Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

ग्रामीण निवासस्थाने- घरे

ड
डॉ. सुधीर राजाराम देवरे
गुरुवार, 03/15/2018 - 12:51
💬 2 प्रतिसाद
- डॉ. सुधीर रा. देवरे बागलाण हा एकेकाळी चार जिल्हे आपल्या पोटात घेणारा प्रंचड प्रांत होता. नाशिक जिल्ह्याचा काही भाग, धुळे, जळगाव, नंदुरबार, आजच्या गुजराथच्या ताब्यात असलेला डांगचा काही भाग अशा या मोठ्या प्रांताला बागलाण म्हटलं जायचं. बागूल राजाची राजवट असलेला तो बागलाण प्रांत. आता हा प्रांत एका तालुक्यापुरता मर्यादित झाला. आजच्या बागलाण तालुक्याचे क्षेत्रफळ केवळ 1616.2 चौ. किमी. असून आताच्या बागलाण तालुक्यात एकूण फक्‍त एकशे सहासष्ट गावे आहेत. तरी सुध्दा इतक्या कमी क्षेत्रफळात या भागात घरांची रचना दोन प्रकारची दिसून येते. याचं कारण बागलाणच्या पश्चिम पटट्यात असणारे पावसाचे जास्त प्रमाण. बागलाणच्या पश्चिम भागाला डांग आहे. डांग भागात पूर्वी बर्‍यापैकी जंगल असल्याने पावसाळ्यात आठ आठ दिवस पावसाची झडी लागायची. याला झडी ऐवजी ‘वर डांग लागना’ असंही म्हटलं जायचं. पाश्चिम भागात कोकणा लोकांचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे म्हणून या भागाला कोकणही म्हणतात. (पण महाराष्ट्राच्या दक्षिणेतला समुद्र तटावर वसलेला कोकणी भाग वेगळा आणि बागलाणातला हा छोटासा उत्तर कोकण वेगळा.) बागलाणच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने तिथं उतरत्या छपरांची घरे जास्त आढळायची. नवापूर, नंदुरबार, पिंपळनेर, साक्री, मुल्हेर, कळवण, दिंडोरी, वणी, पेठ, सुरगाणा आदी भागात उतरत्या छपराची घरे होती. उलट बागलाणच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी म्हणून या भागात मातीच्या धाब्याची सपाट घरे जास्त प्रमाणात होती. उतरत्या छपरांच्या घरांसाठी ऊसांचे पांजडं वापरून झ्याप तयार केला जायचा. गावठी लाल- काळ्या मातीच्या कौलांची घरं असायची, प‍त्र्यांच्या घरांचं प्रमाणही मोठं होतं. नंतर आर्थिक सुबत्ता आलेल्या लोकांची इंग्रजी कौलांची घरंही कुठं कुठं दिसू लागली होती. बागलाण पूर्व भागात आणि धुळे, शिरपूर, जळगाव परिसरातील काही गावातही बहुतांशी मातीच्या धाब्याची किलचनची घरे दिसायची- अजूनही आहेत. यात चिखलाच्या रद्याने बांधलेली घरं जशी आढळायची, (मातीत कुटार वा कडबा टाकून रात्रभर माती भिजवून हेल्याच्या -रेड्याच्या मदतीने ती माती चांगली रगडली की जो निब्बर चिखल तयार होतो त्याला रद्दा म्हणतात. रद्याच्या‍ भिंतीत विटा दगड वगैरे काहीही न वापरता फक्‍त चिखलात बांधकाम केलं जातं.) तशी मातीच्याच पण न भाजलेल्या कच्च्या आणि चौड्या (पसरट) विटांनी मातीतच बांधलेली घरं दिसायची. लाकडाच्या सर्‍या उभारून त्यावर लाकडाच्या आडव्या कड्या टाकलेल्या असत. लाकडांच्या कड्यांवर लाकडांचेच आडवे तिडवे लाकडांचे किलचन अंथरून त्यावर मातीचा चिखल ओतून तयार केलेली धाब्याची घरं म्हणजे किलचनची घरं. आणि धाब्याच्या घराचा दुसरा प्रकार पाटाइचे घर. ‍किलचन ऐवजी लाकडी सर्‍यांवर नेटकेपणाने व्यवस्थित फळ्या टाकून वर चिखल ओतला की ते झालं पाटाइचं घर. घर टुमदार दिसलं पाहिजे, घराला रंगरगोटी केली पाहिजे असं त्यावेळच्या ग्रामीण माणसाला वाटलं नाही. राहण्यासाठी फक्‍त घर हवं. डोकं घालायला घर पाहिजे. घराच्या बाहेरच्या भिंती चिखलाने सारवल्या जात, तर आतून घर मातीने पोतारले जायचे. घराची जमीन मातीची असायची आणि ती चार पाच दिवसांनी शेणाने सारवावी लागायची. टुमदार देखणं घर बांधून त्याच्या भिंती धुवून पिल्याने पोट भरता येईल का, असं गावातले लोक म्हणायचे. म्हणून घरासाठी प्रचंड पैसा खर्च करण्यापेक्षा शेतीत पैसा लावला जायचा. वा शेती विकत घेतली जायची. त्यावेळी भट्टीत भाजलेल्या लाल विटा आणि सिंमेटची घरं खेड्यात दिसायची नाहीत. तसं बांधकाम दिसलं की ते कुठलं तरी सरकारी बांधकाम असेल असं समजलं जायचं. (काही गावातल्या प्राथमिक शाळा त्यावेळी चुना आणि दगडांत बांधलेल्या होत्या. वर इंग्रजी कौलं असायची.) पण अलिकडे सर्व खेड्यापाड्यात भाजलेल्या लाल विटा, सिमेंट, आरसीसी, लोड बेअरींग आणि वर स्लॅब असं आधुनिक बांधकाम मोठ्या प्रमाणात होत आहे. शहर आणि खेडं हा फरक आज सर्वच बाबतीत पुसला गेला असला तरी तो घरांच्या बाबतीत प्रकर्षाने जाणवतो. खेड्यातच नव्हे तर शेतात वस्ती करणार्‍या लोकांचे बंगलेही आज काँक्रेटीकरणात सजलेले दिसतात. पूर्वी शेतात पांजडाचे झ्याप बांधलेले असत, म्हणजे झोपड्याच. (या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.) – डॉ. सुधीर रा. देवरे इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6879 views

💬 प्रतिसाद (2)
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 03/15/2018 - 16:32 नवीन
रोचक माहिती. धाब्याच्या घरांचे फोटो असते तर समजायला सोपं गेलं असतं. गोपाळराव मोरे यांनी चिकाटीने केळझर धरण मंजूर करून घेतल्याचे वाचनात आले होते त्यामुळे बागलाण लक्षात राहिले होते.
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… Fri, 03/16/2018 - 13:01 नवीन
मार्मिक गोडसे जी धन्यवाद. हो बरोबर वाचलंय आपण. धाब्यांच्या घरांची फोटो होतील उपलब्ध. जरूर.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days 19 hours ago
  • सुंदर !!
    5 days 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा