संडास.
संडास
नमस्कार मंडळी, बऱ्याच दिवसांनी मिपावर लेखन करतोय. आणि पुनरागमनासाठी विषय आहे संडास.
काहीलोक लेखाचं नाव वाचूनच नाकं मुरडतील. मला एक कळत नाही संडास सारख्या जिव्हाळ्याच्या विषयावर बोलायला लोक लाजतात किंवा घाबरतात का? तसं पाहायला गेल्यास संडास ही आपल्या रोजच्या जीवनातील अतिशय महत्वाची क्रिया पण त्यावर किंवा संडासच्या समस्यांवर बोलायला लोक तयार नसतात.
शी!!! संडास वर मेलं काय बोलायचं!!!
एकवेळ माणूस दोन दिवस उपाशी राहील पण संडासला गेल्याशिवाय राहणार आहे का? अर्धा जीव होईल त्याचा. शौचाचा त्रास असणारे कितीतरी लोक मी चिडचिड करताना पहिले आहेत. कामात लक्ष नसणे, उगाच दुसऱ्याला दोष देणे असं काहीतरी करताना दिसतात. आणि कोणी माना आगर मानू नका पण "मस्तपैकी साफ शौचाला होण्यासारखं सुख जगात नाही" देवाने जी काही शारीरिक सुख देणाऱ्या क्रिया मानवाला दिल्यात त्यातली ही एक नंबरची क्रिया, परमानंद मिळवून देणारी. पण म्हणतात ना रोज फुकट मिळत असेल तर त्याचं मोल राहात नाही. एक दशांश सेकंदाची किंमत जशी शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरण्याला माहीत तशी मनसोक्त आणि विनासायास शौचास होण्याचं मोल बद्धकोष्ठ किंवा मूळव्याध झालेल्या माणसास ठाऊक. असो.
माझं बालपण गेलं सरकारी घरात. तिथे घरात संडास त्यामुळे फार त्रास झाला नाही. पण बाबा निवृत्त झाले आणि काही वर्ष आम्हाला सार्वजनिक संडास असणाऱ्या चाळीत काढावी लागली. मी त्या चाळीत राहायला आलो आणि मला मोठा साक्षात्कार पहिल्याच दिवशी झाला की आपण सार्वजनिक संडास नामक फार मोठ्या कट्ट्याला एवढे दिवस मुकलो होतो. अहो काय नव्हतं विचारा त्या सार्वजनिक संडासात... तिथल्या भिंती ऍब्स्ट्रॅक आर्ट, ह्यूमन अनॉटॉमी, मुक्तहस्त चित्रकला, चारोळ्या, प्रतिभावान शिव्या यांनी भरलेल्या असत. बाहेर तिष्ठत जी मंडळी उभी असत त्यांच्या चर्चासत्रांच्या विषयांना सीमा नसायची.
भारत पाकिस्तान संबंध/युद्ध,
अमेरिकन राष्ट्राध्याक्ष्यांची निवडणूक,
आखाती युद्ध/राजकारण,
विदेशातील स्वच्छता,
आपल्या देशातील अस्वच्छता,
विदेशातील संडास आणि आपल्या देशातील संडास,
स्थानिक निवडणुका आणि राजकारण,
चाळीतली भांडणे,
चाळीतली लफडी/प्रेमसंबंध/झेंगाट
आज शाळेला सुट्टी आहे की नाही, कोणत्या बाई कशा मारकुट्या आहेत. कोणते सर कसे मारतात.
दहावीचा निकाल, कोणाला किती मार्क पडले,
यूपीएससी/एमपीएससी परीक्षा, कॉलेज प्रवेश,
नोकरी, प्लेसमेंट, हाफिसातील राजकारण
कोणाला किती पगार,
काल कोणाकडे काय शिजवलं होतं, कोणाकडे मटण होतं (मग तो आज कसा जास्त वेळ लावणार यावर चर्चा)
आणि प्रत्येक वयोगटाची एक वेळ ठरलेली होती. कामावर जाणारे सकाळी, त्यानंतर थोडे उशीर गेलं तरी चालतं असे असणारे. शाळकरी मुलं दुपारी. म्हातारे कधीही, नेहमी (टाइमपास करायला काहीच नाही तेव्हा) अशा वेळा ठरलेल्या असत.
काही संवाद मला तिथे घुटमळायला भाग पाडत. संडासांचे दोन भाग होते. पाच एक संडास पुरुषांसाठी आणि तेवढेच महीलांसाठी. दोन विभागांच्या मधे भिंत. पण महिलांच्या गफ्फा स्पष्ट ऐकू येत.
प्रसंग १
पहीली - काय गं?
दुसरी - काय?
पहीली - लैच गर्दी हाय!
दुसरी - ह्म्म्म.
पहीली - काल काय केलं हुतं?
दुसरी - वांगं
पहीली - कसं?
दुसरी - भरल्यालं
पहीली - कसं झाल्तं?
दुसरी - बरं झाल्तं.
पहीली - हीतं कोन गेलय?
दुसरी - तीच. (काहीतरी हातवारे केले असणार, कारण पहीलीला कळले की आत कोण गेलय)
पहीली - तवाच, कीती येळ झाला?
दुसरी - झाली धा मिंटं
तेवढ्या आतली बाहेर आली - एवढी घाइ आसल तर घरी संडास बांधुन घी.
पहीली - घेनारच हाय. पानी वतलस काय?
बाहेर आलेली तिसरी - बघकी, तुज्यासारखी घानेरडी नाय मी.
पहीली - बरं बरं जा...
प्रसंग दुसरा - वेळ दुपारची. शाळकरी मुले. लहान मुलांना दार लावायला भिती वाटत असे म्हणून दरवाजा उघडाच ठेउन बसत असत. दोन समोरासमोरील संडासात बसून गफ्फा मारणारी दोन मुले
पहीला - तु कधी आला?
दुसरा - "...."
पहीला - अय, भैरा झाला का?
दुसरा - मगाच आलुय
पहीला - मग बोलकी तसं...
दुसरा - "....."
पहीला - काय झालंय? काय हुतंय?
दुसरा - कुटं काय?
पहीला - मग कुततोय कशापायी?
दुसरा - काय नाय असंच
पहीला - पेपर भेटले का सगळे?
दुसरा - ह्म्म
पहीला - सगळ्या विषयात पास झाला का?
दुसरा - नाय, गणित गेला.
पहीला - गणताला कोन हायत तुमाला?
दुसरा - देशपांडे बाइ, तुला?
पहीला - मला सोमण सर.
दुसरा - कशे हैत रे?
पहीला - मस्त. सगळ्यांना पास करतेत. चल माझं झालं
दुसरा - आरं दमकी, मला अजुन टैम है.
पहीला - काय खाल्लं हुतंस?
दुसरा - वडापाव
पहीला - त्या भैय्याचा ना? खात जौ नकोस.
दुसरा - मला तुमच्या वर्गात घेतीले का? झाली माजी...
पहीला - सरांना इचारावं लागतं. चल धू लवकर.
प्रसंग तिसरा
ग्रुहस्थ १ - राम राम
ग्रुहस्थ २ - राम राम
ग्रुहस्थ १ - कालची मॅच पायली का?
ग्रुहस्थ २ - ह्म्म
ग्रुहस्थ १ - धू धू धुतलंय की...
ग्रुहस्थ २ - कुटं धुतलंय, घानच हाय सगळीकडं
ग्रुहस्थ १ - आरं पाकीस्तानला धुतलय भारतानं
ग्रुहस्थ २ - ह्म्म
ग्रुहस्थ १ - बगीतली का न्हाय?
ग्रुहस्थ २ - बगीतली ना!
ग्रुहस्थ १ - दोन नंबरला कोन आला हुता सांग बरं?
ग्रुहस्थ २ - मला नाय म्हायत. मी तुज्या आदी आलोय.
ग्रुहस्थ १ - आरं रातची उतर्ली नाय का? मॅचचं इचारतोय
ग्रुहस्थ २ - हुता कोनतरी दाडीवाला
ग्रुहस्थ १ - (मोठ्याने) चला हो चला लवकर. आवरा पटापटा. तुला आर्जंट हाय का?
ग्रुहस्थ २ - नाय
ग्रुहस्थ १ - मग मी जाव का?
ग्रुहस्थ २ - जा...
ग्रुहस्थ १ - शेवटची ओवर बगीटली का
ग्रुहस्थ २ - आता आत जा की...
ग्रुहस्थ १ - लगा तुला इंटरेस्ट नाय
ग्रुहस्थ २ - आता जातू का मी जाव?
असे बरेच संवाद कानावर पडत. तुमच्यापैकी कोणाला सार्वजनिक संडासाचा अनुभव असल्यास इथे सांगा. यथावकाश मी दुसरीकडे घर घेतलं आणि मी त्या सार्वजनिक संडास नामक स्नेहसंमेलनाला मुकलो.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- नि मैं वोडका लगा के तेरे नाल नाचना, नि मैं वोडका लगा के तेरे नाल नाचना, होय मैं तेरा ही ना रटना अड्डी मार के वेहदा पट्टना अज्ज मैं टल्ली होक हटना नि... :- Nawabzaade