Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

चिंब

क
कोमल
Mon, 07/02/2018 - 13:51
💬 4 प्रतिसाद
बऱ्याच दिवसांनी पाऊस पुन्हा सुरू झाला आणि ती धावत गच्चीवर पोहोचली. पावसाचं आणि तिचं नातं खूप जुनं. ती जन्माला आली आणि मोठी झाली ती अशाच भरपूर पाऊस पडणाऱ्या नगरीत. बाकी लोक जसं म्हणायचे "मी बरेच पावसाळे पाहिलेत" तसं ती म्हणायची "बऱ्याच पावसाळ्यांनी मला पाहिलंय". आणि खरंच तर होतं ते. तिच्या जन्माच्या वेळी वेड्यासारखं बरसून त्यानंही आनंद साजरा केलेला. पहिल्यांदा दप्तर पाठीवर लावून, त्यावरून रेनकोट घालून ती जशी शाळेला जायला निघाली तसा तोही आलाच. पहिल्या दिवशी खिदळत शाळेत पोहोचणारी ती एकटीच. आणि मग तर तिला सवयच लागली, पाऊस आला की दप्तराला रेनकोट घालायचा आणि आपण चिंब भिजत घरी यायचं. कॉलेजला जायला लागल्यावर सुध्दा इतकी सुंदर सवय कोणी मोडेल का बरं! फरक फक्त इतकाच असायचा की आता तिच्या सोबत भिजणारं अजून कोणीतरी होतं. ते आता त्याला पाऊस आवडत होता म्हणून की ती आवडतं होती म्हणून चालायचं हे तिलाही कधी कळालं नाही की पावसाला कधी उमगलं नाही. कॉलेज मध्ये असताना एकदा नुसतं कोकणातला पाऊस बघायचा म्हणून गेलेली ती. तेव्हा धोधो कोसळून धमाल आणणारा तोच तर होता. आणि दोस्तांशी भांडणं झाल्यावर तिला शांत करणारा सुद्धा तोच. कधी कधी पकडापकडी चा डाव पण होई त्यांच्यात. तिला भिजायचं असे तेव्हा तो दडी मारून बसे आणि ती छान तयार होऊन कोणासोबत कॉफी प्यायला निघाल्यावर तो बरसू लागे आणि मग आडोसा शोधता शोधता तिची तारांबळ उडे. कधी शर्यत पण लागे दोघांत, सायकलवरुन ती आधी घर गाठते की तो तिला गाठतो! तिचा स्वभावही पावसा सारखाच. कधी बेधुंद-उन्मत्त, कधी धीरगंभीर, तर कधी सगळ्यांवर रुसून बसणारा. ती पावसाशी बोलायची देखील, आणि तोही तिचं सगळं ऐकायचा. गाडी वरून जाताना मनवायची ती, 'नको ना रे आत्ता येऊस. दिवसभर मला एसी मध्ये काकडत बसावं लागेल'. किंवा कधी दुष्काळजन्य परिस्थिती आली की तिला पर्जन्यसूक्त लागत नसे, पोटतिडकीने ती त्याला बोलावे, 'ये की रे आता, किती दिवस झाले आपल्याला भेटून' आणि तो विरघळलाचं म्हणून समजा. तिच्या लग्नाच्या दिवशी सुद्धा, आत अक्षता पडत होत्या आणि बाहेर हा. ते आशिर्वादच असावेत, आणि कदाचित आनंदाश्रू. या सगळ्या आठवणी पावसाच्या धारांसारख्याच झरझर तिच्या डोळ्यासमोरून गेल्या. तेवढ्यात मागून येऊन तिच्या लेकीने तिला क्षणभर मिठी मारली आणि पावसाला बिलगायला ती गेली सुध्दा. पावसामध्ये मनसोक्त भिजणाऱ्या लेकीला बघून 'एक जलचक्र पूर्ण झालं' असं तिलाही वाटलं आणि त्यालाही! Rainy Day Walk With Mom by Vickie Wade चित्रः Rainy Day Walk With Mom by Vickie Wade साभारः https://fineartamerica.com/featured/rainy-day-walk-with-mom-vickie-wade.html

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3011 views

💬 प्रतिसाद (4)
ट
टर्मीनेटर Mon, 07/02/2018 - 14:10 नवीन
कधी दुष्काळजन्य परिस्थिती आली की तिला पर्जन्यसूक्त लागत नसे, पोटतिडकीने ती त्याला बोलावे, 'ये की रे आता, किती दिवस झाले आपल्याला भेटून' आणि तो विरघळलाचं म्हणून समजा. अप्रतिम.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 07/02/2018 - 14:29 नवीन
चित्र आवडलं...
  • Log in or register to post comments
र
राजाभाउ Tue, 07/03/2018 - 06:32 नवीन
मस्त . एखादी कविता वाचवी इतक छान
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Wed, 07/04/2018 - 10:38 नवीन
या सगळ्या आठवणी पावसाच्या धारांसारख्याच झरझर तिच्या डोळ्यासमोरून गेल्या. तेवढ्यात मागून येऊन तिच्या लेकीने तिला क्षणभर मिठी मारली आणि पावसाला बिलगायला ती गेली सुध्दा. पावसामध्ये मनसोक्त भिजणाऱ्या लेकीला बघून 'एक जलचक्र पूर्ण झालं' असं तिलाही वाटलं आणि त्यालाही शाळेत असताना कलिंगड नावाची कथा अभ्यासाला होती. मला वाटतं लेखिका गौरी देशपांडे. तुमची कथा वाचल्यावर अगदी तसंच वाटलं. खूपच छान
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा