रेल्वे कोणाची हो ! रेल्वे आमच्या बापाची....
भारतीय रेल्वेच्या प्रवासातील हा एक प्रसंग. मी एका प्रवासास प्रारंभ केलेला. गाडीत मध्यम स्वरूपाची गर्दी होती. माझा डबा आरक्षित स्लीपर गटातला होता आणि त्यातली काही आसने रिकामी होती. अशातच तीन हिंदी भाषक माझ्या डब्यात आले आणि माझ्या समोरील रिकाम्या आसनांवर बसले. ते बसल्यानंतर थोड्याच वेळात आमच्या आसपासची शांतता भंग पावली. ते तिघे मोठमोठ्या आवाजात असभ्यपणे हिंदीतून बडबडू लागले. त्यांच्या संभाषणातून ते रेल्वेचेच कर्मचारी असल्याचे समजले. तसेच ते ‘रेल्वे आपल्या ‘बा’चीच आहे’ असे त्यांच्या वर्तनातून जाणवून देत होते. आम्ही प्रवासी ते निमूटपणे सहन करत होतो.
थोड्याच वेळात त्यांना एक खेळ खेळण्याची हुक्की आली. त्यासाठी त्यांच्यापैकी दोघे एका बाजूला व तिसरा त्यांच्यासमोर असे बसण्याची गरज होती. मग त्यांच्या म्होरक्याने मला मानेनेच उठण्याची खूण करून दुसऱ्या बाजूस बसण्याचा इशारा केला. मी सहकार्याच्या भावनेतून ते लगेच मान्य केले. ते तिघे खेळायला लागले की निदान शांत तरी बसतील आणि आमचा प्रवास सुखकर होईल, अशी वेडी आशा मला होती. आता त्यांच्या खेळाला सुरवात होणार होती. मग त्यातल्या एकाने अन्य एका प्रवाशाकडून त्याचे बॉलपेन मागून घेतले. आता माझी अपेक्षा होती की कुठूनतरी ते कागद शोधून आणतील. पण छे ! त्यातील एक जण चक्क त्या पेनाने बाजूच्या रिकाम्या आसनावर मोठ्या रेघा ओढू लागला. मला ते असह्य झाले आणि खरे तर एक तिडीक मस्तकात उठली. मी लगेच त्याला हरकत घेतली.
“ अहो, असे करणे बरोबर नाही. ते आसन खराब होईल. त्या पेनाची तिथे उठलेली शाई नंतर तिथे बसणाऱ्याच्या कपड्यांना लागेल,” असे मी ताडकन म्हणालो.
त्यावर तो आसनावर रेघा ओढतानाच मला मग्रुरीने म्हणाला, “ चलता है, कोई फरक नही पडता. और ये शाई कपडेको नही लगती”.
यावर माझ्या अन्य दोघा सहप्रवाशांनी चूप बसणेच पसंत केले.
आता व्यवस्थित रेघा ओढून त्या उर्मटांचा खेळ सुरु झाला. त्यामध्ये त्यांनी रुपयाची तीन नाणी, कागदाचे तीन छोटे बोळे आणि पिस्त्याची तीन टरफले असे चौकटींत मांडले होते. तो खेळ मी पूर्वी कधी पाहिलेला नव्हता. त्यामुळे तो काय आहे हे जाणून घेण्याची खरे तर उत्सुकता होती. प्रवासात अशा प्रकारे ज्ञानार्जन होतच असते. परंतु, त्या तिघांच्या उर्मटपणाचा मला प्रचंड राग आलेला असल्याने मी त्यांच्या खेळाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि खिडकीतून बाहेर बघत बसलो.
जरा वेळाने तिकीट तपासनीस आले. त्यांनी आमची तिकीटे तपासली. त्या तिघांकडे त्यांनी पाहताच त्यांनी “ हम अगले स्टेशनपर उतरनेवाले है,” असे थाटात सांगितले. त्यावर तपासनीसानेही त्यांचा ‘स्टाफ पास’ वगैरे पाहण्याची तसदी घेतली नाही आणि तो पुढे निघून गेला. त्यांनी आसनावर ओढलेल्या रेघा त्याला बहुधा दिसल्याच नसाव्यात !
थोड्या वेळाने पुढचे स्थानक येताच ते तिघे उतरून गेले. मग मी माझ्याजवळील वृत्तपत्राचा कागद वापरून त्या आसनावारील रेघा पुसण्याचा प्रयत्न केला. पण त्याला अर्थातच यश आले नाही. त्या रेघा आता आसनावर अजरामर झाल्या होत्या ! आता बाजूला बसलेल्या एका बाईंना कंठ फुटला. त्या मला म्हणाल्या, “ अहो, ही तरुण मंडळी गरम डोक्याची असतात; आपण त्यांना काही चांगले सांगायला गेलो तर त्यांना खूप राग येतो”. मी त्यावर फक्त ‘हूं’ म्हणालो आणि गप्प बसून चरफडत राहिलो.
रेल्वेच्या कर्मचार्यांनी बेफिकीरीने रेल्वेचीच, म्हणजे सार्वजनिक मालमत्ता विद्रूप करण्याचा हा प्रसंग खूप चीड आणणारा होता. एक नागरिक म्हणून मी तो होऊ न देण्याचा असफल प्रयत्न केला होता. यापेक्षा दुसरे माझ्या हातात तरी काय होते? आणि माझ्या आजूबाजूच्या सहप्रवाशांचा निव्वळ बघेपणा... त्यावर काय बोलणार? तोही अपेक्षितच म्हणायचा.
......
आपल्याकडील एकंदर झुंडशाही बघता वरील प्रसंग फार ‘किरकोळ’ वाटू शकेल, याची मला कल्पना आहे. गेल्याच वर्षी आपण नव्याकोऱ्या ‘तेजस’ एक्सप्रेसमध्ये समाजकंटकांनी घातलेला हैदोस आणि गाडीचे केलेले नुकसान पहिले होते.
वरील प्रसंगातून खुद्द सरकारी कर्मचाऱ्यांचीच बेपर्वा वृत्ती आणि मग्रुरी जाणवली. ती आपल्यापुढे मांडली आहे, इतकेच.
**************************************************************
पूर्वप्रसिद्धी : दै. सकाळ, पुणे.
नंतर त्या पंप वर गेलो असता त्या मॅनेजर ने असे काही लोटांगण घेतले की मलाच विचित्र वाटत होतंअश्या प्रसंगांत अजिबात विचित्र वाटून घेऊ नका. त्या कृतीचा अहंकार नको, पण ती केल्याचे समाधान मात्र नक्की वाटायला हवे ! कोणत्याही देशात प्रत्येक ठिकाणी सरकार पुरे पडत नाही... सरकारनेच सर्व ठिकाणी पोलिसिंग करायचे म्हटले तर आताच्या पाचपट कर भरायला लागेल... तरीही तो पुरा पडेल की नाही हा संशय आहेच ! प्रत्येक स्वच्छ, शिस्तबद्ध आणि सुरक्षित देशात त्या अवस्थेमागे सुजाण आणि सजग नागरिकांचे अमोल सहकार्य असतेच असते. तसे सहकार्य असले म्हणजे, "कोणाच्या तरी माझी चुकीची कृती लक्षात येईल व तिची माहिती योग्य त्या अधिकार्यापर्यंत पोहोचेल" ही जाणिवच बहुतेक सर्व प्रतिबंध करून जाते.मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Akh Lad Jaave... :- Loveyatri