवर या देशातला प्रत्येक घटक अन्याय करण्यासाठी टपून बसलेला दिसून येतो.
तसं पाहायला गेलं तर हिंदू सोडून बाकीच्यांचे सण वर्षभर सुरू असतात. त्यांचे लाऊड स्पीकर्स सतत सुरू असतात आणि फटाके उडवून रस्त्यावर कचरा करणे, वायु प्रदूषण करणे हेही इतरांचे नेहमीच चालू असते पण त्याकडे डोळेझाक केली जाते.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंदू जेव्हा जेव्हा सण साजरे करतात तेव्हा लाऊडस्पीकर हिंदू वस्तीत कधीच लावले जात नाहीत. स्पीकर्स नेहमीच अहिंदूंच्या कानाखाली वाजवले जातात.
फटाक्यांचा त्रास सुद्धा हिंदूंना कधी होत नाही कारण हिंदू हे नेहमी आपली वस्ती सोडून आपल्या शत्रूच्या वस्तीत जाऊन फटाके उडवतात आणि त्या वस्तीला त्रास देऊन आपला हिशोब चुकता करून येतात. आणि म्हणूनच हिंदू फटाके उडवत असताना दुसरा हिंदू कधीही कुरकुर करीत नाही. फटाक्यांच्या कागदांचा कचरा आणि धूर याचा त्रास हिंदूंना कधीच होत नाही.
जुन्या काळी ज्या ज्या वेळी हिंदूंच्या अहिंदूंविरुद्ध लढाया झाल्या, हिंदूंवर आक्रमणे झाली त्या त्या वेळी हिंदूंनी अहिंदू आक्रमकांच्या शिबिरात जाऊन मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावले. त्यांच्या वस्तीत फटाक्यांचा कचरा केला. परिणामी मनोधैर्य खचल्यामुळे अहिंदू आक्रमक हिंदूंविरुद्धच्या लढाईत पराभूत झाले. आजही हिंदूंना ही संधी दिली तर नव्याने इतिहास घडेल.
पण हे सारे लक्षात न घेता हिंदूंच्या व्यक्त होण्यावर बंदी घातली जाते. म्हणूनच म्हणावेसे वाटते हिंदू खतरे में
कुणीही हिंदू मनुष्य स्वतःच्या हौशीसाठी फटाके उडवीत नाही. केवळ धर्माचरण हेच एकमेव कारण असते. खरं तर फटाक्यामुळे समाजामधे आनंद, चैतन्य उत्साह पसरतो. वाजवतो एक जण पण आजूबाजूचे अनेक जण आनंदित होऊन जातात.हा निष्कर्ष कसा काय काढला? लेख उपहासात्मक आहे की नाही ते माहित नाही पण ही विधाने अत्यंत विनोदी आहेत एवढे नक्की