स्वनातीत व्यापारी विमानप्रवास... पुन्हा सुरू होणार !
स्वनातीत (आवाजापेक्षा जास्त म्हणजे सुपर-सॉनिक वेगाने ) उडणारी विमाने ही काही नवीन गोष्ट अजिबात नाही. मात्र, लढाऊ विमानांच्या बाबतीत स्वनातीत वेग ही सामान्य गोष्ट असली तरी व्यापारी तत्त्वावर केल्या गेलेल्या स्वनातीत विमानसेवेच्या (commercial supersonic air-travel) मार्गात सतत मोठमोठे अडथळे येत राहिले आहेत. सर्वसामान्य माणसांच्या मनात तर स्वनातीत प्रवास केवळ एक स्वप्न म्हणूनच राहिला आहे.
१९६९ ते २००३ या कालखंडात व्यापारी तत्त्वावर चाललेली पहिली वहिली स्वनातीत काँकॉर्ड विमानसेवा बंद पडून आता १५ वर्षे लोटली आहेत. त्या सेवेला सुरुवातीपासूनच अनेक प्रकारच्या समस्यांनी ग्रासले होते. Mach 2 (आवाजाच्या वेगाच्या दुप्पट, म्हणजे साधारण २,४५० किमी/तास) वेग गाठण्यासाठी, काँकॉर्डची चार टर्बोजेट इंजिने, प्रत्येकी तब्बल ६,७७० गॅलन्स (२५,६२७ लीटर्स) प्रतितास या दराने इंधन गिळंकृत करत असत. त्यामुळे अर्थातच, काँकॉर्डचा प्रवास अतिमहागडा आणि केवळ मोजक्या अतिश्रीमंत मंडळींना परवडणारा होता. आवाजाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने उड्डाण करताना ते विमान इतका मोठा आवाज (सॉनिक बूम) करत असे की त्यामुळे केवळ ध्वनिप्रदूषणच होत असे असे नाही तर विमानमार्गाखाली असलेल्या जमिनीवरच्या घरांच्या खिडक्या हादरत/फुटत असत. अर्थातच, काँकॉर्डचा मार्ग ठरवताना लोकवस्त्यांना टाळण्यासाठी काँकॉर्डचे स्वनातीत उड्डाण केवळ महासागरांवरून (उदा. न्यू यॉर्क सिटी ते लंडन) शक्य होत असे. त्यामुळे त्या सेवेला व्यापारी फायद्याची समीकरणे सोडविणे जिकिरीचे झाले यात काहीच आश्चर्य नाही. या अवघड पार्श्वभूमीवर, एअर फ्रान्सच्या काँकॉर्ड फ्लाईट क्रमांक ४५९० ला २५ जुलै २००० रोजी झालेल्या दुर्दैवी अपघाताने उंटाची पाठ मोडणार्या शेवटच्या काडीचे काम बजावले. उड्डाण केल्यावर काही क्षणांतच पेट घेऊन ते विमान कोसळले... विमानातील सर्व १०० प्रवासी अधिक ४ कर्मचार्यांचा व जमिनीवरच्या ४ लोकांचा मृत्यू झाला... आणि व्यापारी तत्त्वावर चालणार्या एकुलत्या एका स्वनातीत व्यापारी विमानसेवेने शेवटचा श्वास सोडला.
असे असले तरी, आपले स्वप्न गुंडाळून ठेवेल तर तो माणूस कसला ?! काँकॉर्डमध्ये आलेल्या समस्यांना टाळून किंवा त्यांच्यावर मात करून नवनवी व्यापारी स्वनातीत विमाने बनवणे चालूच आहे. या दिशेने विकसित केलेल्या विमानांतले काही महत्त्वाचे बदल असे आहेत :
अ) (काँकॉर्डमधील चार ऐवजी) कमी इंजिने वापरून इंधनाची गरज कमी करून प्रवासाचा खर्च कमी करणे,
आ) (काँकॉर्डच्या Mach 2 ऐवजी) Mach 1.1 ते Mach 1.6 अश्या कमी वेगाची तडजोड स्वीकारणे,
इ) सॉनिक बूमचा आवाज कमी होऊन जमिनीवरची उड्डाणे शक्य व्हावी यासाठी विमानांच्या रचनेत नाविन्यपूर्ण बदल करणे, इत्यादी.
कामाची निकड म्हणून अतीवेगवान प्रवास आवश्यक असणार्या व्यापारी जगतातील भ्रमणवीरांसाठी आणि अगदी महागडे कुतूहल म्हणून का होईना पण एकदा तरी आवाजाचा वेग ओलांडून काही तास प्रवास करण्याची इच्छा असणार्या लोकांसाठी, या क्षेत्रातील नवीन घडामोडी अत्यंत उत्कंठावर्धक ठरत आहेत. स्वतः तसा प्रवास करण्याची गरज अथवा उत्सुकता नसलेल्या लोकांसाठीही या बातम्या काही कमी रोचक नाहीत. आपण कुठे कधी चंद्र किंवा मंगळावर जाणार आहोत, पण त्यांसंबंधीच्या अचंबित करणार्या बातम्या आपले लक्ष वेधून घेतातच ना ? गेल्या पाच-दहा वर्षांत या क्षेत्रातील चढाओढ अधिकच रंगतदार होऊ लागली आहे.
तर चला, या प्रकारातील काही महत्त्वाच्या प्रतिस्पर्धी विमानांची माहिती घेत घेत थोडेसे भविष्यात डोकावू या !
एकंदरीत स्वनातीत विमानप्रवासाला नजिकच्या भविष्यात सुगीचे दिवस येतील असेच दिसत आहे. त्यामुळे, इतर अनेक स्पर्धकही त्या गंगेत हात धुऊन घेण्यासाठी लहान मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. त्या सगळ्यांना प्रयत्नांना कितपत यश येईल हे काळच ठरवेल. त्यातली एखादी कंपनी जगावेगळे तंत्रज्ञान विकसित करून, स्वनातीत विमानप्रवास सर्वसामान्य प्रवाश्यांच्या आवाक्यात आणून, व्यापारी विमानप्रवासात क्रांतिकारी बदल घडवून आणेल की काय, हे पाहणे मोठे रोचक ठरेल, यात संशय नाही !
१. BOOM XB-1: The Nouveau Concorde
बूम टेक्नॉलॉजी (Boom Technology, Denver, Colorado, USA) नावाची अमेरिकन स्टार्टअप कंपनी हे विमान विकसित करत आहे. XB-1 हे स्वतंत्रपणे विकसित केलेले पहिले आणि आजतागायतचे सर्वात वेगवान मुलकी विमान आहे. त्यामुळे, त्याचे विकसनकाम करताना एरोडायनॅमिक्स, वेग, हवेच्या तापमानाचा उड्डाणांवर होणारा परिणाम, स्वनातीत वेगाने उडताना हवा व विमान यांचे एकमेकावर होणारे परिणाम, इत्यादी अनेक महत्त्वाच्या बाबींबद्दलच्या शास्त्रीय ज्ञानात मोलाची भर पडली आहे व भविष्यात पडत राहील. कंपनीच्या मते XB-1 ही केवळ पहिली पायरी आहे. नवनवीन प्रयोग व तंत्रज्ञान विकसित करत राहून, अधिकाधिक उपयोगी स्वनातीत विमाने बनविण्याची या कंपनीची मनीषा आहे. XB-1चे विशेष असे आहेत : * लांबी ५१.८ मी; पंखांची रुंदी २४.४ मी * कमाल वेग : Mach 2.2 किंवा सरासरी २,३३५ किमी/तास वेगाने न्यू यॉर्क सिटी ते लंडन ३ तास १५ मिनिटांत (सद्या या अंतराला ७ ते ८ तास लागतात) * विनाथांबा उड्डाणाचे कमाल अंतर : ८,३०० किमी * कमाल प्रवासी संख्या : ५५ * इंजिन्स : तीन * अंदाजे उपलब्धता : सन २०२३ * किंमत (MSRP उर्फ manufacturer's suggested retail price; excluding options and interior) : US$२० कोटी * इतर खास वैशिष्ट्ये : --> विमानाचा सांगाडा, मध्यकणा आणि त्रिकोणी (डेल्टा) पंख यांत वैशिष्ट्यपूर्ण बदल केलेले आहेत. त्यामुळे उड्डाण सुकर होते, इंधन कमी लागते आणि सॉनिक बूमची तीव्रताही कमी होते. --> मध्यकणा आणि पंख यांचे विमानाच्या नाकापर्यंत एकत्रीकरण केलेले आहेत. यामुळे हवेत झेप घेताना आणि जमिनीवर उतरताना जास्त सुविधा व सुरक्षितता मिळते. --> अल्युमिनियम आणि कार्बन संयुगांचा (carbon composites) वापर करून विमानाचे वजन कमी करूनही बांधणी अधिक मजबूत बनवली आहे. --> प्रत्येक इंजिनाला स्वतंत्र इंधन पुरवठा करणारी variable geometry nozzle system असलेली तीन शक्तिमान General Electricची टर्बोजेट इंजिने.
BOOM XB-1: The Nouveau Concorde (जालावरून साभार)
२. SPIKE S-512: The Ferrari of the Skies
स्पाईक एरोस्पेस (Spike Aerospace, Boston, Massachusetts, USA) नावाची अमेरिकन कंपनी हे स्वनातीत वेगाने उडणारे विलासी व्यापारी विमान (luxury business jet) विकसित करत आहे. या विमानाच्या सॉनिक बूमचा आवाज इतका कमी असेल की त्यामुळे मानवी वस्ती असलेल्या जमिनीवरून उडण्यास त्याला प्रतिबंध असणार नाही, असा कंपनीचा दावा आहे. SPIKE S-512चे विशेष असे आहेत : * लांबी ३७ मी; पंखांची रुंदी १७.७ मी * कमाल वेग : Mach 1.8 (सरासरी १,९१३ किमी/तास) * विनाथांबा उड्डाणाचे कमाल अंतर : ११,४८२ किमी (हे विमान लंडन ते हाँगकाँग हे अंतर एका झेपेत पार करू शकेल) * कमाल उड्डाण उंची (altitude) : १५,२४० मी * कमाल प्रवासी संख्या : १२ ते १८ * इंजिन्स : दोन * अंदाजे उपलब्धता : सन २०२३ * किंमत (MSRP उर्फ manufacturer's suggested retail price; excluding options and interior) : US$१२.५ कोटी * इतर खास वैशिष्ट्ये --> विमानाच्या सांगाड्याच्या नावीन्यपूर्ण रचनेमुळे त्याला खिडक्या नाहीत. यामुळे विमानाचा बाह्याकार एकदम गुळगुळीत असून वेगाला अजिबात प्रतिबंध होत नाही. --> Innovative Multiplex Digital Cabin : एकही खिडकी नसल्याने विमानाच्या भिंतीच्या आतील पृष्ठभागही एकदम गुळगुळीत आहे व त्याचा उपयोग चलतचित्र, लॅपटॉपवरील प्रस्तुती (presentation) किंवा विमानाबाहेरील दृश्याचे पॅनोरामिक चित्रण पाहण्यासाठीच्या पडद्यासारखा करता येतो. --> आतले फर्निचर मोड्युलर असून ते बसण्याची आसने, विश्रांती घेण्यासाठी कोच/गादी, इत्यादींमध्ये बदलता येते (fully customizable interior configuration). वरच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनांवर कंपनीचा कॉपीराइट असल्याने त्यांची चित्रे इथे देता येत नाहीत. पण त्या रचना कंपनीच्या संस्थळावर येथे पाहता येतील. आपल्या वेळेची किंमत दशलक्ष डॉलर्समध्ये मोजणार्या व्यापारी प्रवाशांची सोय आणि गर्भश्रीमंतांची चैन, असे दोन हेतू नजरेसमोर ठेवून बनवलेल्या विमानाची रचना त्याचे, The Ferrari of the Skies, हे नाव सार्थ करते.
SPIKE S-512: The Ferrari of the Skies (जालावरून साभार)
3. AERION AS2 : The Supersonic Workhorse
एरिऑन कॉर्पोरेशन (Aerion Corporation, Reno, Nevada, USA) नावाची अमेरिकन कंपनी, Lockheed Martin या विमानबांधणी व्यवसायातील नावाजलेल्या कंपनीच्या सहकार्याने हे विमान विकसित करत आहे. हे विमान खाजगी व व्यापारी विमानप्रवास नजरेसमोर ठेवून बनवलेले आहे. Flexjet ही खाजगी विमानवाहतूक संस्था एरिऑन कॉर्पोरेशनची भागधारक आहे व तिने २० विमानांची मागणी नोंदवली आहे. General Electric या विमानइंजिनांच्या बांधणीत दादा असलेल्या कंपनीचा पाठिंबा मिळविणारी एरिऑन ही पहिली सुपरसॉनिक विमानकंपनी आहे (व्यापारी विमानबांधणीत ज्यांची मक्तेदारी आहे अश्या Boeing आणि Airbus कंपन्यांच्या विमानांत प्रामुख्याने General Electricची इंजिने असतात). AERION AS2चे विशेष असे आहेत : * लांबी ५२ मी; पंखांची रुंदी २३ मी; उंची ६.७ मी * कमाल वेग : Mach 1.4 (सरासरी १,४८७ किमी/तास) * विनाथांबा उड्डाणाचे कमाल अंतर : ७,७७८ किमी (Mach 0.95 (सब-सॉनिक) वेगाने उड्डाण केल्यास १०,००० किमी) * कमाल प्रवासी संख्या : १२ * इंजिन्स : तीन * अंदाजे उपलब्धता : सन २०२३ * किंमत (MSRP उर्फ manufacturer's suggested retail price; excluding options and interior) : US$१२ कोटी * इतर खास वैशिष्ट्ये --> स्वनातीत विमानांचे पंख त्रिकोणी (डेल्टा विंग्ज) असतात. या पारंपरिक कल्पनेला छेद देत या कंपनीने AERION AS2चे पंख सडपातळ, हवेला कमीत कमी प्रतिरोध करणारे आणि मागच्या बाजूला विमानाच्या शेपटीशी एकत्रित केलेले (integrated) आहेत. यामुळे, हवेचा प्रतिरोध ७०% कमी करण्यात यश आले आहे. तसेच कार्बन फायबर कांपोझिट्स वापरून विमानाचे वजन कमी आणि मजबुती जास्त करण्यात कंपनी यशस्वी झाली आहे. --> हे विमान सब-सॉनिक Mach 0.95 वेगाने कार्यक्षमरीत्या उडू शकते. सब-सॉनिक उड्डाणांत सॉनिक बूम होत नसल्याने हे विमान मानवी वस्तीवरून निर्धोकपणे उड्डाण करू शकते.
AERION AS2 : The Supersonic Workhorse (जालावरून साभार)
एकंदरीत स्वनातीत विमानप्रवासाला नजिकच्या भविष्यात सुगीचे दिवस येतील असेच दिसत आहे. त्यामुळे, इतर अनेक स्पर्धकही त्या गंगेत हात धुऊन घेण्यासाठी लहान मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. त्या सगळ्यांना प्रयत्नांना कितपत यश येईल हे काळच ठरवेल. त्यातली एखादी कंपनी जगावेगळे तंत्रज्ञान विकसित करून, स्वनातीत विमानप्रवास सर्वसामान्य प्रवाश्यांच्या आवाक्यात आणून, व्यापारी विमानप्रवासात क्रांतिकारी बदल घडवून आणेल की काय, हे पाहणे मोठे रोचक ठरेल, यात संशय नाही !
ते १२ प्रवासी वाले विमान तुम्ही , मी, कंजूस काका व चित्रगुप्त या शिणेर शिटीजन व आपल्या बायका यांना पुरेल ! ;))त्या विमानातून आपण सगळे जगप्रवास करत आहोत असे स्वप्न पहायला आपल्याला कोण अडवू शकते ?! :)( मी हिरव्या देशात होतो तेव्हा )प्रवास करत असताना हिथ्रो अयरपोर्ट वर कॉनकॉर्ड पाहिले होते , ( पण अर्थात पुलं म्हणाले तसे ते एखाद्या लावणी साम्राज्ञीला कोथींबीर निवडतना पाहिल्या सारखे होते ते ) पण तेव्हा पासुन एकुणच ह्या सुपर सॉनिक प्रकारा विषयी प्रचंड कुतुहल आहे ! विमान एकदा हवेत गेल्यावर बाहेरील वेगाचा अंदाज येत नाही , त्यामुळे माक स्पीडचा सुध्दा एकदा टेकॉफ घेतल्यानंतर काही विशेष फील राहील का ? शिवाय एयर ट्रॅवल इन्डस्ट्री कायमच तोट्यात असते , त्यामुळे ह्या अस्सल्या लक्षरी फ्लाईटचा धंदा कितपत चालेल ह्या बद्दल शंकाच आहे ! जरी चालला तरी सर्वसमान्य माणासला परवडणे अशक्यच ! आम्ही आपली सिसेना १७२ ची स्वप्ने पहातो , अगदी ४०-५० ह पर्यंत मिळतंय पण मेन्टेनन्स चं गणित जमवणं अवघड आहे ,असो , हे जरी घेता आले तरी जिंकलो, नाही घेता अलं तरी काही हरकत नाही =)))) :)