Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

आधुनिक दृष्टिकोनातून रामायण

स
स्वीट टॉकरीणबाई
Fri, 03/23/2018 - 10:50
💬 122 प्रतिसाद
'खरे सुपरमॅन - आमचे आप्पा' या लेखात ज्या आप्पांचा (माझ्या सासर्यांचा) उल्लेख आहे त्यांनी गेल्या महिन्यात ASCOP साठी एक लेख लिहिला होता. 'आधुनिक दृष्टिकोनातून रामायण'. तो मी इथे पोस्ट करीत आहे. पण त्या आधी थोडी प्रस्तावना. आप्पा आता सत्त्याण्णव वर्षांचे झाले आहेत पण तोच उत्साह आणि स्पष्ट विचारशक्ती तशीच कायम आहे. माझ्यासारख्या साधारण वाचकांनी वाचलेल्या व ऐकलेल्या रामायणात बर्याच उपकथा आहेत. मात्र मूळ संस्कृत रामायणात काय लिहिलेलं आहे हे आपल्या पैकी फारच थोड्या जणांना माहीत असेल. माझ्या सासूबाई (आई) संस्कृत पंडिता. सासरे (आप्पा) यांचं संस्कृत अतिशय उत्तम. दोघांनी मिळून मूळ संस्कृतमधलं वाल्मीकि रामायण वाचलं. हे मूळ रामायण आहे की नाही याबाबत संस्कृत विद्वानांमध्ये वाद नाही त्या अर्थी तेच मूळ असं मी समजते. (आपल्यासारख्या ज्यांना संस्कृत अजिबात वाचता येत नाही त्यांच्यासाठी देखील ते उपलब्ध आहे. त्याचं मूळ संस्कृत काव्य व वाक्य बाय वाक्य मराठीत अनुवाद 'विदर्भ मराठवाडा बुक कंपनी, पुणे' यांनी प्रकाशित केला आहे.) वाचकांच्या प्रतिक्रिया मी आप्पांपर्यंत पोहोचवीनच आणि त्यांचं स्पष्टीकरण तुमच्यापर्यंत. आधुनिक दृष्टिकोनातून रामायण आधुनिक दृष्टिकोनातून रामायणाचा विचार करायचा म्हणजे शास्त्रीय दृष्टीनं. धार्मिक अगर श्रद्धाळू दृष्टीनं विचार करतांना कोणत्याही व्यक्तीच्या विशिष्ट कृतीवर अगर एखाद्या घटनेवर “असं का?” असा प्रश्न विचारता येत नाही किंवा त्याची योग्यायोग्यता ठरवता येत नाही. फक्त शास्त्रीय दृष्टिकोनांत हे स्वातंत्र्य आपल्याला मिळू शकतं. रामायणाबद्दल पहिला प्रश्न हा आहे की हा इतिहास आहे की वाल्मीकि ऋषींच्या अलौकिक प्रतिभेतून निर्माण झालेली कथा आहे? अर्थात हा इतिहास असो अथवा कल्पित कथा असो, त्यामध्ये त्या काळच्या राजे लोकांचं, तसंच सामान्य लोकांचं जीवन वास्तववादी पद्धतीनं रंगवलेलं आहे. त्या काळच्या समाजपद्धती, धार्मिक प्रथा, रूढी अशा सर्व गोष्टींवर उत्तम प्रकाश टाकलेला आहे. असं सर्व असूनही वाल्मिकींनी ती अत्यंत रंजक केलेली आहे. साहित्यिक कृति म्हणूनही तिच्याकडे पाहिलं तरी सर्व जगातल्या विद्वानांनी तिला वाखाणलं आहे. त्या कथेत मनुष्यस्वभावाचे विविध कंगोरे पहायला मिळतात. प्रेम, द्वेष, राग, लोभ, तिरस्कार अशा विविध अगदी टोकाच्या भावना बघायला मिळतात. शास्त्रीय दृष्टीनं बघायचं तर अयोध्येपासून लंकेपर्यंतच्या भूगोलाचं आणि त्यांत राहणार्या वेगवेगळ्या समाजांचं सविस्तर चित्र लेखकानं कसं रंगवलं याचं आश्चर्य वाटतं. कारण त्याकाळी सर्वत्र वन पसरलेलं, रस्ते नाहीत, दळणवळणाची कोणतीही साधने नाहीत, एकट्यादुकट्यानं प्रवास करणं अत्यंत धोक्याचं, अशा सर्व अडचणींवर मात करून राम, सुग्रीव व त्याचे वानरसैन्य यांच्या मदतीनं समुद्रावर सेतू बांधून लंकेत जाऊन रावणाचा वध करून सीतेला सोडवतो हे सर्व चित्र विलक्षण आहे यात शंका नाही. रामायणाची कथा सर्वांनाच उत्तम माहीत आहे. त्यामुळे त्याबद्दल बोलण्याची गरज नाही. पण त्यातल्या विविध घटना आणि विविध व्यक्तिमत्वं ही मात्र अभ्यासण्यासारखी आहेत. पहिली कथा त्रटिकेची : विश्वामित्र ऋषी रामलक्ष्मणाला घेऊन वनातून जात असतांना पहिली गाठ त्राटिकेशी पडते. त्राटिका ही राक्षसीण अत्यंत सामर्थ्यवान आणि भयंकर जुलमी. तिनं वनावर पूर्ण ताबा मिळविलेला. तिला तोंड द्यायची कोणाचीही छाती नव्हती. पण राम धनुर्विद्येत अत्यंत पारंगत आणि बलवान म्हणून तिला ठार मारू शकत होता. तरीसुद्धा वीर पुरुषांनी स्त्रीला ठार मारायचं नाही हा दंडक. अशा वेळेला विश्वामित्र ऋषी रामाला सांगतात की ही स्त्री असली तरी समाजाची अत्यंत घातक शत्रू आहे. तिचा नाश करण्यात पाप नाही. याचा अर्थ असा की “कोणतेही तत्व पालन करतांना ते समाजाच्या कल्याणाच्या आड येत असेल तर त्याचा वेगळा विचार करावयाचा” असं ऋषी सांगतात. तत्वाचे अवडंबर माजविणार्या लोकांना हे उत्तम उत्तर आहे असं म्हणावंसं वाटतं. श्रावणाची कथा: श्रावण हा ब्राम्हण नव्हता. व तो अंध आई वडिलांना कावडीत घालून काशीला जायला निघाला नव्हता. हा ऋषी होता व तो एका तळ्याच्या काठी आपल्या अंध आईवडिलांना घेऊन रहात असे. तो तपश्चर्या करीत असे. याचे वडील वैश्य व आई शूद्र होती. असे आंतरजातीय विवाह समाजाला मान्य होते असे दिसते. कारण अशा आंतराजातीय विवाहातून जन्मलेल्या मुलाला म्हणजे श्रावणाला तपश्चर्या करण्याचा अधिकार मिळालेला होता. आज मात्र अशा विवाहितांना कित्येक वेळेला समाजाच्या बहिष्काराला (उघड अगर गुप्त) अगर क्वचितप्रसंगी मृत्यूला सुद्धा तोंड द्यावं लागतं. तेव्हा सुधारलेले कोण? तेव्हांचे की आजचे - असा प्रश्न पडतो. सर्वसाधारणपणे समाजात गाजलेली कथा अहिल्येची. (तिला सती अहिल्या असंही कधीकधी संबोधलं जातं.) या अहिल्येला “अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्यान् स्मरेन् नित्यम्” म्हणजे आदरणीय व पवित्र स्त्रियांच्या यादीत तिला बसवण्यात आलेलं आहे. तिची खरी कथा काय आहे? अहिल्या ही एक असाधारण सुंदर तरूण स्त्री. तिचे पती गौतम ऋषी हे एकदा नदीतीरी स्नानाला गेलेले असतांना इंद्र गौतम ऋषींचं रूप घेऊन अहिल्येकडे येतो व मला तुझ्याशी संग करण्याची इच्छा आहे असं सांगतो. हा गौतम ऋषी नसून इंद्र आहे हे अहिल्येच्या लक्षात येतं पण तरीही देवराजाशी रत होण्याचा मोह तिला पडतो आणि ती त्याला संमती देते. समागम झाल्यानंतर “मी कृतार्थ झाले” असं समाधान व्यक्त करते म्हणजे हे आपण काही पापकर्म करतो आहोत असं तिला वाटत नाही. इतकंच नाही तर हे गौतम ऋषींना समजू नये म्हणून इंद्राला “तू आता इथून जा” असे सांगते. पण तिच्या व त्याच्या दुर्दैवाने इंद्र पळून जाण्याच्या आतच गौतम ऋषी परत येतात. काय घडलं हे त्यांच्या लक्षांत येतं, व ते त्या दोघांनाही शाप देतात. अहिल्येला ते “याच आश्रमांत तू वायू भक्षण करून अदृष्य व निराहार अशी राहशील, राम वनात येईल त्यावेळी तुझा उद्धार होईल” असा शाप देतात आणि हिमालयात तपश्चर्येकरता निघून जातात. मात्र सर्वसाधारण समजूत आहे त्याप्रमाणे “तू शिळा होशील” असा शाप तिला देत नाहीत. वास्तविक अहिल्येने व्यभिचाराचं पाप केलं होतं आणि ते आपल्या पतीपासून दडवण्याचाही प्रयत्न केला होता. असं असूनही गौतम ऋषींनी तिला मर्यादित काळापर्यंतचीच शिक्षा दिली आणि नंतर तिचे समाजात पुनर्वसन व्हावे अशी व्यवस्था केली. तिला आयुष्यातून उठवलं नाही. आजचा समाज अशा स्त्रीकडे अशा उदार दृष्टीने पाहील का? दुसरी गोष्ट. अहिल्यामध्ये असा कुठला गुण होता की ज्याकरता तिला “पंचकन्यान् स्मरेन् नित्यम्” या यादीत बसवावी? रामायणातील एक महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे सुग्रीव. सुग्रीव हा वानरांचा राजा. त्याची त्याच्या वानरसेनेवर अत्यंत जरब होती असं दिसतं. सीतेच्या शोधाकरिता वानरांचे वेगवेगळे गट करून त्यानं चारही दिशांना पाठवले होते. त्यात हनुमान, जांबुवंत वगैरेंचा गट दक्षिण दिशेला पाठवला होता. त्या गटानं सारी दक्षिण दिशा पालथी घातली तरी त्यांना सीतेचा शोध लागला नव्हता. शेवटी निराश होऊन दक्षिण किनार्यावर ते बसले असतांना त्यांच्यात बोलणं निघालं की सीतेचा शोध न लावता आपण परत गेलो तर सुग्रीव आपणां सर्वांना ठार मारील. तेव्हा परत जाण्याऐवजी आपण इकडेच जीव देऊ. हनुमान, जांबुवंत यांच्यासारख्यांची ही स्थिती. यावरून सुग्रीवाची सर्व सैन्यावर किती जरब होती हे दिसून येते. अर्थात त्या गटाच्या सुदैवाने तिथे जटायूचा भाऊ संपाती त्यांना भेटला. त्यानं त्यांचं आपसातलं बोलणं ऐकलं आणि त्यानंच रावणानं सीतेला पळवून लंकेत नेऊन ठेवल्याची माहिती त्यांना दिली. ती महिती मिळाल्यामुळे हनुमान लंकेत गेला व सीतेला प्रत्यक्ष भेटून तिची माहिती घेऊन आला. पण या गटाला जर संपाती भेटला नसता तर ते परत सुग्रीवाकडे जायला भीत होते हे उघड आहे. असा हा सुग्रीव. त्याची बायको तारा वालीनं पळविली होती त्यामुळे त्याची व रामाची समस्या एकच होती. रामाची व सुग्रीवाची भेट होण्याला कारण एक कबंध ठरला. राम लक्ष्मण अरण्यातून प्रवास करीत असतांना कबंध त्या दोघांवर धावून गेला म्हणून रामानं बाण मारून त्याला ठार केलं. त्याला जाळून टाकतांना त्यातून एक सुंदर पुरुष बाहेर पडला व त्यानं रामाला “सुग्रीवाची व तुझी समस्या एकच आहे म्हणून तू सुग्रीवाला भेट” असा सल्ला दिला. मग रामाची सुग्रीवाशी भेट झाली तेव्हां रामानं वालीला मारण्याचं वचन सुग्रीवाला दिलं आणि सुग्रीवानं सीतेला शोधून काढण्याचं. वाली हा प्रचंड शक्तिमान असल्याचं सुग्रीवानं रामाला सांगितलं तेव्हा रामानं एका प्रचंड राक्षसाचं शरीर वनात पडलेलं होतं ते आपल्या पायाच्या अंगठ्यानं उचलून कित्येक योजनं दूर फेकून देऊन सुग्रीवाची आपल्या सामर्थ्याविषयी खात्री करून दिली होती. त्या दोघांमध्ये ठरल्याप्रमाणे, सुग्रीवानं वालीला आव्हान देऊन द्वंद्वयुद्धाला बोलावलं. त्यांचं युद्ध चालू असतांना रामानं झाडाआड उभं राहून वालीला बाण मारला व तो खाली पडला. तो मरणासन्न असतांना त्यानं रामाला विचारलं “तू स्वतःला न्यायी राजा समजतोस. मी सुग्रीवाशी युद्धात गुंतलेला असताना तू झाडाआडून मला बाण मारलास हा न्याय झाला का? आणि मी तुझा काय अपराध केला होता म्हणून तू मला मारावंस?” त्यावर उत्तर म्हणून “तू सुग्रीवाची बायको पळविलीस म्हणून मी तुला शिक्षा केली. सुग्रीवानं मला मदत मागितली म्हणून मी तुला मारलं. शिवाय मी माणूस आहे व तू वानर म्हणजे पशू आहेस. माणसाला पशूंची शिकार करण्याचा हक्क आहे. त्यामुळे मी तुला मारण्यात अन्याय केला असं होत नाही.” हे त्याचं उत्तर न्यायाच्या निकषावर टिकणारं नाही आणि हा रामाच्या चारित्र्यावर एक डाग आहे असेच म्हणायला पाहिजे. रामानं वालीला मारल्यामुळे सुग्रीवाला आपली बायको परत मिळाली. त्याचं काम झालं. त्यानं आता रामाला मदत करावयाची. पण आता पावसाळा सुरू होत आहे त्यामुळे रावणाविरुद्धची मोहीम आता आपल्याला सुरू करता येणार नाही असं सांगून सुग्रीव रामाच्या संमतीनं आपल्या राजधानी - किष्किंधेला परत गेला. तिकडे तो आपल्या बायकांच्यात इतका रमला की पावसाळा संपला तरी रामाकडे जाण्याचं तो पूर्ण विसरून गेला. शेवटी रामानं लक्ष्मणाला त्याला बोलावण्याकरता त्याचेकडे पाठवलं. त्यावेळचा प्रसंग लक्ष्मण, सुग्रीव व सुग्रीवची पत्नी तारा या तिघांच्या स्वभावावर उत्तम प्रकाश टाकणारा आहे. लक्ष्मण स्वभावानं अत्यंत संतापी. पूर्वी दशरथानं रामाला चौदा वर्षे वनवासात पाठवायचं ठरवलेलं त्याच्या कानावर गेलं तेव्हा तो दशरथाला ठार करायला निघाला होता. रामानं त्याला वाटेत अडवून शांत केलं होतं. आता सुग्रीवच्या वर्तनाचा त्याला राग आला होता. तो सुग्रीवाला बोलवायला गेला त्यावेळी सुग्रीव आपल्या बायकांच्यात पूर्ण रमून गेला होता. लक्ष्मण आला आहे ते कळताच तो खूप घाबरला. आपण रामाला दिलेलं वचन मोडल्याची त्याला आठवण झाली. लक्ष्मण संतापी आहे, आता तो आपलं काय करील कोणास ठाऊक! अशी भीती वाटून तो स्वतः बाहेर न येता त्यानं आपल्या पत्नीला - ताराला “ बाहेर पाठवलं. तारानं बाहेर येऊन लक्ष्मणाला शांत करण्याचा प्रयत्न केला. तिनं त्याला मुत्सद्दी सल्ला दिला. “अरे लक्ष्मणा, माणसंसुद्धा दिलेलं वचन विसरतात. सुग्रीव हा तर वानर आहे. तो विसरला तर त्यात आश्चर्य काय? पण तो आता जागा झाला आहे. तो तुमचं काम करील. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव. सुग्रीवाजवळ असंख्य वानरांची फौज आहे. त्याच्या मदतीशिवाय तुम्हाला सीतेला शोधून काढता येणार नाही. त्यामुळे तू त्याच्याशी सबूरीनं बोल. त्याला एकदम टाकून किंवा रागावून बोलू नकोस.” लक्ष्मणाला शांत केल्यानंतर सुग्रीव व लक्ष्मण रामाकडे गेले. त्यानंतर सुग्रीव आपल्या वानरांना चारी दिशांना पाठवतो त्यावेळी तो विविध बेटांचं वर्णन करतो व तिथे काय काळजी घ्यावयाची याच्या सुचना आपल्या वानरांना देतो. त्यानं वानरांना पाठवलं त्यात जावा, सुमात्रा, जंबुद्वीप या आजच्या नावांचा उल्लेख येतो. त्यावेळी राम त्याला विचारतो, "या आर्यावर्ताच्या बाहेरच्या बेटांची इतकी सविस्तर माहिती तुला कशी?" त्या वेळी सुग्रीव रामाला सांगतो की ज्यावेळी वालीचं आणि त्याचं भांडण झालं आणि वाली त्याच्या मागे लागला त्यावेळी तो या बेटांवरून त्या बेटावर पळत होता त्यावेळी त्याला या बेटांची व प्रदेशाची माहिती झाली. आपल्याला आज आश्चर्य वाटतं की ही जर कल्पित कथा असेल तर वाल्मीकि ऋषींना या सर्व भागाची इतकी सविस्तर माहिती कशी? त्यानंतर हनुमान सीतेला शोधून काढतो. त्यानंतरच राम वानरांचं सैन्य घेऊन रावणाच्या लंकेवर हल्ला करायचे ठरवतो आणि त्याप्रमाणे सर्व वानरसेना भारताच्या दक्षिण दिशेला प्रवासाला निघते त्या वेळी रामानं या प्रवासात सर्व सैन्याची कशी काळजी घ्यायची, रात्रीच्या वेळी कांही वानरांना पहार्याच्या कामावर ठेवावयाचे, रावणाचे हेर आजूबाजूला फिरतील त्यांच्यापासून सावध राहाणं इत्यादी अत्यंत वास्तववादी सूचना व अर्वाचीन इतिहासात सैन्य इकडून तिकडे जात असताना काय काय करावं लगलं असेल याची वास्तववादी जाणीव करून देणारा आहे. सेना समुद्रापर्यंत आली. आता समुद्र कसा पार करावयाचा हा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी आपल्यामध्ये नल नावाचा वानर आहे व तो सेतू बांधण्यातला तज्ञ आहे असे वानरांनी रामाला सुचवले. त्याप्रमाणे सर्व वानरांनी झाडं, शिळा, दगड इत्यादी साधनं गोळा करून नलाला आणून दिली व त्यानं त्यांच्या सहाय्यानं सेतू बांधला. आता हे सर्व प्रत्यक्षात कसं घडलं असेल? भारत व लंका हे दोन जमिनीचे प्रदेश एकमेकाच्या खूपच जवळ, त्यांचे मध्ये जरी समुद्र दिसत असला तरी या दोन जमिनींना पाण्याखालून जोडणारा जमिनीचा उथळ भाग असणार ह्याची शक्यता खूपच आहे. त्याचा नलाला सेतू बांधताना उपयोग झाला त्यामुळे पाण्यात दगड तरंगले वगैरे आख्यायिकात काही अर्थ नाही. विशेष म्हणजे खुद्द वाल्मीकि रामायणांत दगड पाण्यावर तरल्याचा उल्लेख कुठेही नाही. हल्ली हल्ली काही लोकांनी या समुद्रात मधे उभं राहून फोटो काढून ते प्रसिद्ध केले आहेत. मात्र व्हॉट्सअ‍ॅपवर काहीही होऊ शकतं. त्याबद्दल न बोलणं बरं. राम रावणाचं युद्ध संपतं. रामाच्या आज्ञेप्रमाणे लक्ष्मण अशोकवनातून सीतेला घेऊन येतो. त्यानंतर राम सीतेला म्हणतो, "मी रावणाला शिक्षा केली. त्याच्या कैदेतून तुला सोडवलं. पण तू परपुरुषाकडे राहिलेली असल्यामुळे तुझ्या पावित्र्याबद्दल खात्री देता येत नाही. तेव्हा तू हवं तिकडे जाऊ शकतेस." हे शब्द कानावर पडताच सीतेला काय वाटलं असेल? तिच्या कोणत्या अपराधाकरता तिला ही शिक्षा मिळावी? राम रावणाला मारील, आपल्याला त्याच्या कैदेतून सोडवील आणि आपण रामाबरोबर आनंदानं अयोध्येला जाऊ अशा कल्पनेत असलेल्या सीतेवर हे शब्द अगदी वज्रासारखे कोसळले असतील. तिनं अग्निप्रवेश करायचं ठरवलं पण अग्निनं स्वतःच रामाला ग्वाही दिली की "सीता पवित्र आहे. तू तिचा स्वीकार कर." पुराणकाली स्त्रियांना फार मानानं वागवलं जात असे असा काही लोकांचा दावा आहे. ते अजिबात खरं नाही. सीतेसारखीला ही वागणूक, मग सामान्य स्त्रियांचं काय? अग्नीच्या आश्वासनामुळे सीतेचा स्वीकार झाला व ती बहुमानानं अयोध्येला गेली खरी. पण पुन्हा अयोध्येच्या नागरिकांत कुजबूज सुरू झाली. रामानं एका धोब्याचं बोलणं ऐकलं. धोबी म्हणाला, "माझ्या बायकोच्या चरित्र्याबद्दल मला शंका आली म्हणून मी तिला घराबाहेर काढली. सीता तर इतके महिने रावणाच्या कैदेत राहिलेली. रामानं तिचा परत कसा स्वीकार केला?" हे ऐकून राम पुन्हा अस्वस्थ झाला. शेवटी त्यानं लक्ष्मणाला सांगितलं, "हिला वनांत सोडून ये. मला जास्त काही विचारू नकोस." लक्ष्मणानं त्याप्रमाणे सीतेला वनात नेऊन सोडलं. सीतेला जाताना कल्पनाही दिली नव्हती. त्यामुळे तिला लक्ष्मणानं वनात सोडल्यावर तिचा धीरच सुटला. तिनं लक्ष्मणाला विचारलं, "या भयंकर अरण्यात मी एकटी कुठे जाऊ?" लक्ष्मणाकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. त्यानं तिला सोडतांना इतकीच काळजी घेतली होती की तिला त्यानं वाल्मीकि ऋषींच्या आश्रमाच्या अगदी जवळ सोडलं, हेतू हा की आश्रमात जे कोणी असतील ते तिला आत घेऊन जातील आणि ती सुरक्षित राहील. आणि तसंच झालं. वाल्मीकींचा एक शिष्य बाहेर आला असतांना त्यानं तिला पाहिलं आणि तो तिला आश्रमांत घेऊन गेला. त्यावेळी सीतेला दिवस गेलेले होते याचाही रामानं विचार केला नाही. थोड्याच दिवसांत लव आणि कुश तिच्या पोटी जन्माला आले. आश्रमात सीतेचे पुत्र लहानाचे मोठे झाले. वाल्मीकींनी त्यांना सर्व तर्हेचं शिक्षण दिलं. त्याच काळात त्यांचं रामायण काव्य लिहून पुरं झालं होतं. ते त्यांनी त्या मुलांच्याकडून पाठ करून घेतलं व उच्च स्वरांत (आपल्याकडे पोवाडे गातात तसे) म्हणायला शिकवलं. मग त्यांना ते गाण्याकरिता अयोध्येला पाठवलं. हेतु हा होता की राम स्वतः ते केव्हातरी ऐकेल. त्याप्रमाणे रामानं एक दिवस ते ऐकलं. ‘ती मुलं कोण?’ असं विचारलं. पण वाल्मीकि ऋषींनीं पढवल्याप्रमाने आपण रामाचीच मुलं आहोत हे त्यांनी रामाला सांगितलं नाही. रामानं त्यांना ते काव्य राजदरबारात म्हणायला सांगितलं. सगळ्या दरबारानी ते ऐकलं. तेच जगप्रसिद्ध 'रामायण'. आप्पा गोडबोले

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 44695 views

💬 प्रतिसाद (122)
प
प्राची अश्विनी Fri, 03/23/2018 - 11:30 नवीन
आवडले रामायण. आप्पांना नमस्कार. अवांतर- श्रीलंकेत गेले असताना तिथल्या स्थानिक लोकांना रामायणाबद्दल काय वाटते याचा थोडा शोध घेतला. बहुतेक बुद्ध धर्मीय आहेत. आणि त्यांना रामायणाची, रावणाची फारशी माहिती नाही. तिथे भगवान बुद्ध आणि बौद्ध धर्माचा इतिहास शिकवला जातो. दर रविवारी बहीतांश मुलं पारंपारिक कपडे घालून ( तो त्यांचा रविवार शाळेचा गणवेश असतो.) धर्मशिक्षण घ्यायला वेगळ्या शाळेत जातात. त्या अभ्यासाची वेगळी परिक्षा असते. आणि बौद्ध धर्म धर्म संस्कार त्यांना मुखोद्गत असतात. तामीळ लोकांना मात्र अर्थातच रामायणाची माहिती होती.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Sun, 03/25/2018 - 17:04 नवीन
जननायक प्रभू राम शतकानुशतके रामकथा भारतीय समाजाला प्रेरणा देत आली आहे. विविध कालखंडात, वेगवेगळ्या प्रांतात राम कथेची विविध रूपे लोककलेतून, काव्यातून, नाटकातून, नृत्यातून, प्रकट केली गेली. महाराष्ट्रात गीत रामायणाच्या रूपाने राम कथा तेजाळली. मराठी भाषेला धन्यता लाभली असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. सन 2005 मधे गीत रामायणाला 50 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने गीत रामायणाच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला. हजारो वर्षांच्या कालप्रवाहात या कथेला अनेक रंगांचे वेष्टण लाभले. रामचंद्रांच्या, लोकोत्तर कार्याच्या प्रभावातून रामांचे प्रभू, भगवान, अलौकिक देवता म्हणून रूपांतर झाले. देवालयात त्यांची स्थापना होऊन विविध सण व धार्मिक कृत्ये निर्माण झाली. राम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या एकत्रित रूपात मूर्ती देवालयात सजल्या. राजाश्रयातून चित्रकला, स्थापत्य, मूर्तीकला, यांचा अनुपम विकास पावला व प्रचंड मंदिर संकुलांची स्थापना झाली. देव रूपात राम डाव्या हाताच्या खांद्याला धनुष्य व पाठीला मोजक्या काही बाणांचा भाता लटकवून व उजव्या हाताने भाविक भक्तांच्या मागण्यांना हवा तो आशीर्वाद देते झाले. ‘रामाने रावणास मारले‘ या मराठी भाषा व्याकरणातील भावे प्रयोगाच्या वाक्यात रामायणाची इति कर्तव्यता झाली असा आभास होऊ लागला. संध्याकाळच्या परवचात पाठांतराचा मापदंड व संस्कृतोच्चार शुद्ध होण्याला मदत म्हणून रामरक्षा म्हणणे ब्राह्मण कुटुंबात अनिवार्य झाले. शिवाय रात्री-अपरात्री एकटे राहण्याची पाळी आली तर मनातल्यामनात किंवा भितीने अधिक गाळण उडाली तर मोठमोठ्यांने राम रक्षा म्हणून भीती घालवण्याला मानसिक आधार म्हणून ती उपयोगी पडू लागली. हनुमानाला शनिग्रहाचा वार आणि मंदिर वाटून मिळाले व तेलाचे सचैल स्नान घडू लागले. कीर्तनकारांनी रामनामाच्या जपाचे महत्व उपदेशल्याने जप माळ हातात घेऊन वृद्धांना विरंगुळा मिळाला. अंत-काळी ‘राम’ म्हणण्याने सर्व पापांचा नाश होणार व मोक्षपदाची प्राप्ती होणार असल्याने रामाला साकडे घालण्यात सार्थकता वाटू लागली. रामांच्या चरित्राचे अवलोकन करता रामांनी कोणाही भक्ताला माझे फक्त नाम घे असे आश्वासन दिल्याचे संदर्भ सापडत नाहीत. रामांनी ज्ञान-कर्म-भक्ती मार्गाचे वर्णन करून गीता कथन केल्याचे वाचनात येत नाही. वनवासाच्या काळात सीतेच्या मनोरंजनार्थ पौराणिक कथा वा गुजगोष्टी करना राम दिसत नाहीत. बंधू लक्ष्मण व अन्य सहकार्‍यांबरोबर काही अध्यात्मिक चर्चा करून, त्यांच्या शंका-संशयांचे निराकरण केले असाही फारसा संदर्भ मिळत नाही. आसपासच्या राना- वनातील रयते मधील लोकांशी संपर्क करून रामानी त्यांना धार्मिक वा पौराणिक कथा कथन कसे आपलेसे केले असेल याचा ओहापोह मिळत नाही. रामायण पूर्वकालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती काय होती? त्या वेळच्या समस्या काय असाव्यात? दुष्ट व्यक्ती, वन्य जनावरांपासून, निसर्ग निर्मित धरणीकंप, महापूर, अवर्षण सारख्या प्रकोपांना त्यावेळी लोकांनी कसे तोंड दिले असावे? शेती, वस्त्र, निवारा व अन्य जीवनावश्यक सुविधांची निर्मिती करणार्‍या कलांचे रक्षण व शिक्षण देण्याची पद्धती कशी असावी़? राक्षस संस्कृतीचा प्रभाव काय होता? शस्त्र निर्मितीसाठी धातू खाणींचा शोध, युद्धकला व अन्य विद्याभ्यास, काव्य-शास्त्र-विनोद यांचा विकास कसा साधला गेला असावा? रामांच्या चरित्रामुळे त्यामधे काय व कसा परिणाम झाला? असे अनेक विचार सामान्य माणसाला पडतात. रामायणातील व्यक्तिरेखा मनात काय काय विचार करत असाव्यात ? याचे कुतुहल प्रत्येकाला असते. रामायणातील काही प्रसंगातून रामांच्या व्यक्तीरेखेचे दर्शन करण्यासाठी अनेकांना लेखनाची प्रेरणा मिळाली. आरंभ - 2005 च्या हिंदी विभागातील उत्कृष्ठ लेखनाचा पुरस्कार सुप्रसिद्ध कादंबरीकार श्री.नरेन्द कोहली यांच्या नावाने दिला आहे. यांनी हिन्दी भाषेत ‘अभ्युदय’ नावाची रामकथा कादंबरी रूपात प्रस्तुत केली आहे. त्या रामकथेतील राम त्यांनी जननायक स्वरूपात दर्शवला आहे. जन-सामान्यांच्या व्यथा, समस्या, दुःखे यांच्याशी राम कसे समरस होतात, त्यांच्या जीवनाची इति कर्तव्यता लोककल्याणाशी कशी जुळली आहे. रामांनी राजप्रासाद सोडून खेड्यापाड्यातील, वने, जंगलातील लोकांना ज्यांचा त्या काळातील सुधारलेल्या जगाशी संपर्क नव्हता अशा जाती-जमातींना आपलेसे करून घेतले. त्यांच्या प्रभावी नेतृत्वाला प्रखर पराक्रमाची धार होती. अगतिक गांजलेली सामान्य जनता व स्वतःमधे मशगूल, ऐशारामी राजसत्तेमुळे त्यावेळच्या शस्त्रसंपन्न व आधुनिक पण निर्दयी राक्षस संस्कृतीला टक्कर देण्याची हिम्मत खंडप्राय देशात राहिली नव्हती. रामांसारखा लोकोत्तर नेता जनतेच्या मानसिकतेची रग जाणणारा व त्यांच्या सुख-दुःखांच्या जगात उतरून त्यावर यशस्वी मात कशी करायची याचा आदर्श घालून देणारा, चारित्र्य संपन्न राज्यकर्ता म्हणून तळपून दिसतो. ही त्या काळाची गरज होती. रावण वध हा फक्त स्वतःची पत्नी हरण केली गेली म्हणून तिला परत मिऴवण्यासाठीचा बदला किंवा सूड असा रामांच्या वैयक्तिक समस्येशी जोडलेला नसून त्यावेळच्या राजकारणाचा एक भाग म्हणून वापरला गेलेला डावपेच होता. सीता पळवली जावी असे ठरवले नसताना अचानक आलेल्या संकटाचा संधी म्हणून कसा वापर केला गेला. रामांनी मिळवलेली व नवीन बनवलेली शस्त्रे यामधून मरगळलेल्या व पराजित मनोवृत्तीच्या तरुणाईला शस्त्र विद्येचे तंत्र-मंत्र देऊन आपल्या समाजाचे रक्षण करण्याचा आत्मविश्वास जागृत केला. पुढे युद्धात उभे राहिल्यामुऴे वानर आणि अन्य अनेक जंगली व मागासलेल्या जाती जमातींमधील जनतेला अन्यायाविरुद्धच्या लढाईला सज्ज केले. प्रगत व प्रचंड संहारक शक्ती असलेल्या बलाढ्य सेनेचा यशस्वी मुकबला करून युद्धात विजय मिळवला. श्री. नरेंद्र कोहलींच्या लेखनाचे महत्वाचे वैशिष्ठ्य असे आहे की संभाषणाच्या आधी घडणार्‍या मनोव्यापारातून व्यक्तिरेखांचा गाभा कसा असावा याचे त्यांनी केलेले वर्णन. त्यांच्या लेखनातून राम कथेतील रामांची व्यक्तीरेखा तळा-गाळातील लोकांच्या जननायकाची कशी आहे याची कल्पना येते. उत्सुक वाचकांनी ती कादंबरी व त्यांचे अन्य साहित्य जरूर वाचावे.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Fri, 03/23/2018 - 12:02 नवीन
आपला लेखं आवडला. १+ =================== मला चांगल्या कथा / सादरीकरण नेहमीच खूप आवडतं. लाईफ में मजा आता है. गेम ऑफ थ्रोन , बोर्डवॉक एम्पायर वैगरे दीर्घ कथा व त्यावरील रसग्रहण चर्चा खूप आवडते. पश्चिमेकडील देशात गेऑथ्रो वैग्रे च्या विकी साईट किंवा फॅनडम साईट जश्या असतात, तश्याच तुमच्या लेखा सारखे लेख एकत्र करून रामायण स्टोरी विकी साईट करता येऊ शकेल, अशी सूचना.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Fri, 03/23/2018 - 12:09 नवीन
एक बालिश शंका. हनुमान जर द्रोणागीरी पर्वत उचलून आणू शकत असेल तर रामसेतू करता वानरं एक एक दगड कशाला टाकत बसले होते? त्या मापाचा एखादा डोंगरच का तेथे ठेवला नाही?
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Sat, 03/24/2018 - 16:13 नवीन
नमस्कार मला ह्याचे आश्चर्य वाटले की सेतू बांधायची गरज रामापेक्षा रावणाच्या सेनेला असायला हवी. रामांना फक्त एकच वेळी लंकेवर प्रहार करायला जावे लागले. पण रावणाला स्वत:ला जायला, अन्य सैन्याला बेट लंका ओलांडून प्रत्येक वेळी जावे यावे लागणार म्हणून त्यांनी पूल बांधणे जास्त गरजेचे होते.वरच्या मजल्यावर भेटायला जाणाऱ्यांना जिना किंवा शिडीची व्यवस्था करायला लागण्यापेक्षा जो वरच्या मजल्यावर राहतो त्याला वेळोवेळी खाली वर करायची गरज मोठी आहे नाही का?
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Sat, 03/24/2018 - 16:32 नवीन
ते जाऊ द्या. वानरं जेव्हा समुद्रात दगड टाकून सेतू बांधत होती तेव्हा रावणाची सेना गोटया खेळत होती का समुद्रकिनारी.
  • Log in or register to post comments
प
परिंदा Fri, 03/23/2018 - 12:18 नवीन
असा हा सुग्रीव. त्याची बायको तारा वालीनं पळविली होती >> तारा ही वालीची पत्नी होती. सुग्रीवची पत्नी "रुमा"
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 03/23/2018 - 15:28 नवीन
स्वीट टॉकरीणबाई, अप्पांना नमस्कार सांगा. लेख आवडला. काही भाष्य करेन म्हणतो. १.
हे त्याचं उत्तर न्यायाच्या निकषावर टिकणारं नाही आणि हा रामाच्या चारित्र्यावर एक डाग आहे असेच म्हणायला पाहिजे.
वरील विधानाचा पूर्वार्ध मान्य. पण उत्तरार्धाबाबत परिस्थिती थोडी वेगळी आहे. वालीने रामाला म्हंटलं की तुला सीताच हवी होती तर मला सांगायचं होतं ना. रावणाने माझ्या सांगण्यावरून तिला परत पाठवली असती. रामाला नेमकं तेच मान्य नव्हतं. सीतेलाही मान्य पडलं नसतं. तिला हनुमानाच्या पाठीवरून पळून जाणं सहज शक्य होतं. पण ती गेली नाही. याचं कारण म्हणजे विनायुद्ध सीता परत येणं हे तिच्या चारित्र्यावर सतत संशयाचं सावट ठेवणं आहे. वालीने आपल्या वानरसैन्याच्या सहाय्याने पराक्रमी रावणाची पार दाणादाण उडवली होती. यावर रावणाने राजनैतिक तोडगा काढला. गोडीगुलाबीने वालीला आपल्या जाळ्यात ओढून घेतला आणि त्यासोबत मैत्रीचा तह केला. त्यानुसार त्या दोघांनी एकमेकांवर आक्रमण करायचं नाही. आणि वालीच्या संरक्षणासाठी (काहीही हं.... !) रावणाचं सैन्य किष्किंधेच्या उत्तरेस रुजू होईल. या सैन्याच्या सहाय्याने पुढे रावणाने बराच प्रदेश जिंकला. यांत कौसल्येचं माहेरही (=महाकौशल) आलं. रावणाचा बीमोड करण्यासाठी दशरथाने राजेलोकांना एकत्र आणण्याचा थोडाफार प्रयत्न केला. पण फारसं यश आलं नाही. पुढे वसिष्ठ आणि विश्वामित्रांनी एकत्र येऊन रामलक्ष्मणांना शिक्षण द्यायच्या मिषाने त्यांच्या हातून राक्षसांच्या नाश करवून घेतला. त्याकाळी स्वयंवरे हे राजकारणाचे अड्डे असंत. सीतास्वयंवर ही अशीच एक नामी संधी होती. वसिष्ठांनी बहुधा काहीतरी खटपट करून दशरथास चारही पुत्रांचे विवाह जनकाच्या परिवारात लावून देण्याचं पटवून दिलं. वस्तुत: तशी काही गरज नव्हती. पुढे कैकेयीने आगामी राजकारणावर नजर ठेवून रामाला वनवास घडवण्याचा आग्रह धरला. दोन भाऊ अयोध्येच्या रक्षणासाठी मागे राहिले. रामाचा वनवास रावणाच्या सैन्यास निष्प्रभ करण्यासाठीच होता. पण मध्येच गडबड झाली व शूर्पणखेचा प्रसंग घडला. या घडामोडींचा रावणास सहजंच अंदाज आला आणि त्यानं सीतेस पळवलं. जर वालीने रावणाला विनंती केली असती तर सीता विनायुद्ध रामाकडे परत आली असती. मग राक्षसमुक्त भारताचं केवळ स्वप्नंच उरलं असतं. त्यामुळे वालीवध हा अन्यायकारक असला तरी तो रामचरित्रावरचा डाग मानता येणार नाही. असं आपलं माझं मत. २. अग्निपरीक्षा : ही सीतेने स्वत:हून केल्याचं वाचलं आहे. हा रामाचा आग्रह नव्हता. तो फक्त तिला म्हणतो की तुला पाहिजे तिकडे तू जाऊ शकतेस. माझ्याव्यतिरिक्त लक्ष्मण, सुग्रीव वा बिभीषण हे तुझे पर्याय आहेत. याचं कारण सीताहरणात सापडतं. कांचनमृग हा कोणी पहिला वा ऐकला नसून हा एक मायावी प्रकार आहे असं रामाचं म्हणणं होतं. तरीपण सीतेने रामाला त्याच्यामागे पाठवलं. नंतर लक्ष्मणासही बाहेर पाठवून दिलं. नंतर रावणाने तिला पळवली. यावरून सीता रावणाला फितूर तर नाही ना असा संशय येऊ शकतो. नेमक्या या संशयाची निवृत्ती करण्यासाठी रामाने तिला मोकळीक दिली. सीतेने हे अचूक ओळखलं होतं. म्हणूनंच तिनं हनुमानाच्या पाठीवरून पळून येण्यास नकार दर्शवला होता. रामाने रावणाला ठार मारून सीतेला सन्मानाने सोडवणं हाच एकमेव उचित मार्ग होता. आपल्यावर कसलाही संशय राहू नये याचसाठी तिने आपणहून अग्निपरीक्षा द्यायचं ठरवलं. ३.
अहिल्यामध्ये असा कुठला गुण होता की ज्याकरता तिला “पंचकन्यान् स्मरेन् नित्यम्” या यादीत बसवावी?
पावित्र्यामुळे तिने प्रत्यक्ष इंद्राला ओळखलं. हा गुण नक्कीच तिला पंचकन्यांच्या यादीत समाविष्ट करण्याजोगा आहे. पण मोहात पडल्याने इंद्रासोबत रत झाली. हा दोष दूर व्हावा म्हणून गौतमांनी वायुआहाराचं प्रायश्चित्त सांगितलं. बाकी सारं पाहून घेण्यास श्रीराम समर्थ होतेच ! अ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गवि Sat, 03/24/2018 - 05:23 नवीन
रामाला नेमकं तेच मान्य नव्हतं. सीतेलाही मान्य पडलं नसतं. तिला हनुमानाच्या पाठीवरून पळून जाणं सहज शक्य होतं. पण ती गेली नाही. याचं कारण म्हणजे विनायुद्ध सीता परत येणं हे तिच्या चारित्र्यावर सतत संशयाचं सावट ठेवणं आहे.
का बरं? कसं काय? कोण सावट ठेवणार? युद्ध केल्याने ते सावट कसं नष्ट होणार? शांततापूर्ण मार्गाने परतली (किंवा आणली) तर चारित्र्य वाईट आणि लढून सोडवून आणली तर चारित्र्य चांगलं असं समजणं यात कोणता तर्क आहे. प्रत्यक्ष युद्ध करूनही सावट हटलं का संशयाचं? हनुमानासोबत किंवा अन्य रीतीने तिथून निसटून परत आल्यावरही युद्ध करता आलंच असतं. उलट पत्नी सुरक्षित परत आलेली असल्याने त्यानंतर युद्धात श्रीरामांची स्ट्रेटेजिक पोझिशन आणखी स्ट्रॉन्ग झाली असती (प्रोबेबल होस्टेज सिच्युएशनची भीती न उरल्याने).
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 03/24/2018 - 06:48 नवीन
का बरं? कसं काय? कोण सावट ठेवणार? युद्ध केल्याने ते सावट कसं नष्ट होणार?
मुळात रामायण हे संपूर्णतः काल्पनिक आहे असं मी मानतो आणि फक्त रामायणाच्या अनुषंगाने उत्तरे देतो. युद्ध कुठल्याही परिस्थितीत झालंच असतं, शेवटी रामायणाचा मुख्य हेतू तोच आहे दुष्टांचा नाश, जनांचे कल्याण. आदर्श पुरुषाची कथा जनसामान्यांत पोहोचवणे. सीता हनुमानाबरोबर थेट निघून का येत नाही ह्यांत अनेक कारणांचा सीतेने उहापोह केलेला आहे. ह्यात हनुमानाच्या वेगाने तिला मूर्च्छा येणे, पाठीवरुन खाली समुद्रात पडण्याची भिती, सीतेला घेऊन जात असताना एकाकी हनुमानावर लंकेतील राक्षस हल्ला करतील ही भिती, त्या लढाईत सीतेला राक्षसांनी परत मिळवण्याची किंवा तिचा वध करण्याची भिती. ह्या अनेक कारणांशिवाय लोकापवादाची भिती ही सुद्धा कारणे आहेत. एकतर हनुमान हा परका, त्यासह आली तर लोकापवाद शिवाय रामाच्या पराक्रमाला कमी लेखण्यासारखे. त्यामुळे संशयाचे सावट राहतेच.
शांततापूर्ण मार्गाने परतली (किंवा आणली) तर चारित्र्य वाईट आणि लढून सोडवून आणली तर चारित्र्य चांगलं असं समजणं यात कोणता तर्क आहे.
लढून सोडवून आणली ह्यात चारित्र्य चांगलं हा तर्क रामानेच पुढे फोल ठरवला, अग्निदिव्य करायला लावलं शिवाय उत्तरकांडात परत सीतेला वनवासात पाठवणे व लवकुशांसह परत आल्यावर पुन्हा अग्निदिव्याची मागणी करणे. त्यामुळे प्रत्यक्ष युद्ध करुनही संशयाचे सावट हटले नाहीच.
हनुमानासोबत किंवा अन्य रीतीने तिथून निसटून परत आल्यावरही युद्ध करता आलंच असतं. उलट पत्नी सुरक्षित परत आलेली असल्याने त्यानंतर युद्धात श्रीरामांची स्ट्रेटेजिक पोझिशन आणखी स्ट्रॉन्ग झाली असती (प्रोबेबल होस्टेज सिच्युएशनची भीती न उरल्याने).
पत्नी परत आलेली पाहून युद्ध करण्यात फारसा अर्थ नव्हता (जरी त्याही परिस्थितीत युद्ध झालं असतं तरीही). वानरांचाही उत्साह ओसरला असता. रीरामांची स्ट्रेटेजिक पोझिशन आणखी स्ट्रॉन्ग झाली असे म्हणण्याला फारसा अर्थ नाही. सीतेला परत मिळवणं हेच ध्येय असेल तरच युद्धोत्साह आला असता. उदा. जिहाद्/क्रूसेड्स वगरे आजची कारणे.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Sat, 03/24/2018 - 16:25 नवीन
ह्यात हनुमानाच्या वेगाने तिला मूर्च्छा येणे, पाठीवरुन खाली समुद्रात पडण्याची भिती, रावणाने सीतेला सीटबेल्ट (प्रथम सीतेने वापरला असेल म्हणून त्याला सीटबेल्ट म्हणत असतील) बांधून लंकेला नेले होते का? हनुमानाला वेग कमी करता येत नव्हता का? मग लँडिंग कसा करायचा?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 03/24/2018 - 16:35 नवीन
वरील कारणे वाल्मिकीरामायणात सीता हनुमान संवादात खुद्द सीतेनेच सांगितली आहेत, ती माझ्या मनातील नव्हेत. बाकी रावणाने सीताहरण मायावी दिव्य रथातून केले होते.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Sat, 03/24/2018 - 16:46 नवीन
रामालाही हनुमानाच्या जोडून असा रथ देता आला असता की.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 03/23/2018 - 17:39 नवीन
रामायण व महाभारत ही सर्वोच्च साहित्य मूल्य असलेली महाकाव्ये आहेत. गा पै यांच्या प्रतिसादात तथ्य आहे. अप्पांना नमस्कार __/\__
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/24/2018 - 18:14 नवीन
>>> रामायण व महाभारत ही सर्वोच्च साहित्य मूल्य असलेली महाकाव्ये आहेत. सहमत. त्याचबरोबर हा आपला गौरवशाली इतिहाससुद्धा आहे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 03/23/2018 - 19:00 नवीन
....संस्कृतमधलं वाल्मीकि रामायण वाचलं. हे मूळ रामायण आहे की नाही याबाबत संस्कृत विद्वानांमध्ये वाद नाही त्या अर्थी तेच मूळ असं मी समजते. ....
मला वाटते हे वाक्य जरा अधिक सिंप्लीफाईड आहे. वाल्मिकी रामायण मूळ रामायण असल्याचे सर्वसाधारणपणे मानले जाते , बाकी ट्रेडिशन्स मुख्यत्वे मौखिक असल्यामुळे वाल्मिकी रामायणास मूळ मानण्याशिवाय पर्यायही रहात नाही पण 'मानले जाते' ही कंडीशन महत्वाची रहाते. वाल्मिकी रामायणाच्या लिखीत प्रतींमध्येही भेद असावेत त्या बाबत क्रिटीकल एडीशन बनवण्याचा प्रयत्न केला गेला. माझ्या माहिती प्रमाणे आता काही साहित्य तज्ञांमध्ये बालकांड आणि उत्तरकांड प्रक्षिप्त मानले जातात. (माझ्या व्यक्तीगतमते हे प्रक्षिप्त आहेतच रामायणातल्या उर्वरीत कांडातही प्रक्षीप्तता असणे संभव असावे अर्थात तो भाषा साहित्य अभ्यासकांचा विषय आहे) बालकांड आणि उत्तरकांड प्रक्षिप्त धरलेतर उपरोक्त लेखामधील वाली सुग्रीव वगळता बराच भाग प्रक्षिप्ताची समिक्षा प्रकारात मोडेल अर्थात ती करु नये असे नव्हे. त्राटीका प्रकारात तीला असंख्य दुषणे देऊनही रामायणात तीचा नेमका अपराध काय ते नेमकेपणाने स्पष्ट केले आहे असे मला व्यक्तीशं: वाटले नाही. किंवा माझी माहिती अपूरी असल्यास वाल्मिकी रामायणातील मूळ + अर्थासहीत नेमक्या श्लोकांकडे निर्देश करावा. त्यामुळे मार ही त्राटीका असे गीतरामायणातले गीत ऐकताना कसे वेगळेच वाटते. असो.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 03/24/2018 - 06:10 नवीन
उत्तरकांड सरळसरळ प्रक्षित आहे. युद्धकांडाचे शेवटी फलश्रुती आहे त्यामुळे प्रक्षिप्तता सिद्धच आहे. बालकांडाचे सुरुवातीला नारद वाल्मिकिंना रामाची कथा ऐकवतात व ब्रह्मदेवाच्या आज्ञेने रामायण लिहितात. राम कथा आधी प्रचलित होती ह्यात काहीच शंका नाही. खुद्द महाभारतात रामायण दोन वेळा संक्षेपाने येते, आरण्यकपर्वात द्रौपदीसाठी सौंगंधिक कमले आणायाला जाताना भीम हनुमान संवाद आणि नंतर द्रोणपर्वात षोडषराजकीय आख्यानात रामकथा. अर्थात वाल्मिकी रामायण आणि महाभारतातील संक्षिप्त रामकथेत काही भिन्नता आहेत. महाभारतातील कथा जास्त प्राचीन मानायला हवी असे मला वाटते कारण रामायण हे नंतर रचले गेले आहे. रामायणात त्राटिका हा शब्द नसून ताटिका/ताटका हा शब्द आहे. आणि ती राक्षसीण नसून यक्षी आहे. सुकेतू नामक सदाचारी यक्षाची ती कन्या, सुंद दैत्य तिचा पती व मारिच हा पुत्र जो अगस्त्यांच्या शापाने राक्षस झाला. अगस्त्यांच्याच शापाने यक्षिणीची नरभक्षिणी राक्षसी झाली व ती आसमंत उजाड करु लागली व यज्ञांचा विद्ध्वंस करु लागली हेच तिच्या अपराधाचे कारण.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 03/24/2018 - 09:28 नवीन
माहितीपूर्ण प्रतिसादासाठी अनेक आभार
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 03/26/2018 - 11:56 नवीन
रामायणाच्या आवृत्त्या आणि आधीच्या आणि नंतरच्या संस्कृत साहित्यातील नेमके उल्लेख संक्षेपाने शोधगंगावरील या प्रबंधात (पिडीएफ दुवा) आलेले दिसतात. प्रबंध अलिकडील असला तरी यात एशियाटीक सोसायटीला सापडलेल्या ६ व्या शतकातील प्रतिबाबत काहीच उल्लेख नाही. तसेच इंडो युरोपीय भाषांमधील शब्द साम्या बद्दल भाष्याचा अभाव आहे तरीही थोडक्यात असलेला सक्षेप वाचनीय आहे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 03/23/2018 - 19:24 नवीन
लेख आवडला. प्राचीन ग्रंथ/महाकाव्य इत्यांदीवर उथळ (एकतर त्यांचा दैविक रंग भडकतेने रंगवणारे किंवा त्याविरुद्ध त्या सगळ्या उथळ कपोलकल्पित कथा आहेत असे म्हणणारे) लेखन पदोपदी सापडते. संस्कृत प्राचीन ग्रंथांच्या मूळ संस्कृत आवृत्तींचा समतोल (त्यातील पात्रे केवळ... त्या कालातील व त्या परिस्थितीतील व्यवस्थेप्रमाणे वागणारी, राग-लोभ-मोह-मद-मत्सर-भिती, इ असलेली माणसे असून, तेव्हा त्यांनी कसा विचार केला असता व ती कशी वागली असती... या पायावर केलेला अभ्यास) अभ्यास करून ते मराठीत मांडणारे लेखन फार विरळ आहे. तेव्हा हा लेख वाचून समाधान वाटले. गोडबोलेसाहेबांपर्यंत धन्यवाद पोहोचवावे. माझ्या माहितीतले याप्रकारचे एक लक्षवेधी उदाहरण, इरावती कर्वे यांचे युगांत, हे महाभारतावरील टीकात्मक पुस्तक आहे. गोडबोलेसाहेबांचा अभ्यास त्याच दिशेने झाला आहे असे वाटते. त्यांचा अभ्यास वापरून त्यांनी रामायणावर एक समतोल टीकात्मक लेखन प्रसिद्ध करावे असा आग्रह त्यांच्यापर्यंत पोहोचवावा... त्याबद्दल तुम्हाला आगवू धन्यवाद !
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 03/23/2018 - 22:43 नवीन
"श्रावणाची कथा: श्रावण हा ब्राम्हण नव्हता. व तो अंध आई वडिलांना कावडीत घालून काशीला जायला निघाला नव्हता. हा ऋषी होता व तो एका तळ्याच्या काठी आपल्या अंध आईवडिलांना घेऊन रहात असे. तो तपश्चर्या करीत असे. याचे वडील वैश्य व आई शूद्र होती. असे आंतरजातीय विवाह समाजाला मान्य होते असे दिसते. कारण अशा आंतराजातीय विवाहातून जन्मलेल्या मुलाला म्हणजे श्रावणाला तपश्चर्या करण्याचा अधिकार मिळालेला होता. आज मात्र अशा विवाहितांना कित्येक वेळेला समाजाच्या बहिष्काराला (उघड अगर गुप्त) अगर क्वचितप्रसंगी मृत्यूला सुद्धा तोंड द्यावं लागतं. तेव्हा सुधारलेले कोण? तेव्हांचे की आजचे - असा प्रश्न पडतो. ह्याला ऐतिहासिक पाठबळ आहे."कौटिल्याच्या अर्थशास्त्रात" पण त्यावेळी, नंदराज-कौटिल्य-चंद्रगूप्त ह्या काळात, मिश्र-संमिश्र विवाह होत होते असा उल्लेख आहे. हा चाणक्य काय-काय लिहून गेलाय.... आप्पांना नमस्कार .....
  • Log in or register to post comments
म
मारवा Sat, 03/24/2018 - 01:46 नवीन
लेख प्रतिसाद वाचुन धन्य झालो ! अहिल्या संदर्भातील विवेचन तर कळस आहे . असो.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 03/24/2018 - 06:12 नवीन
लेखन फार आवडले. अगदी मनातलेच असे लिहिले आहे तेही अत्यंत ओघवत्या भाषेत. वालीवधाविषयी रामाने दिलेली कारणे न पटणारी अशीच आहेत.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 03/24/2018 - 07:55 नवीन
वालीवधाविषयी रामाने दिलेली कारणे न पटणारी अशीच आहेत. "राजकारण ही गोष्ट फार 'आधुनिक' आहे" असा तुमचा समज आहे काय ?! राजे-महाराजे निर्माण झाले ते राजकारण जन्माला आल्यानंतर आणि राजकारणाच्या संकल्पनांमुळेच :) ;)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 03/24/2018 - 08:00 नवीन
अगदी अगदी =))
  • Log in or register to post comments
उ
उपेक्षित Sat, 03/24/2018 - 15:27 नवीन
प्रचेतस भाऊ या विषयावर एखांदा कट्टा करू कि राव पुण्यात तुमचे विचार ऐकायला मजा येईल.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 03/24/2018 - 06:55 नवीन
भारत व लंका हे दोन जमिनीचे प्रदेश एकमेकाच्या खूपच जवळ, त्यांचे मध्ये जरी समुद्र दिसत असला तरी या दोन जमिनींना पाण्याखालून जोडणारा जमिनीचा उथळ भाग असणार ह्याची शक्यता खूपच आहे. त्याचा नलाला सेतू बांधताना उपयोग झाला त्यामुळे पाण्यात दगड तरंगले वगैरे आख्यायिकात काही अर्थ नाही. Ram Setu man-made? Discovery Science Channel says so, with scientific proof

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hit The Road Jack (remastered) :- Ray Charles
  • Log in or register to post comments
अ
अर्जुन Sat, 03/24/2018 - 08:11 नवीन
मदनबाण, दुसरया विडिओमधे दाखवलेले दगड नसून प्रवाळ किंवा चुनखडी आहे, असे वाटते. चुनखडी सछिद्र असल्यामुळे त्यामधे हवा भरुन रहाते.
  • Log in or register to post comments
M
manguu@mail.com Sat, 03/24/2018 - 08:58 नवीन
असे दगड खरोखरच जरी असले तरी ते इतक्या लोकांचे वजन घेउन तरंगतील का ?
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Sat, 03/24/2018 - 09:09 नवीन
समुद्रातील लाटांमुळे ही दगडं एका जागी स्थिर राहणे शक्य आहे का?७
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 03/24/2018 - 10:19 नवीन
========================== अधिक शोध केल्यावर हे सुद्धा दिसले...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hit The Road Jack (remastered) :- Ray Charles
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Sat, 03/24/2018 - 14:02 नवीन
प्रचेतस ह्यांचे प्रतिसाद आवडले. माझी शंका तर मार्मिक गोडसे ह्यांच्या शंकेपेक्षाही बालिश आहे. सर्व वानरांना एखाद्या पर्वतावर बसवायचे आणि तो पर्वत हनुमानाने उचलून लंकेत नेऊन ठेवायचा असा सरळ मार्ग का अवलंबला नाही?
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Sat, 03/24/2018 - 14:17 नवीन
हनुमानाचं लंकेत काही बरं वाईट झालं असतं तर परतीचा पर्याय राहिला नसता वानरसेनेला.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Sat, 03/24/2018 - 14:34 नवीन
हम्म. ही शक्यता ठीक आहे. पण हनुमान हा खूपच शक्तिशाली होता, दस्तुखुद्द रावणाने त्याचा प्रसाद खाल्ला होता असे नेटवर वाचलेय. त्याचे काही वाईट होऊ शकले असते असे मला वाटत नाही. पण तुम्ही सांगताय तसे यदाकदाचित झालेच तर (०.०००१% शक्यता) लक्षात घेऊन माझ्या डोक्यात आलेय तसे काही वानर सेनेने केले नसावे.
  • Log in or register to post comments
ग
गवि Sat, 03/24/2018 - 15:16 नवीन
नाऊ द्याट वी आर ऍट इट, दोन तीन मोठे पर्वत नुसतेच (बिनावानरांचे) आणून लंकेवर वरुन हवेतून खाली टाकून आदळता आले असते.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Sat, 03/24/2018 - 15:25 नवीन
दोन तीन मोठे पर्वत नुसतेच (बिनावानरांचे) आणून लंकेवर वरुन हवेतून खाली टाकून आदळता आले असते.
मग कोलॅटरल ड्यामेज नसते झालं का , इनोसंट सिविलीयन्सचे ???
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Sat, 03/24/2018 - 15:47 नवीन
रावणाने त्याचा प्रसाद खाल्ला होता असे नेटवर वाचलेय. त्याचे काही वाईट होऊ शकले असते असे मला वाटत नाही. तसं नाही हो, हार्ट अटॅक किंवा डीहायड्रेशन सारखं काही.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 03/24/2018 - 16:37 नवीन
मुळात रामसेतू हाच काल्पनिक असावा. आता राहिली हनुमानाने समुद्रात न टाकण्याची कारणं तर रामायणातील दक्षिण समुद्रतट आणि रावणाची लंका ह्यातील अंतर १०० योजन इतके उल्लेखित केलेले आहे . (एक योजन म्हणजे म्हणजे सुमारे ८ ते १३ किलोमीटर) म्हणजे रामायणातील १०० योजने म्हणजे ८०० ते १३०० किलोमीटर. जे आजच्या भारतीय दक्षिण तट आणि श्रीलंका ह्यांच्यातील सागरी अंतराचा विचार करता असंभाव्य आहे. आजचे अंतर (सध्याचा रामसेतू किंवा अॅडम्स ब्रिज) हे माझ्या माहितीप्रमाणे फक्त 35 किलोमीटर आहे. अगदी रामायणातील १०० योजन (किमान ८०० किमी) किंवा आजचे अंतर (३५ किमी) जरी धरले तरी इतका भलामोठा पर्वत समुद्रात हनुमानाने आणून समुद्रात टाकणे तत्कालीन दंतकथेप्रमाणेदेखील अशक्य आहे, शिवाय समुद्र उल्लंघन करत असता खुद्द मैनाक पर्वत प्रकटला होता पण त्यालाही मारुतीने पाण्यात ढकलले, शिवाय त्याला सेतू साठी असंख्य पर्वत टाकावे लागले असते, परत पर्वतावर चढउतार करण्यापेक्षा नलरुपी अभियंत्याकडून सेतूबंधन हा सोपा उपाय, मारुतीने द्रोणागिरी देखील वनस्पती न ओळखू आल्यामुळेच उचलून आणला होता.
  • Log in or register to post comments
ग
गणामास्तर Sun, 03/25/2018 - 06:43 नवीन
एकचं भला मोठा पर्वत समुद्रात आणून टाकण्यापेक्षा हनुमानाला २५-३० द्रोणगिरी आणून टाकायला काय झालं होतं? -गार्लिक बेडसे
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Sat, 03/24/2018 - 15:28 नवीन
त्यापेक्षा हनुमानाने श्रीलेंकेलाच उचलून आणून अयोध्येत फुरसतीत युद्ध करता आलं असतं.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 03/24/2018 - 15:52 नवीन
:) तसे नव्हे हो ईश्वराला सुद्धा सारे मानवी टक्के टोणपे खावे लागतात, असे मानवी अनुभ्वव स्वतः घेतलेला इश्वर मानवी जनतेच्या समस्या अधिक चांगल्या समजतो .(असे समजून घ्या हा का ना का)
  • Log in or register to post comments
ग
गवि Sat, 03/24/2018 - 16:09 नवीन
आमची रिसर्च टीम असे कळविते की हनुमानास पर्वत उचलणयाचे ट्रेनिंग होते परंतु बेट उचलणयाचे नव्हते.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 03/24/2018 - 15:35 नवीन
मिपा आणि मिपाकर का नव्हते आपल्या काळी, असा विचार रामराय करत असणार नक्की ;) लेख आवडला.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sun, 03/25/2018 - 06:42 नवीन
अगदी अगदी ! मिपा वाचून रावणाचा पराभव करणे जास्त सोपे होते, असं नक्कीच वाटलं असेल रामरायांना =))
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 03/25/2018 - 09:39 नवीन
नाय तर काय ! एकुलत्या एका परिटाने इतका त्रास दिला. डझनभर मिपाकर त्या काळात सोडून दिले असते तर काय हा:हा:कार माजला असता !!! =)) =)) =)) दर मिपाकरामागे रामायणाचे एक वेगळे व्हर्शन निघाले असते !
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 03/24/2018 - 15:48 नवीन
दशरथ जातक अशी सुद्धा एक व्हर्शन आहे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 03/24/2018 - 16:09 नवीन
उटगीकरांचे दशरथ जातकावरचे भाष्य रोचक वाटते
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 03/24/2018 - 16:51 नवीन
गवि, का बरं? कसं काय? कोण सावट ठेवणार? युद्ध केल्याने ते सावट कसं नष्ट होणार? सीता रावणाला आतून फितूर तर नव्हती ना असा संशय सतत राहणार. कांचनमृग मायावी दिसतोय असं रामाने स्पष्टपणे सांगूनही सीतेने त्याला हरणामागे पाठवलं. नंतर लक्ष्मणासही पाठवून दिलं. त्यामुळे रावणासा सीताहरण करणं सुकर झालं. त्यानंतर प्रबळ रामसेवक हनुमान आल्यावर तिने टोपी फिरवली, असा आरोप करता येऊ शकतो. तो नाहीसा करण्यासाठी रामाने रावणास ठार मारणं जरुरी होतं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
द
दीपक११७७ Sat, 03/24/2018 - 19:45 नवीन
तिसर, लक्ष्मण रेषाही ओलांडली
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 03/24/2018 - 21:12 नवीन
दीपक११७७, माझ्या माहितीप्रमाणे मूळ रामायणात लक्ष्मणरेषा नाही. पण अर्थात चूकभूल देणेघेणे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days 20 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days 20 hours ago
  • सुंदर !!
    5 days 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा