आंजा-टोळ
संवाद हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे मग तो संवाद शब्दाने, स्पर्शाने, लिखित व अन्य कोणत्या का स्वरूपात असेना. आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यासाठी आणि इतरांचे विचार जाणून घेण्यासाठी संवाद अतिशय महत्वाचा आहे. त्याची सुरवात बालपणापासून होते. बोबडे बोल शिकत हा प्रवास सुरु होतो आणि पुढे शाळेमध्ये अक्षर ओळख होऊन वेगवेगळ्या भाषा लिखित स्वरूपात शिकता येतात. आपला संवाद कुटुंबात, मित्रमंडळीत, समाजामध्ये मुख्यत्वेकरून तोंडी स्वरूपात होत असतो.
समाजामध्ये वावरताना, कुठलीही कृती करताना किंवा विचार मांडताना स्वतःच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये, आजूबाजूची परिस्तिथी आणि समाजभान या गोष्टींचा आपल्यावर मोठा प्रभाव असतो. आपण मांडत असलेले विचार हे आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असतात आणि हा संवाद एकास एक किंवा एकास अनेक अश्या स्वरूपात प्रत्यक्ष घडत असल्याने आपली प्रवृत्ती, कल आणि विचारधारा इतरांना कळू शकतात. त्यामुळे विचार मांडताना कित्येकजण आपल्या जसे वाटते तसेच विचार मांडतातच असे नाही. असे बुरखेधारी समाजामध्ये बहुसंख्येने दिसतात. प्रत्येकवेळी सडेतोड बोलणारी व्यक्ती विरळाच आणि त्याची किंमत देखील मोजावी लागते.
आता जर मानवाला संवाद साधताना ओळख लपवायची संधी असेल तर काय होईल? व्यक्त करत असलेल्या विचारांच्या परिणामाची फिकीर करण्याची फारशी गरज नसेल तर? मानवाच्या मनातील खरेखुरे विचार व्यक्त होतील कि नाही? हे म्हणजे गर्दीच्या मानसिकतेसारखे असावे. गर्दी मध्ये स्वतःच्या व्यक्तिमत्वाची फिकीर करायची गरज नसते आणि मानवाची वागणूक त्याच्या व्यक्तिमत्वाला सुसंगत असतेच असे नाही.
आजकालच्या जगात आंतरजालाने नेमकी हीच संधी उपलब्ध करून दिली आहे आणि त्यामुळे आंजा-टोळांचा जन्म झाला आहे. कि-बोर्डाच्या मागे लपणे सहज शक्य असल्याने आंजा-टोळांना मोकळे रान मिळाले आहे. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला या प्रमाणे उचलले बोट आणि लावले कि-बोर्डाला सहज आणि सोप्पे झाले आहे. ओळख लपवणे शक्य असणे, सहजतेने मत मांडतात येणे, व्यक्त होता येणे, तुम्ही मांडलेला विचार दीर्घ काळ टिकून राहणे आणि सर्वात मुख्य म्हणजे जागतिक व्यासपीठ व वाचक उपलब्ध असणे या सर्व गोष्टींमुळे आंतरजालावर या आंजा-टोळांची टोळधाड आली आहे.
सर्वसाधारणपणे आंजा-टोळ हे पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन असणारे, आपापला अजेंडा रेटणारे, मीच केवळ शाना असे समजणारे, इतराना त्रास देण्याची प्रवृत्ती असणारे, विरोधी मतांचा आदर नसणारे, असमंजस आणि भांडखोर किंवा केवळ टाइम पास होण्यासाठी ट्रोल करून मजा बघणारे असतात. असे हे आंजा-टोळ मग त्यांच्या वैयक्तिक मताच्या पुष्टीकरणासाठी लागणारे लेख, माहिती, बातम्या आणि इतर समविचारी टोळांच्या शोधत असतात. एकदा का समविचारी टोळ मिळाले कि त्यातून कंपू तयार होतात आणि इतरांचे साहाय्य मिळाल्याने मोठ्या जोमाने ट्रोलिंग सुरु करतात आणि अश्या रीतीने आंतर जालावर या टोळांची टोळधाड येते. या कंपूंमध्ये एकमेकांच्या आधीच समविचारी असलेल्या मतांचे समर्थन करून असे ब्रेन वॉश करतात कि आंजा-टोळांसाठी कंपूचा विचार हेच अंतिम सत्य ठरते आणि अश्या कम्पूधारकाचे मतपरिवर्तन करणे अशक्यप्राय होऊन बसते. दुसऱ्या बाजूने कित्येकदा हे आंजा-टोळ राजकीय पक्षांनी आणि वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी किंवा समाज विघातक शक्तींनी स्पॉन्सर केलेले पेड आंजा-टोळ असू शकतात.
आंतरजालावर ओळख लपवणे सहज शक्य असल्याने हे आंजा-टोळ त्यांच्या काहि कारणास्तव इतरत्र मांडू न शकणाऱ्या मतांचे प्रदर्शन अगदी सहजतेने करतात. हे विरोधी मत असणाऱ्यांना डिवचतात, हेत्वारोप करतात किंवा सरळ सरळ त्रास देतात. कित्येकदा आंजा-टोळ मांडत असलेली मते हि त्यांची मते असतीलच असे नाही किंबहुना नसतातच. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हे आंजा-टोळ आंतर जालावर धुमाकूळ घालतात. या सर्व प्रकरणात प्रामाणिकपणे लिहीणाऱ्या, मत मांडणाऱ्यांना विनाकारण त्रास होऊ शकतो.
आंतरजाल जगात सर्वत्र असल्याने आणि आंजा-टोळ हे जगात कुठेही असू शकत असल्याने कित्येकदा त्यांना कायद्याचा बडगा दाखवणे अवघड होऊन बसते. याचा हि लोकं फायदा उठवतात. तरीही कित्येक देशांमध्ये तिरस्कारणीय आणि द्वेषपूर्ण अभिव्यक्ती हा गुन्हा मानला जातो त्यामुळे आंजा-टोळांवर कायदेशीर कारवाई शक्य होऊ शकते.
बऱ्याचवेळा आंजावर चाललेल्या चर्चेमध्ये आपल्याकडे असलेल्या माहिती, ज्ञाना नुसार भाग घेण्याचा मोह होतो तेव्हा आपल्या मताचे विनाकारण खंडन करणारे, उसकवणारे, शाब्दिक प्रहार करणारे हे आंजा-टोळ ओळखता आले पाहिजेत. आणि असा प्रसंग आला तर तात्काळ व्यक्त न होता आपली प्रतिक्रिया लिहून ती काही वेळाने डोके शांत झाल्यावर पुन्हा तपासून पाहावी आणि पुढे असे काही लिहिल्याबद्दल पस्तावा होणार नाही याची खात्री करून आंजा-वर प्रकाशित करावी. यासाठी स्वयं-नियंत्रण आणि थोडीफार गेंड्याची कातडी असणे गरजेचे आहे.
जर यदाकदाचित कोणास आंजा-टोळांकडून त्रास झाला तर दुर्लक्ष करणे किंवा मिपाच्या भाषेत फाट्यावर मारणे या पलीकडे आपण काय करू शकतो, नाही का?
टीप : या धाग्याचा माहितीस्तोत्र आंजा वरील आंजा-टोळांसंदर्भातील विविध संकेत स्थळे.
- किंवा तुम्ही माझे लाडके मिपाकर आहात असा शिक्कामोर्तब करण्यात आले पाहिजे
कुणाच्याही चांगल्या कामासाठी कौतुक केले तर भक्त म्हणून हेटाळणी चा शिक्का बसेल म्हणून गप्प बसले पाहीजे अशीच विचारवंतांची कायमची अपेक्षा असते काय? चांगल्या ला चांगलं म्हणण्याची वाईट्ट खोड असलेला जुनाट नाखु