Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

आंतरजालावरचा वावर अधिक सुलभ, आनंददायी व उत्पादक बनवणार्‍या उप-प्रणाल्या (एक्सटेन्शन्स व अ‍ॅप्स)

ड
डॉ सुहास म्हात्रे
Fri, 06/01/2018 - 20:40
💬 53 प्रतिसाद
आजच्या जीवनावश्यक गोष्टींची यादी केली तर त्यात आंतरजालाची निवड नक्कीच होईल, असे म्हणतात. यातला विनोदाचा भाग सोडला तरी आंतरजालाने आपल्या जीवनात फार महत्वाचे स्थान बनवले आहे आणि त्याच्याशिवाय जगण्याची कल्पना आपल्याला सहन होणार नाही, यात संशय नाही. खानपानच्या वेळांमध्ये तीन-चार तासांचा अवधी आपण सहजपणे पेलतो पण "तेवढा सलग वेळ डेस्कटॉप-लॅपटॉप-टॅब-मोबाईल इत्यादीमध्ये तोंड न खुपसता घालवल्याला किती दिवस झाले? " या प्रश्नाचे उत्तर सहजा-सहजी देता येणार नाही, नाही का?! आपल्या कामाच्या जागेवरच नाही, घराच्या बसायच्या खोलीतच नाही, तर स्वयंपाकघर आणि झोपण्याच्या खोलीतही या आंतरजालाने कसा आणि कधी शिरकाव केला, हे अख्ख्या मानव जमातीच्या अजून ध्यानातच आलेले नाही. असे हे आंतरजाल औपचारिक-अनौपचारिक, खाजगी-सार्वजनिक, व्यावसायिक-अव्यावसायिक, आणि इतर सर्व प्रकारचे मानवी जीवन व्यापून अंगुलीभर उरले आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही, इतके मात्र नक्की! अमेरिकन सरकारने १९६०च्या दशकात, "मजबूत, सुरक्षित आणि स्वतःतील बहुसंख्य चुका स्वतःच दुरुस्त करून (fault-tolerant) सेवा चालू ठेवणार्‍या संगणकीय जालाच्या उभारणीसाठी" सुरू केलेल्या एका संशोधनाने जालाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ARPANET नावाने ओळखले जाणारे हे जाल सुरुवातीला लष्करी व शैक्षणिक माहितीचे आदान-प्रदान करण्यास वापरले जात होते. १९८०च्या दशकात सरकारी व खाजगी अर्थसाहाय्याने National Science Foundation Network बनवण्याची कल्पना पुढे आली. त्याला मुख्य कण्यासारखे वापरून त्याच्याशी अनेक मुख्यतः सरकारी व व्यापारी जाले जोडली गेली. त्यानंतर, १९९०च्या दशकात अनेक खाजगी, सरकारी, सार्वजनिक, शैक्षणिक, व्यापारी व भ्रमणध्वनीची जाले त्याला जोडली गेली आणि "जालांचे जाल... महाजाल... " असलेल्या आधुनिक आंतरजालाचा जन्म झाला. हे महाजाल जमिनीखालून/समुद्रातून जाणार्‍या केबल/ऑप्टिकल फायबर; वायरलेस साधने; उपग्रह; इत्यादींचा वापर करणार्‍या अनेक यंत्रणांचा माहितीवहनासाठी वापर करते आणि माहितीचा प्रवाह अखंडपणे (२४ X ७) जगभर चालू ठेवते. जालावर वावरण्यासाठी दोन महत्त्वाच्या संगणकप्रणाली आवश्यक असतात : (अ) जालावरच्या प्रत्येक माहितीच्या {जालपत्र (वेबपेज), चित्र (इमेज), चलतचित्र (व्हिडिओ), इत्यादी} वैयक्तिक URL चे वर्गीकरण आणि सूचीकरण (इंडेक्सिंग) करणारी प्रणाली उर्फ वेब सर्च इंजिन : हे मूलतः दुसर्‍या संस्थळांच्या माहितीचे वर्गीकरण व सूची असलेले संस्थळ असते. ते वापरकर्त्याच्या डोळ्याआड राहून आपले काम करत असते. उदा : google.com, Microsoft Bing, इत्यादी. (आ) वेब सर्च इंजिनने शोधलेली माहिती सहजपणे, त्वरीत आणि समजायला सोपी असेल अश्या प्रकारे समोर आणणारी प्रणाली, म्हणजे वेब ब्राउझर, (नुसते) ब्राउझर किंवा जालन्याहाळक. प्रत्येक ब्राउझरच्या मागे (त्याच्या विकासकावर अवलंबून) त्याचे वेब सर्च इंजिन असते. उदा: "Google Chrome + google.com"; "Microsoft Edge + Microsoft Bing". बहुसंख्य वापरकर्त्यांना आपण वापरत असलेल्या वेब सर्च इंजिनाची कल्पना नसते, असावी अशी गरजही नसते. परंतु, आवश्यक वाटल्यास, "वेब सर्च इंजिन + ब्राउझर" या जोडीतील प्रणाल्यांना आपण आपल्या प्राधान्याप्रमाणे/आवडीप्रमाणे बदलू शकतो. उदा: "Google Chrome + Microsoft Bing" अशी जोडी होऊ शकते. आंतरजालावरच्या माहितीच्या महासागराचा आवाका आणि त्या माहितीच्या वापराची गरज, प्रचंड प्रमाणात वाढली आहे आणि ही गरज सतत विस्तारत आहे. त्या माहितीच्या महापुरातून आपल्याला हवी असलेली माहिती मिळविण्याचे काम अधिक सुलभ, अधिक आकर्षक, अधिक उपयोगी आणि अधिक कार्यक्षम करण्याची साधने बनवणे ही एक आवश्यक गरज झाली आहे. "वापरकर्त्यांची समस्या ही उद्योजकांची संधी असते." अर्थातच, अनेक व्यक्तिगत आणि संस्था विकासक या संधीचा फायदा घेण्यासाठी पुढे आले आहेत. त्यांनी ईमेल, जालसंगीत, जालवर्तमानपत्र, जालदूरध्वनी, जालचलतचित्र, जालदूरदर्शन, जालपुस्तके, जालप्रकाशन, जालसहकारी कार्यपद्धत, जालप्रस्तुती, जालवितरण, इत्यादी साधने बनवून जाल-वावर अधिक सुकर, आनंददायी व उत्पादक बनविला आहे. जालवावरासाठी वापरल्या जाणार्‍या ब्राउझर्समध्ये HTML, CSS, JavaScript, multimedia capabilities, इत्यादींचा वापर करून जालाची पाने चाळणे ही केवळ कामाची निकड न राहता एक आनंदानुभवही करण्याचा प्रयत्न होत आहे... म्हणजेच, या सगळ्या विकसन कामामुळे संशोधक-विकासकांना जितका फायदा झाला आहे त्यापेक्षा जास्त फायदा आंतरजालाला व त्याच्या सर्वसामान्य वापरकर्त्यांना झाला आहे. दिवसेंदिवस सहज-सुलभ व स्वस्त बनणार्‍या ब्रॉडबँड कनेक्टिविटीने जालाच्या या घोडदौडीला मोलाची मदत केली आहे; किंबहुना, त्याशिवाय आंतरजालाचा वापर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणे शक्यच झाले नसते. या संगणकप्रणालींच्या विकासाच्या वाटचालीचा फार मोठा आणि रोचक इतिहास आहे. पण, सद्य लेखाचा तो मुख्य विषय नसल्याने आपण त्या स्पर्धेची केवळ धावती ओळख करून घेऊ या. १. World Wide Web : १९९०-९१ : Tim Berners-Lee : आंतरजालावरच्या अगडबंब माहितीच्या सागरात माहिती साठवून ती हवी तेव्हा परत मिळविण्यासाठी, प्रत्येक माहितीला एक ओळखखूण देणे आवश्यक होते. सन १९९० साली Tim Berners-Lee नावाच्या इंग्लिश शास्त्रज्ञाने World Wide Web (WWW किंवा नुसते Web) या नावाने एक प्रणाली बनवली. ही प्रणाली दर माहितीसंचासाठी एक ओळखखूण उर्फ Uniform Resource Locator (URL) नेमून देते व तिला आंतरजालावरून संपर्क करता येईल अश्या hypertext linksने गुंफून ठेवते. आंतरजालावरची माहिती शोधताना "www. " असे टंकण्याने सुरुवात केली की आपला World Wide Web प्रणालीशी संपर्क साधला जातो. बर्नर्स-ली ने १९९१ साली Nicola Pellowला साथीला घेऊन WWW ची डंब टर्मिनलसाठीची (संगणकीय प्रोसेसर नसलेला संगणकीय पडदा) आवृत्ती बनवली. २. Mosaic : १९९३ : Marc Andreessen (Team Leader) : हा ग्राफिकल इंटरफेस असलेला पहिला बाऊझर होता. Mosaicने WWWला सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी सुगम बनविल्यामुळे तो खूप लोकप्रिय झाला. १९९०च्या दशकामध्ये झालेल्या आंतरजालाच्या भरभराटीचे (इंटरनेट बूम) बरेचसे श्रेय याच्याकडे जाते. ३. Netscape Navigator : १९९४ : Marc Andreessen : Marc Andreessenने Mosaic सोडून स्वतःची Netscape नावाची कंपनी स्थापन केली. तिने बनवलेला Netscape Navigator थोड्याच काळात सर्वात जास्त लोकप्रिय ब्राउझर बनला. ४. Internet Explorer : १९९५ : Microsoft : आयबीएम मायक्रो कॉम्प्युटर (त्या काळात प्रामुख्याने वापरला जाणारा डेस्कटॉप काँप्युटर) व्यवसायात निर्विवाद नेतेपद मिळवणार्‍या मायक्रोसॉफ्टने त्याचा स्वतंत्र ब्राउझर बनवला नसता तरच आश्चर्य वाटले असते. अर्थातच, मायक्रोसॉफ्टचे आणि नेटस्केपचे ब्राउझर-युद्ध चांगलेच गाजले. सन १९९५ मध्ये मायक्रोसॉफ्टने आपल्या लोकप्रिय Windows operating systemबरोबर, Internet Explorer कोणत्याही निर्बंधांशिवाय मोफत (bundled freeware with no restrictions on usage) द्यायला सुरुवात केली. मायक्रोसॉफ्टच्या विजयात या रणनीतिचा सिंहाचा वाटा होता. सन २००२ पर्यंत ब्राउझर वापरात Internet Explorer चा हिस्सा ९५% टक्के इतका वाढलेला होता. ५. Firefox : १९९८ : Mozilla Foundation : मायक्रोसॉफ्टबरोबरच्या स्पर्धेत हतबल झालेल्या नेटस्केपने निर्वाणीचा प्रयत्न म्हणून Mozilla Foundation ही मुक्त संगणक प्रणाली संकल्पना (open source software model) पुढे आणली. त्यातून, सन २००४ साली, Firefox नावाच्या ब्राउझरचा जन्म झाला. २०११ पर्यंत त्याचा वापर २८%पर्यंत वाढला. ६. Safari : २००३ : Apple : हा ब्राउझर अ‍ॅपलच्या संगणकांवर बलिष्ठ असला तरी त्याचा इतरत्र फारसा प्रभाव पडला नाही. ७. Chrome : २००८ : Google : सन २००८ मध्ये, ब्राउझर-युद्धात सर्वात शेवटी उडी घेणार्‍या या महत्त्वाच्या प्रतिस्पर्ध्याने पदार्पणातच अशी काही चमक दाखवली की, हा हा म्हणता Microsoft Internet Explorerला मागे टाकत २०१२ पर्यंत त्याने निर्विवाद विजेतेपद पटकावले. त्याने आपले सर्वोच्च स्थान आजतागायत कायम ठेवले आहे. गुगलचा मुख्य कार्यकारी अधिकारी Eric Schmidt याची ब्राउझर-युद्धात भाग घेऊन जखमी व्हायची अजिबात इच्छा नव्हती! मात्र, गूगलचे सहसंस्थापक Sergey Brin व Larry Page यांचे मत जरा वेगळे होते. Mozilla Firefox मधून बाहेर पडलेल्या अनेक विकासकांना हाताशी धरून त्यांनी Chromeची पहिली आवृत्ती बनवली. ती पाहून प्रभावित झालेल्या Eric ने आपले मत बदलले आणि नंतर बाकीचा इतिहास घडला!

सुमारे ३५८ कोटी आंतरजाल वापरकर्त्यांमध्ये जगभरच्या ब्राउजरवापराची साधारण स्थिती अशी आहे (मोजणीचा काल आणि मोजमाप करणार्‍या पद्धतीमधील फरकामुळे, वेगवेगळ्या कंपन्यांनी दिलेल्या आकड्यांमध्ये थोडा फरक असू शकतो)...

 व्यापारी टक्केवारीप्रमाणे ब्राउजर वापर : आलेख (ग्राफ) विकीवरून साभार



 ब्राउजर वापर : देशातील लोकप्रियतेप्रमाणे नकाशा, गिझ्मोडो.कॉम वरून साभार



 वेगवेगळ्या ब्राउजर्सचे लोगोज (जालावरून साभार)



आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेल्या आंतरजाल ब्राउझर्सना सर्वोत्तम बनविण्याचा त्यांच्या विकासकांचा सतत प्रयत्न चालू असतो. कारण, तसे न केल्यास त्यांचा आंतरजालावरच्या व्यापारातला वाटा कमी होण्याचा धोका असतो. पण, आजच्या खुल्या व्यवस्थांच्या जमान्यात एका कंपनीने कितीही जोमाचे प्रयत्न केले तरीही व्यवहारात तिला काम-व्ययाचे समीकरण आदर्श ठेवणे कठीण असते. शिवाय, प्रत्येक वापरकर्त्याच्या कार्यपद्धती आणि / अथवा प्रणालीकडून असलेल्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात. यावर उपाय म्हणून, आजच्या सर्व मोठ्या कंपन्या आपल्या प्रणालींमध्ये, (अ) मूळ संगणक आज्ञावली न बदलता वापरकर्त्याच्या जरूरीप्रमाणे बदल करा येतील (कस्टमायझेशन) आणि / किंवा (आ) मूळ संगणक आज्ञावलीला पूरक असलेल्या इतर कंपन्यांच्या (थर्ड पार्टी) मूल्यवर्धन करणार्‍या उप-प्रणाल्या जोडता येतील; अशी व्यवस्था करून ठेवतात. ब्राउझर्सही त्याला अपवाद नाहीत. मुख्य प्रणालीच्या पाठीवर स्वार होऊन तिचे मूल्यवर्धन करणार्‍या उप-प्रणाल्यांना अ‍ॅप्स किंवा एक्स्टेन्शन्स म्हणतात. हे मूल्यवर्धन अनेक प्रकारे होऊ शकते, उदा: मूळ प्रणालीचे रुपडे अधिक सुंदर करणे (अ‍ॅट्रॅक्टिव्ह इंटरफेस), मूळ प्रणाली वापरायला सहज-सोपी (ञूजर फ्रेंडली) करणे, मूळ प्रणालीत नसलेल्या सोयी-सुविधा-पर्याय उपलब्ध करून देणे (व्हल्युएबल अ‍ॅडिशनल फीचर्स), इत्यादी. (अ) आंतरजालाचे ३५८ कोटी वापरकर्ते असणे, (आ) उप-प्रणाली विकसित करणे पूर्णपणे मुक्त असणे, (इ) उप-प्रणाली मोफत देऊनही इतर मार्गांनी (जाहिराती, इ) उत्पन्न मिळवणे, (ई) उत्तम कामाचा (यशस्वी अ‍ॅप/एक्सटेन्शन) पुरावा दाखवून मोठ्या कंपन्यांच्या नजरेत भरणे व नोकरी/कंत्राटी काम मिळवणे, इत्यादी अनेक फायदे समोर ठेवून, ब्राउझर्ससाठी अक्षरशः दशलक्षांनी उप-प्रणाल्या बनवल्या गेल्या आहेत आणि त्यांत दररोज हजारोंनी भर पडत आहे. या उप-प्रणाली विस्फोटातून, स्वतंत्रपणे शोध घेवून आपल्याला उपयोगी उप-प्रणाली मिळवणे बहुदा अनेक निष्फळ प्रयत्नांनंतर किंवा अपघाताने सापडते. सर्वात कमी श्रमाचा आणि जास्त फायद्याचा पर्याय, ती उप-प्रणाली वापरत असलेल्या मित्र अथवा सहव्यावसायिकांची शिफारस, हाच असतो. तर या लेखाच्या निमित्ताने मी सर्व मिपाकरांना आपल्या आवडत्या आंतरजाल अ‍ॅप्स व एक्स्टेन्शन्सची माहिती येथे वाटून घेण्याचे आवाहन करू इच्छितो. माहिती इतरांना जास्तीत जास्त फायदेशीर व्हावी यासाठी खालील स्वरूपात (फॉर्मॅट) द्यावी... ठळक शब्दांत उप-प्रणालीचे नाव * किंमत : ________________________________ * थोडक्यात वर्णन आणि / किंवा आवडलेल्या सोयी-सवलती-पर्याय-फायदे : मी माझ्या आवडीच्या काही उप-प्रणाल्यांची माहिती देऊन सुरुवात करत आहे. इतरांनीही, "एकमेका साहाय्य करू, अवघे मिपाकर होऊ सुखी जालप्रवासी" या तत्त्वाचा पुरस्कार करून हातभार लावल्यास मंडळ आभारी असेल!

*********************************************



१. Wikiwand

* किंमत : मोफत. * थोडक्यात वर्णन आणि / किंवा आवडलेल्या सोयी-सवलती-पर्याय-फायदे : विकिपेडियाबद्दल सांगायला नकोच. तिचा वापर न केलेला जालप्रवासी औषधालाही सापडणार नाही. ती वापराच्या बाबतीत जालावरची पाचव्या क्रमांकाची प्रणाली आहे आणि जगभरातले ५० कोटीच्यावर लोक तिचा वापर करतात. असे असूनही, दशकापेक्षा जास्त कालखंडात तिचे रुपडे (इंटरफेस) बदलण्याचा प्रयत्न झालेला नाही. या परिस्थितीत सुधारणा करावी या उद्येशाने Lior Grossman आणि Ilan Lewin या जोडगोळीने Wikiwand विकसित केली आहे. Wikipedia सद्या Chrome, Safari, Firefox, iPhone व iPad उपलब्ध आहे. Android साठी आवृत्ती बनवणे चालू आहे. Wikipedia चे रूपरंग सुंदर करून Wikiwand थांबत नाही. तिची sidebar menu, navigation bar, personalized links to other languages, new typography, व access to previews of linked articles इत्यादी अनेक आयुधे विकिपेडियावरचा वावर सुलभ व आनंददायक करतात. खालील चित्रांची तुलना केल्यास विकीवांड विकीपेडियात घडवून आणणारे दृश्य फरक लगेच लक्षात येतील. वापराच्या अनुभवातील फरक जाणून घेण्यासाठी आपल्या ब्राउझरला Wikiwand एक्स्टेन्शन जोडून पहा. फरक नक्की आवडेल.

 मूळ विकिपेडिया पान



 तेच विकिपेडिया पान, विकिवांडच्या सहाय्याने असे दिसते



*********************************************



२. Boomerang

* मूळ प्रणाली : gmail व outlook * किंमत : मोफत. * थोडक्यात वर्णन आणि / किंवा आवडलेल्या सोयी-सवलती-पर्याय-फायदे : हे एक्स्टेन्शन जीमेलच्या कार्यपद्धतीत जास्त पर्याय देऊन तिचा वापर जास्त सोयीचा करते. त्यातील काही महत्त्वाच्या सुविधा अश्या आहेत : १. Send an email later : संदेश सोयीच्या वेळी लिहून, ती मेल भविष्यात हवा त्या वेळी पाठविण्याची तजवीज करणे. २. Remind you if you don’t hear back : आपण पाठवलेल्या संदेशाची (उत्तर नाही आले, किंवा आले तरीसुद्धा) ठराविक वेळी आठवण करून देणे. ३. The best follow up reminders : सद्या आवश्यक नाही पण भविष्यात ठराविक वेळी एखाद्या संदेशावर कारवाई आवश्यक असल्यास, त्याची आठवण करून देणे. बूमरँग तो संदेश इनबॉक्समधून काढून आर्काइव्ह करते व ठरवलेल्या वेळी परत इनबॉक्समध्ये "अनरेड" स्थितीत आणते. ४. घराबाहेर / ऑफिसबाहेर असताना आठवलेल्या गोष्टी, स्वतःला ठराविक वेळेस (उदा: पुढील कामाच्या दिवशी, ऑफिसचे काम सुरू करण्याच्या वेळी) आठवण करून देणे. जीमेल लिहिण्यासाठीच्या नेहमीच्या टेक्स्टबॉक्सला बूमरँग आपले पर्याय जोडते. याशिवाय, ब्राउझर्समध्ये दिसणार्‍या बूमरँगच्या आयकॉनवर टिचकी मारून येणार्‍या खिडकीत पूर्वी पर्याय लावलेल्या संदेशांचे नियोजन (नवीन पर्याय वापरणे, जुन्या पर्यायात बदल करणे, जुना पर्याय काढून टाकणे, इ) करता येते.

 बूमरँगसह जीमेलची टेक्स्टबॉक्स



*********************************************



३. Pocket (पूर्वाश्रमीचे Read it later)

* किंमत : मोफत किंवा शुल्क भरून प्रिमियम आवृत्ती. * थोडक्यात वर्णन आणि / किंवा आवडलेल्या सोयी-सवलती-पर्याय-फायदे : १. ऑनलाईन / ऑफलाईन वापरता येणारे हे अ‍ॅप / एक्स्टेन्शन आपल्याला आवडलेल्या पण त्वरित वाचायला-पहायला वेळ नसणार्‍या जालावरच्या माहितीला (मजकूर, चित्रे, चलतचित्रे, इ) साठवून ठेवते. हे काम अ‍ॅप न उघडता, ब्राउझरमधील त्याच्या एक्स्टेन्शनच्या आयकॉनवर टिचकी मारून करता येते. २. साठवलेली पाने आपल्या मनाप्रमाणे टॅग्ज लावून साठवून ठेवता येतात आणि नंतर आपल्या सोयीने 'पॉकेट'मध्ये साठवलेल्या यादीतून शोधून उघडता येतात. त्यांना पॉकेटमध्ये किंवा मूळ स्रोतामध्येही उघडता येते. ३. या अ‍ॅपमुळे ब्राउझरच्या टॅब्जवर किंवा बुकमार्क्सच्या यादीत गर्दी टाळता येते आणि एखादे महत्त्वाचे पान विस्मृतीतही जात नाही. ३. पॉकेटचे खाते डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅब, मोबाईल अश्या अनेक डिव्हाइसेसवरून चालवता येते. त्यामुळे, एका डिव्हाईसवर केलेले बदल (साठवण करणे, काढून टाकणे, इ) सगळीकडे दिसतात. ४. साठवलेली माहिती दुसर्‍यांशी पॉकेट, फेसबुक, ट्विटर, एव्हरनोट, ईमेल, इत्यादी मार्गांनी वाटून घेता येते. ५. शुल्क भरून घेता येणार्‍या प्रिमियम आवृत्तीत अजून बर्‍याच सोयी आहेत. पण, मोफत असलेल्या आवृत्तीत माझ्यासारख्या सर्वसामान्य वापरकर्त्याला पाहिजे असणार्‍या सगळ्या सोयी आहेत.

 पॉकेट उघडल्यावर दिसणारी साठवलेल्या माहितीची रचना



*********************************************



४. Google Keep

* किंमत : मोफत. * थोडक्यात वर्णन आणि / किंवा आवडलेल्या सोयी-सवलती-पर्याय-फायदे : १. ऐकलेल्या, जालावर मिळालेल्या किंवा मनात सुचलेल्या माहितीला त्वरित व सहजपणे साठवण्यासाठी उपयुक्त असे हे अ‍ॅप/एक्स्टेन्शन आहे. ते वापरून बोलणे मजकूराच्या स्वरूपात (व्हॉईस टू टेक्स्ट) साठवता येते (Use “Ok Google” voice commands to “take a note” or “add to to-do list”). २. टंकलेली माहिती प्रवाही मजकूर (फ्री फ्लोईंग टेक्स्ट), यादी, इत्यादी अनेक स्वरूपात साठवता येतो. ३. जालावरची माहिती ब्राउझरवर असलेल्या एक्स्टेन्शनच आयकॉनवर टिचकी मारून त्वरित साठवता येते. ४. माहिती स्वतंत्र नोट्सच्या स्वरूपात ठेवता येते. नोट्सना शीर्षके व पार्श्वरंग (बॅकग्राऊंड कलर) देता येतात. ५. एका डिव्हाईसवर ठेवलेली माहिती डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅब, मोबाईल अश्या अनेक डिव्हाइसेसवरून चालवता येते. त्यामुळे, एका डिव्हाईसवर केलेले बदल (साठवण करणे, काढून टाकणे, इ) सगळीकडे दिसतात. ६. साठवलेली माहिती दुसर्‍यांशी वाटून घेता येते. सामील असलेल्या प्रत्येकाला माहितीत बदल करता येतो (शेअर्ड एडिटेबल नोट्स) व तो सर्वांच्या डिव्हाईसमधील नोटमध्ये दिसतो.

 गुगल नोटमध्ये साठवलेल्या माहितीची रचना (लॅपटॉप)



 गुगल नोटमध्ये साठवलेल्या माहितीची रचना (मोबाईल)



*********************************************




वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 33677 views

💬 प्रतिसाद (53)
भ
भुमन्यु Mon, 06/25/2018 - 16:04 नवीन
show Highlights: गुगल मध्ये सर्च केलेले शब्द अधोरेखित करण्यासाठी Kindle Cloud reader: किंडल वर सेव्ह केलेली पुस्तके लॅपटॉप वर वाचण्यासाठी Amazon assistant: एखादी गोष्ट गुगल वर सर्च केली आणि ती वस्तू जर अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध असेल तर, तुम्हाला अअ‍ॅमेझॉनचा लिंक बार येतो Multi highlighter
  • Log in or register to post comments
J
Jayant Naik Tue, 07/24/2018 - 07:08 नवीन
इतक्या वेगवेगळ्या गोष्टींवर तुम्ही प्रकाश टाकला आहे कि ...याचा आवाका पाहून दचकायलाच झाले. कसे काय जमवता हे सर्व ?
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Sun, 09/02/2018 - 20:45 नवीन
चांगली माहिती दिलीत म्हात्रेजी
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा