Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

वाहनं आणि प्रवास

ड
डॉ. सुधीर राजाराम देवरे
Sun, 07/01/2018 - 14:03
💬 13 प्रतिसाद
- डॉ. सुधीर रा. देवरे खेड्यापाडयातला पूर्वीचा प्रवास बैलगाड्यांतून होत असे. अगदी लग्नाचे वर्‍हाड सुध्दा या गावातून त्या गावी बैलगाडीने निघायचं. घर ते शेत आणि आजूबाजूच्या चार- पाच मैलांवर असलेल्या खेड्यापाड्यात कामेकाजे जाण्यासाठी पायी चालण्याचा तो काळ होता. याच काळात इकडे कुठे कुठे सायकलीही दिसू लागल्या. त्यावेळी अनेक कर्मचारी रोज वीस- पंचवीस मैलांचा प्रवास आपल्या सायकलींनी करत असत. 30 ते 40 वर्षांपूर्वी या प्रदेशातल्या ग्रामीण भागात क्वचित मोटरसायकली सुध्दा दिसू लागल्या होत्या. जावा आणि राजधूत कंपनीच्या या मोटारसायकलींना ग्रामीण भागात फटफट्या म्हटलं जायचं. पण त्यांचं प्रमाण अतिशय नगन्य असं होतं. गावात केवळ एक दोघांकडे फटफट्या दिसायच्या म्हणून हे लोक गावाच्या दृष्टीने खूप श्रीमंत समजले जायचे. बाकी लोक आपला प्रवास आपापल्या मगदूराप्रमाणे करायचे. जिथं पायी जाणं शक्य आहे तिथं पायी जायचं. जिथं बैलगाडीने जाणं शक्य होईल तिथं बैलगाडीने जायचं. सायकल असली तर कोणी सायकलीने एकट्याने प्रवास करायचा. सायकलीवर डबलशीट बसून दोघांनाही प्रवास करता यायचा. ज्यांच्याकडे बैलगाडी नाही, सायकल नाही ते एस टी ने प्रवास करायचे. एस टी सुध्दा सर्वत्र उपलब्‍ध नव्हती. जिथून एसटी उपलब्ध होईल त्या ठिकाणी पायी जाऊन एसटी पकडून लोक गावाला जात. अशा अडचणींमुळे अगदी आवश्यक असलेला प्रवासच त्यावेळचे गावकरी करत असत. त्याकाळी गाव तिथं एसटी हा प्रकार नव्हता. प्रवासासाठी बैलगाडी प्रमाणे छकडं हा प्रकारही त्यावेळी पहायला मिळायचा. पण बैलगाडी हे सर्वसाधारण शेतकर्‍यांचं वाहन तर छकडं हे श्रीमंतीचं प्रतीक समजलं जायचं. बैलगाडी ओढायला दोन बैल लागत तर छकडं ओढायला एक घोडा पुरेसा असे. बैलगाडीत दाटीवाटीने सात-आठ लोक सहज प्रवास करू शकत तर छकडं वा टांगा हे (चालवणारा धरून) दोन जणांचं प्रवास करायचं वाहन होतं. छकडं अथवा टांग्याला वर अर्धगोलाकार कामटी आणि कापडाचं छत तयार केलेलं असे. म्हणून ऊन वा पावसापासून टांग्यात थोड्याफार संरक्षणाची सोय होती. मात्र बैलगाडीला कोणतेही छप्पर नव्हते. छप्पराची बैलगाडी अजूनही सहसा कुठे पहायला मिळत नाही. म्हणून बैलगाडीतून प्रवास करताना ऊन, पाऊस, थंडीपासून संरक्षण करता येत नव्हतं. बैलगाड्यातून उघडा वाघडा प्रवास करावा लागायचा. बैलगाडी आज लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून बैलगाडी संदर्भातले भाषेतले शब्द, म्हणी आणि वाक्प्रचारही पुढे लुप्त होणार आहेत. उदाहरणार्थ, गाड्याबरोबर नळ्याची यात्रा, जुवाडं, सावळा, जोतं, गेज, साटलं, पांजरी, चकारी, धाव, तुंबडं, आस, आरी, शेल आदी शब्द नागरी माणसाला आजच समजेनासे झाले आहेत. लग्नाचे वर्‍हाड लग्नाच्या गावाला नेण्यासाठी त्याकाळी बैलगाड्या वापरल्या जात असल्या तरी लग्नाचे गाव वीस पंचवीस मैल लांब असले तर वर्‍हाडासाठी ट्रक्टर वा ट्रक भाड्याने केला जात असे. ट्रक्टरच्या ट्रॉलीत वा ट्रकमध्ये लोक दाटीवाटीने उभे राहून लग्नांना हजेरी लावत. वयस्कर माणसं ट्रकच्या मध्यभागी बसायचे. त्याकाळी पर्यटनाची कल्पनाही खूप भव्य दिव्य नव्हती. गावातल्या माणसाचे पर्यटन म्हणजे जवळपासच्या लोकदेवांची जत्रा करत तो थोडाफार भटकून घ्यायचा. (उदाहरणार्थ, बागलाणातला माणूस भाक्षीची जत्रा, सटाण्याची देव मामलेदारची जत्रा, दोधेश्वर, कपालेश्वर, मांगीतुंगी, नामपूर जत्रा अशा आपल्या तालुक्यापुरती मर्यादित ठेवायचा.) जास्तीत जास्त सप्तशृंगी देवीची यात्रा आणि कुलदैवताची भेट झाली की त्याला समाधान मिळत असे. काही लोक अधून मधून पंढरीची वारीही करून येत असत. पंढरीची वारी हे त्यावेळी खूप लांबचं पर्यटन समजलं जायचं. गावातल्या लोकांचे पर्यटन हे पायी, बैलगाडी वा नंतर एसटीने होऊ लागले. मध्यंतरीच्या काळात इकडच्या ग्रामीण लोकांना आगगाडीचे (रेल्वेचे) खूप अप्रूप होतं. (इकडे रेल्वेचे दळणवळण नसल्यामुळे हे आकर्षण होतं.) आता स्वत:च्या (फोर व्हीलर) गाड्या जिकडे तिकडे दिसू लागल्या. गावातले अनेक लोक आता देशांतर्गत विमान प्रवासही वरच्यावर करू लागले. आज या भागातले अनेक तरूण मुलं परदेशात आहेत याचंही कोणाला विशेष अप्रुप वाटत नाही. कोणीही बोलता बोलता सहज सांगून जातो, ‘परोंदिस आम्ही दिल्लीमा व्हतूत तधळ तठे पाऊस पडना. कालदिस मी मुंबईले व्हतू. रातलेच वनू.’ अशा पध्दतीने आजचा गावातला माणूस प्रवासातही ग्लोबल झाला आहे. (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.) – डॉ. सुधीर रा. देवरे ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3331 views

💬 प्रतिसाद (13)
त
तुषार काळभोर Sun, 07/01/2018 - 16:05 नवीन
माझें आजोबा १९५५-८५ सायकलने लोणी-काळभोर ते खडकी दारुगोळा कारखान्यात कामाला जायचे. माझ्या आई वडिलांचं लग्न हडपसर मध्ये १९७४ मध्ये झालं. आईच्या मामाच्या घरी. आईचं माहेर सासवड-कोंढवा रस्त्यावर हिवरे. तिथून ट्रक अन् बैलगाड्यात वऱ्हाड आलं होतं. वडिलांकडचं वऱ्हाड ट्रॅक्टरमधून आलं होतं. नवरा नवरी बैलगाडीतून हडपसरवरून लोणीकाळभोरला गेले होते. आमच्या आत्यांचं त्यांच्या घरून लोणीला, आई-चुलत्यांचं माहेरी येणंजाणं लोणीतुन हडपसर आणि हडपसर ते सासवड एसटीने व्हायचं.(सगळ्या सोयरिकी पुरंदर तालुक्यात. झेंडेवाडी, काळेवाडी, दिवे, सासवड, हिवरे, कोडीत, जाधववाडी, भिवडी) माझ्या एका चुलत्याचं लग्न उरुळीकांचनला होतं. तेव्हा (१९९४) आम्ही ट्रॅक्टरमधून लोणी ते उरुळी गेलो होतो. माझं लग्न टोलनाक्याजवळ झालं २०१३ मध्ये. १ स्कार्पिओ, 3 स्विफ्ट, 2 अल्टो, १ आयकॉन , ४-५ मोटारसायकली इतक्या गाड्यातून घरातली माणसं कार्यालयात गेली होती. बाकी भावकीची अन् पाहुणेरावळे आपापल्या गाड्यातून आली.
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… Mon, 07/02/2018 - 15:03 नवीन
खूप छान वाटले आपले अनुभव ऐकून. धन्यवाद
  • Log in or register to post comments
श
शिवाय Sun, 07/01/2018 - 18:11 नवीन
मी की नै चालत चालत किवा सायकलवर लग्न करनार हाय..
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… Mon, 07/02/2018 - 15:04 नवीन
छान
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Sun, 07/01/2018 - 19:23 नवीन
लहानपणी यात्रा , लग्ना साठी बैलगाडी मध्ये गोधडी च्या सस्पेंशन वर बसून तासनतास प्रवास केला पण त्यावेळी कधी अंगदुखी जाणवली नव्हती , आता चारचाकी मध्ये तासाभरात अंगदुखी सुरू होते .
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 07/02/2018 - 09:55 नवीन
मी तुम्हाला एक बैलगाडी (डब्बल गोधडीसकट) देतो....तुमची चारचाकी माझ्या नावावर कराल का? नाहीतरी तुम्हाला तासाभरातच त्रास व्हायला सुरु होतोय.....दुखणेसुद्धा निघून जाईल की :)
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Mon, 07/02/2018 - 10:11 नवीन
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Mon, 07/02/2018 - 10:11 नवीन
  • Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे Mon, 07/02/2018 - 10:17 नवीन
थांबा ! डॉ . सुधीर देवरे नां तुम्हाला यक इंजेकशन च द्यायला सांगतो , म्हंजी त्यानां यक पेशन्ट भेटलं आणि तुमची टवाळगीरी बी थांबलं
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… Mon, 07/02/2018 - 15:10 नवीन
मी इंजेक्शनचा डॉक्टर नाही.
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… Mon, 07/02/2018 - 15:05 नवीन
एकदम बरोबर.धन्यवाद
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Mon, 07/02/2018 - 09:16 नवीन
बैलगाडी आज लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून बैलगाडी संदर्भातले भाषेतले शब्द, म्हणी आणि वाक्प्रचारही पुढे लुप्त होणार आहेत. उदाहरणार्थ, गाड्याबरोबर नळ्याची यात्रा, जुवाडं, सावळा, जोतं, गेज, साटलं, पांजरी, चकारी, धाव, तुंबडं, आस, आरी, शेल आदी शब्द नागरी माणसाला आजच समजेनासे झाले आहेत. अगदी खरं आहे, ' गाड्याबरोबर नळ्याची यात्रा' चा अर्थ मलाही माहीत नव्हता, परंतू बालपणाचे काही वर्ष चाळीत राहिल्यामुळे आणि नंतरही सोसायटीत ग्रामीण भागातून शहरात स्थाईक झालेले शेजारी राहिल्यामुळे अशा अनेक म्हणी,वाक्प्रचार कानावर पडायचे. कुतूहल म्हणून अर्थ विचारायचो तेव्हा त्याचा उलगडा व्हायचा. हा बैलगाडीला लावलेला 'नळा ' मी तीन एक वर्षांपूर्वी एका खेड्यात बघितला आहे. ह्या म्हणी/वाक्प्रचार चा उगम गमतीदार असतो, त्यामुळे ग्रामीण भाषा मिश्किल वाटते. देवरे सर , तुमच्या लिखाणामुळे ग्रामीण भाषेची, जीवनाची ओळख होते, परंतू बऱ्याच वस्तू आम्ही प्रत्यक्ष बघितलेल्या नसल्याने त्या शब्दांचा अर्थ कळत नाही. चित्र रूपाने समजण्यास सोपे जाते व संदर्भ लागण्यास अडचण येत नाही. तसं काही करता येतं का बघा. तुमचे लेख मी आवडीने वाचतो. चर्चेतही भाग घेत जा, त्यामुळे मूळ लेखात न समजलेले मुद्देही चर्चिले जातील.
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… Mon, 07/02/2018 - 15:07 नवीन
आपण सविस्तर लिहीले आणि अापला अनुभव मांडला म्हणून आनंद झाला. चित्रांबद्दल एका मित्राशी बोलणे झाले आहे. करू या. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा