वाट्सअॅपमुळे मराठी सं.स्थळे मंदावली आहेत काय ?
रामराम मंडळी, मंडळी. कोणतीही नवीन गोष्ट काही दिवसच चांगली वाटते. सर्वसामान्य माणसांचा स्वभावच चंचल असतो. एका गोष्टीत तो फार काळ रमत नाही. मग ते मोबाईल, गाडी टीव्ही, किंवा काही नवीन उपयोगाची उपकरणे असोत की, लेखन करण्यासाठीची माध्यमं जशी की, फेसबूक, वाट्सअॅप, ब्लॉग की ड्रुपलवर आधारित असलेली मराठी संस्थळे असोत. काळाप्रमाणे त्याचा उपयोग कमी जास्त होत असतो. मराठी संकेतस्थळांना आता पंधरा वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे, मराठी माणसं लालित्यपूर्ण लेखन करतात कमी आणि भांडतात जास्त असा माझा एक व्यक्तिगत अनुभव आहे. गेल्या काही वर्षात लेखनाच्या बाबतीत काही बदल झपाट्याने झाले आहेत. जसे अगदी सुरुवातीला ब्लॉग लिहिल्या जायचे, प्रत्येक लिहिता वाचता येणारा ब्लॉग लिहित होता, आता सर्वच ब्लॉग लिहित नसतील पण हे प्रमाण कधीकाळी खूप होतं. नंतर जिमेल चॅटींग जोरात सुरु झालं. बझर वगैरे. नंतर फेसबूकानं जोर धरला. आणि आत्ता वाटसअॅप.
वाटसअॅपने काही सुविधा खूप दिल्या आहेत. एखादे दोन उतारे असलेल्या पोष्ट्स, कुठल्या तरी पोष्टला तात्काळ उत्तर, आपली पोष्ट किती लोकांनी वाचली त्याच्या नोंदी, तात्काळ निरोप देवाण-घेवाण. प्रेमाच्या गोष्टी, लफडी आणि तत्सम गोष्टींनी वाट्सअॅप रात्रंदिवस बीझी झालं आहे. मोबाईल काही क्षण जरी इकडे तिकडे झाला की अरे, आत्ता तर मोबाईल इथे होता, कुठे गेला, अशी शोधाशोध सुरु होते. इतकं तंत्रज्ञानांनी माणसं व्यस्त होऊन गेली आहेत. आम्ही तर बॉ वाट्सअॅप पाहात सुद्धा नाही, अशी म्हणनारी माणसं असतीलच यात काही वाद नाही. पण, कधीकाळी ज्या मराठी संस्थळांनी अक्षरक्ष वेड लावलं होतं, ते वेड आता कमी झालंय का असे वाटायला लागले आहे. एखादी दुसरीच सुंदर कविता, त्यावर एकापेक्षा एक दिली जाणारी दाद, काही उत्तम कथा, काही उत्तम लालित्यपूर्ण लेखन, पर्यटन, गड किल्ले, यांची माहिती त्याची मात्र संख्या मंदावली आहे काय, असे वाटायला लागले आहे. काथ्याकूट मात्र जोरात असतो. पण तेवढ्यावर मराठी संस्थळे जगतील असे मला काही वाटत नाही.
माणसं येतात आणि जातात. नवी पिढी येते ती आपली काही वैशिष्टे घेऊन. तेव्हा नव्या काळात मराठी संस्थळे कशी असतील. त्यावर येणारे लेखन कसे असेल ? अशा संस्थळावर आपण केलेलं लेखन असतं, किती लोकांनी दाद दिली याची उत्सुकता असते. अनेकदा झालेलं विषयांतर आपलं लिहिण्याचा उत्साह घालवतो. काही आयडी सतत आनंदावर विरजन घालायलाच आलेली असतात, त्यापेक्षा वाट्सअॅप बरं असंही वाटू शकतं, त्यामुळेही लेखन कमी येत आहे, असे होऊ शकते. हे सर्व असूनही मराठी संस्थळे भविष्यात कशी असतील, नवनव्या तंत्र माध्यमात मिपासारख्या चहल-पहल असलेल्या संस्थळाला भविष्यात काय करावे लागेल, आणि अजून आपणास काय वाटते, आपली काय मतं आहेत ते समजून घेण्यासाठीचा हा काथ्याकूट तेव्हा आपल्या प्रतिसादाची वाट पाहतोय. स्वागत. :)
संपादक मंडळाने ललीतलेखन संबंधी जास्तीत जास्त उपक्रम राबवणे
कन्टेन्ट क्वालिटी वर ठेवायला हे उपयोगी पडेल, मराठी दिनाच्या बोलीभाषा लेखमालेमुळेच मला मिपाचे सदस्यत्व घावे वाटले हे ही इथे मी आवर्जून नमूद करतो, अर्थात, एक उपक्रम राबवायचा म्हणजे संपादक/मालक/साहित्य संपादक मंडळीला किती मानवी तास घालवावे लागतात ह्याची मला पूर्ण कल्पना आहेच. पण तुमच्या हातात संपादकत्व, मालकीचे हक्क आहेत, एक मेंबर म्हणून उठून मी उपक्रम राबवतो म्हणलं तर जमेल असे नाहीये. त्यामुळे सगळ्या संपादक अन मालकांनाही खास नम्र विनंती की उपक्रम वाढवा, भरपूर वाढवा अर्थात आपलं वैयक्तिक आयुष्य आणि कार्यव्याप सांभाळून(च) . इतकं केलं तरी मी आपला व्यक्तिशः आभारी राहीन.