Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

मिसळ अश्यांना 'पावा'यची नाही रे!

श
शाली
गुरुवार, 04/12/2018 - 05:34
💬 74 प्रतिसाद
हॉटेल मध्ये बायकोला घेवून जो मिसळ खायला जातो आणि टेबलवर बसल्यावर "दोन मिसळ" अशी ऑर्डर देतो, सॅंपलला रस्सा म्हणतो, आमच्याकडील लहान पोर सुध्दा सांगेल की हा खरा 'मिसळखाऊ' नाही म्हणून. मिसळ खायची असेल तर चार जिवाभावाचे मित्र आणि 'आपले मिसळचे' हॉटेल असेल तरच खरी गम्मत. मिसळ खायला जावून बसले की दहा-बारा मिनिटात ऑर्डर न देता मिसळच्या प्लेट समोर यायला हव्यात. ज्याला फक्त शेव आणि सॅंपल हवा ती प्लेट त्याच्या समोर, ज्याला मिसळवर कांदा पेरुनही थोडा वाटीत हवा असतो ती प्लेट त्याच्या समोर, एक्सट्रा तर्री हवी असलेल्याच्या समोर तर्रीची वाटी, कुणाच्या प्लेटमध्ये लिंबाची जास्तीची फोड असं सगळं न सांगता आले की 'मिसळखाऊ' कसा लहाण मुलासारखा प्रसन्न हसतो. दर्दी मिसळखाऊ कधी आरोग्याचा विचार करत नाही. त्याला मिसळच्या नुसत्या वासावरुन कळते की मिसळमध्ये मिठ जास्त आहे की कमी. तो मिसळला तोंड न लावताच चिमुटभर मिठ मिसळमध्ये टाकतो. तो चुकनही मिसळवर असलेल्या कोरड्या शेव-पापडीतील शेव तोंडात टाकत नाही. दोन्ही चमचे दोन हातात घेवून, अतिशय एकाग्रतेने आणि मनापासून तो सर्व मिसळ एकजीव करतो. थोडा सॅंपल अजुन घेतो. मग ईतरांची प्रगती पहातो आणि पावाचा एक तुकडा फक्त सॅंपलमध्ये बुडवून हलक्या हाताने तोंडात घालतो. मग दोन्ही हात चमच्यासहीत अंतराळी तरंगत ठेवून, डोळे मिटून पहिला घास सावकाश तोंडात घोळवतो. त्या दोन-चार सेकंदाच्या तुर्यावस्थेतच त्याला पुढील पंधरा मिनिट चालणाऱ्या 'मिसळयज्ञात' किती सॅंपल, एक्सट्रा फरसाण आणि पावांची आहूती पडणार आहे याचा अंदाज येतो. चारही मित्र जरी जिवाभावाचे असले तरी 'मिसळ मनासारखी' कालवून, पहिला घास खाताच काही सेकंदासाठी तुर्यावस्थेत जाईपर्यंत ते एकमेकांचे कुणी नसतात. या समाधीतुन ते मिसळभुमीवर (टेबलवर) ऊतरले की मग एकमेकांबरोबर ओळखीचे हसुन गप्पा आणि मिसळीला एकदमच हात घालतात. काही जण चपातीने भाजी खावी तशी पावाने मिसळ खातात. हा मिसळचा घोर अपमान आहे. मिसळ खाताना ऊजव्या हातात पावाचा लहाणसा तुकडा घेवून मिसळमध्ये बुडवावा, डाव्या हातातल्या चमच्याने मोठ्या कौतुकाने मिसळला आधार देत पावाच्या तुकड्यावर ढकलावे आणि मग तो पावाचा तुकडा पानाचा विडा खावा तसा खावा. अस्सल ‘मिसळखाऊ’ फार तर तिन वेळा डोळे आणि दोन वेळा नाक पुसेल रुमालाने. यापेक्षा जास्त नाही. खऱ्या मिसळखाऊमध्ये काही गुण असणे फार आवश्यक असते. सगळ्यात पहिला म्हणजे कोडगेपणा. सॅंपल कितीही वेळा मिळत असला तरी ‘अस्सल मिसळखाऊ’ दोन पावानंतर “जरा फरसान टाका हो” अशी कोडगेपणाने मागणी करतोच करतो. नवख्या मिसळखाऊचे ते काम नव्हे. मग हॉटेल मालकही वैतागलेल्या चेहऱ्याने वाटीत वगैरे न देता सरळ मुठीत थोडे फरसान आणुन तुमच्या प्लेटमध्ये कुस्करुन टाकतो. आता हा हॉटेलमालकाचा वैताग पाहून नविन माणूस संकोचून जाईल. पण खरी गम्मत अशी असते की मिसळखाऊचा कोडगेपणा आणि मालकाचा वैताग यांचे विचित्र नाते असते. वासराने ढुशा दिल्याशिवाय गाय जसा पान्हा सोडत नाही, तसे गिऱ्हाईकाने कोडगेपणा केल्याशिवाय मालकही खुलत नाही. तो वैताग वगैरे त्या कौतुकाचाच भाग असतो. मनापासुन, चविने, पोटभर जेवणारा असला की खरी सुग्रण जशी खुष होते ना, तसेच आगावू फरसाण घेवून “मामा, सॅंपल द्या की जरा मोकळ्या हाताने” म्हणनारे गिऱ्हाईक असले की मालकही जाम खुष होतो. सुग्रण बाई आणि असा मालक या दोघांचा आनंद एकाच जातकुळीचा. “तर्री कमीच टाका किंवा नाही टाकली तरी चालेल, कांदा वेगळा द्या” असं म्हणून पाव निरखून निरखून खाणारा कुणी असला की मालक त्या ‘पांचट मिसळखाऊ’कडे ढुंकूनही पहात नाही. ‘अस्सल मिसळखाऊ’चा दुसरा गुण म्हणजे स्वच्छता. थांबा जरा. स्वच्छता म्हणजे अती स्वच्छता असलेल्या मिसळच्या हॉटेलकडे पक्का मिसळखाऊ सरळ पाठ फिरवतो. हॉटेल जरा असे तसेच हवे. जर हॉटेलमधले टेबल ‘सांडलेली तर्री’ पुसून पुसून किंचीत लाल झालेले असतील तर हमखास तिथे चवदार मिसळ मिळणार हे सांगायला कोणी भविष्यवाला नको. आणि हॉटेलच्या एंट्रीलाच जर भजीचा घाणा काढणारा बसला असेल तर ते हॉटेल ‘आंब्याच्या पानांचे तोरण’ बांधलेल्या घरापेक्षा सुंदर दिसते. अस्सल मिसळखाऊ फार स्वच्छतेच्या नादी लागत नाही. मिसळ खावून झाल्यावर टिशूपेपरला किंवा पेपर नॅपकीनला हात पुसणाऱ्याने खरी मिसळ खाल्लीच नाही. मिसळ खाऊन झाल्यावर हात धुवावेत आणि हवेतच चार पाच वेळा झटकून मांडीवर एकदा सुलटे मग ऊलटे दाबावे. खरा मिसळप्रेमी बायकोला न घाबरता सरळ खिशातला रुमाल काढून, त्याला डाग वगैरे पडतील याचा विचार न करता खसखसून हात पुसतो आणि काऊंटरवर “किती झाले?” विचारत तिथे ठेवलेल्या शेव-पापडी, फरसाणच्या थाळीतुन फरसाण घेवून, हातावर चुरडून त्याची फक्की मारतो. (कोडगेपणा) खरा मिसळखाऊ कधीच मिसळ खाल्ल्यानंतर ताक पित नाही. त्याला ‘ताक’ म्हणजे फॅड वाटते. मिसळ नंतर कडक आणि गोड चहाच हवा. तोही किती? तर फक्त ‘जिभेच्या शेंड्याला चटका’ ईतकाच. तोही बशीत. दोन कप चहा चारजणांना पुरतो. ‘अट्टल मिसळखाऊ’चा महत्वाचा गुण म्हणजे ‘आपल्या’ मिसळीचा सार्थ अभिमान. कोल्हापुरी मिसळ, पुणेरी मिसळ, नाशिकची मिसळ हे ढोबळ अभिमान झाले. मिसळखाऊ कधी गावाच्या नावाने मिसळला ओळखतच नाही मुळी. तो ओळखतो ‘तात्याची मिसळ’ ‘भाऊची मिसळ’ ‘रामाची मिसळ’ वगैरे. आणि तिचाच अभिमान बाळगतो. अर्थात अभिमान, मग तो कोणत्याही गोष्टीचा असो, वाद हा आलाच. मिसळखाऊंचे पण वाद होतात, खटके ऊडतात. पण ते इतरांशी नाही तर मिसळखाऊंबरोबरच. ‘भाऊची मिसळ’चा कट्टर भक्त जर ‘रामाची मिसळ’च्या अट्टल भोक्त्याला भेटला तर वाद अटळच. मग या वादावादीचा शेवट तर्रीच्या लाल ओघळातच मिटतो. दोघेही भक्त आलटून पालटून एकमेकांकडे मिसळ खायला जातात आणि “आमच्या इतकी भन्नाट नाही, पण तुमचीही मिसळ भारी आहे” असे एकमेकांना सांगून वाद मिटवतात. अर्थात वर वर्णन केलेले ‘मिसळखाऊ’ आणि अशी ‘मिसळ’ मिळणारी हॉटेल तुम्हाला पुण्यात, कोल्हापुरात किंवा नाशकात नाही मिळणार. हा, ऊपनगरात मिळाली तर मिळतील. पण गावाकडे मात्र तुम्हाला हमखास अशी ‘प्रसिद्ध मिसळ’ची हॉटेल मिळतीलच मिळतील. हे झाले मिसळपुराण. पण हे मिसळ वाले ‘भाऊ’ ‘तात्या’ ‘रामा’ हे एक वेगळेच आणि त्यांच्या मिसळसारखेच चटकदार प्रकरण असते. आमचा मिसळवाला रामाही त्याला अपवाद नाही. तर रामाविषयी पुन्हा कधीतरी, तोवर शोधा आपला मिसळवाला. काय……..

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 24989 views

💬 प्रतिसाद (74)
प
पुंबा Sun, 04/15/2018 - 17:07 नवीन
येस्स्स.. चला, आता जलपर्णी पुन्हा वाचणे आले.. :-)
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sat, 04/14/2018 - 11:41 नवीन
अमुक एक गोष्ट तमुकच पद्धतीने केली पाहिजे तरच भारी, नायतर तुम्ही बोगस.. असला फालतू प्रकारच आवडत नसल्याने लेख आवडला नाही.
  • Log in or register to post comments
श
शाली Sun, 04/15/2018 - 17:12 नवीन
मी हे सहज लिहिलय हो.असंच असावं असा बिल्कूल हट्ट नाही. प्रतिसाद वाचून घाबरल्यासारखं झालं चक्क. आणि हो काही गोष्टी क्लिअर करतो. मिसळ बनवायला खरच कौशल्य लागते. मी गावी जीथे मिसळ खातो ते स्वत: शेव आणि पापडी घरी बनवतात. मसाले अगदी घरचे असतात. नकारात्मक ज्यांनी लिहिलय त्यांनी खरी मिसळ खाल्ली नसावी. मी कोल्हापुर, पुणे, नाशिक अशी कोणतीही वर्गवारी केली नाहीये. आपापली मिसळ असे म्हटलंय. काहीही गांभीर्याने घ्यायची सवय घातकच. हलकं फुलकं लिहिलय हो मी.
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 04/16/2018 - 05:05 नवीन
हलका फुलका लेख छान आहे. या लेखातली स्टाईल विनोदासाठी तशी घेतलेली स्पष्ट दिसतेय. ती फार सीरियस नजरेने पाहणं पटत नाही. तसं तर मग पुलंचा "पानवाला" आठवावा. त्यातही अमुक प्रकारे पान खाणारा अस्सल, तमुक खाणारा बावळट वगैरे असं पूर्ण लेखभर आहेच की.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 04/16/2018 - 06:39 नवीन
रविवारच्या खिम्यातला किंवा मटणातला रस्सा थोडा फार जास्तच करावा आणि मग त्या रश्यात फरसाण-पापडी-गाठीया-कांदा घातला की उत्तम मिसळ बनते. मटणाच्या रश्यातल्या आणि रस्सा जर ताजे घरगूती मसाले टाकलेला असेल तर अशा मिसळीला कुठेही तोड नाही. आणि अशा मिसळीबरोबर तांदळाची गरमगरम ट्म्म फुगलेली भाकरीच हवी. एकदा ट्राय करा आणि मग बोला.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 04/16/2018 - 07:58 नवीन
लाखातलं बोललात! मटणाच्या रश्श्यात भेळ नाहीतर फरसाण टाकून खाणे हा आमच्या घरी यात्रेतला आवडता भाग आहे.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Mon, 04/16/2018 - 06:56 नवीन
ह्या रश्यात मिसळ खरंच फार टेस्टी लागते , पायापावच्या रश्यातही छान लागते.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 04/16/2018 - 14:35 नवीन
हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर,
खाण्याच्या व्यवसायात कन्सिस्टंसी खूप महत्वाची आहे हे यांना कधी कळणार देव जाणे.
रोचक विधान आहे. तुम्हाला कन्सिस्टंसी म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे ते मला माहित नाही. मात्र मामलेदार मिसळीचा स्वाद कन्सिस्टंट आहे हे नक्की. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 04/16/2018 - 14:44 नवीन
अभ्या..,
ह्या सगळ्या मिसळीतली मोस्ट भंगार मिसळ म्हनजे मामलेदार.
मामलेदार मिसळ एकतर जाम आवडते किंवा आजिबात आवडंत नाही लोकांना. मधलेअधले कोणी सापडंत नाहीत. मा.मि.मुळे मिसळीविषयीच्या संकल्पनांत पराकोटीचा फरक (=प्याराडिम शिफ्ट) पडतो. मग काय नावडलं तुम्हाला तिच्यातलं? जाणून घ्यायची उत्सुकता आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/17/2018 - 07:33 नवीन
नुसतेच जळजळीत आणि तेलकट.... अर्थात, जोपर्यंत मटणातल्या रश्यातल्या मिसळीची माहिती न्हवती, तोपर्यंत मामलेदार हा एकमेव पर्याय होता. सध्या मात्र घरीच मिसळ खाणे. डोंबोलीत पण मामलेदारची मिसळ मिळते पण तिथे उगाच अपमानास्पद वागणूक मिळते.शिवाय उगाच अंग चोरून मिसळ खायला लागते. टेबल खूर्ची वर खाणे, हाच मुळात अन्नाचा अपमान, असे मी समजतो. मस्त ऐसपैस मांडी घालून, एका हातात भाकरी आणि मग उजव्या हाताने भाजी-आमटी ओरपण्यातले सूख काही वेगळेच. असो, खाण्यात आणि पिण्यात मॅनर्स बाळगाणारी व्यक्ती चार हात दूर ठेवणेच उत्तम.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 04/17/2018 - 08:00 नवीन
नुसतेच जळजळीत आणि तेलकट...
+१
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 04/17/2018 - 08:25 नवीन
रश्श्यावर तेलाचा नुसता तवंग होता की चवीलाही तेलकट होता? की फरसाण तेलकट होतं? की दोन्ही? कुतूहल म्हणून विचारतोय. -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/17/2018 - 13:20 नवीन
दोन्ही ....
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 04/17/2018 - 19:02 नवीन
मला आवडणाऱ्या तवंग आणि तिखटजाळ या गोष्टी नेमक्या तुम्हांस आवडंत नाहीत. पिंडे पिंडे रुचिर्भिन्ना:. -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/18/2018 - 03:47 नवीन
एकदा माझ्या हातची मिसळ खाऊन बघा.... मग ठरवा... अर्थात, माझ्या कडे टेबल-खूर्ची नसल्याने, जमीनीवर मांडा ठोकूनच जेवावे लागेल. तेलकट आणि तिखटजाळ, म्हणजेच चमचमीतपणा नाही.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 04/18/2018 - 08:29 नवीन
अर्थात तुमची मिसळ फक्कडच जमलेली असणार यावर वाद नाही. मात्र मिसळ चमचमीतच हवी असं बंधन नसावं (असा माझा अंदाज). पिंडे पिंडे रुचिर्भिन्ना:. -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 04/18/2018 - 20:10 नवीन
+१ मग कधी येताय?
  • Log in or register to post comments
उ
उपेक्षित गुरुवार, 04/19/2018 - 14:52 नवीन
किती तो मी पणा मूवी साहेब ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 04/20/2018 - 04:04 नवीन
मी "मी" पणा करीन, नाहीतर करणार नाही...त्यात तुमचा काय संबंध?
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Tue, 04/17/2018 - 10:35 नवीन
नुसता नावाजलेला प्रकार झालाय. मामलेदार कडे नावाखातीर लोकं जातात. तिखट रस्सा बास . आता ठाण्यात सुरुची मिसळ आलीये म्हणून मामलेदार फ्रांचायझी देतोय. मिसळ कधी पण सध्या ठिकाणी खावी. किंवा घरीच . हे ओव्हर रेटेड लोकांकडे नाही.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 04/17/2018 - 11:22 नवीन
ठाण्यात अन्य ठिकाणी कैक पट उत्तम मिसळ मिळते. मामलेदार इज नॉट bad बट सर्टनली नॉट बेस्ट. नॉट इव्हन क्लोज टू बेस्ट.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/17/2018 - 13:21 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Tue, 04/17/2018 - 13:34 नवीन
विषय मिसळीचा नाही मिसळखवय्यांबद्दल आहे. आता यावर अधीक चर्चा करण्यासारखे काही राहिलेलं नाही. चर्चेचा रोख भलतीकडेच गेला आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 05/11/2018 - 13:56 नवीन
हणमंत अण्णा, मी दोन दिवस न हागता येत्या रविवारी पहिल्या ऊताची मिसळ खाऊन रेक्टमास काशी दाखवणार आहे रेक्टमास काशी दाखवणार? हा खरंच भारी प्रकार दिसतोय. माझ्या माहितीप्रमाणे जिथे काशी दिसते त्यास अॅनस म्हणतात. ही काशी जर रेक्टमापर्यंत पोहोचणार असेल तर मिसळ लई म्हंजे लईच भारीये. शिवाय रेक्टमात रक्तमांस दाटून राहील ते वेगळंच! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा