Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

माणूस आणि एकलेपण

ड
डॉ. सुधीर राजाराम देवरे
Wed, 11/15/2017 - 13:21
💬 4 प्रतिसाद
- डॉ. सुधीर रा. देवरे माणूस नात्यांमुळे एकटा पडत नाही. दु:खातच नव्हे तर सुखाच्या दिवसातही माणसाला आपल्या माणसांसोबत रहायला आवडते. विवाहाचा समारंभ जसा एकट्याने साजरा करता येत नाही, कमीतकमी वधूवरांचे दोन कुटुंबे आणि दोन मित्र तरी त्यात सामील असतात, तसा माणसाचा शेवटचा दिवसही म्हणजे अंत्यविधीही कोणाला एकटेपणाने उरकून घेता येत नाही. माणसाच्या पार्थिवाला उचलायला कमीतकमी चार खांदे द्यावे लागतात. सारांश, सुखाचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी माणसाला नातेवाईक लागतात आणि दु:खाचे सांत्वन करण्यासाठीही माणसाला आपुलकीचे नातेवाईक लागतात. माणूस या जगात एकटा असू शकेल का? म्हणजे तो विनासंबंध- विनापाश असू शकेल का? माणसाशी कोणतेही नातेसंबंध न ठेवता कोणी एखादा सुखात जगू शकेल का? तो दुसर्‍या माणसाशी कायम फटकून वागू शकतो का? एखादा माणूस माणूसघाना असू शकतो का? तो एकलकोंडा असू शकतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारार्थी येऊ शकतात, तरीही आपल्याला असे रोज कोणाबद्दल तरी ऐकायला येते, की अमूक एक माणूस एकलकोंडा आहे. अमूक एकाला एकटे राहणे आवडते. अमूक एक माणूस आजूबाजूच्या माणसांत न मिसळता आपल्याच कोषात कायम गर्क असतो. आपल्याकडे माणसं येणं त्याला आवडत नाही आणि इतर माणसांकडे जाणंही तो हेतुत: टाळत असतो. वगैरे. अतिपरिचयात अवज्ञा म्हणून एखादा माणूस शेजार्‍यापाजार्‍यांशी फटकून वागत असेल वा वेळप्रसंगी भांडतही असेल कदाचित, तरी तो माणसात मिसळणाराच असतो. एखादा माणूस माणसांच्या कळपात राहणे टाळत असला तरी तो आतून अनेक लोकांशी मैत्री करण्याच्या प्रयत्नात असतो. अपरिचित माणसाशी सोबती करावी असेच त्याला मनातून वाटत असते. माणसाशी प्रत्यक्षात फटकून वागणारा माणूस हा आतून समाजाशी जुळवून घेणाराच असतो. कोणताही माणूस तमाम मानव समाजाविरूध्द जात नाही. समाजातील काही प्रवृत्तींविरूध्द तो बंड करू शकतो पण आख्या मानवजातीच्या विरोधात जाणारा माणूस अजून जगात जन्माला आला नाही. जगाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात एकटा मनुष्य राहणे म्हणूनच अशक्य घटना वाटते. आपला स्वत:चा स्वभाव विसरून आपण इतर लोक आणि त्यांचे स्वभाव हा नेहमी चर्चेचा विषय करतो. एखादा माणूस कसा एकलखुरा आहे, तो समाजापासून कसा फटकून वागतो, तो माणसात मिसळत नाही, समाजात मिसळत नाही, नातेवाईकांकडे जात येत नाही. विवाह, अंत्यविधी आदी कार्यक्रमांना उपस्थित राहत नाही. अमूक हा आपण आणि आपले घर भले वा काम भले असा झापडे लावलेल्या विचारांचा माणूस आहे, अशा प्रकारचे कोणाबद्दलचे तरी वक्‍तव्य आपण कायम ऐकत आलो आहोत. माणूस हा निसर्गत:च समाजप्रिय प्राणी आहे, मग तो कोणताही माणूस असो. गरीब असो, श्रीमंत असो, आदिवासी ग्रामीण असो की शहरी सुशिक्षित असो. तो माणसाच्या कळपातच रमणारा आहे. कोणाकडे जात येत नसला तरी तो माणसांच्या वस्तीतच घर बांधतो. माणसाच्या गरजाच अशा आहेत की तो अंशत: का होईना परावलंबी आहे. पूर्णपणे स्वावलंबी नाही. त्याला कपडे शिवण्यासाठी शिंप्याकडे जावे लागेल तर डोक्याचे केस कापण्यासाठी न्हाव्याकडे जावे लागेल. तब्बेत तपासण्यासाठी डॉक्टरकडे जावे लागेल तर जेवण तयार करण्यासाठी बाजारात- दुकानात नाहीतर आयत्या जेवणासाठी हॉटेलीत तरी जावे लागेलच. कोणीही एकलखुरा माणूस जंगलात वा डोंगरात रहायला जात नाही. माणसांच्या गावात वा शहरातच तो वस्ती करतो. म्हणजे प्रत्यक्ष ओळखीत अथवा येता जाता कोणाशी गप्पा मारण्यात तो रमत नसला तरी आजूबाजूच्या माणसांचा कानोसा घेतच तो आपल्या कोषात आपले आयुष्य व्यतीत करत असतो. म्हणून मानवी संबंधांचा विचार आधी म्हटल्याप्रमाणे कोणत्याही एका टोकाचा न करता साधकबाधक तारतम्याने घ्यावा लागेल. खरं तर हा एकटे राहणार्‍या माणसाचा स्वत:चा दोष नसून तो दोष काही प्रमाणात आपल्यात म्हणजे या समाजात आहे. आपण एखाद्या माणसाला मुद्दाम एकटे करून सोडतो. आपली तार त्याच्याशी जुळत नाही म्हणून तो आपल्यापासून दूर जातोय असे न समजता आपण तो त्याचा मूळ स्वभावच आहे असे समजून चालतो. तो सामाजिक असूनही आपण त्याला समाजापासून वेगळे पाडतो. आपल्या आणि त्याच्या सवयी- छंद- व्यसनेही भिन्न असल्यामुळे केवळ तो दूर राहतो. आपल्यापासून तो अंतर ठेऊन असतो याचा अर्थ तो आपला व्देष करतो- मत्सर करतो असा होत नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे. एखादी मानसिक धक्का देणारी घटना घडून गेल्यामुळेही एखादा माणूस कायमचा एकलकोंडा होऊ शकतो. पण या मानसिक पातळीवरच्या गोष्टी आपल्याला अज्ञात असल्यामुळे आपण त्याच्याबद्दल गैरसमज करत तो मनुष्य कसा माणूसघाना आहे याची सर्वांकडे चावळ करून हा समज आपल्या मनाशी पक्का करून टाकतो. आणि तसा समज आजूबाजूच्या समाजातही कसा अधिक दृढ होईल असा प्रचार करत राहतो. आपण स्वत:ला सामाजिक- सोशल समजत असूनही आपल्यात ही सामाजिक पर्यावरणासाठी सर्वात प्रदुषणीय बाब आहे. अगदी एकट्या राहणार्‍या माणसापेक्षा असा प्रचार करणारा माणूस समाजाला जास्त धोकादायक ठरतो. आपल्या मताने सर्व माणसांपासून अंतर ठेऊन असणार्‍या माणसाच्या घरात सर्वात जवळची पत्नी असते, (अंतर ठेऊन असणारी स्त्री असेल तर तिला सर्वात जवळचा पती असतो.) मुले- बाळे असतात, आई- वडील असतात. या सर्वांशी रोज त्या व्यक्‍तीचा अगदी जवळून संबंध येत असतो. आणि या संबंधांत जिव्हाळ्याचा लवलेशही नसेल असेही आपल्याला ठामपणे म्हणता येणार नाही. प्रदर्शन करणे वेगळे आणि आतून प्रेम असणे वेगळे. म्हणजे त्या व्यक्‍तीची प्रेम अभिव्यक्‍तीची पध्दत आपल्यापेक्षा भिन्न असू शकते. पण तिच्या हृदयात प्रेमच नाही असे आपल्याला म्हणता येणार नाही. आपल्यापरीने ती व्यक्‍ती घरदार चालवत- कर्तव्य पार पाडत आपल्या प्रेमाची अभिव्यक्‍तीच करत असते. आता एकदम एकटा राहणार्‍या माणसाबद्दल बोलुया. म्हणजे एखाद्या घरात एक माणूस कायम एकटाच राहतो. त्याला पत्नी नाही, (व्यक्‍ती स्त्री असेल तर तिला पती नाही.) मुले- बाळे नाहीत वा कोणत्याही नातेवाईकांसोबत न राहणारा एकटा माणूस. कोणत्याही नात्याशी आपली तार न जुळल्यामुळे हा मनुष्य एकटा राहत असेल असे आपल्याला वाटत असले तरी, हा माणूस कदाचित विशिष्ट परिस्थितीमुळेही एकटा राहत असेल अशी शक्यता गृहीत धरावी लागतेच. तो एकटा राहतो म्हणून त्याला एकलकोंडा असेही म्हणता येणार नाही. तसेच जंगलात वा पर्वतांच्या गुहेत राहणारा एखादा बुवा- साधुही आपल्यासोबत शिष्यगण घेऊन वावरतो. म्हणून अशा लोकांनाही आपल्याला निर्णायकपणे माणूसघाना ठरवता येणार नाही. कोणी एखादा माणूस आपल्याशी फटकून वागतो म्हणून तो एकलखुरा असाही युक्‍तीवाद इथे कोणी करू शकेल. पण तो अमूक एकाशी वा एखाद्या मनुष्य गटाशी फटकून वागतो म्हणून तो पूर्ण समाजाच्या विरूध्द आहे असे मानणे सयुक्‍तीक होणार नाही. त्याच्या एखाद्या तात्विक गोष्टीच्या आड येणार्‍या घटनांमुळे तो तुमच्याशी तसे वागत असेल तर तो एकलकोंडा नसून त्याच्या तत्वाविरूध्द तुम्ही आहात, त्या प्रवृत्तींच्या विरूध्द तो आहे असे म्हणावे लागेल. पण कोणाच्या तात्विक भूमिकेची आपण नेहमीच अशी गल्लत करतो आणि एखाद्याच्या वैचारिक बैठकीला निकाली काढत राहतो. आयुष्यात एखादे ध्येय साध्य करण्यासाठी वा अभ्यास करण्यासाठी कोणी एखाद्या माणसाने- कलावंताने आपल्यावर एकटेपणा लादून घेतलेला असतो. घरात समाधी लावून- स्वत:ला कोंडून घेऊन तो कलाकृती निर्माण करीत असतो. कलाकृती पूर्ण झाल्यावर ती रसिकांसाठीच म्हणजे शेवटी समाजासाठीच उपलब्ध होणार असल्यामुळे अशा कलावंतालाही म्हणूनच एकलकोंडा वा समाजात न मिसळणारा म्हणता येणार नाही. माणूस ज्या समाजात जन्माला येतो. ज्या परिस्थितीत तो वाढतो. ज्या परिवेशात त्याचे बालपण जाते. ज्या सांस्कृतिक वातावरणात त्याची भावनिक व मानसिक जडण घडण होते, तिथल्या स्थानिक जीवन – जाणिवा त्याच्या आख्या आयुष्यात आविष्कृत होत राहतात. मग तो माणसात मिसळो वा आपण म्हणतो तसा तो एकलखुरा असो. कोणाला असे एकलखुरा- एकलकोंडा ठरवणे ही समाजातील काही लोकांची हेतुत: कोती राजकीय खेळी असते. अशा समजामागे वास्तवात मुळीच तथ्य नसते. माणूस जन्मताच अनेक धाग्यादोर्‍यांच्या संबंधात येऊन पडतो. आपली नाळ जशी त्याला कधी विसरता येत नाही, तसे हे नाते- संबंध त्याला नाकारता येत नाहीत. पुढे आयुष्यात जे औपचारिक- अनौपचारिक नाते होत जातात- जोडले जातात, ते ही त्याला कधीच समूळ उपटून फेकता येत नाहीत, काही लोक गर्दीत असूनही कायम एकटेपणा सोसत असतात आतून. कायम घाबरलेले असतात ते. परिस्थितीचा दबाव येतो. मानसिकता आकुंचन पावते. ही खरी वस्तुस्थिती आहे. म्हणून मानवी संबंध आणि सामाजिकता ह्या संज्ञा फार जपून हाताळल्या पाहिजेत. नाहीतरी समाजात बहुमताने रूढ होणार्‍या सर्वच वाईट गोष्टींना आपण मान्यता देऊ आणि अल्पमतात असलेल्या चांगल्या गोष्टींना सोडचिठ्ठी देत राहू. (पुण्याच्या ‘अक्षरवेध’ दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.) – डॉ. सुधीर रा. देवरे इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2237 views

💬 प्रतिसाद (4)
प
पैसा Wed, 11/15/2017 - 17:39 नवीन
लेख आवडला
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… गुरुवार, 11/16/2017 - 12:35 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
च
चामुंडराय गुरुवार, 11/16/2017 - 02:32 नवीन
"लेख आवडला" प्रतिसाद बराच वेळ एकला आहे म्हणून हा प्रतिसाद ऍडवला :)
  • Log in or register to post comments
ड
डॉ. सुधीर राजा… गुरुवार, 11/16/2017 - 12:35 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 4 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा