Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

गाणे कसे बनते?

A
arunjoshi123
Wed, 04/11/2018 - 08:01
💬 69 प्रतिसाद
केवळ पद्यसंवादच करणारा समाज गोष्टींत ऐकला आहे, पण प्रत्यक्ष कधी होता का माहित नाही. जगात सर्व प्राचीन साहित्य मुख्यतः पद्य स्वरुपात कशामुळं असलं पाहिजे? काही वेद (कि वेदांचा काही भाग?) सोडले तर जवळजवळ सारा इतिहासच पद्य आहे असं वाटतं. समाजाला इतकी कवनप्रियता का असावी? छंदबद्धता आवश्यक असणे हा पद्द्यातिरेक होता का? असो. ------------- कविता आणि गाणे यांच्यात मूलभूत फरक काय? कायद्याची भाषा, सरकारची भाषा, मानवी व्यवहार करणारांची भाषा, सामान्य लोकांची भाषा, आपल्या सुहृदांची भाषा आणि आत्मसंवादाची भाषा हे सुलभीकरण पुढे नेत नेत शेवटी गाणे आणि अंततः कविता बनत असावी. जे लिहिलं आहे, जे म्हणायचं आहे आणि जो अर्थ निघू शकतो हे सगळं कायद्याच्या भाषेत जवळजवळ एकच असतं. कवितेत जे लिहिलं आहे, जे म्हणायचं आहे आणि जो अर्थ निघू शकतो हे पूर्णतः मित्यांच्या तीन अक्षांसोबत काटकोनात असू शकतं. गाणं कवितेच्या मानानं लोकभाषेशी जवळचं असावं, अर्थातच बर्‍याच कविता स्वतः गाणी असतात हे आलेच. कविता त्यामानाने आशयघन असतात. कवितेत कधीही सविस्तर वर्णन नसतं. अगदी अलंकारांनी दिलेली शक्ती जरी दोन मिनिटं बाजूला काढून पाहिली तरी कवितेतले शब्द आशयाच्या दृष्टीनं फार विस्तारलेले दिसतात. कवितेत अनेकदा न लिहिलेले शब्द दिसू लागतात. अनेक कवी अशा कविता लिहितात ज्या वाचून अज्ञान प्रांतात घोड्यावर बसवून एकटेच सोडून दिले आहे असे वाटते. जो आशय पाहायचा आहे तो पाहा, ज्या गावाला जायचं आहे त्या गावाला जा. म्हणून माझ्यासारख्या माणसाला अशा अ‍ॅडव्हेंचर टुरिझम पेक्षा गाण्यांचा नॅचरल टुरिझम भावतो. ----------------- गाणी त्यामानानं सोपी असतात. जे एरवी गद्यात लिहिता आलं असतं ते मिठ-मिर्चू-लोणी लावून पद्यात सांगीतलं जातं. गाण्याचं एकमात्र आवश्यक नि पुरेसं लक्षण म्हणजे चाल असावं. चाल नसली तर त्याला थेट गद्य म्हणावं. गाण्यात बाकी बर्‍याच गोष्टी नसतील तर चालतील. चालीत बसणार्‍या वारंवार उधृत होणार्‍या ओळींपासून आदिवासी लोकांनी पहिलं मुखडा-गाणं बनवलं असावं. मग ते लांबत जाऊन मोठं गाणं बनलं असावं. आज एक विकसित कला म्हणून कवी लोक कथानकात दिलेल्या परिस्थितीच्या अवतीभोवती रेटून गाणी बसवताहेत. पण कधी काळी कोण्या मोठ्या बृह्त्कथेचा भाग नसलेली सुटी सुटी गाणी लोकांना सुचत असावीत. ========================================================== आता गाणं कसं बनतं? (हा प्रश्न आहे. उत्तराचा उपोद्घात नाही.). माझ्यासारख्या लेमॅनला वाटतं ते असं: एखाद्या चित्रपटात, नाटकात, अल्बममधे वा थीममधे एखाद्या परिस्थितीमधे एखादा आशय मांडायचा असं दिग्दर्शक कविस (लिरिसिस्टास मराठीत काय म्हणतात?) सांगेल. मग कवी काही ओळी लिहिल. याला कोणीतरी चाल देईल. (या चाल देणाराला म्हणतात काय?). कोणी संगीत देईल. कोणी गाईल. काय मॅच होतं काय नाही यानुसार एक इटरेटीव प्रोसेस चालेल. गाण्याचे बोल ते चाल ते वाद्ये ते गायक ते सुर बरंच काही मागे पुढे होत शेवटी एक सुसंगत गाणं बनेल. ज्या गीतांना आज आपण अजरामर इ म्हणतो त्यांची कच्ची रुपं त्यांच्या निर्मात्यांनी पाहिली असणार. गाण्यांची ही बाळंतपणं आपल्यापैकी कुणी पाहिली आहेत काय? हे कुतुहल आहे म्हणून धागा काढला आहे. ============================================================= लेखकाला (म्हणजे मला) या क्षेत्रातलं अजिबात काही कळत नाही. सहज वाटलं ते लिहिलं आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 31719 views

💬 प्रतिसाद (69)
प
प्रदीप Fri, 04/13/2018 - 14:22 नवीन
  • गाणे बनताना आधी काव्य बनत असे . काही वेळेस मात्र संगीतकार त्याच्या सोयीनुसार बदला सुचवीत असे
चित्रपट संगीत बहुतांशी मी, व इतरांनी लिहील्याप्रमाणे, प्रथम चाल व नंतर शब्द असा प्रवास असावयाचा. तुम्ही लिहील्याप्रमाणे ओ. पी. तसे करत नव्हते, हा एक अपवाद समजावा. तसेच मला वाटते, साहीर फारसा चालींवर शब्द बांधण्यास राजी नसावा. ह्याविषयी नक्की काही सांगता येत नाही. कारण त्याने सरसकट अशी भूमिका घेतली असती, तर तो चित्रपटसृष्टीत फारसा टिकला नसता. पण तो तसा टिकून होता, तो काही निव्वळ त्याच्या शायरीच्या जोरावर होता, असे मानने कठीण जाते. त्याच्या ईगोईस्टिक वागण्यामुळे रोशन सोडल्यास, प्रथम दर्जाच्या संगीतकारांनी त्याच्यासमवेत काम फारसे केले नाही. मग त्याची गीते, खैय्याम, चित्रगुप्त व जयदेव ह्यांजबरोबर आहेत. त्यातील काही गीतांवर 'इथे गीत प्रथम झाले आहे, व चाल नंतर' असा स्पष्ट ठसा दिसतो. उदा. 'तेरे बचपन को जवानी की दुवा देती हूं' हे आर्त गाणे. मराठी भावगीतांच्या बाबतीत मात्र बहुतांश, गीत प्रथम व चाल नंतर असे होते. (मराठी चित्रपट संगीतात असे होतेच असे वाटत नाही). वसंत प्रभू, खळे व हृदयनाथ मंगेशकर ह्यांनी अनेकानेक उत्तम कवितांना चाली लावून त्या अजरामर केलेल्या आहेत.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 04/12/2018 - 08:36 नवीन
बर्‍याच अंशी चर्चा छान चालली आहे. प्रदीपदा लिहीत आहेत हा मोठाच महत्त्वाचा पॉइंट आहे. गाण्याची चोरी याबद्दल पूर्वी बरेचदा चर्चा झाल्या आहेत तरी तेच तेच मुद्दे येताना बघून मजा वाटली.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ गुरुवार, 04/12/2018 - 08:52 नवीन
गाण्याची चोरी याबद्दल पूर्वी बरेचदा चर्चा झाल्या आहेत तरी तेच तेच मुद्दे येताना बघून मजा वाटली. -- या चर्चांचा एकादा दुवा मिळू शकेल काय ? ---- लेख व काही प्रतिसाद दोन्ही आवडले आहेत.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 04/12/2018 - 09:54 नवीन
https://www.misalpav.com/node/26715 हा एक लगेच सापडला. मला वाटते मारवा यांच्याशीही आमची या विषयावर उद्बोधक चर्चा झाली होती. अजून आहेत. ते परत कधीतरी. :)
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 04/12/2018 - 09:25 नवीन
https://www.youtube.com/watch?v=FOmsmhJ-gIs&t=1406s ------------------------------- अनभिज्ञ श्रोत्यासाठी मालिका.
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे गुरुवार, 04/12/2018 - 11:11 नवीन
प्रतिसादांमधूनही छान माहिती मिळत्ये.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 04/12/2018 - 11:25 नवीन
१९६७ चा सिनेमा शागीर्द. त्यावेळी 'दिल विल प्यार व्यार मै क्या..' ह्या गाण्याबद्दलचा रेडियोवर ऐकलेला एक किस्सा. ह्या गाण्यात मजरूह सुलतानपुरीनी दिल्/प्यार. बरोबर अनेक ऊर्दु शब्दही घातले होते. गीत ऐकल्यावर दिग्दर्शक म्हणाले- गाण्यात जरा जास्तच जड शब्द आहेत.' वो(सायरा बानोचे पात्र) ये सब दिल/प्यार कुछ नही जानती.. दिल विल प्यार व्यार हटा दो..' हेच वाक्य मजरूहनी पकडले .. व गाण्यात बदल केला- जसे गाण्यात पुढे घर-वर नाम वाम.. लट वट. नैन वैन.. व थोड्याच वेळात दिग्दर्शकाना पाहिजे तसे गाणे तयार झाले.
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 04/12/2018 - 20:42 नवीन
नेहमीच्या रागदारी कोलाहलात चार सुरेल सूर कानी पडले. प्रदीपदा, चौरा, एस, विजुभाऊ, राही यासारख्या दर्दी रसिकांचे प्रतिसाद खासच.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 04/13/2018 - 07:21 नवीन
चाल आधी, गाणे नंतर या विषयी मला वाटते ते..... अरे संसार संसार हे गाणे घ्या. ते ज्या वृत्तात आहे त्याच वृत्तात गीतकाराने नवे गीत लिहिले तर संगीतकाराच्या डोक्यात बाय डिफॉल्ट जुनी चाल आधी वाजेल आणि नवी चाल बांधण्यात अडचण येईल. हृदयनाथांनी ही आठवण सांगितली आहे. सुरेश भट कविता वाचताना "स्वतःच्या" चालीवर गाऊन दाखवत. एका गीताच्यावेळी भटांनी गाऊन दाखवलेली चाल "अनलर्न" करण्यास सहा महिने लागले अशी आठवण हृदयनाथांनी सांगितली आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Fri, 04/13/2018 - 17:48 नवीन
खळ्यांनी 'गोरी गोरी पान' बद्दलही असेच म्हटले होते.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 04/13/2018 - 09:45 नवीन
इथे काही उत्तरं मिळण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Fri, 04/13/2018 - 14:07 नवीन
अगोदरच्या प्रतिसादात मी 'जुन्या जमान्यातल्या' गाणी बनवण्याची प्रक्रिया लिहीली होती. त्यात थोडी माहिती लिहायची राहून गेली. साँग- रेकॉर्डिंग स्टुडियोत, अर्थात एक कंट्रोल रूम असते, जिथे मिक्सर व मॉनिटरींगची सुबिधा असते. साउंड रेकॉर्डिस्ट, व संगीत दिग्दर्शक येथे बसून काम करतात. सिंगर्ससाठी वेगळा बूथ असतो, आणि वादकांसाठी मोठा हॉल असतो. ह्या हॉलमधे अ‍ॅकॉस्टिक इन्सुलेशनचे पडदे वापरून वेगवेगळे विभाग केलेले असतात-- स्ट्रिंगसाठी एक, पर्क्युजनासाठी एक इत्यादी. वादक ह्या विभागांत बसून वाजवतात. सिंगर्स व मुख्य पर्क्युजन्स ह्यांना हेडफोन्स दिलेले असतात, ज्यातून ते (संपूर्ण किंवा 'सबमिक्स') ऐकू शकतात, जेणेकरून ते एकमेकांशी 'सिंक' मधे रहातात. बाकी सर्व वादक नोटेशन्सवरून, व मुख्य पर्क्युजनचा आधार घेऊन वाजवतात. ह्याचा अर्थ बहुतांशी वादकांना, गायकांचे गाणे ऐकू येत नसते! आणि ह्या सर्व सव्यापसवातून गाणे जेमतेम तीन- चार तासांत रेकॉर्ड व्हायचे. हे सर्व येथे सविस्तर अशासाठी लिहीले, की ह्या प्रक्रियेची कॉम्प्लेक्सिटी कळावी, व त्यात गुंतलेल्या सर्वांच्या स्किल्सची कल्पना यावी. जर बरीचशी अ‍ॅरेंजमेंट अ‍ॅरेंजर्सच (तत्कालीन शब्दः सहाय्यक अथवा असिस्टंट) करत असतील, तर त्यात संगीत दिग्दर्शकाचे काय काम, असा प्रश्न केला जातो. तर, उत्तम अ‍ॅरेंजर्स घेणे, त्यांना तसेच वादकांना त्यांच्या प्रतिभेस अनुसरून काम करण्याची मुभा देणे, जेणेकरून ते मोटिव्हेट होतील, आणी तरीही त्या सर्व प्रक्रियेवर आपला ठसा उमटवणे, हे करण्यासाठी, मला वाटते, अतिशय धैर्य लागते, स्वतःविषयी भरपूर कॉन्फिडन्स असावा लागतो. ह्या दॄष्टीने त्या काळचे अनेक संगीतकार 'इन्स्टिट्यूशनस' होते. गुणी माणसांना हेरून आपल्याकडे कामास लावणे, त्यांच्या प्रतिभेस वाव देणे व तरीही आपली शैली, स्वतःच्या प्रत्येक गीतावर उमटवणे, हे येरागबाळ्याचे काम नोहे. पैसा ह्यांनी 'ढापलेल्या चालीं' ह्या संबंधात पूर्वी झालेल्या चर्चेचा धागा टाकला आहेच, तेव्हा ते सगळे पुन्हा सांगत बसत नाही. पण, थोडक्यात, कुणाचीतरी चाल घेऊन ती सर्व गाण्यात तशीच्या तशी वापरणे व तिचा फक्त आधार घेऊन, त्यावरून गीत स्वतंत्ररीत्या विकसीत करणे, ह्यात फरक आहे. मला तर असे वाटते की, तत्कालीन संगीतकारांनी असे काही इकडून- तिकडून घेतल्यामुळे आमचा अतिशय फायदा झाला. फक्त भारतीय शास्त्रीय व लोकसंगीतावर आधारलेल्या गीतांचा विचार केला तरी, तसे केल्याने आमच्सासारख्या आम जनतेची शास्त्रीय संगीताची तोंडओळख झाली. आणि लॅटिन अमेरिकन लोकसांगीताची शैली व तेथील काही वाद्ये (कोंगो, बोंगो), ईस्टर्न युरोपियन शैली व काही वाद्ये (अ‍ॅकॉर्डियन), मध्यपूर्वेतील संगीत ह्यांनी आमच्या सांगितीक जीवनात बहुविधता आणली. पाश्चिमात्य शास्त्रीय संगीतावर तर तेव्हा सर्व ऑर्केस्ट्रेशनच अवलंबून होते-- व आताही आहेच. तेव्हा अनायासे आम्हाला, त्या संगीताची किंचीत का होईना, जाण आली; त्यांच्या व्हायोला, चेल्लो सारख्या वाद्यांना आम्ही आपलेले करून घेतले. ह्यामुळे कळत- नकळत आमचे कान त्या त्या प्रकारांच्या संगीतासाठी 'तयार' होत गेले, आमच्या सांगितीक सीमा सहजरीत्या विस्तारल्या. हे वाटते तितके साधे, सरळ नाही. त्यांनी तसे काहीच केले नसते, तर आम्ही अगदी खास जुन्या भारतीय शास्त्रीय संगीतावर(च) आधारलेली गीते ऐकत बसलो असतो! आता हेच पहा ना-- पौरात्य संगीतातून आपण काहीच घेतलेले नाही ('सायोनारा, सायोनारा' हा एकमेव अपवाद!) त्यामुळे मलातरी चिनी ऑपेराचे संगीत कानावर पडले की ते एकदम परके वाटते. ह्याउलट तुर्की रेस्टोराँमधे सुरू असलेले संगीत आपलेसे वाटते.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 04/14/2018 - 06:06 नवीन
>>जर बरीचशी अ‍ॅरेंजमेंट अ‍ॅरेंजर्सच (तत्कालीन शब्दः सहाय्यक अथवा असिस्टंट) करत असतील, तर त्यात संगीत दिग्दर्शकाचे काय काम, याचे उत्तर अ‍ॅरेन्जर्स संगीत दिग्दर्शक म्हणून फारसे यशस्वी झाले नाहीत यात आहे. लक्ष्मीकांत प्यारेलाल हा अपवाद असावा. आर डी स्वतः एसडींचे असिस्टंट होते पण आर डी चे असिस्टंट असलेले बासू, मनोहारी सिंग किंवा कल्याणजींना असिस्ट करणारा बाबला हे संगीत दिग्दर्शक म्हणून यशस्वी झाले नाहीत.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Fri, 04/13/2018 - 15:02 नवीन
माझा ५ गाणी रेकॉर्ड करायचा मानस आहे. पण मला संगीत संयोजनातला ग चा म येत नाही. === गीत आणि चाल एकदम रेडी असेल तर गायकासकट/ गायकाविना संगीत संयोजन, रेकॉर्डिंग, एडिटिंग करून फायनल गाणे लाँच करायला साधारण किती खर्च येतो ? किंवा जरा मला तीच गाणी इतर संगीतकारांना विकायची असतील तर तशी सोय आहे का?
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Fri, 04/13/2018 - 15:18 नवीन
मी त्या क्षेत्रात काम करत नाही, तेव्हा मी ह्याबद्दल आपणास काहीच ठोस माहिती देऊ शकत नाही. ह्याबद्दल माफी असावी. मला वाटते, सध्या डिजिटलच्या जमान्यात,स्टुडिओचे भाडे (साउंड इंजिनीयरसकट) फारसे नसावे, कारण आता ही कमोडीटी झाली आहे. संगीत आयोजकांच्या व गायक गायिकांच्या बाबतीतही असेच. अर्थात टॉपचे अ‍ॅरेंजर्स, व गायक गायिका महागात पडणार, पण त्यांच्या कामाचा दर्जाही तसाच असणार (संपूर्ण प्रक्रियेस किती वेळ लागेल व म्हणून किती तासांसाठी स्टुडियोचे बुकींग करावे लागेल, हे जमेस धरून). थोडक्यात माझा होरा असा की अगदी कमी बजेटपासून, बर्‍याच खर्चिक -- अशी वाईड रेंज आता आपल्या येथे सध्या उपलब्ध असावी. खरे तर, विजूभाऊंना ह्याविषयी विचारावे, कारण त्यांनी हे स्वतःच अलिकडे कधीतरी केलेले आहे.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 04/16/2018 - 12:45 नवीन
प्रदीप जी धन्यवाद...!! विजू भाऊ कृपया तुम्ही या बाबतीत मदत कराल का??
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 04/16/2018 - 12:45 नवीन
प्रदीप जी धन्यवाद...!! @विजू भाऊ कृपया तुम्ही या बाबतीत मदत कराल का??
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 04/16/2018 - 13:03 नवीन
नक्की
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 04/13/2018 - 15:30 नवीन
उत्तम माहिती मिळत आहे. आतापर्यंत सर्व चालीना फक्त आणी फक्त संगीतकारच चाली लावतो असा समज होता. पण ह्या चाली लावण्यात त्याच्या टीममधले सहभागी असू शकतात असे दिसते.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days ago
  • सुंदर !!
    6 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा