युरोपच्या डोंगरवाटा ३: नॉर्वेतील एक अविस्मरणीय बसप्रवास
डोंगरवाटांचं सौंदर्य पाहायचं तर पायीच भटकायला हवं असं नाही. प्रवास ट्रेनचा असो, बस किंवा चारचाकीचा असो, घाटवाटा, धुकं, पाऊस, कोसळणारे धबधबे हे मोहवून टाकतातच!
उत्तर युरोपातील नॉर्वे या देशाचं नाव घेतलं की फ्योर्डस् (Fjords) आणि northern lights (aurora borealis) आठवतात. यातलं दुसरं आकर्षण पाहणं सोपं नसलं तरी फ्योर्डसचं संथ पाणी मात्र पर्यटकांचं स्वागत करायला असतंच. फक्त ऋतूनुरूप त्याच्या आजूबाजूचे पर्वत कधी बर्फ लेवून समाधिस्त दिसतात, तर कधी धबधब्यांचे तुषार उडवत असतात. नॉर्वेच्या या भागात प्रवास करणे हासुद्धा पर्यटनाचाच एक भाग आहे, असं वाचलं होतं. त्याचा प्रत्यय २०१४ साली नॉर्वेतील एका बसप्रवासात आला. पर्यटकांची गर्दी टाळून नॉर्वेच्या अंतर्भागात वाट वाकडी करून केलेल्या त्या प्रवासाने निसर्गाची इतकी अप्रतिम रुपं दाखवली की आजही नॉर्वे म्हटलं की तो प्रवास आठवतो.
प्रवासाला सुरूवात झाली Ålesund या पश्चिम किनार्यावरील शहरातून. गंतव्य होतं सुप्रसिद्ध Sognefjord च्या Lustrafjorden या शाखेवरील Nes हे चिमुकलं गाव. २६० किलोमीटरचा हा प्रवास बसने करायला सुमारे सात तास लागणार होते. एवढा वेळ लागायची कारणं होती कमी वेगमर्यादा असलेले काही रस्ते आणि फ्योर्डसमध्ये अनिवार्य असलेला जलप्रवास.
बस सुटल्यावरही हवामान बदलायचं चिन्ह दिसत नव्हतं. तसाही शहरी भाग बघण्यात रस नव्हताच. थोड्या वेळाने फ्योर्ड ओलांडण्यासाठी पहिल्या फेरीत चढलो (म्हणजे प्रवाश्यांसकट अख्खी बस चढली) आणि कॅमेर्याला एकदाचं काम मिळालं.
२० मिनिटांचा फेरीचा प्रवास संपला आणि बस पुन्हा मार्गी लागल्यावर पाऊस सुरू झाला. फ्योर्डच्या दुसर्या शाखेतून येणारी फेरी फोटोत दिसत आहे.
आता रस्ता पाण्याच्या कडेने जात होता. वातावरण ढगाळ असलं तरी पलीकडच्या तीरावरचे डोंगर, कुठे पाण्याच्या काठावर असलेली टुमदार घरं सुरेखच दिसत होती. मे महिना असल्याने हिवाळा संपून थोडीफार हिरवळही होती.
फ्योर्डच्या तीरावर दिसलेले हे या प्रवासातील एकमेव शहर. पाचेक मिनिटांनी बस पुन्हा एका बोटीच्या धक्क्यावर आली तेव्हा लक्षात आलं आता तिकडेच जायचंय.
इथे थोडं या फेरींबद्दल लिहायलाच हवं. नॉर्वेच्या फ्योर्डसच्या भागात अनेक ठिकाणी फेरी बोटी या रस्त्याच्या जाळ्यात मोडतात. आमची बस ज्या E३९ या युरोपियन महामार्गावरून जात होती त्याच रस्त्याचा ही फेरी एक भाग होती. स्वतः गाडी चालवून नॉर्वेत फिरायचं असेल तर वाटेतल्या सगळ्या फेरींची वेळापत्रके पाळणं महत्त्वाचं ठरतं. कुठेतरी मस्त धबधबा वगैरे दिसला म्हणून थांबलो आणि फेरी गेल्यामुळे अडकलो असं होऊ शकतं. शिवाय फेरीचं शुल्कही द्यावं लागतं.
बसच्या वाहतुकीत फेरी अंतर्भूत असल्याने वेगळा आकार नसतो. फेरी चालवणार्या वेगवेगळ्या कंपन्या असतात. बस आणि फेरीची वेळापत्रकं integrated असल्याने आणि बसेस (मे महिन्यात तरी) वेळेवर धावत असल्याने अजिबात व्यत्यय न येता प्रवास सुरू राहतो. शाइला पोहोचेपर्यंत तीनदा फेरीने वेगवेगळे फ्योर्डस् ओलांडले. प्रत्येक फेरीच्या वेळी एकच दृश्य दिसले. सगळ्या खासगी गाड्या धक्क्यावर रांग लावून असत. बस आली की सरळ फेरीवर चढून दुसर्या टोकाला जाऊन थांबत असे. मग बाकीच्या गाड्या चढत. पलीकडच्या धक्क्यावर सगळ्यांत आधी बस बाहेर पडे. पण त्यामुळे उगाच आपल्याला स्पेशल ट्रीटमेंट मिळत्येय असं वाटायचं!
फेरीत बस चढली की चालकासकट सगळ्यांनाच पाय मोकळे करायला मिळत. भणाणणारा वारा खायला मिळे. अर्थात फेरीगणिक इतर खानपानाचीही सोय असते. त्यात मला विशेष आवडले Brunost हे कॅरेमलच्या चवीचं चीझ भरलेले पॅनकेक्स. एका फेरी कंपनीच्या बोटींवर खाल्ले त्या चवीचे पॅनकेक्स इतर कुठे मिळाले नाहीत.
फेरीनंतर E३९ हा महामार्ग सोडून बस FV६५१ या लहान रस्त्याने निघाली. E३९ फेरी न घेता लांबून वळसा घेऊन Nordfjordeid ला जातो. अर्थात रस्ता कोणताही असला तरी बाहेर दिसणारी निसर्गाची रूपं अप्रतिमच होती. डोंगरमाथ्यावर वितळणारं बर्फ खाली आणणार्या असंख्य जलधारा आणि कुठे मोठे धबधबे डोळ्यांना सुखावत होते.
Nordfjordeid ला बस थोडा वेळ थांबणार होती. मग थोडी झोप काढली. जाग आली तेव्हा बस पुन्हा महामार्गावरून धावत होती. बाहेरचं दृश्य पाहून झोप लागल्याची हळहळ वाटली.
पुन्हा एक छोटा जलप्रवास पार पडला. शाइला पोहोचायला सुमारे एक तास होता. खिडकीतून बाहेर बघण्यात मस्त वेळ जात होता.
शाइला उतरल्यावर बस पुढे निघून गेली. डोंगरांनी वेढलेलं सुंदर गाव होतं शाइ. वीसेक मिनिटांनी Sogndal ला जाणारी बस आली आणि पुढचा प्रवास सुरू झाला. Jostedalsbreen राष्ट्रीय उद्यानाच्या जवळून रस्ता जात होता. Jostedal हिमनदी ही युरोपातील मोठ्या हिमनद्यांपैकी एक आहे. तिच्या आजूबाजूचा मोठा पर्वतीय भाग संरक्षित केलेला आहे. उन्हाळ्यात तिथे भटकायला नक्कीच आवडेल.
ढगांनी आणखी गर्दी केल्याने काळोख दाटला. त्यामुळे एकदाची कॅमेर्याला विश्रांती मिळाली. थोड्याच वेळात सोग्नला पोहोचलो. पण प्रवास अजून संपला नव्हता! तिथून तिसर्या बसने Lustra फ्योर्डच्या तीरावरील चिमुकल्या Nes ला एकदाच आणून सोडलं. फ्योर्डच्या बाजूने रस्ता आणि रस्त्यापलीकडे छान सजवलेलं गेस्ट हाऊस बघून सगळा शीण गेला. इथे पुढचे दोन दिवस आराम आणि जवळपास पायी निरुद्देश भटकायचं एवढाच बेत होता. पुस्तक वाचणं नाहीतर पाण्याच्या पलीकडे डोंगरातल्या प्रचंड धबधब्याचा आवाज ऐकणं, कुराणात बागडणारी कोकरं पाहणं यात मस्त वेळ गेला..
भटकताना या सुंदर रंगवलेल्या पोस्टाच्या पेट्या दिसल्या एकदा रस्त्याच्या कडेला.
तासनतास पाहत राहावं, एवढा प्रवास करून आल्याचं सार्थक वाटावं असं दृश्य खोलीच्या बाल्कनीतून दिसत होतं...

ऑलेसुंड (Ålesund) ते शाइ (Skei) साडेचार तास, नंतर Sogndal पर्यंत एक तास आणि शेवटी Sogndal ते Nes एक तास असा एकूण प्रवास होता. ऑलेसुंडहून सकाळी अकराला निघायचं होतं. पण सकाळपासून रूमच्या खिडकीतून दिसणारे ढग तिथेच होते.
२. नॉर्वेमध्ये मुख्य भूमी आणि त्याच्या हजारो बेटांच्या समुहाला जोडणारे ७५० किमी पेक्षा जास्त लांबीचे ९०० पेक्षा जास्त भुयारी मार्ग आहेत. त्यातल्या एकमेकाला छेदून जाणार्या दोन भुयारीमार्गांनी तयार झालेला हा एक भुयारी चौक !...
३. याशिवाय, (अ) भर हिवाळ्यातल्या -१८ किंवा कमी तापमानात व मीटर-दोन मीटर उंच हिमवर्षावाने भरलेल्या विमानतळांवरून सुव्यस्थित चालणारी विमानव्यवस्था आणि (आ) त्याच अवस्थेतल्या रस्त्यांवरून वाहनवाहतूक चालू ठेवण्याची व्यवस्था, केवळ नॉर्वेजियन तंत्रज्ञ व प्रशासनच करू जाणे !