खनिज-खजिन्यातील रंगीत धातू
Book traversal links for खनिज-खजिन्यातील रंगीत धातू
(खजिन्यांचा खजिना : लेखांक ६ )
लेखमालेच्या या भागात आपण लोह, तांबे आणि जस्त या तीन रंगीत धातूंबद्दल जाणून घेऊ.
लोह
शरीरातील लोह हे मुख्यतः हिमोग्लोबिन या लालपेशीतील प्रथिनात साठवलेले असते. हिमोग्लोबिनवर स्वतंत्र लेख मी यापूर्वीच लिहिलेला आहे. तो इथे आहे : https://www.misalpav.com/node/41474. त्यात लोहाचे स्त्रोत वगैरे माहिती विस्ताराने आहे.
त्याव्यतिरीक्त असलेली लोहाची माहिती आता देतो. लालपेशीचे आयुष्य साधारण १२० दिवस असते. शरीरात रोज २०० अब्ज लालपेशी मरतात आणि त्यांची जागा नव्या पेशी घेतात. मृत पेशींतील लोह हे अजिबात वाया घालवले जात नाही. त्याचा नवीन पेशींतील हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी पुनर्वापर केला जातो. अशा प्रकारे आपण लोहाच्या ‘खजिन्या’चे सतत जतन करतो. त्यामुळेच रोजच्या आहारातून लोहाचे शोषण हे अल्प प्रमाणात पुरेसे असते. प्रौढाची रोजची गरज आहे १५ mg आणि त्यातले प्रत्यक्ष शोषले जाते अवघे १.५ - २ mg. लोह हा मुळात धातू असून तो सुट्या स्वरुपात पेशींत साठणे घातक असते. म्हणूनच आतड्यातील त्याचे शोषण अत्यंत मर्यादित ठेवलेले आहे. आहारातून आपण जरी गरजेपेक्षा जास्त खात राहिलो तर अतिरिक्त प्रमाण सरळ शौचावाटे निघून जाते.
हिमोग्लोबिन व्यतिरिक्त लोह हे इतर काही प्रथिने व एन्झाइम्समध्येही असते. त्यापिकी एक प्रथिन आहे मायोग्लोबिन. हे स्नायुमध्ये असते आणि तिथे ते ऑक्सिजन साठवून ठेवते. जेव्हा जोरदार व्यायाम केला जातो तेव्हाच त्यातला ऑक्सिजन स्नायुपेशींना सोडला जातो.
लोहाची अतिरिक्त साठवणूक (overload):
आतड्यांचे कार्य व्यवस्थित असताना आहारातून जरी अतिरीक्त लोह घेतले तरी ते शरीरात साठत नाही. पण एका अनुवांशिक आजारात शोषणाचे नियंत्रण बिघडते. मग नेहमीच्या २-३ पट लोह शोषले जाते व ते पेशींत साठते.
रक्ताच्या काही आजारांत (उदा. थॅलसिमिया) रुग्णाला खूप प्रमाणात बाहेरून निरोगी रक्त द्यावे लागते(transfusion). अशांमध्ये मात्र कालांतराने लोहाची बरीच साठवणूक होते. त्याने हृदय, यकृत व इतर महत्वाच्या इंद्रियांना इजा पोहोचते.
* * *
तांबे
आहारात सूक्ष्म प्रमाणात आवश्यक असलेले हे धातूरुपी मूलद्रव्य. त्याचे महत्वाचे स्त्रोत म्हणजे कवच असलेले जलचर प्राणी, मांस, अख्खी धान्ये, बीन्स आणि कठीण कवचाची फळे.
शरीरातील कार्य:
ते यकृत आणि मूत्रपिंडात बऱ्यापैकी साठवले जाते. रक्तात ते प्रथिनांशी संयुगित असते.
ते पेशींतील अनेक एन्झाइम्स च्या कामासाठी आवश्यक असते. त्याद्वारे ते खालील क्रियांत मदत करते:
१. ऊर्जानिर्मिती
२. लोहाचे आतड्यातून योग्य शोषण
३. त्वचेतील रंगद्रव्य (melanin) तयार करणे
४. मज्जासंस्थेतील संदेशवहन
५. शरीर सांगाड्याची बळकटी
६. Antioxidant कामात मदत.
अभावाचे परिणाम :
१. त्यामुळे लोहाचे शोषण कमी होऊन रक्तन्यूनता होते
२. रक्तातील पांढऱ्या पेशींची न्यूनता
३. मज्जातंतूना इजा
नेहमीच्या आहारातून ते अतिरिक्त खाल्ले जाण्याची शक्यता नसते. काही अनुवांशिक आजारात त्याचा शरीरात चयापचय नीट होत नाही आणि त्यामुळे ते धातूस्वरुपात महत्वाच्या इंद्रियांत साठते. त्यातून त्यांना इजा होते.
तांबे आणि जलशुद्धीकरण
पिण्याचे पाणी तांब्याच्या पात्रात साठवून ठेवण्याची आपली पूर्वापार परंपरा आहे. तांब्याचा जंतुनाशक गुणधर्म तपासण्यासाठी अलीकडे काही शास्त्रीय प्रयोग झाले आहेत. जर पिण्याचे पाणी तांब्याच्या पात्रात १६ तास ठेवले तर त्यामुळे त्यातील पचनसंस्था बिघडवणाऱ्या काही जंतूंचा नाश होतो असे दिसले आहे.
***********
जस्त
साधारण ज्या अन्नपदार्थांतून आपल्याला तांबे मिळते ते जस्तही पुरवतात. उच्च प्रथिनयुक्त आहारातून ते सहज मिळते.
शरीरातील कार्य:
जस्त हे पेशींतील जवळपास २०० प्रथिने व एन्झाइम्समध्ये असते. त्याद्वारे ते अनेक शरीरकार्यांत मदत करते. त्यातील काही प्रमुख अशी:
१. पेशींची वाढ, विभाजन आणि मूलभूत कामकाज
२. जखमा व्यवस्थित भरणे
३. वास व चव यांचे ज्ञान
४. प्रतिकारशक्तीचे संवर्धन
अभावाचे परिणाम
साधारण आर्थिक दुर्बल लोकांत याचा अभाव दिसून येतो. त्याची लक्षणे अशी:
१. त्वचेवर पुरळ येणे आणि त्यावरील केसनाश
२. जखमा लवकर न भरणे
३. वास व चव या संवेदनावर परिणाम
४. मुलांत वाढ खुंटणे आणि जननेन्द्रियांची अपुरी वाढ
******************
💬 प्रतिसाद
(55)
ह
हेमंतकुमार
Wed, 09/26/2018 - 18:28
नवीन
तुमच्या प्रश्नाचे उत्तर प्रत्यक्ष वैद्यकीय तपासणी करूनच द्यावे लागेल. हे मुद्दे बघा:
१. पचनसंस्थेचा दीर्घकाळ आजार आहे का ?
२. वय ६० चे पुढे ?
३. शुद्ध शाकाहारी ?
जस्ता ची रक्तपातळी ही चाचणी फारशी निर्णायक व विश्वासार्ह नसते
- Log in or register to post comments
P
palambar
गुरुवार, 09/27/2018 - 17:44
नवीन
वय ५॰ , पचनसंस्थेचा काहीही आजार नाही, पूर्ण शाकाहारी नाही. अंडी खाते.
- Log in or register to post comments
व
वन
Wed, 12/05/2018 - 03:37
नवीन
मी पण तांब्याचे जगमधून पाणी प्यायला आता सुरवात केली आहे.
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
Sat, 04/11/2020 - 07:10
नवीन
सध्या जस्त हा धातू एकदम प्रकाशझोतात आलेला आहे. अर्थातच त्याच्या विषाणूविरोधी गुणधर्मामुळे.
गेली अनेक वर्षे त्याच्यावर संशोधन चालू आहे. त्याचे २ विशेष गुणधर्म असे:
१. पेशींतील विषाणूची वाढ रोखणे
२. आपली विषाणूविरोधी प्रतिकारशक्ती वाढवणे.
कोविद१९ च्या रुग्णांवर त्याचे प्रयोग जगभरात सुरु आहेत. त्यांना लवकर यश येवो ही सदिच्छा !
- Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार
गुरुवार, 04/16/2020 - 06:23
नवीन
करोना २ हा विषाणू कोणत्या पृष्ठभागावर किती काळ टिकतो याबद्दलचे संशोधन सध्या जोरात आहे. एका अभ्यासात स्टील, प्लास्टिक आणि तांबे यांची तुलना केली गेली. त्याचा निष्कर्ष असा , की तांब्यावरून तो ४ तासात नाहीसा होतो. बाकीच्यांवर मात्र तो बराच अधिक काळ राहतो.
https://www.nejm.org/doi/full/10.1056/NEJMc2004973
यानिमित्ताने तांब्याचे भांड्यात पाणी ठेवायचे महत्व अधोरेखित झाले !
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2