इस रंग बदलती दुनिया में !
नुकतीच एका अध्यात्म वगैरेंच्या धाग्यावर इथे एक अवांतर चर्चा सुरु झाली (म्हणजे मीच सुरु केली म्हणा!) त्याला माझं छिद्रान्वेषण कारणीभूत आहे असे काही लोकांचं मत झालं. पण तरीही त्या चर्चेतला मुख्य मुद्दा मला फार महत्वाचा वाटतो. खूप साधा सरळ मुद्दा...
एखाद्याची खिल्ली उडवण्यासाठी त्याला फक्त "काळ्या" म्हणणे पुरेसे आहे?
आपण बरेच "कॉमेडी" शो पाहतो. त्यातले निम्मे अर्धे विनोद हे शारीरिक व्यंग किंवा रंग (म्हणजेच तो किती काळा आहे त्यानुसार) यावर असतात.
काही लोक यावर खळखळून असतात तर काही यांना कमी प्रतीचे विनोद समजतात. पण हे विनोद समाजावर किंवा तसे व्यंग किंवा रंग असलेल्या व्यक्तींवर काय प्रभाव पडत असतील याचा विचार केला जातो का? त्याची कोणाला गरज वाटते का?
आपल्या बालपणातील काही प्रसंग आपल्या मनावर कायमस्वरूपी कोरले जातात काही चांगले म्हणून काही वाईट म्हणून! पण काही प्रसंग असे असतात जे की आपण मोठे झाल्यानंतर कधीतरी आठवतात आणि मग त्या घटनांचं गांभीर्य लक्षात येत, जे मग कायम लक्षात राहत...तसाच एक प्रसंग...
पाचवीला असताना हिंदीचा वर्ग सुरु होता. सगळ्यांना शिकवता शिकवता काहीतरी विनोद सांगून हसवणारे सर तास घेत होते. तास हिंदीचा असल्यामुळे सर बऱ्याच वेळा हिंदी सिनेमामधले डायलॉग म्हणून दाखवत असत आणि मुलं टाळ्या वाजवत असत.
"हिंदी सिनेमातले मुलींचे बाप कसे असतात, बिचार्या पोराकडून काही झालं की लगेच डायलॉग मारतात 'ये शादी नही हो सकती!' बिचार्या पोरांनी काय करायचं?" सर एकदम रंगात येऊन हावभाव करून सांगत होते. सगळा वर्ग ते बघून हसत होता.
माझ्या शेजारी स्वप्नील बसला होता, तो पण जोरजोरात हसला. सरांचं लक्ष त्याच्याकडे गेल्यावर ते त्याला म्हणाले,"तू काय हसतोय इतका, काळ्याला तर मुळीच मुलगी देणार नाही तो!" या डायलॉग नंतर संपूर्ण वर्ग जोरजोरात हसू लागला. तो देखील कसनुसा हसला. मी देखील, तो हसतोय हे पाहून हसतच होतो.
काय वाटलं असेल त्याला तेव्हा? जी गोष्ट त्याच्या हातातच नव्हती त्यासाठी त्याच्यावर विनोद केला गेला तोही सगळ्या वर्गासमोर! त्याचसोबत काळा असणे ही काहीतरी हसण्यासारखी गोष्ट आहे असेच बाकीच्यांना त्यानंतर वाटले असले तर त्यात नवल ते काय.
काहीच दिवसांपूर्वी, दत्तक घेतलेल्या मुलाचा रंग काळा आहे म्हणून त्याला गोरा करायला दगडाने घासणाऱ्या आईची बातमी बऱ्याच लोकांनी वाचली असेलच. "मुलगी काळी असेल तर हुंडा जरा जास्त देऊन करून टाका लग्न" असे सल्ले देणारे लोक देखील सापडतील.
मध्यन्तरी अशाच एका घटनेच्या अनुषंगाने शतशब्दकथा लिहिली होती पण लोकांचे आपल्याकडे इतकी पण वाईट परिस्थिती नाही असे म्हणणे पडले.
इथे ते पाहता येईल.
आपल्या इथे गोरा करणाऱ्या क्रिमचे विक्रीचे आकडे पहिले तरी लक्षात येत की आपण किती आहारी गेलोय गोरेपणाच्या किंवा असे म्हणता येईल की किती घाबरतो काळे असण्याला!
"ए गोऱ्या", "अरे गोरू" हे खिल्ली उडवायला वापरता येत नाही कारण त्यात अपमान करतोय का स्तुती हेच आपल्या लोकांना समजत नाही. त्यामुळे माणूस गोरा असेल तर निदान आपल्याइथे तो रंगभेदातून तरी मुक्त असतो.(हे माझे मत, कोणाला वेगळी परिस्थिती माहिती असेल तर सांगू शकता) पण मग शारीरिक व्यंग हा डोमेन उघडा असतोच!
निदान एखाद्या आंधळ्या माणसाला "ए आंधळ्या" म्हणून खिल्ली उडवू नये असे बऱ्याच(काही नमुने असतातच) लोकांना कळते. पण हे बाकीच्या व्यंगांबद्दल म्हणता येत नाही. बुटका असणे, तिरळा असणे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जाड असणे ही हक्काने खिल्ली उडवण्याची व्यंग झालेली आहेत.
जाड लोकं ही आळशीच असतात म्हणून ती जाड होतात हा समज जवळपास फिट्ट झालेला आहे त्यामुळे ते व्यंग नाहीये आणि म्हणून त्यांच्यावर विनोद करण्यात काहीच गैर नाही असे बऱ्याच लोकांना वाटते. पण खरंच सगळ्याच लोकांचा लठ्ठपणा व्यायामाने नियंत्रित होतो का हे डॉक्टरच स्पष्ट करू शकतील.
"आता मग आम्ही कोणावरच विनोद करायचे नाहीत का?", "ही असली लोकं विनोद पण समजू शकत नाहीत!" असे प्रतिसाद देखील येतील पण विनोदनिर्मितीसाठी एखाद्याचा रंग/व्यंग हे आवश्यकच असते का? सकस विनोद याशिवाय होऊच शकत नाही का? हे प्रश्न देखील येतात.
या बाबतीत समाज हळूहळू बदलेलंच पण त्यासाठी जिथे अशा गोष्टी दिसतील तिथे लोकांनी व्यक्त होण्याची गरज मला तरी वाटते.
जोपर्यंत आपण मुद्दामून अथवा अनावधाने जी गोष्ट बोलत/लिहीत आहोत ते चुकीचे आहे हे करणाऱ्याला जाणवत नाही तोपर्यंत बदलाला वाव नाही!
आपल्याला काय वाटत?
(चित्र आं.जा.वरून साभार)
(चित्र आं.जा.वरून साभार)
टोकाचे शारीर विनोद आणि पुरुषांनी ओंगळ स्त्री वेष घेतल्याशिवाय 'विनोदी' काही घडू शकत नसल्याचा ठाम विश्वास नाटक-सिनेमा-मालिकांमध्ये बळावला आहे. तेच समाजात दिसले तर आश्चर्य कसले?
अशीही बनवाबनवी मध्ये किंवा चाची ४२० मध्ये पुरूषांचे स्त्री. रुप ओंगळ आणि बटबटीत होऊ नये म्हणून घेतलेली दक्षता एक वस्तुपाठ ठरावा इतकी मर्यादा संभाळून आहे हवा येऊ द्या मधील कमी उंचीची पात्रं फक्त शारीर आणि किळसवाणा विनोदासाठी चार आहेत दूरून दर्शन वाला नाखु पांढरपेशा