Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

विश्वास-श्रद्धा-निष्ठा: यनावाला

य
यनावाला
Fri, 02/02/2018 - 09:41
🗣 52 प्रतिसाद
विश्वास-श्रद्धा-निष्ठा: यनावाला (भाविक आणि विवेकवादी यांच्यातील संवाद. यात श्रद्धा, विश्वास आणि निष्ठा या तीन संकल्पनांच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न आहे. "आजचा सुधारक" चे संस्थापक-संपादक दि.य.देशपांडे यांनी आ.सु.च्या एका अंकात या व्याख्या थोडक्यात दिल्या आहेत. त्यांचा विस्तार या संवादात केला आहे.) भाविक: परवा तुमचा एक लेख वाचला. त्यात "श्रद्धाभावना नसावी." असे तुम्ही म्हटले आहे. श्रद्धेवर तुमचा एवढा राग का ? श्रद्धा का नसावी? विवेकवादी: श्रद्धा का नसावी ? श्रद्धेमुळे माणसाची कोणती हानी (नुकसान) होते ? या प्रश्नांविषयीं त्या लेखात विवेचन केलेच आहे. ते असो. तुमच्या काही शंका असतील त्यांविषयी आपण अवश्य चर्चा करूया. पण तत्पूर्वी आपल्याला "श्रद्धा" या संकल्पनेची व्याख्या करावी लागेल. श्रद्धेविषयी तुमची समज आणि माझी समज भिन्न भिन्न असतील तर चर्चा निष्फळ ठरेल. म्हणजे तुम्ही एका विषयावर बोलत आहात तर मी दुस-याच असे होईल. भाविक: श्रद्धा म्हणजे काय यावर आपणा दोघांची मते इतकी वेगवेगळी असतील काय ? विवेक : असू शकतील. प्रत्येकाला वाटते की एखाद्या संकल्पनेची आपल्या डोक्यात जी व्याख्या आहे तीच सर्वांच्या डोक्यात असणार. सर्वसाधारण बोलण्यात , लिहिण्यात आपण विश्वास, श्रद्धा, निष्ठा हे शब्द साधारणपणे एकाच अर्थी वापरतो. पण या तीन शब्दांचे तीन काटेकोर अर्थ आहेत. ते भिन्न भिन्न आहेत. तसे असायला हवेत. भाविक : असे ? मला हे ठाऊक नव्हते. विवेक : ठीक आहे. तुमच्या मते श्रद्धा म्हणजे काय ते सांगा. अथवा श्रद्धा शब्द वापरून एक वाक्य बोला. भाविक: श्रद्धा म्हणजे एखाद्या पवित्र गोष्टीवरील दृढ आणि अतूट विश्वास. उदा. देव अस्तित्वात आहे यावर माझी श्रद्धा आहे. विवेक : श्रद्धाविषय पवित्र का हवा? भाविक : मला वाटते श्रद्धा ही पवित्र गोष्टीवरच ठेवतात. "पृथ्वी सूर्याभोवती फिरते." या गोष्टीवर माझा विश्वास आहे. पण ती श्रद्धा नव्हे. विवेक : देव पवित्र म्हणून त्याच्यावर श्रद्धा. पृथ्वीचे सूर्याभोवती भ्रमण पवित्र नाही. म्हणून त्यावर विश्वास. पण पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे ज्ञान आहे ना ? आणि "नहि ज्ञानेनसदृशं पवित्रमिह विद्यते।" [ज्ञानासारखे पवित्र अन्य काही नाही.] असे गीतेत म्हटले आहे ना? भाविक : ते असो. विवेक : बरे असो. देवाचे अस्तित्व तुम्ही खरे मानता. ते कोणत्या आधारावर ? भाविक : अहो, देव अस्तित्वात आहे हे बहुसंख्य लोक खरे मानतात. त्याअर्थी ते खरेच असले पाहिजे. ते खोटे का म्हणायचे ? विवेक: सत्यासत्य बहुमताने ठरत नाही. बहुमताने पारित होतात ते सभेतील ठराव. हजारांतील ९९९ जणांनी असत्याला सत्य मानले तरी ते असत्यच राहाते. "बहुसंख्य लोक देवाचे अस्तित्व खरे मानतात म्हणून मी मानतो." हा युक्तिवाद सदोष आहे. त्यावरून देवाचे अस्तित्व सिद्ध होत नाही. क्षमा करा, पण तुम्ही गतानुगतिक मनोवृत्तीचे आहात हे यावरून दिसून येते. भाविक: ते कांही असो. देव अस्तित्वात आहे यावर आमची -म्हणजे आम्हा सर्व भाविकांची-पूर्ण श्रद्धा असते. त्यासाठी कसल्या पुराव्याची, आधाराची आवश्यकता वाटत नाही. किंबहुना देव हाच आमचा आधार आहे. तुम्हा विवेकवाद्यांची कशावरच श्रद्धा नसते काय ? विवेक : नसते. विवेकवादी व्यक्ती कशावरच श्रद्धा ठेवत नाहीत. श्रद्धेची आवश्यकताच नाही. श्रद्धेमुळे मानवसमाजाची अतोनात हानी झाली आहे असे आम्ही मानतो. पण त्यासाठी व्याख्या करायला हवी. भाविक: तेच तर मी मघापासून म्हणतो आहे. विश्वास, श्रद्धा आणि निष्ठा या तीन संकल्पनांच्या तुमच्या व्याख्या सांगा. विवेक. : जे विधान, जे तत्त्व, जो निसर्गनियम, जी संकल्पना, जी गोष्ट : १) पंच ज्ञानेंद्रियांतील एकातरी इंद्रियाने प्रत्यक्ष अनुभवता येते. अथवा २) जिच्या कथित गुणधर्मांचा सार्वत्रिक,सार्वकालिक प्रत्यक्ष प्रत्यय येतो, अथवा ३) जी वैज्ञानिक प्रयोगाने सिद्ध करता येते, अथवा ४) जी खरी असण्याची शक्यता अनुभवाने, कॉमनसेन्सने, किंवा तर्कसंगत युक्तिवादाने दाखविता येते, अथवा ५) जिचे सत्यत्व मानवाच्या अधिकृत ज्ञानसंग्रहातील तत्त्वांच्या आधारे सिद्ध करता येते, थोडक्यात म्हणजे ज्याची सत्यता माणसाच्या तर्कबुद्धीला पटते, पटविता येते. केवळ तेच तत्त्व, तीच संकल्पना, तीच गोष्ट सत्य मानणे म्हणजे विश्वास ठेवणे होय. भाविक: तुमची ही "विश्वास" शब्दाची व्याख्या लांब आणि किचकट झाली. विवेक.: लांब झाली हे मान्य. पण परिपूर्ण व्याख्या करताना शक्य ते सर्व पर्याय लक्षात घ्यावे लागतात. म्हणून व्याख्या मोठी झाली. पण किचकट नाही. सोपे स्पष्टीकरण असे : वर पाच कसोट्या दिल्या आहेत. त्यांतील किमान एका कसोटीला जे तत्त्व, जो नियम,जे विधान खरे उतरते तेच सत्य मानणे म्हणजे त्यावर विश्वास ठेवणे. . भाविक: आता श्रद्धा या संकल्पनेची तुमची व्याख्या सांगा. विवेक: श्रद्धेची स्वतंत्र व्याख्या करण्याची आवश्यकता नाही. विश्वासाच्या संदर्भात ज्या पाच कसोट्या वर सांगितल्या आहेत त्यांतील एकाही कसोटीला खरी न उतरणारी संकल्पना केवळ पूर्वग्रहामुळे, शब्दप्रामाण्यामुळे खरी मानण्याची मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा. तर "एवं गुण विशिष्ट देव अस्तित्वात आहे." हे विधान या पाच अटीतील एकही अट पूर्ण करीत नाही, तरीसुद्धा "ते विधान सत्य आहे." असे मानण्याची मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा. भाविक: हे कळले. आता निष्ठा म्हणजे काय ते सांगा. विवेक: आपण थोडी उजळणी करूंया. एखादे विधान, तत्त्व, एखादी संकल्पना , नियम इ. सत्य असण्याची शक्यता आहे किंवा नाही हे तपासण्याच्या ज्या पाच अटी आहेत त्यांतील एकही अट पूर्ण करीत नसेल तर ते विधान , संकल्पना, नियम इ. तर्कदृष्ट्या असत्य ठरते. असे विधान उपनिषदांत आहे, पुराणात आहे, गीतेत भगवंतांच्या मुखी घातले आहे . अशा शब्दप्रामाण्याच्या आधारे सत्य मानण्याची मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा होय, हेही स्पष्ट केले आहे. वरील व्याख्यांवरून दिसून येते की श्रद्धा ही व्यक्तीच्या भावनेशी तर विश्वास हा व्यक्तीच्या विचारसरणीशी संबधित आहे.. "देव अस्तित्वात आहेच." अशी आस्तिकांची भावना असते. तरी प्रत्येक आस्तिक व्यक्ती देवपूजा, नामजप, होमहवन अशी कर्मकांडे करीलच असे नाही. तसे न केले तरी त्या व्यक्तीच्या श्रद्धेला बाधा येत नाही. ती व्यक्ती श्रद्धावंतच राहाते. कारण श्रद्धेचा संबंध आचारांशी नसतो तर भावनेशी असतो. तसेच नास्तिकाच्या घराण्यात परंपरागत चालत आलेले कांही धार्मिक सण -उत्सव तो करणारच नाही असे नाही. तसे केल्याने त्याच्या नास्तिकवादी विचारसरणीला बाधा पोचत नाही. "देव अस्तित्वात नाही" हा त्याचा विचार ठाम असतो. याप्रमाणे श्रद्धा आणि विश्वास या संकल्पना अनुक्रमे व्यक्तीच्या भावनेशी आणि विचाराशी निगडित आहेत, आचारांशी नाहीत. मात्र विचार आणि आचार यांत एकवाक्यता असणे चांगले हेही खरेच. आणि तसे बहुधा असतेच. पण अशी एकवाक्यता नसली तरी श्रद्धा आणि विश्वास यांच्या आपल्या व्याख्या अबाधित राहातात. भाविक : हे सर्व चांगले समजले. आता निष्ठा म्हणजे काय ते तुमच्याकडून ऐकण्याची उत्सुकता आहे. विवेक. : निष्ठा ही संकल्पना, व्यक्तीच्या आचारांशी संबंधित आहे. आपण निष्ठेची व्याख्या करूया. "एखादी कृती अथवा कार्य करणे हे आपले कर्तव्य आहे. आपण ते प्रामाणिकपणे केलेच पाहिजे." अशी मनोवृत्ती असणे आणि त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे निष्ठा. मग या मनोवृत्तीचे कारण काहीही असो. समजा "अ" या व्यक्तीची योगासनांवर निष्ठा आहे. तर "अ" नित्य नेमाने योगासने करणारच. योगासनांनी शारीरिक तसेच मानसिक आरोग्य चांगले राहाते अशी त्याची श्रद्धा अथवा असा विश्वासही असू शकेल. त्याला महत्त्व नाही. "अ" नित्य नेमाने योगासने करीत नसेल तर त्याची योगासनांवर निष्ठा नाही असे म्हणावे लागेल. समजा "ब" ची आबाजींवर निष्ठा आहे. याचा अर्थ "ब" स्वत:ला आबाजींचा निष्ठावंत सेवक समजतो. त्यांची सेवा करणे हे आपले कर्तव्य मानतो. समजा "सत्य-अहिंसा-अस्तेय " या तत्त्वांवर "क" ची श्रद्धा आहे. याचा अर्थ असा होतो की "क" कधीही हेतुपूर्वक (म्हणजे जाणून-बुजून) असत्य बोलत नाही. कुणाची हिंसा करीत नाही. कठोर बोलून कुणाचा आत्मसन्मान दुखावत नाही.(कारण ती हिंसाच असते.) तसेच अस्तेय म्हणजे चोरी न करणे हे तत्त्व "क" पूर्णांशाने पाळतो. याप्रमाणे निष्ठा ही संकल्पना आचरणाशी संबंधित असते. त्या मागच्या विचारसरणीशी नाही. समजा "ड" जर विवेकानंदांचा निष्ठावंत भक्त असेल तर त्याने विवेकानंदांची शिकवणूक आचरणात आणायला हवी. तसेच त्या शिकवणुकीचा शक्य होईल तेवढा प्रसार करायला हवा. भाविक : छान ! देवाच्या अस्तित्वाविषयी तुमचे आणि माझे मतभेद असले तरी श्रद्धा- विश्वास-निष्ठा या संकल्पनांच्या तुम्ही केलेल्या व्याख्या मला आवडल्या. पण "श्रद्धेचे दुष्परिणाम" या विषयावर आपली चर्चा झालीच नाही. त्यासाठी पुन्हा कधीतरी येईन. धन्यवाद ! विवेक : अवश्य यावे. तुमचे सदैव स्वागत आहे. धन्यवाद ! **********************************************

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 42207 views

🗣 चर्चा (52)
प
प्रकाश घाटपांडे Fri, 10/04/2019 - 15:40 नवीन
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Sat, 10/05/2019 - 12:06 नवीन
या विषयातील एक उपविषय म्हणजे "गुरु" गुरूबाजी , गुरूगिरी कि जी पूर्वी हि आहे आणि आज हि आहे आणि त्याचे असंख्य प्रकार आहे ( सर्व धर्मात थोड्या फार फरकाने पण भारतीय ( हिंदू) समुदायात याचा छाप जरा जास्त मोठा आहे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही मी अनेक माझ्यापेक्षा जास्त शिकलेल्या व्यक्तींना एका प्रकारचया हट्टीप्रमाणे हे म्हणताना बघितलंय कि "असे कसे? आयुष्यात गुरु असलाच पाहिजे" (भाविक:) माझा ( विवेक गटातील ) प्रश्न मग असा असतो कि ... गुरु या शब्दाऐवजी शिक्षक हे वापरलेले नाही का चालणार? हा अर्थात माझा हेतू पुरस्पर वापरलेले प्रश्न असतो .. भाविक: त्यात काय फरक? उगाच का फाटे फोडताय दोन्ही एकच. विवेक: सांगतो, शाळेतील एखादा आवडता शिक्षक/ शिक्षिका आठवा ... तुम्हाला त्यांच्या बद्दल आदर होता तो आठवा ... भाविक: हो आठवले गणिताचे शिक्षक विवेक: बरं मग समजा काही काळानं किंवा तेव्हा जर त्या वयक्तीने काही गंभीर गुन्हा केला तर त्यांच्या बद्दल चा आदर (एक व्यक्ती म्हणून गणित शिक्षक म्हणून नाही ) कमी होईल / असता झाला कि नाही? .. आणि एक नागरिक म्हणून त्याला तुम्ही शिक्षेस पात्र ठरवले असते कि नाही... हे हि समजा बाजूला ठेव तुम्ही अश्या आदरणीय शिक्षकाच्या शिकवण्यात त्रुटी किंवा न पटणारी गोष्ट ठाम पणे दाखवून दिली किंवा खोडून काढली असती कि नाही ? भाविक: आ ....हा .. हो ... विवेक: मग मला आता हे सांगा हाच तर्क तुम्ही "अध्यात्माच्या शिक्षकांना" का नाही लावत? गुरु हा शब्द मुळातच वापरलं जातो कारण या शब्दामागेच हे दडलेलं असतं की " मी सांगीन ती पूर्व दिशा" शेवटी मनुष्याला षड्रिपू ने वेढा घातलेला आहे ,, कदाचित ज्याला तुम्ही गुरु म्हणता ती व्यक्ती तुमचं माझ्या पेक्षा जास्त गुणी असेल ,,,पण शेवटी मनुष्यच ना? प्रामाणिकपणे सांगायचं तर हे "देवाचे एजन्ट" असले काय आणि नसले काय जर देव आहे तर तो आणि मी पामर बघून घेईन ना ! माफ करा थोडा विषयांतर केले ...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    3 days 11 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    3 days 11 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    3 days 11 hours ago
  • सुंदर !!
    3 days 11 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    3 days 11 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा