चतुरभ्रमणध्वनीच्या (स्मार्टफोन) कॅमेर्याचे नाविन्यपूर्ण उपयोग
आजच्या घडीला चतुरभ्रमणध्वनी (स्मार्टफोन) बाळगणे ही नेहमिची गोष्ट झाली आहे. यात संभाषण आणि संदेश पाठवणे या सर्वसामान्य सोईबरोबर फोटो काढण्यासाठी कॅमेरा ही एक आकर्षक सोय असते, हे सांगायची गरज नाहीच. किंबहुना, जेथे जातो तिथला फोटो आणि सेल्फी फेबुवर टाकली नाही तर तो अक्षम्य अपराध असावा असा हल्ली फोनकॅमेर्याचा उपयोग होऊ लागला आहे. सेल्फीचे वेड तर मानसिक आजार आहे की काय इतके वाढले आहे आणि ते अनेकदा अपघात व मृत्युचे कारणही ठरत आहे.
कॅमेर्याची सोय हल्ली इतकी महत्वाची झाली आहे की फोनचे नवीन मॉडेल आले की त्याच्या जाहिरातीत सर्वप्रथम कॅमेर्याची मोठी पिक्सेलसंख्या, पुढचा दुहेरी कॅमेरा, सेल्फी कॅमेर्याची मोठी पिक्सेलसंख्या, स्लो मोशन कॅमेरा, इ इ इ केवळ कॅमेर्याचे अनेक गुणधर्म प्रकर्षाने मांडलेले असतात. इतके की, ते पाहून ही जाहिरात फोनची आहे की कॅमेर्याची असा प्रश्न पडावा ! फोनमधले कॅमेरे इतके शक्तिशाली व वापरण्यास इतके सोपे झाले आहेत की काही दिवसांतच स्वतंत्र कॅमेरा ही वस्तू केवळ व्यावसायिक छायाचित्रकारांच्या हातातच दिसेल असे वाटते !
पण, असे काही असले तरी कॅमेरा ही फोनमधली एक महत्वपूर्ण सोय आहे यात वाद नाही. मात्र, केवळ फोटो घेणे याउप्पर त्या कॅमेर्याचे अनेक उपयोग होऊ शकतात हे बहुतेकांच्या घ्यानात येत नाही ही त्या कॅमेर्याच्या दृष्टीने एक शोकांतिकाच आहे ! फोटो/सेल्फी घेणे आणि तो साठवणे या मूलभूत सोईला इतर फोनअॅप्सबरोबर जोडून कॅमेर्याचे नेहमीच्या व्यवहारात शक्य असलेले असंख्य सोपे आणि फुकट उपयोग उपलब्ध आहेत. या लेखात त्यांचा संक्षिप्त आढावा घेतला आहे. जाणकारांनी त्यात अधिक भर टाकून मिपाकरांना शहाणे करून सोडावे व कॅमेरा+फोनअॅपसॅव्वी करून सोडावे अशी अपेक्षा आहे. :)
१. आपल्याला न येणार्या भाषेचे आपल्याला समजणार्या भाषेत भाषांतरः
परदेशांतच काय पण भारतातल्या अनेक राज्यांत फिरताना तेथिल भाषा येत नसल्याने होणारी गैरसोय ही नेहमीची गोष्ट आहे. इथे चकटफू गुगल ट्रान्सलेट (for Android and iOS) अॅप कामी येते. अॅपमध्ये कोणत्या भाषेतून कोणत्या भाषेत भाषांतर हवे ते निवडून तुमचा फोन मजकूरावर फोकस करा आणि इंन्स्टंट ट्रान्सलेट बटण दाबा, बस. त्या मजकूराचे भाषांतर तुमच्या फोनच्या स्क्रीनवर दिसू लागेल. मजकूर टाईप करण्याची गरज नाही ! रस्त्यावरून फिरताना दिसणार्या पाट्या, रेस्तराँमधला मेन्यू, छापील कागदावरचा मजकूर, इत्यादींचा त्वरीत अर्थ लावायला अत्यंत सोईचे !
सामसुंग गॅलॅक्सी S8 किंवा नंतरच्या मॉडेलमध्ये ही सोय अंतर्भूत (इनबिल्ट) आहे व ती Bixby Vision बटण दाबून वापरता येते.
२. रात्रीचे आकाशदर्शनः
आकाशदर्शनाची आवड असलेल्यांसाठी अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. त्यातले Star Walk 2 (for Android and iOS) हे अत्यंत उपयुक्त अॅप आहे. फोनमधिल लोकेशन सर्विस आणि गायरोस्कोप वापरून हे अॅप फोनच्या पडद्यावर दिसणारी नक्षत्रे, ग्रह, धूमकेतू, इत्यादिंची माहिती देते. वेळेबरोबर (पुढे/मागे) आकाशातील स्थिती कशी बदलेल, नक्षत्रांचे त्रिमिती रूप, इत्यादी गोष्टीही या अॅपवर पाहता येतात. SkyView (for Android and iOS) हे अॅपही चांगले आहे पण Star Walk 2 इतके ताकदवर नाही. मात्र हे अॅप नजिकच्या काळात आकाशात घडणार्या प्रसंगांची पूर्वसूचना देऊ शकते. जाहिरातींचा जाच सहन केला तर दोन्ही अॅप्स चकटफू आहेत.
३. ऑगमेंटेड रिअॅलिटी:
ऑगमेंटेड रिअॅलिटी म्हणजे फोटो किंवा चित्रांमध्ये डिजिटल ग्राफिक सामिल करणे. उदा: आत्याबाईला मिशा काढणे, माणसाला नसलेली टोपी घालणे, इ. इतरांकडे पाठवण्यापूर्वी फोटोंना अधिक मनोरंजक करण्यासाठी हे माध्यम उपयोगी आहे.
या विषयात असंख्य अॅप्स आहेत. Snapchat (for Android and iOS) मध्ये ही सोय अंतर्भूत आहे. Inkhunter (for Android and iOS) हे सुद्धा चांगले आहे. Ikea Catalog app (for Android and iOS) मध्ये तुम्ही आपल्या घराच्या फोटोत वेगवेगळे फर्निचर ठेवून ते शोभून दिसेल की नाही हे पडताळून पाहू शकता.
४. डिजिटायझेशनः
सद्याच्या डिजिटल जमान्यात कागदी दस्त साठवून ठेवण्याची गरज दिवसेदिवस कमी होत आहे. अनेक अनौपचारिक व औपचारिक देवाणघेवाणितही (बँक स्टेटमेंट्स, जागेचे फोटो, कागपत्रे, पावत्या, बिझनेस कार्ड्स, ते गरजेचे नसते. त्यांच्या डिजिटल प्रती फोनमध्ये/क्लाऊडवर (गुगल ड्राईव्ह, ड्रॉपबॉक्स, इ) साठवणे किंवा (इमेल, व्हॉट्सॅप, इ वापरून) घर/ऑफिसच्या बाहेर असतानाही त्वरीत दुसरीकडे पाठवणे, यासाठी अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. असा व्यवहार (डेटा प्रोव्हायडर सोडून) कोणत्याही वहनसेवादात्याच्या (उदा: कुरिअर, पोस्त, इ) मदतीशिवाय जलद, सहजसुलभ व पेपरलेस करण्यासाठी ही अॅप्स फार उपयोगी आहेत.
यातिल काही अॅप्समध्ये स्वयंचलित क्रॉपिंग/रोटेशन/ठळक करणे (फोटो एडिटिंग), फोटोचे (एडिट) करण्याजोग्या मजकूरात रुपांतरण करणे, इत्यादी सोयी अंतर्भूत आहेत. या प्रकारातील CamScanner हे अॅप त्यातिल अनेक उपयोगी सोईंमुळे माझे आवडते आहे.
५. माहितीदर्शन (Look up information):
गुगलफोटोमध्ये नुकतेच अंतर्भूत केलेल्या Google Lens तंत्राने (हे सद्या फक्त Android मध्ये उपलब्ध आहे, iOS साठी ते नजिकच्या भविष्याकाळात येईल) एखाद्या गोष्टीचा (उदा: ऐतिहासिक वास्तू, फूल, प्रसिद्ध व्यक्ती, नावाजलेले चित्र, इ) फोटो किंवा तिचे चित्र वापरून तिच्याबद्दलची माहिती मिळविता येते.
६. दुवा टाईप न करता संस्थळे उघडणे:
हल्ली बरीच संस्थळे त्यांचा QR code पाटी, पार्सल, पोस्टर, माहितीपत्रक, स्टेशनरी, इत्यादींवर प्रसिद्ध करतात. तो कॅमेर्याने स्कॅन करून त्यांचे संस्थळ उघडता येते व त्या संस्थळावर संपूर्ण महिती उपलब्ध होते. जालावर असंख्य QR code Scanner/Reader उपल्ब्ध आहेत.
७. छुपा सुरक्षा कॅमेरा (स्पायकॅम):
एखादा जुना/अतिरिक्त फोन आणि सतत जवळ असलेला फोन अशी जोडी वापरून या अॅप्सच्या वापराने आपले घर, घरातील लहान मुले, पाळीव प्राणी, इत्यादींवर घराबाहेर पडल्यावरही नजर ठेवता येते. यासाठी, Manything (for Android and iOS) हे फार उपयोगी अॅप आहे. घरातल्या लहान मुलांवर लक्ष ठेवायला Dormi (for Android only) व Cloud Baby Monitor (for iOS only) ही उपयोगी अॅप्स आहेत. यापैकी काहींमध्ये, हालचालीने सक्रिय होणे, लहान मुल रडू लागल्यास आवाज मोठा करून गजर वाजवणे, मुलांशी बोलायची व्यवस्था असणे, चित्रण जालावर साठवणे, इत्यादी (विनाशुल्क/सशुल्क) सोयी आहेत.
८. काढलेले फोटो आपोआप जालावर साठवणे:
काढलेले बहुतेक फोटो त्वरीत कामाचे नसतात व केवळ आठवण म्हणून काढलेले असतात. ते फोनवर सतत साठवून बाळगणे आवश्यक नसते. बहुतेक सर्व कॅमेरा अॅप्समध्ये फोटो त्वरीत (किंवा ब्रॉडबँड उपलब्ध झाल्यावर) जालावर साठवण्याची आणि फोनवर आवश्यक नसलेले फोटो तेथून नष्ट (डिलिट) करण्याची सोय असते. यामुळे फोनवरची जागा (मेमरी) भरून फोन संथ होण्याचे प्रमाण कमी होते.
८. आठवणीत ठेवायचा मजकूर:
बर्याचदा आपल्याला एखाद्या जागेचा पत्ता, एखादी संख्या किंवा इतर कोणती माहिती (उदा: टू डू लिस्ट्स, प्रवासात बरोबर घेतलेल्या प्रत्येक बॅगेतील वस्तूंची यादी, हॉटेलमधले महत्वाचे फोन नंबर्स, इ) फक्त काही काळासाठी साठवून ठेवायची असते. ती फोनमध्ये (अॅड्रेसबुक, इ मध्ये) टंकणे हा अनावश्यक त्रास असतो. यावर उपाय म्हणून अनेक नोट साठवणारी अॅप्स आहे जी मजकुराबरोबरच फोटोही साठवू शकतात. अश्या गोष्टींचे फोटो फोनमध्ये साठवल्यास ते सतत उपलब्ध राहतात व काम झाल्यावर ते फोटो डिलिट करून फोनमधील जागा रिकामी करणे शक्य होते.
या प्रकारातले माझ्या आवडिचे अॅप Google Keep आहे. यात लिखित मजकूर, आवाजी मजकूर व फोटो वेगवेगळ्या नोट्समध्ये विषयवार साठवून ठेवता येतात. मजकूर ठेवताना बुलेट लिस्ट हा उपलब्ध प्रकार फार सोईचा आहे. तो वापरून यादी बनवल्यास त्यातील प्रत्येक नोंद स्वतंत्रपणे कमी जास्त करता येते. आपल्या प्राथमिकतेप्रमाणे याद्यांचा क्रम पुढेमागे करता येतो. याद्यांना कलर-कोड करता येते. दीर्घकाळ / वारंवार लागणार्या याद्या काम झाल्यावर आर्काईव्ह करून ठेवाता येतात व जरूर पडेल तश्या परत वर आणता येतात, इ इ इ.
मोबाईल फोन कॅमेरा वापरणार्या अॅप्सची ही केवळ एक छोटीशी जंत्री आहे. इतरांनीही त्यात जरूर भर घालावी. या माहितीची देवाणघेवाण सर्वांच्या फायद्याची होईल असे वाटते.
कृपया, इथे फक्त "फोनचा कॅमेरा वापरून फोटो काढण्यापलिकडे शक्य असलेल्या उपयोगांचीच" चर्चा करणे अपेक्षित आहे. धन्यवाद !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आँखें मिलानेवाले, दिल को चुरानेवाले मुझको भुलाना नही... :- Nazia Hassanमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hit The Road Jack (remastered) :- Ray Charles