एक उनाड संध्याकाळ
एके दिवशी मला 'एक उनाड संध्याकाळ' कशी व्यतीत करावी लागली, त्याचा एक किस्सा मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याचे असे झाले, मी कामावरून रोज संध्याकाळी बरोबर पाचच्या दरम्यान ऑफिसमधून घरी येतो. दुपारी १२ च्या दरम्यान आमच्या सौं.नी मला ऑफिसमध्ये फोन केला. "अहो! आज संध्याकाळी चार वाजता माझ्या आठ दहा मैत्रिणी पार्टीकरीता आपल्या घरी येणार आहेत. आमचं सर्व आटपायला निदान सहा तरी वाजतील. तर आज तुम्ही घरी जरा उशीरा याल का? आणि हो! बिल्डींगजवळ आलात की मला फोन करा. मैत्रिणी गेल्या असतील तर मी तसं तुम्हाला सांगते. मग तुम्ही वर या"
मग काय? ऍडजस्ट करणे भागच होते. मी विचार केला, कामावरूनच तासभर उशिरा निघू. पण मग आठवले. कामावर थांबलो तर भेटणाऱ्या प्रत्येकाला उशिरापर्यंत थांबण्याचे कारण समजावून सांगताना नाकी नऊ येणार. तसंच घरी जाताना ट्रेनला गर्दीही वाढत जाणार होती. ट्रेनला होणाऱ्या गर्दीचा विचार करून माझ्या अंगावर काटा आला. म्हणून मी ऑफिसमधून सुटल्याबरोबर माझी नेहमीची गाडी पकडली.
गाडीत बसल्या बसल्या मी हा तास दीडतासाचा वेळ कसा काढायचा याचा विचार करू लागलो. तीनचार तास काढायचे असते तर नाटक सिनेमा वगैरेचा तरी बेत केला असता. पण मला दीडदोन तासच काढायचे होते. बाकीचा वेळ उगाच फुकट गेला असता. बरं दुसऱ्या दिवशी लवकर उठून परत कामावर जायचे होते. त्यामुळे मी तो विचार रहित केला. बाजारात खरेदी वगैरे काही करायची नसल्याने तसाही वेळ काढणे शक्य नव्हते. बरं विंडो शॉपिंग करण्यात मला काही रस नसतो. ज्या गावी जायचे नाही त्या गावचा रस्ता का पहा? देवळात, बागेत वेळ काढायचा म्हटले तरी तिथे एकट्याने जाण्यात काही मजा नव्हती. आणि तसंही म्हटलं तर कल्याणमध्ये देवळं आणि बागांची वानवाच आहे. संसारी माणसाला मित्रमंडळीही अशीही कमीच असतात. आणि आता नेमके ती घरी भेटण्याची शक्यताही नव्हती. वेळ कसा काढायचा हा विचार करून माझं डोकं भणभणायला लागलं. पण निर्णय काही होईना.
आणि पहाता पहाता कल्याण स्टेशन आलेसुद्धा. मी प्लॅटफॉर्मवर उतरलो. काहीच ठरलेले नसल्याने मला समजेना की मी डावीकडे जाऊ की उजवीकडे? मी गोंधळलेलो असताना समोरच माझा नेहमीचा घरी जाणारा पूल दिसला. माझे पाय आपोआप तिकडे वळले. मी पूलाच्या पायऱ्या चढू लागलो. आता मला वेळच काढायचा असल्याने एक एक पायरी शक्य तितका सावकाश चढत होतो. पण पायऱ्या त्या असून किती असणार? संपल्या लवकर. मी पूलावर आलो. पूलाचं एक टोक माझ्या घराच्या दिशेने जात होते. तिथून माझे घर मला खुणावत होते. पण मी मोठ्या अनिच्छेनेच दुसऱ्या टोकाच्या दिशेला वळलो. मी शक्य होईल तितके सावकाश पावलं टाकत चालत होतो. पूल जिथे संपतो त्या टोकाला मी जाऊन उभा राहिलो. खाली वाकून पाहिले तर तिथून बाजाराची सुरवात होताना दिसत होती.
मनात म्हटलं, चला! बाजारात चक्कर मारून वेळ काढू. पुन्हा मी शक्य तितके सावकाश पायऱ्या मोजत मोजत खाली उतरलो. बाजार चांगलाच फुललेला होता. रस्त्याकडेला भाजी, फळे विकणारे ओरडून ओरडून माल विकत होते. गिऱ्हाईकांशी हमरीतुमरीवर येऊन मालाचा सौदा करत होते. दुकानांच्या बाहेर माल लटकवलेला होता. त्यांच्या शोकेस नवीन मालांनी सजवलेल्या होत्या. रिक्षा, बस, मोटारगाड्या गर्दीतून हॉर्न वाजवत वाट काढत होत्या. सर्वत्र गडबड गोंधळ चालू होता. आणि मी शक्य तितक्या सावकाश पाय उचलत बाजारात चालत होतो. जो कोणी आडवा येईल, त्याला मोठ्या अदबीने आणि औंदार्याने प्रथम जायला वाट करून देत होतो. निरपेक्ष वृत्तीने दुकानांच्या शोकेसकडे पहात होतो. बाजाराला शक्य तितका मोठ्ठा वळसा घालून पुन्हा स्टेशनच्या पूलाजवळ येऊन पोहोचलो. हातातल्या घड्याळाकडे पाहिले. अरेरे!! मुश्किलीने फक्त अर्धा तास उलटला होता.
म्हटलं, इकडेतिकडे विनाकारण हिंडत बसायला नको. सरळ घरीच जाऊया. सावकाश जाऊ म्हणजे वेळ निघेल. मी पुन्हा पूल चढून वर आलो. आणि घराच्या दिशेने निघालो. पूलावरून रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या मालगाडीचे डब्बे मोजले. उभ्या असलेल्या रेल्वे इंजिनाचे बारकाईने निरीक्षण केले. यार्डातल्या तीस चाळीस लाईनी मोजून घेतल्या. चांगला वेळ गेला. आता घरच्या रस्त्याला लागलो. दुतर्फा फेरीवाले आपला माल लावून बसले होते. त्यांच्या मालाचे निरीक्षण करत चालू लागलो. कोण काय विकत घेतंय ते पाहू लागलो. दुकानात असलेल्या गिऱ्हाईकांकडे पाहून घेतले. पुन्हा बरा वेळ गेला.
असं करत करत आमच्या बिल्डिंगजवळ येऊन पोहोचलो. बिल्डिंगमध्ये शिरतेवेळी आमचे शेजारी नेमके भेटले. त्यांच्याशी हवापाण्याच्या गोष्टी बोलता बोलता घराच्या दरवाजापाशी पोहोचलो आणि थबकलोच. दरवाजात दहा बारा चपलांचा ढीग पडलेला होता. बंद दरवाजातून बायकांचा जोरजोरात हसण्या खिदळण्याचा आवाज येत होता. आणि मला आठवले. मिसेस म्हणाली होती, बिल्डींगजवळ आलात की मला फोन करा. मैत्रिणी गेल्या असतील तर मी तसं तुम्हाला सांगते. मग तुम्ही वर या. पण मी शेजाऱ्याशी बोलण्याच्या नादात कधी घरी पोहोचलो होतो ते मला समजलेच नाही. याचा अर्थ सहा वाजून गेले तरी पार्टी अजून संपली नव्हती.
मी उलट्या पावली जिने उतरून बिल्डिंगच्या बाहेर पडलो. मला पुन्हा प्रश्न पडला. आता काय करावे? कुठे जावे? मी वाट फुटेल तिथे रस्त्याने चालत राहिलो. अशीच दहा पंधरा मिनिटे चाललो असेन आणि माझा मोबाईल वाजला. मिसेस बोलत होती. "अहो, कुठे आहात? या घरी, सर्व मैत्रीण गेल्यात." मला किती आनंद झाला म्हणून सांगू! मी परत फिरलो. आणि झपझप चालत घरी गेलो. अक्षरशः उडतच गेलो म्हणाना! हा! हा!! हा!!
(समाप्त)
माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in
💬 प्रतिसाद
(27)
व
विजुभाऊ
Mon, 06/11/2018 - 13:58
नवीन
आम्ही असेही सारखे उनाडतच असतो त्यामुळे हा प्रश्न कधी पडलाच नाही
- Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि
Mon, 06/11/2018 - 18:16
नवीन
मिपावर लिहिता येतं म्हणजे किमान वाचनाची संवय असेल असं ग्रुहित धरल्यास्,उनाडपणे भटकण्यापेक्षा, कल्याणमध्ये एखाद्या वाचनालयात बसला असता तर वेळ सत्कारणी लागला असता. रच्याकने बस स्टँड अगर रेल्वे स्टेशनवर्,निवांतपणे बाकावर बसून , इतरांची लगबग्,गडबड बघण्यात काय मजा असते हे मी अनेकवेळा अनुभवून पाहिले आहे, तुम्ही पण एखादेवेळी असा अनुभव घ्यावा.
- Log in or register to post comments
स
सचिन काळे
Mon, 06/11/2018 - 19:51
नवीन
@ जयन्त बा शिम्पि, आपल्या सुचनेची नोंद घेतली आहे.
- Log in or register to post comments
व
वीणा३
Mon, 06/11/2018 - 18:18
नवीन
तुमचं ते फोटो स्टेटस प्रकरण काय आवडलं (वाचवलं )नव्हतं. हे चक्क आवडलं तुम्ही काय लिहिलंय ते (शेवटचे काही शब्द सोडून :P )
- Log in or register to post comments
स
सचिन काळे
Mon, 06/11/2018 - 19:57
नवीन
@ वीणा३, आपणांस फोटो स्टेटस् प्रकरण आवडले नाही, त्याकरिता मी दिलगीरी व्यक्त करतो. हा लेख आवडल्याचं कळवल्याबद्दल आपले खूप आभार.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Tue, 06/12/2018 - 03:08
नवीन
लेख आवडला .
विषय अतिषय उत्तम आहे. ( बाकी लेख लिहिन्यातच अर्धा दीड तास गेला असावा )
बाकी आपणाविषयी खालील अनुमाने काढण्यात आलेली आहेत , कृ ह घे :D
1. आपण प्रचंड वरकोहॉलिक आहात.
2. तुम्हाला कोणतेही व्यसन नाही. किंवा काम करणे हेच तुमचे व्यसन आहे, ते नसेल तर तुम्हाला कसेसे होते.
3. तुम्हाला अध्यात्म देव देवळं असली हौस नाही.
4.तुमचे छानशी हाफ गर्लफ्रेंड नाही.
5. कल्याण मध्ये छानशी चौपाटी नाही, असलेतरी तिथे भारी भेळ मिळत नाही.
6. तुम्हाला राजकारण किंवा candy crush किंवा तत्सम निरर्थक गोष्टींचे व्यसन नाही
7. आणि सर्वात महत्वाचे तुम्हाला मिपावर जमलेला असा मित्रांचा कंपू नाही .
एकूणच नेहमीप्रमाणे अतिशयोक्ती करून म्हणेन की कल्याणस्थ मिपाकरांविषयी अपार कणव दाटून आली आहे ,
आज आम्हाला कळाले की आमचे कळलावे मित्र सॉरी सॉरी कळव्याचे मित्र एका हाकेवर पुण्यात कट्ट्याला येण्यास का तयार असतात ते !!
ह. घ्या.
- Log in or register to post comments
स
सचिन काळे
Tue, 06/12/2018 - 03:27
नवीन
@ मार्कस ऑरेलियस, प्रतिसाद दिल्याबद्दल आपले आभार.
हा! हा!! हा!! आपण काढलेली सर्व अनुमाने सत्याच्या जवळ जाणारी आहेत.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 06/12/2018 - 08:32
नवीन
हाफ गर्ल्फ्रेंड कशी मिळवावी यावर एक धागा काढा ना गडे?
- Log in or register to post comments
ग
गणामास्तर
Tue, 06/12/2018 - 14:01
नवीन
अजून काही अनुमान ,
१) सदर लेखकू निर्व्यसनी सुद्धा असावेत नाही तर फावल्या वेळात काय करावे हा प्रश्न पडला नसता.
२) त्यांना मित्रही फारसे नसावेत आणि जे काही असतील ते त्यांना टाळत असावेत.
हा ! हा !! हा !!
- Log in or register to post comments
स
सचिन काळे
Tue, 06/12/2018 - 14:10
नवीन
@ गणामास्तर, सही पकडे हैं!! हा! हा!! हा!!
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Tue, 06/12/2018 - 14:11
नवीन
:-))))
- Log in or register to post comments
क
कंजूस
Tue, 06/12/2018 - 06:01
नवीन
लगेच धागा काढायचा होतात. मी आज काय करू? नंतर कल्याण स्टेशनात बसून प्रतिसाद देत बसायचे गडावरची तोफ वाजेपर्यंत. किंवा डीमार्ट.
- Log in or register to post comments
स
सचिन काळे
Tue, 06/12/2018 - 06:08
नवीन
@ कंजूस, लगेच धागा काढायचा होतात. >>> हा! हा!! हा!! छान कल्पना होती.
गडावरची तोफ वाजेपर्यंत. >>> 'गडावरची तोफ' ही उपमा खरंच आवडली. छान!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 06/12/2018 - 08:32
नवीन
खि खि खि...आयड्या आवडल्या गेली आहे
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Tue, 06/12/2018 - 09:21
नवीन
सौंना तुमच्या बद्दल कदाचित खात्री वाटत नसावी नाहीतर तुम्हाला घराबाहेर रहाण्याची शिक्षा झाली नसती.
तुमचे मित्र घरी आले की तुम्हीपण त्यांना एकदा असेच घराबाहेर काढा म्हणजे मग पुरुषांची दु:खे काय असतात त्याची त्यांना जाणीव होईल.
(आमच्या सौ माहेरी गेल्या की आमचे मित्र न बोलावता आमच्या घरी येतात)
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
स
सचिन काळे
Tue, 06/12/2018 - 10:07
नवीन
@ पैजारबुवा, सौंना तुमच्या बद्दल कदाचित खात्री वाटत नसावी नाहीतर तुम्हाला घराबाहेर रहाण्याची शिक्षा झाली नसती. >>> अळीमिळी गुपचिळी !!! :डोळा मारा:
तुमचे मित्र घरी आले की तुम्हीपण त्यांना एकदा असेच घराबाहेर काढा म्हणजे मग पुरुषांची दु:खे काय असतात त्याची त्यांना जाणीव होईल. >>> हिंमत नाही हो!! तरी सौं.ना विचारून पहातो. हा! हा!! हा!!
- Log in or register to post comments
ख
खिलजि
Tue, 06/12/2018 - 09:55
नवीन
मला अशी आज्ञा जेव्हा माझी बायको करेल, त्या दिवशी पृथ्वी गोल गोल फिरेल . भाग्यवान आहात आपण कि अशी मायाळू आणि आपल्यावर दृढ विश्वास ठेवणारी पत्नी मिळाली आहे.
आम्हाला अशी संधी फार कमी मिळते आणि मिळते तेव्हा ती यथेच्छ सत्कारणी लावली जाते . दीड तासाचे आपण चार तास केले असते तरी चालले असते कारण गृहमंत्र्यांकडूनच फर्मान आलेलं होते . तुम्ही एक सुवर्ण संध्याकाळ वाया घालवली असे म्हणेन . याला आपण पोस्ट मॅरीड गोल्डन संध्या असेही म्हणू शकतो . माझ्या वाट्याला आली कि मी अनुभव टाकेनच पण जाऊन देत . पुढच्यावेळी पूर्ण तयारीनिशी उतारा मैदानात . आगाऊ शुभेच्छा .
सिद्धेश्वर विलास पाटणकर
- Log in or register to post comments
स
सचिन काळे
Tue, 06/12/2018 - 10:52
नवीन
@ खिलजि, पुढच्यावेळी पूर्ण तयारीनिशी उतारा मैदानात . आगाऊ शुभेच्छा >>> धन्यवाद! आतापासूनच कंबर कसतो. हा! हा!! हा!!
- Log in or register to post comments
श
श्वेता२४
Tue, 06/12/2018 - 10:36
नवीन
वरच्या मार्कस भाऊंच्या निरीक्षणात अजून एक भर घालते
8. तुम्हाला खादाडी करण्याची आवड नसावी
माझ्यासारखीने त्या भागात मिळणाऱ्या एखाद्या चांगल्या हॉटेल किंवा तत्सम स्टॉलवर जाऊन अगदी एक एक घासाची चव घेत पदार्थांचा आस्वाद घेतला असता वर तन्मयतेने चहा किंवा कॉफीचा गोट घेत घेत त्याची पुरती मजा घेतली असती. यातच तासभर नक्कीच गेला असता.....
- Log in or register to post comments
स
सचिन काळे
Tue, 06/12/2018 - 11:17
नवीन
@ श्वेता२४, तुम्हाला खादाडी करण्याची आवड नसावी >>> निरीक्षण फिफ्टी फिफ्टी बरोबर आहे. आमच्या सौ. सुगरण आहेत. त्या हॉटेलवाल्यांना लाजवतील अशा एकसे एक चविष्ट डिशेस बनवतात. त्या तोच पदार्थ प्रत्येकवेळी नवीन नवीन प्रकारे बनवतात. पदार्थात नवीन नवीन प्रयोग करून पहातात. मला त्यांच्या हातचं जळकंसुद्धा आवडतं. मुलीने कॉलेजमध्ये रोज डबा उघडल्यावर इतर मुली म्हणायच्या "बघू बरं! आज काळेबाईंच्या हॉटेलमधून काय पाठवलंय?" आणि डब्यावर तुटून पडायच्या.
तात्पर्य : मला खादाडी करण्याची आवड आहे, पण फक्त आमच्या सौं.च्या हातची.
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Tue, 06/12/2018 - 13:51
नवीन
कुरकुरीत पॉपकॉर्नी लेखन ! आवडले आहे !
सौं आणि त्यांच्या मैत्रिणींचे अजुन काही किस्से असतील तर येवु द्यात !
- Log in or register to post comments
स
सचिन काळे
Tue, 06/12/2018 - 14:16
नवीन
@ चौथा कोनाडा, कुरकुरीत पॉपकॉर्नी लेखन ! आवडले आहे ! >>> धन्यवाद!!
सौं आणि त्यांच्या मैत्रिणींचे अजुन काही किस्से असतील तर येवु द्यात ! >>> हो! जरूर!!!
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Tue, 06/12/2018 - 13:51
नवीन
कुरकुरीत पॉपकॉर्नी लेखन ! आवडले आहे !
सौं आणि त्यांच्या मैत्रिणींचे अजुन काही किस्से असतील तर येवु द्यात !
- Log in or register to post comments
ख
खिलजि
Tue, 06/12/2018 - 14:23
नवीन
"सौ" ने देता कौल
यथेच्छ करावा झोल
असेल दीड तास हातात
तर ओतावी चालता चालता ग्लासात
हाणावी एकाच दमात
पाऊले जड होईस्तोवर
श्वास घ्यावा जोरजोरात
सुवास काढण्या बाहेर
दोघातिघांना मुद्दाम गाठावे
वास येतोय का ते बघावे
येता इशारा घराकडून
चिंगम चघळत चघळत घरी जावे ,
थेट बाथरूमात घुसावे
- Log in or register to post comments
स
सचिन काळे
Tue, 06/12/2018 - 14:32
नवीन
@ खिलजि, "सौ" ने देता कौल >>> वा:! मस्तं!! आवडलं!!
और आने दो। हम वाट बघताय।
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Wed, 06/13/2018 - 10:25
नवीन
कल्याणला कल्याण भेळ कशी मिळत नाही याचं आश्चर्य वाटलं .
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Wed, 06/13/2018 - 14:52
नवीन
:-))) ह्यो खास पुनेरी ओव्हररेटेड पदार्थ हये, अमी चाकुन पायला पन त्यच्या पेक्शा अमची कोर्नरची भेळ भारी हाये.
- Log in or register to post comments