Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

गूढ अंधारातील जग -२

स
सुबोध खरे
Tue, 11/14/2017 - 16:15
💬 63 प्रतिसाद

Book traversal links for गूढ अंधारातील जग -२

  • ‹ गूढ अंधारातील जग
  • Up
  • गूढ अंधारातील जग -३ ›
गूढ अंधारातील जग -२ मूळ पाणबुडी या शाखेची गरज काय आणि तिचा हेतू किंवा उद्देश काय हे आपण समजून घेऊ. युद्धाचा मूळ हेतू म्हणजे आपल्या शत्रूचे आर्थिक शारीरिक /सामरिक आणि मानसिक खच्चीकरण करणे. जी गोष्ट सामोपचाराने सुटत नाही(साम) तिच्यासाठी पैसे मोजून(दाम) काम होत असेल तर ठीक ते जर होत नसेल तर दंड (युद्ध) आणि भेद (शत्रूला एकटा पाडणे) हे आपले काम करण्याचे उपाय अनादिकालापासून तत्वज्ञानात सांगितले आणि वापरले गेले आहेत. यात लष्कराचा किंवा कूटनीतीचा भाग दंड आणि भेद यात केला जातो. शत्रूला नामोहरम करण्यासाठी त्याची युद्ध लढण्याची क्षमता आणि ती क्षमता कमी करण्यासाठी त्याची आर्थिक क्षमता कमी करणे आवश्यक आहे. यासाठी शत्रूवर थेट हल्ला करून त्याची लष्करी साधन सामग्री नष्ट करणे हा दंड या उपायाचा भाग आहे. त्याच्या व्यापाराची नाकेबंदी करणे आणि त्याच्या कडे येणाऱ्या आयातीवर आणि त्याने करण्याच्या निर्यातीवर तुम्ही बंदी आणली कि शत्रूची आर्थिक नाकेबंदी होते. उदा. भारताला रोज ४०लाख बॅरल म्हणजेच रोज तुम्हाला पाच लाख बारा हजार टन कच्चे तेल लागते.ट्रकने आणायचे ठरवले तर केवळ तेलासाठीच ५१ हजार ट्रक रोजचे लागतील. ( पाकिस्तानला ४ लाख बॅरल कच्चे तेल लागते. हा सर्व व्यापार केवळ आणि केवळ समुद्रमार्गे होऊ शकतो ( जे देश तेलउत्पादक देशाला लागून आहेत त्यांना पाईप लाईनने पुरवता येणे शक्य आहे). भारताच्या दोन्ही शत्रूंच्याकडे जाणारे सागरी मार्ग हे दोन चिंचोळ्या सामुद्रधुनी(STRAIT) मधून जातात. चीनकडे जाणारा सागरी मार्ग हा मलाक्का च्या सामुद्रधुनी तुन जातो तर पाकिस्तान कडे जाणारा सागरी मार्ग हा होर्मूझच्या सामुद्रधुनीतुन जातो.चीन कडे जाणारे ८० %तेल आणि चीनकडून निर्यात होणारा ७५ % मलाक्काच्या सामुद्रधुनी तुन जातो. या सामुद्रधुनीचा सर्वात अरुंद भाग हा फक्त अडीच किमी आहे. http://www.businessinsider.com/maps-oil-trade-choke-points-person-gulf-and-east-asia-2017-4?IR=T चीनशी दोन हात करायचे तर त्याच्या आर्थिक सामर्थ्याला धक्का लावणे आवश्यक आहे म्हणूनच भारताने जाणून बुजून अंदमान निकोबार वरील आपले लष्करी तळ वाढवायला सुरुवात केली आहे. या भागाची भारताने नाके बंदी केली तर चीनची आर्थिक सत्ता कोसळायला फार कमी दिवस लागतील. चीन पाकिस्तान आर्थिक मार्गिका (CPEC) साठी चीन एवढा अधीर का झाला आहे आणि चीनने आपल्या नौदलाचा आणि विशेषतः पाणबुडी शाखेचा झपाट्याने विस्तार का सुरु केला आहे याचे उत्तर आपल्याला येथे मिळेल. जागतिक बाजारात चीनचा कोणीही मित्र नाही. भारत अमेरिका रशिया जपान दक्षिणपूर्व आशियातील देश (कोरिया ,मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएटनाम इ.) सर्वानाच चीनच्या विस्तारवादाची भीती वाटत आली आहे. पाकिस्तानची परिस्थिती अशीच आहे. त्यांच्या कडे येणारे कच्चे तेल हे सौदी अरेबिया इराण, संयुक्त अरब अमिराती, कुवैत आणि कतार कडून येते. आणि यातील इराण सोडले तर बाकी सर्व देशाकडून येणारे तेल(८५%) होर्मूझच्या सामुद्रधुनीतून येते. त्यातून भारताने इराणच्या चहाबार बंदराचा विकास चालू केला आहे. भारताने इराण बरोबर आपले संबंध बरेच चांगले ठेवले आहेत. शिवाय पाकिस्तान हा सुन्नी बहुल देश असून तेथे शियांवर सतत अत्याचार/शिरकाण होत असतात. सर्वात मोठा आणि एकमेव शिया असलेला इराण यांचे पाकिस्तानशी संबंध याकारणाने (आणि बलुचिस्तान मुळॅ) कायम तणावपूर्ण राहिलेले आहेत. https://www.thequint.com/voices/blogs/chabahar-and-gwadar-struggle-for-power-between-india-and-pakistan-china-iran-cpec-obor अशा अनेक कारणांमुळे युद्ध झाले तर प्रत्यक्ष लष्करी विजय न मिळवता पाकिस्तानची आर्थिक आणि सामरिक कोंडी करणे भारताला सहज शक्य आहे. पाणबुडीचा सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे लपून राहणे.STEALTH पाण्याच्या पृष्ठभागाच्या खाली असलेली वस्तू आपल्याला सहजासहजी दिसत नाही. त्यामुळे रडार किंवा सोनारचा जन्म होण्याअगोदर केवळ दृष्टीला दिसेल अशा लष्करी वाहनांपैकी पाणबुडी शोधून काढणे फारच कठीण होते. याचा फायदा घेत जर्मनीने पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांना जवळ जवळ पराभवापर्यंत आणले होते. एखादे जहाज आपल्याला दिवस किंवा रात्री उपग्रहाच्या साहाय्याने काही क्षणात शोधणे सहज शक्य आहे पण आजही पाणबुडी एकदा पाण्याच्या खाली गेली तर तिला शोधून काढणे हे जवळ जवळ अशक्य आहे. अरबी समुद्राचा विस्तार ३८ लाख चौरस किमी आहे आणि मोठ्या आकाराच्या पाणबुडीचा आकार (अरिहंत सारख्या) एक सहस्त्रांश चौरस किमी आहे म्हणजेच पाणबुडीला शोधून काढणे हे अक्ख्या महाराष्ट्र राज्यात एक काळ्या रंगाचा बिबळ्या अमावास्येच्या रात्री शोधून काढण्याएवढे "सोपे" आहे अशी पाणबुडी जर मलाक्काच्या आखाताच्या आजूबाजूला दडून बसली असेल तर तिला उपग्रह किंवा विमान अथवा जहाजाने शोधून काढणे हे जवळजवळ अशक्य आहे. १९७१ च्या युद्धात पाकिस्तानच्या पाणबुडीने आपले खुकरी हे जहाज बुडवले होते पण भारताकडे ४ फॉक्सट्रॉट वर्गाच्या चार पाणबुड्या असूनही त्यांना एकही पाकिस्तानी जहाजाला बुडवता आले नाही. हे आश्चर्यच नव्हे काय? त्यात आश्चर्य काहीच नव्हते कारण पाकिस्तानच्या नौदलाची सर्वच्या सर्व जहाजे भारतीय पाणबुड्याना घाबरून कराची बंदराच्या आसपास सुरक्षित उथळ पाणयात बसून होती. रिंगणात प्रतिस्पर्धी उतरलाच नाही तर तुम्ही काय कुस्ती खेळणार आणि त्याला हरवणार? त्यावर भारतीय नौदलाच्या जहाजांनी ऑपरेशन ट्रायडेंट आणि ऑपरेशन पायथॉन असे दोन हल्ले करून पाकिस्तानि नौदलाची कंबरच मोडली. https://en.wikipedia.org/wiki/Operation_Trident_(1971) https://en.wikipedia.org/wiki/Operation_Python पण यामुळे भारताचा व्यापार मात्र सुरळीत चालू होता आणि पाकिस्तानची संपूर्ण नाकेबंदी झाली होती. फॉकलंड च्या युद्धात ब्रिटिश नौसेनेने अर्जेंटिनाची जनरल बेलग्रेनो नावाची नौका बुडवल्यावर अर्जेंटिना नौदलाने त्यांची जहाजे बंदरातच ठेवली होती. Following the loss of General Belgrano, the Argentinian fleet returned to its bases and played no major role in the rest of the conflict. British nuclear submarines continued to operate in the sea areas between Argentina and the Falkland Islands, gathering intelligence, providing early warning of air raids and effectively imposing Sea denial. https://en.wikipedia.org/wiki/ARA_General_Belgrano पाणबुडीची दहशत अशी असते. पाणबुडी या शस्त्राचा वापर केवळ युद्धातच होतो असे नव्हे तर युद्धाला प्रतिबंध (DETERRENT) म्हणून पण याचा वापर होऊ शकतो. अण्वस्त्रधारक क्षेपणास्त्रे असलेली पाणबुडी हा एक युद्ध टाळण्यात फार मोठा आधार असू शकतो. दोन अण्वस्त्रधारी राष्ट्रात सहसा युद्ध होत नाही कारण सर्वंकष संहार ( mutually assured destruction) हि भीती युद्धाच्या काठावरून राष्ट्रांना परत येण्यास भाग पडू शकते. पण एखाद्या राष्ट्राच्या माथेफिरू हुकूमशहाने सर्व समावेशक असा पहिला अण्वस्त्र हल्ला( first strike) केला तर दुसऱ्या राष्ट्राचा सर्वनाश होऊन त्यात त्याची अण्वस्त्रे सुद्धा नष्ट होण्याची भीती असते.अशा परिस्थितीत त्या राष्ट्राकडे जर अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे असलेली पाणबुडी असेल तर ती पाणबुडी अशा भयंकर हल्ल्यातही सुरक्षित राहील आणि मग त्या पाणबुडीने केलेल्या प्रतिहल्ल्यात( second strike) मूळ अण्वस्त्रे वापरणारा देश सुद्धा नष्ट होईल. त्यामुळे असा हल्ला करण्याचा मूर्खपणा पहिला देश करू धजावणार नाही. उदा. चीनने भारतावर अण्वस्त्र असलेली क्षेपणास्त्रे डागली आणि भारताचा भूभाग संपूर्णपणे भाजून टाकला तरी आपल्याकडे असलेली "अरिहंत" हि अण्वस्त्र धारी क्षेपणास्त्रे असलेली पाणबुडी दक्षिण चीनच्या समुद्रातुन १२ सागरिका क्षेपणास्त्रे (K १५) हायड्रोजन बॉम्ब टाकून चीनला बेचिराख करू शकेल अशी आज आपली क्षमता आहे. अशीच दुसरी अणुपाणबुडी "अरिदमन" या वर्षाअखेरीस जलावतरण करेल आणि २०१९ पर्यंत संपूर्णपणे युद्धक्षमता धारण करेल. https://en.wikipedia.org/wiki/Arihant-class_submarine असाच एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे (non state actors) असंघटित किंवा घातपाती कारवाया करणाऱ्या दहशतवादी किंवा सागरी चाचे यांचा बंदोबस्त करण्यासाठी होऊ शकतो. एडन च्या किंवा मलाक्का आखातात असलेले चाचे हे नौदलाच्या जहाजाला पहिले कि तेथील जनतेत मिसळून जातात आणि जहाज गेले कि परत सक्रिय होतात. अशा वेळेस तेथे आपली पाणबुडी त्यांच्यावर दिवसापण "नजर" ठेवू शकते आणि हे लोक कुठे जातात त्याचा ठावठिकाणा सापडला कि त्यांच्या तळावर क्षेपणास्त्रे डागून त्याचा संहार करू शकतात. नागा किंवा रोहिंग्या बंडखोरांना चीनची "फूस" मिळत असते जेणेकरून भारत आणि म्यानमार मध्ये तणाव राहावा आणि आपल्याला तेथे शिरकाव करता यावा. अशा विषम शत्रू विरुद्ध होणाऱ्या असमतोल युद्धात केलेल्या कारवाईचा कोणताही पुरावा मागे न ठेवता कार्यवाही करण्यासाठी पाणबुडीचा फार मोठा उपयोग होऊ शकतो. कालवेरी या भारतीय पाणबुडीतून क्षेपणास्त्र डागण्याची चाचणी यशस्वी झाली आहे https://timesofindia.indiatimes.com/india/navy-successfully-test-fires-anti-ship-missile-from-kalvari-submarine/articleshow/57430490.cms https://economictimes.indiatimes.com/news/defence/first-scorpene-submarine-ins-kalvari-delivered-to-navy-to-be-commissioned-soon/articleshow/60783199.cms https://www.youtube.com/watch?v=dzttFhYUR7g क्रमशः

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 39264 views

💬 प्रतिसाद (63)
स
संग्राम Sat, 11/18/2017 - 17:18 नवीन
मला हे 2 प्रश्न पडले होते .... Oxygen बद्दल समजलं . .. आता संपर्काबद्दल सांगा
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 11/18/2017 - 20:12 नवीन
संपर्क यंत्रणेबद्दल पुढच्या भागांमध्ये विस्तृतपणे येईल.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 11/18/2017 - 15:01 नवीन
अर्जेंटिना "सॅन जुआन" नावाची जर्मन बनावटीची पाणबुडी गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता आहे. पाणबुडी कडून कोणताही संदेश तीन दिवसात न आल्याने तिचा शोध चालू आहे. नियमाप्रमाणे जर कोणताही संपर्क होत नसेल तर पाणबुडी ने पृष्ठभागावर येणे आवश्यक आहे. तिच्या शोधासाठी अमेरिका ब्रिटन आणि इतर देशांचे उपग्रह आणि विमाने यांची मदत घेतली जाणार आहे. http://www.bbc.com/news/world-latin-america-42030560 http://edition.cnn.com/2017/11/17/americas/argentina-submarine-missing/index.html https://en.wikipedia.org/wiki/ARA_San_Juan
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Sat, 11/18/2017 - 17:09 नवीन
पाणबुडी गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता आहे.पाणबुडी कडून कोणताही संदेश तीन दिवसात न आल्याने तिचा शोध चालू आहे.
एक शंंका. आपली पाणबुडी नक्की कुठे जाते हे किमान अर्जेंटिनाच्या नौदलाला तरी माहीत असायला हवे होते ना? थोड्या थोड्या वेळाने जमिनीवरील कार्यालयाशी काहीतरी संंपर्क करणे अपेक्षित असेल ना?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 11/18/2017 - 20:12 नवीन
हाच संपर्क तुटला आहे म्हणून तर काळजी वाटते. जर संपर्क करणारी यंत्रणा खराब झाली तर पणबुडीने ताबडतोब पृष्ठभागावर यायला पाहिजे. तसे झालेले नाही. पणबुडीमध्ये काही अपघात झाला किंवा बंद पडली की काय झाले हे समजायला मार्ग नाही म्हणून तर शोध चालू आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 11/20/2017 - 07:11 नवीन
http://www.news.com.au/world/south-america/missing-submarines-chance-of-being-found-with-crew-still-alive-fading-by-hour/news-story/b5c507fbf04115015775dbbffe0cfa9e
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 11/22/2017 - 07:28 नवीन
http://www.news.com.au/world/south-america/last-day-of-air-for-missing-argentinian-submarine/news-story/2cd05b2655dbc6eb7f53b89db966fec3
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sat, 11/18/2017 - 17:18 नवीन
वाचूनच श्वास दडपला भो ......
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Mon, 11/20/2017 - 22:30 नवीन
लहानपणापासून पाणबुडी बघायची जबरदस्त इच्छा होती. ३-४ वर्षांपूर्वी एका सी म्युझियममध्ये ठेवलेली पाणबुडी आतून बघायची संधी मिळाली होती. आतील जागा बघून खरंच चक्रावून गेलो होतो. मोकळेपणाने हात पाय सुद्धा लांब करता येणार नाहीत एवढीशी जागा होती. एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठीचे दार म्हणजे कसरत करत जायला लागेल एवढे छोटे. झोपायची जागा म्हणजे .. जाऊ दे. पाणबुडीत राहण्यासाठी सैनिकांना त्यांच्या आकारमानावर पण बारीक लक्ष ठेवावे लागत असेल. एवढ्याश्या चिंचोळ्या जागेत इतके दिवस कसे काय राहत असतील याचे कायमच आश्चर्य वाटते. डॉक्टरसाहेब समजा २-३ महिने सूर्यप्रकाश, मोकळी हवा नाही तसेच फार हालचाल व व्यायाम नाही. मग हे सैनिक वजन आटोक्यात कसं ठेवतात? तब्येतीची काळजी कशी घेतात? मधेच समुद्रात जर कोणाची तब्येत बिघडली तर काय सोय असते?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 11/21/2017 - 15:35 नवीन
पाणबुडीत एक ८ x १० फुटाची बारीकशी व्यायामशाळा पण असते. लोक तेथे व्यायाम करून आपले वजन नियंत्रणात ठेवतात. शिवाय पाणबुडीत तळण्याची प्रक्रिया जवळ जवळ करताच येत नाही. त्यामुळे तेथील आहारात तेलाचा वापर कमीच असतो शिवाय मिताहार आणि वजन नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीनेच आहार तयार केला जातो. त्यात सर्व तर्हेची जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतील अशा तर्हेची सोयही केली जाते. आणि जेंव्हा पाणबुडी लांब गस्तीसाठी जाते तेंव्हा त्यांच्या बरोबर ते डॉक्टरला पण घेऊन जातात. हा डॉक्टर पण एक वर्षे पाणबुडीचा खास अभ्यासक्रम केलेला असतो. ( ते लोक अशा डॉक्टरांची "खास" काळजीहि घेत असतात). अणुपाणबुडीत तर काही वेळेस अंडरवॉटर मेडिसिन/ मरीन मेडिसिन मध्ये "एम डी" केलेला डॉक्टरही जातो. हा तीन वर्षाचा मुंबई विद्यापीठाचा पूर्ण अभ्यासक्रम आहे. हेच लोक अंटार्क्टिका सारख्या ठिकाणी पण नेले जातात. ( मी या विषयाचा एक महिन्याचा प्रारंभिक अभ्यासक्रम केला आहे). एक आमचे सर्जन कमांडर जेकब मॅथ्यूस नावाचे सर होते. त्यांनी पाणबुड्याचा कोर्स ( diver) पाणबुडीचा कोर्स( submarine course) MBBS आणि मरिन मेडिसिन मध्ये MD केलं होतं. त्यांचा पगार, नॉन प्रॅक्टिस अलाउन्स, DIVER अलाउन्स आणि SUBMARINE अलाउन्स मिळून एकंदर पगार नौदल प्रमुखच काय आपल्या राष्ट्र्पतींपेक्षा जास्त होत असे. प्रत्येक पाणबुडीचे कमांडिंग ऑफिसर अतिशय मृदू स्वभावाच्या या डॉकटरने आपल्या बरोबर गस्तीसाठी (WAR PETROL) यावे म्हणून खास प्रयत्नशील असत.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Tue, 11/21/2017 - 22:47 नवीन
पाणबुडीमध्ये सुद्धा त्यांनी मिनिएचर फॅसिलिटीज केल्यात, आवश्यकच आहे. अश्या स्थितीत राहणाऱ्या आणि देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना सलाम. __/\__
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Wed, 11/29/2017 - 07:58 नवीन
छान माहिती.. वाचून खरंच श्वास दडपला....पाणबुडीतील सैनिकांचे कौतूक वाटले...!! भारताकडे येणार्‍या पाईपलाईन्स कोठून येतात हो? त्यावर चीन आणि पाकड्यांचा डोळा नसेल काय? आपण त्यासाठी काय काळजी घेतो?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 12/01/2017 - 14:10 नवीन
पाणबुडीतील ४४ जणांच्या जिवंत परत येण्याच्या अशा मावळत चालल्या आहेत हि दुर्दैवाची गोष्ट आहे. https://www.cnbc.com/2017/12/01/argentina-abandons-rescue-mission-for-crew-of-missing-submarine.html Balbi said 28 ships, nine planes and 4,000 people from 18 countries were involved in the search covering 557,000 nautical miles - more including radar monitoring. "Despite the magnitude of our search it has not been possible to find the submarine," he said. याचबरोबर एखादी पाणबुडी साधारण कुठे होती हे माहित असले तरी शोधणे किती कठीण आहे हे येथे अधोरेखित होते आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    5 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    5 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    5 days ago
  • सुंदर !!
    5 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    5 days 5 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा