Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

माध्यमांतर– "एपिक" धर्मक्षेत्र: द्रौपदी एपिसोड!

न
निमिष सोनार
Tue, 03/06/2018 - 12:34
💬 3 प्रतिसाद
सूचना: आरंभ या जानेवारी २०१८ पासून सुरु झालेल्या ई-मासिकातील फेब्रुवारी अंकातील माझा हा अभिनव प्रयोग - माध्यमांतर! खास येथे मिसळपाव वाचकांसाठी देत आहे!) टीव्ही एपिसोड लिखित स्वरूपात म्हणजे माध्यमांतर! दृकश्राव्य माध्यम ते छापील माध्यम! आरंभ येथून डाउनलोड करता येईल: https://play.google.com/store/apps/details?id=com.marathi.magazine.aarambh प्रस्तावना: एपिक चॅनलवरील महाभारतावर अभिनव प्रयोग केलेल्या "धर्मक्षेत्र" च्या पहिल्या एपिसोडबद्दल मी ह्या महिन्यात लिहित आहे ज्यात द्रौपदीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. "एपिक ऑन" हे मोबाईल ऍप खास सबस्त्राईब करून मी काही एपिसोड अभ्यासून ते खास "आरंभ" च्या वाचकांसाठी "अध्यात्म" या सदरात (माध्यम रूपांतर करून) देत आहे. अर्थात हे माध्यम रूपांतर वाचकांना नीट समजण्यासाठी थोडे स्वैर आहे याची नोंद घ्यावी. ज्यांनी "धर्मक्षेत्र"चे हे एपिसोड पाहिले असतील किंवा नसतीलही आणि ज्यांनी महाभारत वाचले किंवा पाहिले असेल किंवा नसेल; अशा सगळ्या वाचकांना काहीतरी वेगळे पण माहितीपूर्ण वाचल्याचे नक्की समाधान या अभिनव सदरातून मिळेल, हे मात्र नक्की!) एपिसोड सुरु: (कुरुक्षेत्रावरचे युद्ध संपून आता चित्रगुप्तच्या दरबारात पाप पुण्याचा हिशेब करण्याची वेळ आली आहे. महाभारतातील सगळे पात्र आता मृत्यू पावले आहेत, असे येथे गृहीत धरले गेले आहे.) चित्रगुप्त येतात... त्यांना सगळे अभिवादन करून बसतात मात्र कर्ण पांडवांजवळ बसायला नाही म्हणतो आणि त्याचा परम मित्र दुर्योधनाजवळ बसायची परवानगी मागतो आणि त्याचे जवळ जाऊन बसतो. सध्या दरबारात फक्त द्रौपदी आणि कृष्ण यांची अनुपस्थिती असते. मग त्या धर्मेक्षेत्राच्या कोर्टात गांधारी आणि कुंती येतात. गांधारी व्देषभावना मनात ठेऊन, कोर्टात (दरबारात) द्रौपदीला आणण्याची चित्रगुप्त याला विनंती करते. एका झाडाखाली द्रौपदी उभी असते, तिला कृष्ण "धर्मक्षेत्र"च्या दरबारात चलण्याची विनंती करतो. दोघे तेथे येतात... पहिला आरोप तिच्यावर लागतो की पांडवांशी विवाह करणे हे द्रौपदीचे षडयंत्र होते, तिच्या वडिलांचा बदला पूर्ण करण्यासाठी! मग स्वयंवरात काय घडले याविषयी चर्चा सुरू होते. गांधारी द्रौपदीवर आरोप करते की स्वयंवरात तिची नजर सर्वप्रथम कुणावर गेली? पांडवांवर तर नक्की नाही. द्रौपदी खरे सांगते की कर्ण. चित्रगुप्त: "मग कर्णाच्या गळयात माळ का नाही घातली?" द्रौपदी: "कारण तो सूतपुत्र होता!" गांधारी: "चूक आहे. तू कौरव पांडवांचे शतृत्व आणखी वाढावे यासाठी असे केलेस आणि तुझा जन्मच मुळात तुझ्या वडिलांचा एक बदला घेण्याच्या दृष्टीने झाला. (द्रुपद आणि द्रोण यांची दुष्मनी सर्वश्रृत आहे आणि सगळ्यांना माहीत आहे) तिची इच्छा होती की भाऊ (दृष्टद्युम्न) सोबत वडिलांना मदत करावी. तिला युद्ध घडवायचे होते. म्हणून तिने कर्णाला मुद्दाम नाकारले!" कृष्ण आक्षेप घेतो आणि सांगतो की मीच तिला "अर्जुन हा, तुझी नियती आहे" हे सांगितले होते आणि त्याला स्वयंवरात वरायला सांगितले. कर्ण प्रश्न विचारायला उभा राहतो तर भीम कर्णावर धावून जातो आणि दोघे एकमेकांना मारण्यास उठतात. चित्रगुप्त त्यांना चूप करतो. भीमाच्या मते कर्णाला द्रौपदीला काही प्रश्न विचारायचा अधिकार नाही. कर्ण: "द्रौपदी तू माझ्याशी लग्न केले असते तर युद्ध झालेच नसते. तू सांगितले असते की तुला गुरु द्रोण यांचा बदला घ्यायचा आहे तर मी सगळे हारून तुला मदत केली असती. विचार दुर्योधनाला! मी त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण केली आहे. आपण त्याची मदत घेतली असती." द्रौपदी: "बरोबर आहे. जो माणूस आपल्या मित्राची प्रत्येक इच्छा पूर्ण करायला बांधील आहे त्याला माझ्यासाठी वेळ काढायला जमले असते का? त्याचे ऐकून तू माझेशी कसाही व्यवहार केला असता. तू खरे तर माझ्याशी लग्न करायला लायक नाहीस. नव्हता!" मग कुंती येते आरोप करायला!! चित्रगुप्त: "कुंती जी, कौरव पांडव यांच्यात नेहमी भांडणे होत होती तर तुम्हाला कधी वाटले होते का की भविष्यात यांच्यात युद्ध होईल?" कुंती गप्प!! चित्रगुप्त: "वेगळ्या पद्धतीने विचारतो. तुला तुझ्या सुनेची वागणूक योग्य वाटली का? कौरव पांडव यांच्यातील शत्रुत्व वाढेल असा प्रयत्न तिने केला असे तुम्हाला नाही वाटत? मयसभेत दुर्योधन पाण्यात पडला तेव्हा द्रौपदी त्याला हसून म्हणाली की तुला तुझ्या वडिलांसारखे दिसणे बंद झाले का? आंधळा झालास का? (त्याला तेव्हा सुयोधन असे संबोधले जायचे) आणि पुढचा आरोप म्हणजे मोठ्या व्यक्तींचा तिने अपमान केला आहे. कुंती जी तुम्ही उत्तर द्या!" कुंती: "हो. ही पांडवांच्या जीवनात आली आणि सगळे पांडव बदलले. खुनशी झाले. शत्रुत्व आणखी वाढले!" कृष्ण: "चूक आहे तुमचे. कौरवांनी पांडवांना अनेक वेळा जिवानिशी मारण्याचा प्रयत्न केला, त्रास दिला तेव्हा तुम्ही चूप राहिलात आणि तुम्ही चूप म्हणून पाचही पांडव चूप राहिले. पण द्रौपदी बोलली म्हणून तिला चूक मानले गेले. ती पांडवांना एवढेच म्हणाली की कौरवांनी तुमच्या सोबत एवढे सगळे करून तुम्ही चूप का राहिलात? अन्याय सहन का केला? लहानपणीच भीमाला पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न दुर्योधनाने केला तेव्हा त्याला योग्य वेळेस धडा का नाही शिकवला? शिकवला असता तर लक्षागृहात पुन्हा तुम्हा पाचही भावांना मारण्याची हिम्मत त्यांची झाली असती का? कुंती आत्या, लक्षात घ्या! तुमची मुले लहानपणापासून शुर होते आणि त्यांना योग्य दिशा देण्याचे काम फक्त द्रौपदीने केले आणि आज तुम्ही तिचा अपमान केलात?" मग द्रौपदीचा भूतकाळातील प्रत्येक पांडवांसोबत संवाद दाखवला जातो. चित्रगुप्त: "सुयोधनाचा द्रौपदीवर पुढचा आरोप आहे की तिने द्युतक्रिडेत झालेल्या अपमानाचे कारण पुढे करून युद्धाला आमंत्रण दिले!" मग चित्रगुप्तच्या दरबारात वाद विवाद होतात की द्रौपदीला द्युतक्रिडेत दुःशासन ओढत आणतो तेव्हा द्रौपदी कुलवधू असते की दासी? आणि तिला द्युतात पणाला लावण्याबाबत जबाबदार कोण? आणि द्रौपदीचा त्या युक्तिवादात विजय होतो. ती म्हणते की जर युधिष्ठिर स्वत:ला द्यूतात हारून चुकला होता तेव्हा त्याला द्रौपदीवर अधिकार नव्हता आणि म्हणून तिला पणाला लावायचा त्याला अधिकार नव्हताच. म्हणून तिला द्युतक्रिडेत ओढत आणले तेव्हा ती दासी नव्हती तर कुलवधू होती आणि दुर्योधनाचा युक्तीवाद ती खोडून काढते की ती त्यावेळेस दासी होती आणि सभेत दासीचा नाही तर कुलवधूचा अपमान झाला हे ती सिद्ध करते. मग गांधारी आणि कुंती यांचा द्रौपदीवरून वाद होतो कारण गांधारीला द्रौपदीचा द्युतक्रिडेतला अपमान साधारण अपमान वाटतो मग कृष्ण दोघींना खडसावतो आणि "दुर्योधन द्युतक्रिडेत द्रौपदीला मांडीवर बसण्यास सांगतो" या द्रौपदीच्या अपमानाची आठवण करून देतो. नंतर गांधारीला खडसावतो की तुझी मुले तुझे काहीही ऐकत नसत. मग गांधारीचा कृष्ण थोडासा अपमान करतो तेव्हा दुर्योधन चिडतो मग कृष्ण सांगतो की तुझ्या आईचा थोडासा अपमान सहन करत नाहीस आणि द्रौपदीचा (जी तुझ्या मोठ्या भावाची पत्नी आहे म्हणजे आईसमान आहे) इतका मोठा अपमान तू भर सभेत केलास आणि जर का तो अपमान मनात धरून त्याला युद्धाचे कारण द्रौपदीने बनवले तर त्यात गैर काय? मग गांधारी कबूल करते की ती पुत्रप्रेमात आंधळी झाली होती आणि तिची मुले तिचे ऐकत नसत. मग चित्रगुप्त द्रौपदीचा फैसला सुनावतात: "महत्त्वाकांक्षी असणे चांगले फक्त ती अतिरेकी नको. तुम्ही (म्हणजे द्रौपदी) येणाऱ्या पिढ्यांसाठी एक उदाहरण बनून राहाल. अशा प्रकारे द्रौपदी एपिसोड संपतो... माध्यमांतर हा प्रयोग कसा वाटला ते जरूर सांगा आणि प्रतिक्रिया द्या! (समाप्त) माझ्या ब्लॉग ला जरूर भेट द्या: https://vachanastu.blogspot.in/ २७ फेब्रुवारीला माझ्या वाढदिवशी माझी वलय ही कादंबरी ईसाहित्य वर प्रकाशित झाली आहे. काही सत्य घटनांचा आधार घेऊन लिहिलेली सिने टीव्ही क्षेत्रावर आधारित ही एक मनोरंजक, खळबळजनक आणि थरारक (काल्पनिक) कादंबरी आहे आणि ती येथून डाउनलोड करता येईल: http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/valay_nimish_sonar.pdf धन्यवाद! - निमिष सोनार, पुणे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2962 views

💬 प्रतिसाद (3)
ख
खिलजि Tue, 03/06/2018 - 14:43 नवीन
निमिष साहेब महाभारत ... एक अप्रतिम ग्रंथ काव्य .. यात सर्व आहे .. काम , क्रोध , ईर्ष्या , मत्सर , छळ , कपट, त्याग , निस्सीम प्रेम , श्राप वाणी आणि त्यांचे परिणाम , प्रतिज्ञा पालन ,, सर्व सर्व .. मला वाटते , कि प्रस्तावना थोडी जास्त परिणाम कारक व्हायला हवी होती ... आचार्य द्रोण आणि द्रुपद , यांची जशी दुश्मनी महाभारतास कारणीभूत आहे तशीच त्यांची निस्सीम मैत्रीही ... गुरुकुलात असताना , द्रोण आपला गुरुबंधू द्रुपद याच्याशी काही अंतर ठेवूनच राहत होते .. द्रुपदालाही हे माहित होते कि द्रोण काय हस्ती आहे ते .. त्यानेच बळेच त्यांच्याशी मैत्री साधली आणि कधीही अंतर देणार नाही याची त्यांना ग्वाही दिली .. जेव्हा गुरुकुलातून बाहेर पडण्याचा दिवस आला तेव्हा सर्वात जास्त बंधूंवियोगाचा शोक द्रोणाचार्यानी व्यक्त केला होता ... द्रुपदानेही त्याला तितकीच तोडीची साथ दिली होती .. द्रोणांच्या वाईट कालखंडात , ते जेव्हा मदत मागायला गेले तेव्हा ती खोटी होती हे कालांतराने सिद्ध झाले ... इथेच त्यांनी प्रतिज्ञा घेतली आणि महाभारतास खरा प्रारंभ झाला ... पुढील होणारे परिणाम बघून आणि त्यांची होऊ शकणारी परिणामकारकता बघूनच राजा द्रुपद द्रोणांच्या वधासाठी शक्ती प्राप्त करण्यासाठी मोठ्या तपश्चर्येला बसला ....एक अप्रतिम ग्रन्थकाव्य.. कधीही होणे नाही असे ... यात असलेल्या सर्व गोष्टींची अनुभूती आजही इतक्या हजारो वर्षानंतर आपण अनुभवत आहोत ... काहीही बदललेले नाही आहे .. कौरव ;; टेस्ट ट्यूब बेबी .. हा प्रकार त्यावेळे देखील असावा असं काहीस कौरवांचा जन्म होता .. गांधारीने पाडलेला गर्भ वेद व्यासांनी त्यांच्या तपोबलाने आणि सूर्याच्या उन्हाने ( त्याचे शंभर गोळे ) करून कालांतराने कौरवांस जन्माला घातले ... मोठा गोळा होता त्याचे नाव " सूर्योधन " असे ठेवले तर दुसऱ्याचे सुशासन आणि अशी बरीच काही चांगली नावे .. कौरवांची नाव तर चांगली होती पण त्यांचे दुष्कर्म आणि फलद्रूप प्रत्येक नावासमोर " सु " च्या ऐवजी " दु " लागत गेले ... निमिष साहेब ,, मस्त रंगवता येईल हा एपिसोड ... सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 03/07/2018 - 09:54 नवीन
हा भाग थोडाफार पाहिला होता. त्याचा कोर्ट फॉर्मॅट फारसा आवडला नव्हता. तुम्ही चांगले लिहिले आहे. कादंबरी प्रकाशनासाठी अभिनंदन!
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 03/11/2018 - 22:08 नवीन
निमिष सोनार, महाभारतातल्या पात्रांच्या मनाचा वेध घ्यायचा प्रयत्न चांगला रंगला आहे. व्यासांची पात्रं ओढाताण न होता अलगदपणे चित्रगुप्ताच्या सभेस येऊन बसलेली वाटतात. लाक्षागृह, वस्त्रहरण, इत्यादिंचे संदर्भ अचूक व यथोचितपणे आलेले आहेत. फक्त एक संदर्भ चुकला आहे. तो म्हणजे मयसभेत द्रौपदी नव्हती. त्यामुळे तिच्याकडून दुर्योधनाचा अपमान होणं अशक्य आहे. धृतराष्ट्रासोबत गांधारीदेखील पुत्रप्रेमाने आंधळी झाली होती हे विधान चिंतनीय आहे. तिने जर वेळच्या वेळी आक्षेप घेतले असते तर दुर्योधन काबूत राहिला असता. ही एक शक्यता आहे. दुसरी शक्यता म्हणजे तिलादेखील सूड उगवायचा होता. धृतराष्ट्राशी तिचं लग्न फसवून लावण्यात आलं. हे अर्थात शकुनीचं कर्तृत्व. त्यामुळे तिने सूड म्हणून आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधून राहण्याचा निश्चय केला असावा. पुढे कौरवांचा जन्म झाल्यावर आपली अलिप्त भूमिका चालू ठेवली. तिसरी शक्यता म्हणजे अपराधीपणाची टोचणी. तिच्या चुकीने तिने स्वत:चा गर्भगोळा पाडला. त्याचे १०० भाग केले व त्यातून कौरव जन्मले. ही चूक तिला बोचंत असावी. त्यामुळे तिने दुर्योधनाच्या कारवायांत हस्तक्षेप केला नाही. ज्याप्रमाणे कुंतीस कारणाविषयी अपराधीभाव होता तसाच गांधारीस सर्व कौरवांप्रती असावा. तुम्ही वर्णन केलेल्या पहिल्या शक्यतेमुळे विचारांस चालना मिळाली. त्याबद्दल धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days 18 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days 18 hours ago
  • सुंदर !!
    5 days 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा