राजांचे मावळे - 2
भाग पहिला
घोडखिंड : मल्हारी
मल्हारी सगळ्यांच्या पुढे होता कारण त्याला हा रस्ता तळहाताच्या फोडाप्रमाणे माहीत झाला होता. मुसळधार पाऊस आणि त्यामुळे झालेला गुढघाभर चिखल. आता ते सगळे एका छोट्या पठारावर पोचले होते. थोडाच वेळ का होईना पण ते सगळे उघड्यावर आले होते. न सांगताच मावळे राजांच्या आजूबाजूला पसरले. मल्हारी अजून पुढेच होता आणि त्याच्या मागेच राजे पळत होते. राजांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला प्रत्येकी 2 2 मावळे होते आणि मागे बाजी. पालखीवाले सगळ्यात मागे पडले होते ते आता हळू हळू अंतर कमी करत होते. मल्हारीने संकेत दिला आणि सगळे थांबले. तो आता वाटांच्या दुभाजकावर येऊन पोचला होता आणि त्याला योग्य वाटेवर घेऊन जायचं होतं. रस्ता जरी मल्हारीला पाठ असला तरी पुढे कोण आहे किंवा कोण नाही याचा अंदाज नव्हता. सगळे थांबले आणि निरव शांतता पसरली. या शांतततेमध्ये फक्त प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा आवाज येत होता. आणि मल्हारीला स्वताचा श्वास. त्याचे कान फारच टवकारले होते, तो अंदाज घेत होता की पुढे कोण नाही ना. मागे अजून कोणीतरी जोरजोरात श्वास घेत होता, ग्यानबा का बाजी? क्षणभर मल्हारी थांबला. त्याला खात्री झाली की पुढे कोणी नाही. इशारा दिल्यावर सगळे डाव्याबाजूच्या वाटेनी निघाले. आता मल्हारी सगळ्यात पुढे होता, त्याच्या मागे अजून 3 मावळे होते, मग बाजी आणि मग राजे. वाट आता खाली उतरत होती. पाय जपून टाकावा लागत होता पण वेग काही कमी करून चालणार नव्हता. घोडखिंडीच्या तोंडाशी पोचायला अजून थोडा वेळ होता.
मल्हारीच गाव याच वाटेवरच, अंबा. सगळं लहानपण आणि सुरुवातीचं तरुणपण या दऱ्या खोऱ्यात गेलं. वाट आणि वाट माहिती. राजेंनी जेव्हा त्याला बोलावलं तेव्हा त्याला स्वतःचा फार अभिमान वाटला. पण राजांनी जेव्हा त्याला विशालगडापर्यंतचा मार्ग काढायला सांगितलं तेव्हा त्याला प्रश्न पडला. जेव्हा त्याला त्या प्रश्नाचे उत्तर उमगले तेव्हा तो हादरला. "राजांनी नीट विचार केला असेलच." तो राजाना मुजरा करून मागे वळला. बाजी बाहेरच उभे होते. बाजींनी त्याला एकच सांगितलं " पन्हाळ्याचा वेढा तोडायचा आहे, पण शत्रूला न कळता". त्याला पुढे काही सांगायची गरज नाही पडली. एका अंधाऱ्या रात्री, मल्हारी आणि मोरोबा पन्हाळ्यातून खाली उतरले. यवनाचा पहारा होता पण तो आता एवढा कडक राहिला नव्हता. एका ठिकाणी बसायची सैन्याला सवय नसते, त्याला सतत युद्ध हवं असत नाहीतर घर. यवन वैतागला होता, राजे जेरबंद झाले होते गडावर आणि काहीच हालचाल करत नव्हते. नुसते यवनच नाही तर मल्हारीपण उबगला होता गडावरून वेढा बघून बघून. चार दिवसांपूर्वी मोरोबा जेव्हा वर आला तेव्हा केवढीतरी खळबळ माजली होती. मोरोबा नुसता लपून छपून वर आला नव्हता तर त्याने भरपूर माहिती आणली होती बरोबर त्याच्या. शत्रूचा पहारा कुठे कडक आहे, कुठे ढिला आहे, कुठल्या तुकडीचा नायक कोण आहे वगैरे. राजेंनी मोरोबाला खूप प्रश्न विचारले. मग त्यांना सगळ्यांना जायला सांगून रात्री खूप खलबत झाली. शेवटी काहीतरी ठरलं. काय होत ते मल्हारीला नाही कळलं पण आता हालचाल करायची आहे एव्हढं उमगलं. मल्हारीच्या पुढे मोरोबा होता. दोघेही एका नसलेल्या वाटेवर एका गडद झुडुपाच्या मागे दडलेले होते. चपळ मोरोबाची नजर सगल्याबाजूचे वेध घेत होती आणि दोघांचे कान सश्या सारखे टवकारले होते. देवाच्या कृपेने आज याबाजूला पहारा कडक नव्हता पण तरीही सावधपणे जावं लागतं होत. मोरोबा आणि मल्हारी वेढा ओलांडून पुढे जेव्हा आले तेव्हा एका मोठ्या झाडाखाली क्षणभर बसले. बसल्यानन्तर त्यांच्या लक्षात आलं की त्यांचे श्वास जणू रोखले गेले होते आणि हृदय हरणाच्या वेगाने धावत होत.
उजव्याबाजुनी मल्हारीला सळसळ ऐकू आली, ओळखीचा आवाज आल्यासारखं वाटलं. मल्हारी क्षणभर गोंधळला आणि वीज चमकल्या सारखा त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. पुढच्या क्षणात बरच काही घडलं. मल्हारीने ओरडून इशारा दिला आणि तलवार उपसली. मल्हारीच पाहून पाठच्यानीं पण तलवारी उपसल्या. राजेंभोवती कड झालं आणि परत शांतता पसरली. मल्हारीने अलगद ढाल पाठीवरून डाव्या हातावर घेतली नि तो सज्ज झाला. तो आता पूर्ण उजव्याबाजूला फिरला. त्याचे दोन्ही पाय ताठरून उडी मारायला सज्ज झाले. आता आतून आवाज येत होता. मल्हारी समोरच झुडूप थोडस हलल आणि त्यातून दोन डोळे चमकले. आता गुरगुरायचा आवाज स्पष्ट येऊ लागला. एक उडी मारून वाघ झुडुपाच्या बाहेर आला.
आता जंगलाच्या या भागात भरपूर वाघ एकमेकांसमोर आले होते. जंगली, हिंस्त्र जनावर ते एक आणि राजांवर जीव ओवाळायला निघालेले ते बाकीचे. मल्हारीचा श्वास अजून पूर्ण लयीत आला नव्हता पण त्याने तलवारीची पकड थोडीशी ढिली केली. ते जनावर गुरगुरत होत पण मल्हारीला अंदाज आला की ते भुकेलं नसावे. त्याच्या हद्दीत शिरलोय आपण बहुतेक म्हणून ते पुढे आल असावं. आता आजूबाजूला खरी निरव शांतता पसरली होती. मल्हारी मनोमन प्रार्थना करत होता की कोणी एकदम हालचाल करु नये कारण त्याला आता विश्वास आला होता की जनावर भुकेलं नाहीये. काही क्षण अजून निरव शांततेत गेले, वाघ एकदा त्याच्याकडे बघून गुरगुरला. पुढच्या क्षणाला तो झुडुपाच्या मागे उडी मारून दिसेनासा झाला.
सगळेजण सुटकेचा निश्वास सोडणार तेवढ्यात मागून येणाऱ्या फौजेचा आवाज जवळ वाटू लागला. मल्हारीला बाजीने खूण केली आणि सगळ्यांनी परत वेगाने रस्ता पकडला. पाठलाग करणार सैन्य, पळणाऱ्या सैन्यापेक्षा दोन पटीनेतरी जास्त होत आणि उघड्यावर ते अंगावर घेण्यासारखं नव्हतं. मल्हारी आता घोडखिंडीच्या तोंडाशी आला होता. त्याने बाजींना संकेत केला आणि सगळे थांबले. यापुढे जे घडणार होत ते अशक्य कोटीतलं होत.
फसलेल्या यवनाची पहीली तुकडी बघता बघता कापली गेली. आक्रोश, आरडाओरड, शिव्याशाप, युद्धगर्जना आणि किंकाळयांनी आसमंत भरायला लागला. मल्हारी बाजींच्या बाजूला उभा होता. समोर तलवार चालवणाऱ्या पहिल्या तुकडीची सुरुवात चांगली झाली होती. पण आता शत्रूला अंदाज येऊ लागला होता. आंधळेपणाने आत शिरणारे यवन कमी झाले होते आणि ते आता अंदाज घेऊन शिरत होते. खाशाबाच्या डाव्याबाजूचा मावळा डगमगला, त्याच्या आरपार एक भाल्याच टोक आलं होतं. बाजींनी गर्जना केली "हर हर महादेव" आणि ते संग्रामात उतरले. बाजी धिप्पाड, जवळजवळ दोन मावळ्यांची जागा त्यांनी व्यापली. मल्हारीने खाशाबाला मागे ओढलं आणि तो त्याच्या जागी उतरला. पुढे किती वेळ गेला कोणास ठाऊक. मल्हारीच्या हातातली तलवारच फक्त बोलत होती. मध्ये कधीतरी पाऊस चालू झाला आणि थांबला. तेवढ्यात एक भाला सणसणत आला आणि बाजी डगमगले.
मल्हारीने आणि ग्यानबाने पटकन त्यांना मागे खेचलं. त्यांच्या जागेवर परत खाशाबाने उडी घेतली. बाजींच्या शरीरात दोन बाण घुसले होते एकदम. ग्यानबाने एक ओढून काढला पण मल्हारीने दुसरा फक्त तोडला. बाजींचे रक्त वाहुन जाणे परवडणार नव्हते. बाजींची ती छोटी तुकडी आता दमलेली कळत होती. मल्हारी परत धुमश्चक्रीत उतरला पण हात जड झाल्यासारखे वाटत होते. अंग घामाच्या धारांनी भिजल होत का पावसाच्या पाण्याने? का हे रक्त होत? त्याला विचार करायला वेळच मिळत नव्हता. यवनाला आता पूर्णपणे कळले होते की आपण फसवले गेलो. पण त्याची मग्रुरी काही त्याला मागे फिरू देईना. जे काही थोडेसे आहेत त्यांना संपवायचे मग शिवाजी सापडलाच जणू. तोंडाशी चालू झालेलं युद्ध आता खिंडीत शिरलं होत. पण त्यामुळे मावळ्यांनाच फायदा होत होता. तुकडीतले काही लोक वेली धरून वर चढले होते नि मोरोबाने जमा करून ठेवलेले दगड नेम धरून मारत होते. यवन मरत तर नव्हता पण जायबंदी नक्की होत होता.
तेवढ्यात मल्हारीला बाजींची गर्जना ऐकू आली "हर हर महादेव" , "जय भवानी" . क्षणभर उसंत घ्यायला थांबलेले बाजी परत आले. आता मल्हारीच्या डाव्या बाजूला बाजी नि उजव्याबाजूला ग्यानबा अशी भिंत तयार झाली. उजव्याबाजूला, डाव्याबाजूला, खाली, वर, इकडे, तिकडे. तलवारी नुसत्या तळपत होत्या. शत्रूचे हात, पाय, डोकं, तलवार, ढाल, जे काही तळवारींच्या मार्गात येत होतं ते कापलं जात होतं, नाहीतर दूर ढकलले जात होते. मगासचा थकवा नाहीसा झाला होता. युद्धज्वर नसानसात भिनला होता. समोर फक्त यवन आणि यवनच दिसत होता. मल्हारीच्या डाव्याबाजूला असलेले बाजी परत मागे गेले, त्यांची जागा दुसर्याने घेतली. मल्हारीला सुचलं पण नाही की कोण आला त्याबाजूला हे. त्याची नजर आता स्थिर झाली होती, हातांना एक लय सापडली होती, पाय नजरेला आणि हाताला पूरक हालचाल करत होते. त्यालयीतच त्याला जाणवलं की समोरचा शत्रू कमी होतोय (की बाजूला होतोय?). त्याच्या समोरचा शेवटचा यवन भेलकांडत खाली पडला आणि मल्हारीच्या तलवारीने तिचा बळी घेतला. मल्हारीने तलवार त्याच्या शरीरातून उपसली आणि पुढच्यासाठी तो सज्ज झाला. त्याचे स्नायू आता टरारले होते, श्वास दीर्घ घेतला होता आणि समोरून एक भाला सणाणत आला. मल्हारीने अशी वेदना कधीच अनुभवली नव्हती. भाल्याने त्याच्या छातीचा भाता फुटला होता आणि रक्ताचे लोट उसळले होते. त्याच्या हातातली तलवार आणि ढाल कधी गळून पडली त्याला कळलच नाही. समोरून येणारा शत्रू हळूहळू दिसेनासा झाला. मागे डोकं कशावर तरी आपटलं. मल्हारीने बोलायला तोंड उघडलं पण पावसाच्या चार थेंबांशिवाय............
💬 प्रतिसाद
(15)
स
संजय पाटिल
Fri, 10/27/2017 - 07:58
नवीन
चित्तथरारक! सगळं डोळ्यसमोर उभं झालं...
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Fri, 10/27/2017 - 13:00
नवीन
सरस्वतीचा वरदहस्त आहे तुमच्यावर.. लिहीत राहा
- Log in or register to post comments
र
राघव
Fri, 10/27/2017 - 13:17
नवीन
ज ब र द स्त !
लिहित राहा भावा लिहित राहा..!!
[नतमस्तक] राघव
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Fri, 10/27/2017 - 13:36
नवीन
फार...फार सुंदर लिहिलंय हो __/\__
- Log in or register to post comments
ए
एस
Fri, 10/27/2017 - 14:53
नवीन
श्वास रोखून वाचतो आहे. पुभाप्र.
- Log in or register to post comments
म
महेश हतोळकर
Fri, 10/27/2017 - 16:29
नवीन
चित्रदर्षी वर्णन. असेच लिहीत रहा. पुभाप्र.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Fri, 10/27/2017 - 17:48
नवीन
सुंदर चित्रदर्शी वर्णन ! असेच लिहीत रहा !!
- Log in or register to post comments
द
दिपस्वराज
Sat, 10/28/2017 - 06:35
नवीन
काय सामना रंगलाय ....... खिळवून ठेवलंस मित्रा.
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Sat, 10/28/2017 - 23:24
नवीन
रोमांचकारी... येऊद्यात अजून
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 10/29/2017 - 03:09
नवीन
उत्तम लिहिलंय.
मात्र यवन शब्दाचा अतिवापर खटकला. तत्कालीन इस्लामी सैन्याला यवनी सेना असे असे अगदी क्वचित म्हटले जात असे.
ऐतिहासिक संदर्भाच्या दृष्टीने मसाउद किंवा मसाउदची सेना हा शब्द अधिक सयुक्तिक झाला असता तरीही (चुकीचा जरी असला तरी) यवन हा शब्द इथे कथानकात अधिक चपखल बसतोय हे सांगणे न लगे.
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Sun, 10/29/2017 - 07:24
नवीन
जबरदस्त लिहिलंय!!
- Log in or register to post comments
स
संग्राम
Sun, 10/29/2017 - 08:24
नवीन
_/\_
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Sun, 10/29/2017 - 13:55
नवीन
बेफाम!!
- Log in or register to post comments
स
सुमीत
Wed, 11/01/2017 - 14:22
नवीन
त्रिवार मुजरा
- Log in or register to post comments
व
विनिता००२
Fri, 11/03/2017 - 05:08
नवीन
सुरेख लिहीताय ___/\___
- Log in or register to post comments