कोबालामिन (ब-१२) : एक अनोखे व्हिटॅमिन
Book traversal links for कोबालामिन (ब-१२) : एक अनोखे व्हिटॅमिन
‘ब’ गटातले हे जीवनसत्व वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामध्ये कोबाल्ट हे मूलद्रव्य असून अशा प्रकारचे ते आपल्या शरीरातील एकमेव संयुग आहे. त्याचा शोध १९४८ मध्ये लागला आणि त्यानंतर जीवनसत्वांच्या अधिकृत यादीत एकाचीही भर पडलेली नाही. निसर्गातील विशिष्ट जीवाणूच ते तयार करू शकतात. आपल्या मोठ्या आतड्यांत तसे काही उपयुक्त जीवाणू असतात आणि त्यांच्यामार्फत आपल्याला थोडे ब-१२ मिळते. अर्थात तेवढ्याने आपली गरज भागू शकत नसल्याने आपल्याला ते आहारातूनही घ्यावे लागते.
ब-१२ चे आहारस्त्रोत, शरीरातील कार्य आणि त्याच्या अभावाची कारणे व परिणाम यांचा आढावा लेखात घेतला आहे.
आहारस्त्रोत:
ब-१२ चे बाबतीत एक मूलभूत गोष्ट म्हणजे कुठल्याही वनस्पतीत ते नसते. पण, जर पालेभाज्या सेंद्रिय शेतीतून निर्माण केल्या तर त्यांच्यात काही उपयुक्त जीवाणू राहतात आणि त्यांच्या माध्यमातून या भाज्यांत ब-१२ येते. तसेच शिळ्या अन्नातही जीवाणूंची वाढ होते आणि अशा अन्नसेवनातून ते आपल्याला मिळू शकते.
प्राणिज पदार्थ मात्र भरपूर ब-१२ पुरवतात. यकृत, अंडे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे त्याचे महत्वाचे स्त्रोत.
यीस्ट हाही एक त्याचा वैशिष्ट्यपूर्ण स्त्रोत. त्याचा वापर करून बनवलेले शाकाहारी पदार्थ हा अशा लोकांसाठी दिलासा असतो. ‘व्हेगन’ खाद्यशैलीतून मात्र ते मिळणे अवघड असते. अलीकडे ब-१२ ने ‘संपन्न’ केलेली काही खाद्यान्ने बाजारात मिळतात.
ब-१२ चे पचनसंस्थेतून शोषण:
हा एक गुंतागुंतीचा विषय आहे. अन्नातले ब-१२ प्रथिनांशी घट्ट संयोग झालेले असते. प्रथम ते जठरात येते. तिथल्या हायड्रोक्लोरिक आम्ल आणि एन्झाइमच्या मदतीने ते सुटे केले जाते. नंतर तिथले IF नावाचे एक प्रथिन त्याच्याशी संयुग पावते. ही एक आवश्यक क्रिया आहे. पुढे हे संयुग लहान आतड्यांतून मार्गक्रमण करीत आतड्याच्या शेवटच्या भागात पोचते. तिथे त्याचे विघटन होऊन ब-१२ शोषले जाते. पुढे ते रक्तप्रवाहातून यकृतात पोचते आणि तिथे त्याचा मोठ्या प्रमाणात साठा होतो. पुढे ते गरजेनुसार सर्व शरीराला पोचवले जाते.
शरीरातील कार्य :
अन्य ‘ब’ जीवनसत्वांप्रमाणेच तेही काही रासायनिक क्रियांमध्ये सह-एन्झाईमचे काम करते.
याद्वारे ते पेशींतील DNA व RNA या मूलभूत रेणूंच्या उत्पादनात मदत करते. याकामी त्याला फोलिक अॅसिड या अन्य ‘ब’ जीवनसत्वाचीही मदत होते.
मज्जातंतूंच्या कामातही त्याचे महत्वाचे योगदान आहे.
अलीकडील संशोधनातून त्याचा हाडांच्या आरोग्यासाठीही संबंध असल्याचे दिसले आहे. ते अस्थिजनक पेशींच्या योग्य वाढीसाठी मदत करते.
अभावाची कारणे:
१. अतिशुद्ध शाकाहारी (व्हेगन) खाद्यशैली: गेल्या दोन दशकांत हा खूप कुतूहलाचा व चर्चेचा विषय झालेला आहे. येथे काही मुद्दे लक्षात घ्यावेत. सहसा जन्मल्यापासून कुणीच अशी शैली आचरत नाही. तेव्हा तथाकथित ‘शाकाहारी’ हे दूध वा दुग्धजन्य पदार्थ खात असतात आणि त्यातून ब-१२ मिळते. त्याची रोजची गरज काही मायक्रोग्रॅम इतकीच आहे. वर आपल्या यकृतात त्याचा भरपूर साठा होत असतो. साधारणपणे हा साठा आपल्या ५ वर्षांच्या गरजेइतका असतो. तेव्हा व्हेगन शैली आचरणात आणल्यानंतर काही वर्षांनी अभावाची लक्षणे दिसतील.
२. जठरातील पेशींची वयानुरूप झीज होते आणि त्यामुळे वृद्धांमध्ये IF चे उत्पादन कमी होऊ लागते. तसेच अन्य काही आजारांमध्येही अशी झीज होते.
३. पचनसंस्थेचे काही आजार : यांत ब-१२ चे शोषण नीट होत नाही.
४. IF ची अनुवांशिक कमतरता : हा ऑटोइम्युन प्रकारातील आजार आहे.
५. अलीकडे लठ्ठपणा कमी करण्यासाठी पचनसंस्थेवर काही शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यात जठराचा काही भाग काढून टाकला जातो. त्यामुळे IF चे प्रमाण खूप कमी होते आणि त्याचा परिणाम ब-१२ चे शोषणावर होतो.
अभावाचे परिणाम:
शरीरातील सर्वच पेशींच्या वाढीवर परिणाम होतो परंतु, तो लालपेशी आणि मज्जासंस्थेवर प्रकर्षाने दिसून येतो. रुग्णात साधारण खालील लक्षणे दिसतात:
१. रक्तक्षय आणि त्यामुळे येणारा अशक्तपणा: हा रक्तक्षय लोहाच्या कमतरेतून होणाऱ्यापेक्षा वेगळ्या प्रकाराचा असतो. यात लालपेशी मोठ्या आणि विचित्र आकाराच्या होतात.
२. हातापायांना ‘मुंग्या’ येणे आणि चालताना अस्थिर वाटणे: मज्जारज्जू व मज्जातंतूवर दुष्परिणाम झाल्याने हे होते.
३. काही रुग्णांत मनस्वास्थ्य बिघडू शकते आणि विस्मरण होते.
वृद्धावस्थेत हाडे ठिसूळ होणे.
वृद्धावस्था आणि ब-१२ चा पुरवठा:
या अवस्थेत जठराची पचनशक्ती बरीच कमी झालेली असते. त्यामुळे नैसर्गिक आहारातील ब-१२ शरीरात नीट शोषले जात नाही. याउलट ‘संपन्न’ खाद्यांतले अथवा गोळ्यांच्या रुपातले ब-१२चे व्यवस्थित शोषण होते. त्यामुळे अशा स्त्रोतांचा वापर वृद्धांमध्ये गरजेनुसार जरूर करावा.
ब-१२ ची रक्तपातळी :
अलीकडे ही पातळी चाळणी चाचणी म्हणून बरीच चर्चेत असते. पण या चाचणीचे निष्कर्ष बऱ्याचदा विश्वासार्ह नसतात. समजा पातळी ‘नॉर्मल’ पेक्षा कमी असेल तरीही त्या व्यक्तीत संबंधित आजाराची लक्षणे बिलकूल नसतात. म्हणून काही त्रास (रक्तक्षय वगैरे) नसेल तर उठसूठ याच्या फंदात पडू नये. कधीकधी अशी टूम निघते की सर्व शाकाहारीनी हे प्रमाण बघून घ्यावे. पण अशा सरसकटीकरणाला तसा अर्थ नाही.
***************************
तेव्हा तथाकथित ‘शाकाहारी’ हे दूध वा दुग्धजन्य पदार्थ खात असतात आणि त्यातून ब-१२ मिळते. त्याची रोजची गरज काही मायक्रोग्रॅम इतकीच आहे. वर आपल्या यकृतात त्याचा भरपूर साठा होत असतो. साधारणपणे हा साठा आपल्या ५ वर्षांच्या गरजेइतका असतो. तेव्हा व्हेगन शैली आचरणात आणल्यानंतर काही वर्षांनी अभावाची लक्षणे दिसतील.जर माझ्या रोजच्या आहारात दुध, ताक, दही, हे कम्पल्सरी असंलच तर काही वर्षांनी अभावाची लक्षणे दिसतील का