पुरुष जननेन्द्रियाचे यशस्वी प्रत्यारोपण : अभिनंदन !
गेल्या अर्धशतकात शरीरातील अनेक अवयवांचे प्रत्यारोपण यशस्वी करण्यात वैद्यकशास्त्राला यश आलेले आहे. हृदय, मूत्रपिंड, यकृत, नेत्रपटल, त्वचादि अवयवांची प्रत्यारोपणे आता नियमित होत असतात आणि सामान्यजनांना ती परिचित आहेत.
हृदय, मूत्रपिंड आणि यकृत यांचे प्रत्यारोपण हे एखाद्या रोग्याच्या जीवनमरणाशी थेट संबंधित असते. या दृष्टीकोनातून आता पुरुषाच्या जननेंद्रियाकडे बघूया. त्या अवयवाचा गंभीर कर्करोग झाल्यास अथवा ते एखाद्या गंभीर अपघातात नष्ट झाल्यास तो त्या पुरुषासाठी फार मोठा धक्का असतो. संबंधित भागाच्या डागडुजीनंतर तो रुग्ण जिवंत राहू शकतो पण त्याच्या पुढील आयुष्यातील ‘पुरुषार्थ’ संपलेला असतो. अशा या जिवंत ‘जखमी’ अवस्थेत आयुष्य कंठणे किती वेदनादायक असते याची कल्पनाच केलेली बरी.
त्यामुळे या महत्वाच्या अवयवाचे देखील प्रत्यारोपण करता येईल का यावर गेले दशकभर प्रयत्न वैद्यकविश्वात चालू आहेत. नुकतेच अशा एका भगीरथ प्रयत्नाला यश आलेले आहे. याच आठवड्यात याची बातमी आपल्यातील अनेकांनी वृत्तमाध्यमात वाचली असेल. २६/४/२०१८ ला ही बातमी प्रसृत झाली आहे. Reuters या वृत्तसंस्थेकडून ती जाहीर झाली आहे. माझ्या मोबाईलवर ती येऊन धडकली होती. बातमीचा तपशील, संबंधित डॉक्टरांच्या चमूचा फोटो आणि अमेरिकेतील रुग्णालयाचे नाव हे सर्व पाहता ती विश्वासार्ह वाटली होती. आज मी तिची अधिकृत वैद्यकीय संस्थळावरून खातरजमा केली आहे आणि त्यानंतरच इथे लिहीत आहे. सामान्यजनांच्या माहितीसाठी त्याचा वृतांत सादर करतो.
अमेरिकेतील बाल्टीमोर येथील Johns Hopkins Hospital मध्ये केलेली ही शस्त्रक्रिया आहे.
अफगाणिस्तानात तैनात केलेला एक सैनिक हा या घटनेतील रुग्ण आहे. त्याचा एका अत्याधुनिक स्फोटक उपकरणाशी संपर्क येऊन तो जखमी झाला होता. त्यात त्याचा जननेन्द्रियाचा भाग नष्ट झाला होता. संबंधित डॉक्टरांनी या प्रत्यारोपणाची शक्यता आजमावली होती. आता ते एखाद्या मृत दात्याची वाट पाहत होते.
अखेर २६/३/२०१८ रोजी असा दाता मिळाला. मग त्याच्या शरीरातून शिस्न (penis), वृषण(scrotum) आणि पोटाच्या त्वचेचा काही भाग काढण्यात आला. नंतर वृषणातून अंडाशये( testes) काढून टाकण्यात आली. मग शिस्न आणि अंडाशय-विरहित वृषण यांचे प्रत्यारोपण रुग्णावर केले गेले. ९ प्लास्टिक सर्जन्स आणि २ मूत्रशल्यविशारद यांच्या १४ तासांच्या अथक परिश्रमानंतर हे काम यशस्वी झाले. मोठ्या अवयवांच्या प्रत्यारोपणाशी तुलना करता ही अतिसूक्ष्म प्रकारची नाजूक शस्त्रक्रिया आहे. ती यशस्वी केल्याबद्दल संबंधित चमू खचितच अभिनंदनास पात्र आहे. वैद्यकविश्वातील एक अभूतपूर्व अशी ही घटना आहे.
प्रत्यारोपण केलेल्या या रुग्णाला त्याची मूत्र आणि लैंगिक कार्ये ही जवळपास ‘नॉर्मल’ प्रकारे करता येतील असा विश्वास त्या डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. अर्थात लैंगिक उद्दीपन होण्यासाठी रुग्णास testosterone हे पुरुष हॉर्मोन बाहेरून द्यावे लागेल.
शस्त्रक्रियेपूर्वी मोठ्या धक्क्याने ग्रासलेला हा रुग्ण निराश झालेला होता. शस्त्रक्रियेने केलेल्या या किमयेनंतरचा त्याचा आनंद काय वर्णावा? “Now, I am OK”, हे त्याचे उद्गार किती बोलके आहेत.
आज या डॉक्टरांच्या चमूचे जगभरातून अभिनंदन होत आहे. एक डॉक्टर आणि मिपासदस्य म्हणून मीही त्यात सहभागी आहे. वैद्यकविश्वात याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. भविष्यात तो रुग्ण जेव्हा सर्वार्थाने ‘कार्यरत’ होईल तेव्हा या शस्त्रक्रियेचे यशापयश पूर्णपणे स्पष्ट होईल.
आता भविष्यत अशा प्रकारच्या प्रत्यारोपणासाठी मृत दात्याच्या अवयवाऐवजी 3D design organ तयार करता येईल का, यावर संशोधकांमध्ये विचारविनिमय चालू झाला आहे. रुग्णहितासंबंधीच्या अशा सर्व संशोधनांचे मी स्वागत करतो आणि संशोधकांना सुयश चिंतितो.
******************************************
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- लख मेरा टुनू टुनू करता है... ;) :- Sherlyn Chopra feat. Vicky & Hardik | Sukriti Kakar |4K |