निरोप आणि स्वागत..!
निरोप आणि स्वागत..!
'परिवर्तन' हा निसर्गाचा नियम आहे..तो सर्वाना मान्य करावाच लागतो. याच निसर्गनियमानुसार २०१७ ला निरोप देण्याची आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याची वेळ जवळ येवून ठेपली आहे. भारतीय लोकमानसात उत्सवप्रियता असल्याने नवीन विचारांचे, नव-संकल्पाचे स्वागत करण्यासाठी तो नेहमीच उत्सुक असतो. नवे वर्ष आले म्हटल्यावर त्याचे स्वागत आणि त्यानिमित्ताने संकल्प करणे देखील ओघाने आलेच! सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वांनी काहीना काही तरी प्लॅन्स केले असतील, आणि त्याच्या बरोबरीने नवीन वर्षामध्ये काय करायचे याचा संकल्पही केला असेल.. तसे पाहता प्रत्येकाचा नववर्षाचे स्वागत करण्याचा दृष्टीकोन वेग-वेगळा असतो..पद्धती वेगळ्या असतात..हा ज्याच्या त्याच्या संतोषाचा आणि समाधानाचा भाग आहे. नववर्षाचे स्वागत देवापुढे निरंजनी लावून परिवारासमवेत करायचे कि..मद्यालयात बेधुंद होवून करायचे. याविषयी उपदेशाचे डोस पाजण्याइतपत समाज अज्ञानी नाही. परंतु नववर्षाचे स्वागत सामाजिक जान-भान जपून उत्साहपूर्ण वातावरणात केले गेले पाहिजे. पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करण्याच्या नादात आपण आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य विसरून आपल्या जीवनरचनेत न शोभणारे कृत्य तर करत नाही ना? याचा जरा गंभीरपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
दरवर्षी थर्टी फर्स्ट‘ साजरा करण्यासाठी पहाटे पाचपर्यंत बियरबार व पार्ट्या सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत असते. त्यामुळे नवीन वर्षाची पहिली सकाळ उजाडेपर्यंत मद्यपी दारुचा (झिंगेपर्यंत) आनंद घेतात. आज महाराष्ट्रात दारूबंदी करण्याची मागणी जोर धरत असताना रात्रभर दारू पिण्याची मुभा देणे कितपत योग्य आहे हा एक चिंतनाचा विषय होवू शकेल ! अर्थात, नव्या वर्षांच्या पूर्वसंध्येला आणि सरत्या वर्षांच्या रात्री आपोआप मने जल्लोषाच्या भावनेने भारून जातात..त्यामुळे नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सेलिब्रेशन करणे काही चूक नाही. पण त्याचा इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यायलाच हवी..सेलिब्रेशन म्हणजे दारू, धिंगाणा,दुसऱ्यांना त्रास होईल इतक्या मोठ्या आवाजात ध्वनिवर्धक लावणे, रस्त्यावर बेफाम गाड्या चालवून महिलांची छेडछाड काढणे नव्हे, हे लक्षात घेऊन "थर्टी फर्स्ट‘चा आनंद लुटला जावा. सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नववर्षाचे स्वागत करताना "बंधनांची ऐशीतैशी‘ होणार नाही याची काळजी सर्वानीच घ्यायला हवी. प्रारंभ म्हणजे सुरुवात! मागील चांगल्या-वाईट गोष्टींना बाजूला सारून नवीन सूर्यउदयी नवसंकल्पांचे अवलंबन करणे, त्यांचे निश्चित धोरण ठरवणे, सत्याची कास धरणे आणि नव्या जोमाने, नव उत्साहाने कामाला लागणे म्हणजेच नववर्षाचे स्वागत. त्यामुळे नववर्षाच्या निमित्ताने काही चांगले करण्याचा संकल्प ही आपण केला पाहिजे.
आज राज्यातील शेतकरी मरणासन्न अवस्थेत आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे त्याच्या घरची चूल पेटणे अवघड झाले आहे. त्यामुळे निराशेच्या गर्तेत शेतकरी आत्महत्या करतोय..जगाचा पोशिंदा अश्या अवस्थेत जगत असताना नशेत झिंगन्यापेक्षा आपण त्याला मदत करण्यासाठीचा संकल्प करू शकतो का? यावरही विचार केला गेला पाहिजे. सध्याच्या आधुनिक आणि तंत्रद्यानच्या युगात माणूस फार प्रगत झाला.. पण या प्रगतीच्या नादात तो एखाद्या यंत्राप्रमाणे आजूबाजूच्या परिस्थितीचा कुठलाही विचार न करता स्वकीयांनाच चिरडत पुढे निघाला आहे. संवेदना, माणुसकी हे शब्द त्याच्या शब्दकोशातून हरवू पाहत आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षात माणूस म्हणून जगण्याचा आणि माणुसकी च्या नात्याने आपापल्या कुवतीनुसार गरजवंतांना मदतीचा हात देण्याचा संकल्पही आपल्याला करता येईल. छोटे छोटे संकल्प आपल्याला भविष्यात मोठा फायदा करून देणारे ठरत असतात. त्यामुळे स्वत:साठी व आपल्या प्रियजनांचे जीवन अधिक समृध्द व अर्थपूर्ण व्हावे यासाठी आपण काही संकल्प केले पाहिजेत.
२०१७ ला निरोप देताना सर्वांच्याच मनात समिश्र भाव-भावना असतील! सरत्या वर्षात घडलेल्या चागल्या वाईट गोष्टीच्या आठवणीने मन कातर होत असेल. तर नवीन आशा घेवून येणाऱ्या नववर्षबद्दल कमालीचे कुतूहल आणि तितकीच अनामिक भीती सुद्धा वाटते. पण 'जुने जावू द्या मरणालागुनी जाळून किंव्हा पुरून टाका' या कवितेच्या ओळीप्रमाणे सर्व भावना दूर करून नव्या उत्सहाने नववर्षाचे स्वागत करायला हवे. सामाजिक बांधीलकीचे ऋण सेवेतून व्यक्त करण्याचा तसेच अपप्रवृत्तींना आळा घालण्याची व विधायक कामाला बळ देण्याची जबाबदारी तुमची-आमची आणि सर्वांचीच आहे. याची जान व भान ठेवण्याचा संकल्प आपण सर्वांनी या नववर्षाच्या निमिताने करायला हवा. काळ बदलून काही होत नाही तर विचार बदलले तेंव्हाच समाज बदलत असतो त्यामुळे या वर्षात आपल्या आचारात आणि विचारात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संकल्प करून या नवीन वर्षाला सामोरे जावू या.! आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्या..
💬 प्रतिसाद
(6)
र
रंगीला रतन
Sat, 12/30/2017 - 16:39
नवीन
पहिल्या २ पॅराग्राफ पर्यन्त सहमत... पण शेतकर्यांचा विषय इथे अप्रस्तुत वाटतोय...उद्या खेडेगावांमधे बघा, शेतकर्यांचिच मुले किति धिंगाणा घालतात ते पण समजेल.
- Log in or register to post comments
ह
हरवलेला
Sat, 12/30/2017 - 17:08
नवीन
+1
- Log in or register to post comments
च
चामुंडराय
Sat, 12/30/2017 - 17:54
नवीन
हरिदासाची कथा मूळ पदावर...
काहीही करून, ओढून ताणून शेतकरी आणलाच पाहिजे का प्रत्येक धाग्यात?
- Log in or register to post comments
न
नाखु
Sat, 12/30/2017 - 18:46
नवीन
कसं,
धागालेखक त्यांचं शेत (पक्षी धागा) सोडून कुठेही उपस्थित राहणार नाहीत, उगाच इतरांच्या शेतात जाऊन (पक्षी धाग्यात) काय चाललंय ते समजलं तर त्याचा उपयोग काय?
निव्वळ मिपावर शेतकर्यांना न्याय मिळावा यासाठी ते फिरकत नसावेत असा प्राथमिक अंदाज आहे.
खरं खोटे तेच जाणे
अखिल मिपा वडाची साल पिंपळाला लावण्याची सवय टाळारे संघटनेचा प्राथमिक सदस्य नाखु पांढरपेशा
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Mon, 01/01/2018 - 18:41
नवीन
ये बात कुछ हजम नही हुई राय्साहब ! हे काही पटले नाही !
जो ज्या विश्वाशी संबंधित त्या क्षेत्राच्या अनुषंगानंच लिहिणार ना ! आणि गैर काय त्यात ?
अन हरिदास या शब्दावरून कोटी करुन काही तरी ओढुन ताणुन लिहिलं आहे असं वाटतं !
- Log in or register to post comments
अ
अँड. हरिदास उंबरकर
Mon, 01/01/2018 - 12:33
नवीन
निव्वळ मिपावर शेतकर्यांना न्याय मिळावा यासाठी ते फिरकत नसावेत असा प्राथमिक अंदाज आहे.
खरं खोटे तेच जाणे<<
>>उपरोक्त लेखात शेतकरी व्यथा आणि वेदनांचा उल्लेख संयुक्तिक नसेलही, मात्र चुकीचा नाही. असे माझे मत आहे. दुसरे असे कि, "शेतकर्यांना न्याय मिळावा" फक्त यासाठीच ... हा आपला प्राथमिक अंदाज आपणच तापसून पाहण्याची गरज आहे.. त्यासाठी माझे धागे आपल्याला मदत करू शकतील..!
इतरांच्या (शेतात) धाग्यात काय चाललेय यावरही लक्ष नाही, हा आपला आक्षेप काही अंशी मान्य आहे.. कार्यबाहुल्यामुळे मध्यंतरी थोडा वेळ कमी मिळाला. मात्र तरीही मिपावर कायम लक्ष आहे..
- Log in or register to post comments