फुलपाखरा
का जागतेस तू शोना?
काय विचार करत असतेस तू?
का झोप येत नाही?
कोण? मी?
तू जागी आहेस ना म्हणून,
मी पण जागतोय
.
चमचम चांदणीसारखी टिमटिमत राहतेस
कधी कधी वाटतं
दिवसभर
थोडा थोडा मी
जमा होत जातो
तुझ्या डोळ्यात
आणि मग रात्री
झोपेला तुझ्या डोळ्यात
उतरायला जागाच उरत नाही
.
असं होतय का रे फुलपाखरा?
त्रास देतो ना बाबा असा?
दूर निघून जातो
आणि लेकरु बाबाला शोधत राहतं!
.
एक गंमत करुया
आज झोपलीस ना की
बाबाला तुझ्या स्वप्नात बोलावं
स्वप्नात मग बाबा आणि बाबाची डॉल
खुप खेळतील, हसतील, धावतील
आईला घेऊला का बरोबर?
नको, आधि आपण खुप मस्ती करु
मग मस्ती केली म्हणून
रागवायला येईलच ना ती?
तेव्हा, तिला पण आपल्या खेळात
सामील करुन घेऊ
तिला कळणारच नाही कि
ती कुणाच्या पार्टीत आहे
मज्जा ना?
.
पण कोकरा, स्वप्नचं रे ते
सकाळी ऊठलीस की संपेल
मग परत मी दिवसभर
थोडा थोडा साचत जाईन
तुझ्या डोळ्यात
आणि परत तु जागत राहशील,
छे.. नकोच्च..
.
का जागतेस तू शोना?
काय विचार करत असतेस तू?
का झोप येत नाही?
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२२/११/२०१७)
💬 प्रतिसाद
ए
एस
गुरुवार, 11/23/2017 - 00:10
नवीन
'बाबाला तुझ्या स्वप्नात बोलावं' चं 'बोलवावं' करूयात का? बाकी कविता तरल नेहमीसारखीच.
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 11/23/2017 - 04:53
नवीन
फारच आवडली,
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 11/25/2017 - 06:59
नवीन
छान!
- Log in or register to post comments