चितळेंपेक्षाही जास्त माजोरडे दुकान!
शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं ना? कालपर्यंत मी सुद्धा अशी काही कल्पना केली नव्हती... पण सत्य हे कल्पनेपेक्षाही विचित्र असते, याचा फर्स्ट ह्यांड अनुभव घेतला मी!
===============================================================================
कार्यालयीन कामानिमित्त गेल्या आठवड्यात बंगलोरास आलेलो, आणि वीकेंड मैसुरच्या कार्यालयात घालवून, धनत्रयोदशीच्या संध्याकाळीच घरवापसी करणार होतो. हा मैसुर म्हणजे महिषासुराचा धाकटा भाऊ आणि बकासुराचा चुलत भाऊ असावा असं उगीच वाटत रहातं. असो. तर, दिवाळीच्या आधीच्या वीकांताला मी घरात नसल्याने सौ तुफान चिडलेली... “वर्षभर घरात पसारा कर आणि साफसफाईच्या वेळेला बरोबर पसार हो! पसाभर हातभार लाऊ नकोस कामांना... घर माझं एकटीच आहे का?” इत्यादी इत्यादी... त्यामुळे दिवाली को मनानेसे पैले घरवाली को मनाना था! तस्मात् “मैसुरास रेशमी साड्या चांगल्या मिळतात, तिथून तुझ्यासाठी काही छानश्या साड्या आणतो” असं सांगून मांडवली केली.
कबूल करून बसलो खरा; पण कपडे खरेदी, ती सुद्धा बायकांची, हा एक प्रचंड वैतागवाणा प्रकार आहे, हे समस्त पुरुषवर्ग मान्य करेल. या विषयावर पु लं नी एव्हढ खुमासदार लिहिलेलं असतानाही बायका आपापल्या नवऱ्यांना कापड खरेदीस का ओढून नेतात हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे दिलेला शब्द कसा पाळावा हा यक्षप्रश्न होताच. एकदा वाटलेलं, की तसही माझे शब्द हिंस्र असल्याने नाही पाळला तर? पण सौ दुर्गावतार धारण करतील, या भीतीने मनाचा हिय्या करून कापड खरेदी उरकायची ठरवली.
सर्वात पहिला अडथळा आला दुकान निवडण्यात. रांगेत ३५-४० साड्यांची दुकानं, आणि प्रत्येक दुकानात मैसूरच्या “अस्सल आणि सर्वोत्तम” रेशमी साड्या मिळणार. योग्य दुकानाचा शोध ईश्वराच्या शोधाईतकाच कठीण वाटू लागला. मग निमूट कार्यालयातल्या भगिनी समाजाला शरण गेलो, आणि म्हणालो, “बायांनो, एखादं बरंसं दुकान सुचवा!” त्यांनी आपापसांत काहीतरी अगम्य बडबड केली आणि एक भगिनी मला म्हणाली, “गो टू कर्नाटका सारी सेंटर!” दुसरीने स्वत:च्या फोन वरून उबर सुद्धा बोलावली. आणि मी शुंभासारखा आपल्या पायांनी त्या गाडीत बसून वधस्तंभाकडे चाललेल्या वसंतसेनाघातकी चारुदत्तासारखा निघालो पण!
कर्नाटका सारी सेंटर! स्वर्ण महाल हे नाव धारण करणाऱ्या, आणि सशाच्या टाळूला गंडस्थल म्हणण्याचा गटणेपणा करणाऱ्या एका चारमजली कळकट्ट इमारतीत हे दुकान आहे. न्यूटनचं नाव घेऊन आत शिरलो. तळमजल्यावर चारास एक या गुणोत्तरात काही विक्रेत्या ग्राहकांकडे दुर्लक्ष करत होत्या. त्यातल्या एकीसमोरच्या घोळक्यात भर टाकत मी म्हणालो,
“सिल्क सारीज दिखाइये!”
“रेंजा?”
“फुल रेंज इन रोमिंग” खिशातून फोन काढत मी उद्गारलो, आणि मग माझी ट्यूब पेटली! आधल्या रात्री सौंशी बोलून मातोश्री आणि शत्रुपक्षाच्या पुढारी स्त्री साठी (पहा: नारायण) साडी; आणि सौंसाठी ड्रेस मटेरियल असा बेत नक्की झालेला. पण किती रुपड्या खर्च करायच्या ही महत्वाची तहाची कलमं राहून गेलेली. आली की नाही पंचाईत! आणि त्यात ती मद्रकन्या कंटाळवाण्या चेहऱ्यानं माझ्याकडे रोखून बघत होती.
“फाईव थाउजंड?” मी, भीतभीत.
“पिलावूल्कंडी तेरेपारम्पील उषा!”
“???”
नक्की काय म्हणायचंय हिला? मी किंमत खूप कमी सांगितली का? साड्यांच्या किमती किती असतात? इकडे कुणी हिंदी बोलतच नाही का? अशा प्रश्नांच्या वावटळीत चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह घेऊन मी उभा.
आमचा हा आध्यात्मिक पातळीवरचा संवाद पाहून तिसरीच एक दुर्मुखसुंदरी मला म्हणाली,
“सर, सेकंड फ्लोअरा यू गो.”
“इंग्लीश हम शरमिंदा है, तेरे कातील...” असं काहीतरी पुटपुटत पावनखिंडीसारख्या त्या अरुंद जिन्यावरून चढून दुसऱ्या मजल्यावर पोचलो, आणि....
तिथं उफाळलेली गर्दी पाहून फेफरं यायचं बाकी राहिलं. शुष्क दिना आधी मदिरेच्या दुकानासमोर पण एवढी गर्दी नसते राव... खरेदी करणारी एक अनाहिता, तिला सोबत करणाऱ्या दोन बायका आणि अशा तीन टोळ्यांना सांभाळायला एक विक्रेती या प्रमाणात त्या वीस बाय वीस च्या दालनात तीन-चारशे बायका कलकलाट करत होत्या. फुल कुंभमेळा लागलेला. आल्यापावली मागे वळावं असा विचार करत असतानाच मागून आलेल्या लोंढ्याने मला आत ढकलून दिलं, आणि अभिमन्यू सारखा मी त्या चक्रमव्यूहात एकाकी लढू लागलो. क्षणभर वाटलं, एवढ्या गर्दीत घुसून खरेदी केल्याने सौ खूष होईल. पुराव्याने शाबीत करण्यासाठी एखादा फोटो घेऊन ठेवावा. पण खिशातून फोन काढायचा प्रयत्न केला आणि त्या भानगडीत डझनभर बायकांच्या निरनिराळ्या अवयवांना स्पर्श झाला. मग डंकर्क च्या यशस्वी माघारी सारखी ती मोहीम मी रद्द केली..
मुंबईच्या लोकलचा अनुभव असल्याने मागच्या लोंढ्याचा फायदा घेऊन एका कौंटरजवळ पोचलो. आणि चक्क त्या विक्रेतीला हिंदी येत होतं. चटकन तिने २ साड्या दाखवल्या. त्यातली पहिली पसंत केली आणि त्याच डिझाईन मध्ये आणखी रंग मागितले. प्रत्युत्तरादाखल तिने समोर टाकलेली पहिलीच साडी उचलली. ठरवलेल्यापैकी दोन जिन्नस दोन मिनिटात घेतले! “जितं! जितं!!” अशी आरोळी ठोकली मी!
“ये दो सारीज पॅक कर दिजीये. और मुझे ड्रेस मटेरिअल दिखाईये.” मी, ऐटीत.
“नै सर. पैले इसका बिलिंग होना.”
“नहीं, मै सारा बिलिंग साथमे करुंगा.”
“नै सर. पैले इसका बिलिंग होना.” तिची रेकॉर्ड एकाच ठिकाणी अडकलेली.
“ठीक है!”
आलीया भोगासी... म्हणत मी त्या गर्दीतून वाट काढत तिच्या मागून बिलिंग कौंटर पाशी गेलो. तिथही झुंबड उडालेली होतीच. त्या गोंधळात थोडा वेळ गेल्यावर माझा नंबर लागला. त्या हिंदी बोलणाऱ्या विक्रेतीने तिच्या हातातल्या साड्या बिल बनवणाऱ्या हेडमास्तराकडे दिल्या. मी निमूट कार्ड काढून त्याच्या हातात दिल आणि काही सहस्र रुपयांचा चुराडा करून घेतला.
नाकावर घसरलेल्या चष्म्याच्या वरून माझ्याकडे बघत त्या बुवाने कार्ड आणि बिल माझ्या हातात दिलं. मी साड्यांच्या प्रतीक्षेत उभा.
“हो गया.” हेडमास्तरबुवा.
“लेकीन मेरी सारीज?” मी
“वो नीचे फर्स्ट फ्लोर से लेनेका.” डिसमिस!
च्यायला! ही आणखीच भानगड! इथंच माझ्या हातात साड्या देऊन टाकल्या असत्या तर काय बिघडणार होतं? तरी बरं, खाली उतरता उतरता साड्या घेऊन जायचं होतं. वरून येणाऱ्या बायकांना चुकवत, मास्टर अफझुलखानच्या पाठीवरच्या तोफेसारख्या (पहा: असा मी असामी) त्या जड लॅपटॉप बॅगेला सांभाळत आणखी वर जाणं म्हणजे शिक्षाच झाली असती. “थँक्यू!” म्हणून मी खाली जायला निघालो, आणि आठवलं! सौंसाठीची खरेदी शिल्लक आहे... पोटात एक छोटासा गोळा आला!
“सर, ड्रेस मटेरियल चाहिये” अजीजीने मी हेडमास्तरबुवाला म्हणालो.
“थर्ड फ्लोर.”
जेवणाची वेळ झालेली. आतापर्यंत माझा उत्साह पार संपलेला. दोन मिनिटात खरेदी संपवल्याचं भारी फिलिंग केव्हाच उडून गेलेलं. पोटातला छोटासा गोळा आता भुकेचं रूप घेऊन दंगा करत होता. नाईलाजाने, टाचा घासत घासत मी अजून एक मजला चढून गेलो.
इथं गर्दी जरा कमी होती. विरार ट्रेन मधून बांद्रा ट्रेन मध्ये आल्यासारखं वाटलं. पण इथं सौंसाठीची खरेदी करायची होती. त्यामुळे एका कानाला फोन लाऊन तिच्याशी बोलायचं. सॉरी, तिचं बोलण ऐकायचं. आणि ते विक्रेतीला सांगायचं. दुसऱ्या फोन वरून ती दाखवेल त्या कापडाचे फोटो काढून सौंना पाठवायचे. मग पुन्हा “यात फ्युश्या कलर आहे का बघ, लेमन ग्रीन ऐवजी ओशन ग्रीन किंवा बॉटल ग्रीन आहे का विचार, या पॅटर्न मध्ये जडावाचं काही माग...” असे हल्ले परतवायचे. अशी सगळी सव्यापसव्य करून चार कापडं नक्की केली.
“आईये सर, बिलिंग करते है.” त्राणच गेलं माझ्या पायातलं.
पुन्हा मघाच्यासारखे सगळे उद्योग करून बिल बनवलं. फक्त इथं हेडमास्तरबुवा ऐवजी मुख्याध्यापिका बाई होत्या. बिल माझ्या हाती देऊन “फर्स्ट फ्लोर” असं म्हणत तिने मोबाईलमध्ये डोकं खुपसलं.
“मॅडम, ये ड्रेस मटेरियल इधरही मेरेको क्यू नही देते?” हमारे बगीचे मै पैदा हुवा फुलदणाणा च्या शैलीत मी.
“नै सर, आपको फर्स्ट फ्लोर से ही लेना होगा!” मुख्याध्यापिका
“लेकीन ऐसा क्यू? इधर ही देंगे तो आपका भी टाइम बचेगा और हमारा भी.” आता वैताग बोलायला लागलेला.
“नै सर, हमारा प्रोसेस है, आपको फर्स्ट फ्लोर से ही लेना होगा” प्रोसेस? उद्या सांगाल आमची डेव्हलपमेंट, टेस्टिंग आणि क्यूए टीम आहे.
“ये कैसा प्रोसेस है? इसमे आपका भी टाइम जाता है और हमारा भी!” मी चिकाटीने माझा मुद्दा लाऊन धरलेला.
“सर आप इधर आर्ग्यू करनेसे फर्स्ट फ्लोर जायेंगे तो आपका भी टैम बचेगा और हमारा भी!”
इनस्विंगिंग यॉर्कर. क्लीन बोल्ड. जमिनीवर पडलेला माझा चेहरा उचलून घेत मी फर्स्ट फ्लोर कडे.
पहिल्या मजल्यावर पॅकिंग कौंटरकडे सगळे ग्राहक आपापले जिन्नस घ्यायला जमा झालेले. रांग लावल्याने आम्हा भारतीयांच्या राष्ट्रवादावर गदा येते. त्यामुळे तिथं मारामारी चालू होती. मुसंडी मारून त्या गर्दीत घुसलो. कौंटर पल्याड दोन अण्णा लोकांकडून बिल घेऊन जिन्नस शोधून आणून देत होते. आणखी एकजण येणारे जिन्नस तपासत होता. एकजण खुर्चीवर नुसता बसून होता. मी हातातली दोन बिल त्याच्यासमोर सरकवली. अवाक्षर न बोलता त्यान दुसऱ्या दोघांकडे बोट दाखवलं. आता माझ्यात वाद घालायचं देखील त्राण उरलं नव्हतं. मी निमूटपणे माझ्यावर कृपादृष्टी पडायची वाट बघू लागलो. एवढ्यात माझ्या नंतर आलेल्या एका सुंदरी कडून त्या दादाने बिल घेतलं. आणि माझ्यात वाद घालायचा नवा उत्साह संचारला.
“मै पैले आया, पैले मेरा बिल ले लो.”
“आपका दो बिल है. दुसरा आदमी आपका बिल लेगा. मै सिर्फ एक बिल देखता है.”
“और किसिका दो से जादा बिल होगा तो?” मलाही कंडू कमी नाही.
त्यानं खुर्चीवर बसलेल्याकडे बोट दाखवलं. प्रोसेस! मग मी तो दो बिल वाला मोकळा व्हायची वाट बघत निमूट उभा राहिलो.
यथावकाश माझा नंबर लागला. माझे सगळे जिन्नस माझ्या ताब्यात आले. दो बिल वाल्याने मला “येक्ष्ट्रा ब्याग्ज” पण दिल्या. आणि जखमेवर मीठ चोळायला मला म्हणाला,
“सर! प्लीज व्हिजीट अगेन!”
===============================================================================
घरी आल्यावर साडी बघून मातोश्रींनी साडी बघून अपेक्षेप्रमाणे संतोष व्यक्त केला. सौंनी, तिच्या मातोश्रीन्साठीची साडी बघून (अपेक्षेप्रमाणे) असंतोष व्यक्त केला. “तुझा चॉईस अगदी बंडल आहे!” इति सौ.
“ते पाच वर्षांपूर्वीच सिद्ध झालंय!” विजयी स्वरात मी.
पण हा टोमणा कळायला एक किमान बौद्धिक कुवत लागत असल्याने, माझा बाउन्सर तिच्या डोक्यावरून वाईड!
===============================================================================
दीपावलीच्या शुभेच्छा!
💬 प्रतिसाद
(92)
M
mayu4u
Wed, 10/18/2017 - 10:52
नवीन
माझ्यासारखे!
- Log in or register to post comments
प
पिंट्याराव
Wed, 10/18/2017 - 12:53
नवीन
तुमच्या समाधानासाठी क्षणभर असे समजूया की, चितळे माहीत नाही असे लोक अस्तित्वातच नसतात.
तरी वरच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे, चितळे माहीत असणाऱ्यांसाठी तरी लेखाच्या शिर्षकाने निराशा केलीय असं वाटतं का?
- Log in or register to post comments
व
वकील साहेब
Wed, 10/18/2017 - 10:04
नवीन
छान लिहिता राव तुम्ही. वाचायला मज्जा येते. पू ले शू
- Log in or register to post comments
प
परिंदा
Wed, 10/18/2017 - 14:10
नवीन
मस्त खुसखुशीत लेख आहे. आवडला.
तस्सा चितळ्यांच्या दुकानात मलादेखील कधीच वाईट अनुभव नाही आला.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 10/18/2017 - 17:12
नवीन
सिरविसद्धा बरा आहे॥
जळगावचा काजुंशी काय संबंध आहे?
- Log in or register to post comments
P
palambar
Wed, 10/18/2017 - 18:01
नवीन
छान लेख , ते दुकान सरकारि
असणार ,
- Log in or register to post comments
P
palambar
Wed, 10/18/2017 - 18:03
नवीन
मराठि लिहितांना दम्छाक होते आहे, काय करावे?
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Wed, 10/18/2017 - 18:15
नवीन
=))))))
मजा आली!!!
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 10/18/2017 - 18:17
नवीन
=))))))
लैच मजा आली!!!
- Log in or register to post comments
स
सोमनाथ खांदवे
Wed, 10/18/2017 - 18:22
नवीन
" पिलावूल्कंडी तेरेपारम्पील उषा! " चा खरा उच्चार ' पिलावूलाकंदी थ्येक्कपरामबिल उषा हाये ,पायजे तर गूगल भावू ला इचारुन बगा . याचा याकुरेट शार्टफाम पी टी उषा बर्का , आनी उगीचच कशापाई चितळ्या ना बदनाम कर्ता ओ ?. मारवाड्या च्या श्वीट शेंटर मदिल डुप्लीकेट खव्या च्या मिठाया खान्या परिस खड़ूस चितळ्या च्या वरिजनल टेस्टी मिठाया लैच भारी .
- Log in or register to post comments
क
कविता१९७८
Wed, 10/18/2017 - 18:51
नवीन
साडीच्या मोठ्या दुकानांची प्रोसेस अशीच असते. चेन्नईमधल्या आठ मजली कल्याण सिल्क सारीज , प्रत्येक मजल्यावरचे बिलिंग त्याच मजल्यावर पण सामान पहिल्या मजल्यावर किंवा तळमजल्यावर मिळणार, आधी सर्व खरेदि करुन बिलिंग करुन घ्यायचे व नंतर सगळे सामान एकत्र ताब्यात घ्यायचे. यात माजोरडेपणा नाहीये पण जास्त मजले असलेले विस्तीर्ण दुकान व्यवस्थित सांभाळायला असा खटाटोप करावा लागतो.
- Log in or register to post comments
M
mayu4u
Wed, 10/18/2017 - 19:00
नवीन
फ्लिपकार्ट ने मार्केट रिसर्च व्यवस्थित केलेला लक्षात येतो :)
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 10/19/2017 - 14:07
नवीन
अगदी सहमत आहे. लेखकाने परराज्यात जाऊन तेथील स्पेशल समजल्या जाणार्या गोष्टींची खरेदी केलिये मात्र त्यांची प्रॉसेस फॉलो करायला नापसंती दर्शवलिये हे जरा खटकले. नुसती गंमत म्हणून वाचायला चांगले आहे पण चितळ्यांकडील गोष्तींशी केलेली तुलना कळली नाही. त्यांच्या दुकानाची ती तर्हा आहे. फसवाफसवी करून गेलेले लोक, बिलींग काऊंटरला बदलल्या जाणार्या वस्तू असे अनुभव त्यांना आले असतील व त्यावर काढलेला मार्ग आहे. आपली लोकसंख्या इतकी आहे की कस्टमरचा विचार सध्या बाजूला ठेवला तरी गर्दी होणार अशी परिस्थिती आहे. त्यातूनही अमक्या गावात तमक्या ठिकाणी साड्यांच्या दुकानात फलाणा पद्धतीने खरेदी केल्यास अजिबात गर्दी होत नाही, गडबड उडत नाही असे उदाहरण असल्यास तिथे जावे, पण आपल्यालाही स्पेशल खरेदी करायची असते तर असे होणे अपरिहार्य आहे. त्याची कटकट होणार हेही मान्य आहे पण त्यांची तक्रार करण्यासाठी आणखी तिसर्याचेच उदाहरण म्हणून नाव वापरणे खटकले. खादी ग्रामोद्योहाच्या दुकानात फारशी गर्दी नसावी. तेथून खरेदी करावी. ;)
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 10/19/2017 - 15:02
नवीन
खादी ग्रामोद्योहाच्या दुकानात फारशी गर्दी नसावी. तेथून खरेदी करावी. ;) >> असते,असते! खादी फ्याशन वाक्य आहे!
- Log in or register to post comments
M
mayu4u
Fri, 10/20/2017 - 17:31
नवीन
शिवाय, सौन्चा आदेश मैसूर सिल्क चा असल्याने....
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 10/18/2017 - 19:08
नवीन
हहपुवा.
- Log in or register to post comments
अ
अनामिक
गुरुवार, 10/19/2017 - 07:54
नवीन
चितळेच्या मिठाया फार बेक्कार असतात. जव़ळ जवळ सगळ्याच मिठाया सुकलेल्या कडक वाटाव्या अश्या. खाताना पाणी प्यायल्याशिवाय गिळत नाहीत. काजुकतलीचेही तसेच... सुकलेली.
मिठायांना नरम पणा नसतोच. काजुकतली मधे वेलची फक्तं आणि फक्तं चितळेच घालत असावेत.
चितळेच्या मिठाईच्या वाट्याला न गेलेलेच बरे.
बाकरवडीला मात्र तोड नाही.
- Log in or register to post comments
म
मारवा
गुरुवार, 10/19/2017 - 08:34
नवीन
चितळे बंधु च्या मिठाई मध्ये व्हरायटी तरी आहे का ?
कुठलाही कराची वा घसीटा च्या इतकी बेसीक रेंज तरी आहे का ?
बंगाली मिठाई च्या रेंज ची गोष्ट बाजुला ठेवा
एक बरापैकी गवळी आहे चितळे दुधात प्युरीटी असते भेसळ वगैरे नाही दही तुप वगैरे ठीक हे
पण जो एक जातिंवंत जसा बंगाली मिठाई वाला असतो कराची वाला असतो तसा चितळे कडे काय आहे ?
बाकरवडी चा कुरकुरीत पणा ठीक है
पण मिठाई त ते डिंकाचे लाडु वगैरे किती बकवास आयटेम आहेत
ते डिंकाचे लाडु मिठाई म्हणून खायचे हा मिठाई चा अपमान च नव्हे का ?
- Log in or register to post comments
अ
अनामिक
गुरुवार, 10/19/2017 - 09:11
नवीन
ते डिंकाचे लाडु मिठाई म्हणून खायचे हा मिठाई चा अपमान च नव्हे का ?
अगदी बरोबर. आणि डिंकाचे लाडु सुका मेवा कमी आणि खोबरं जास्तं घालून केलेले असतात.
शुद्धं तुपातले म्हणून लाडू, बालुशाही ह्यांना वनस्पती तुपाचा वास असतो.
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 10/19/2017 - 13:21
नवीन
खोबरंवाले डिंकलाडू ( कोपरावाळा गुंदरना लाडवा) गुजराथी प्रकार आहे. तेल काढलेलं खोबरं उर्फ डिसिकेटिड कोकोनट वापरतात.
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 10/19/2017 - 13:58
नवीन
महाराष्ट्रीय मिठाया किंवा गोडातले पदार्थ कोणते असतात यावर एकदा चर्चा करुयात.
बंगाली असो किंवा दुसरी कोणतीही मिठाई महाराष्ट्रातले, तेही पुण्यातले चितळे का ठेवतील? (ठेवायची असली तर ठेवतील पण न ठेवल्यास चुकीचे ठरणार नाही)
महाराष्ट्रीय श्रीखंड हे गुजराथी श्रीखंडापेक्षा वेगळं असतं. महाराष्ट्रातही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं बनत असतं. त्यावरून माझी गुज्जु मैत्रिण आपल्याकडील श्रीखंडाला श्रीखंड मानायलाच तयार नाहीये. मग आता काय करायचे?
आता नोकरदार मंडळींची आवक जावक पुण्यात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढल्याने त्यांना आपल्या गावची आठवण येते व ते चितळ्यांकडी (किंवा काका हलवाईकडील, घोडक्यांकडील) पदार्थ वेगळे आहेत म्हणण्यापेक्षा वाईट आहेत म्हणतात. मला आताशा चितळ्यांकडील मिठाई, बाकरवडी वगैरे फारशी आवडत नाही पण दुसरीकडे आवडेल अशी मिळतही नाही. त्यातल्यात्यात काका हलवाईकडील आंबा बर्फी चितळ्यांपेक्षा मऊ आहे. पदार्थ टिकणे न टिकणे, त्यातून दुधापासून बनलेले हे गणित वेगळे आहे. बदलत जाणारी टेंपरेचरे (आठवा, पूर्वी दिवाळी आतासारखी खोडी पुढे मागे आली तरी पहाटे भरपूर थंडी असायची, आता नसते) पाहता त्यांनाही मिठाई ड्राय करावी लागत असेल का हा विचार करतिये. ड्राय आंबा बर्फी मलाही आवडत नाही पण पूर्वी अशी नव्हती हेही माहितिये.
जे कोणी अमक्या गावात असं नि तसं म्हणतायत, तिथे असेच परगावचे नोकरदारांचे लोंढे भविष्यात घिरट्या घालू लागले की सामाजिक जीवनावर चांगला, वाईट परिणाम झालेला दिसेल. जे आत्ता तिथे आहे ते टिकेलच असेही सांगता येत नाही.
पूर्वी दिवाळी किंवा सणावाराचे पदार्थ घरी करण्यावर भर असे. अशात हलवायांकडील जिन्नस किती खपणार? विकत आणणे हे शरमेचे समजले जाई. आता आम्हाला फराळ विकत आणायला काही वाटत नाही. बदल असणारच! डिंकाचे लाडू चितळ्यांचे खाऊन पाहिले नाहीत पण ते कसे दिसतात हे पाहिले आहे. आवडतील असे वाटत नाही. डिंकाचे लाडू हे बाळंतिणीसाठी किंवा थंडीत खायला म्हणून केले जातात. ते घरचे असावेत असा बेसिक नियम आहे. ज्यांना जमतच नाही अश्यांसाठी पर्याय नाही. आपल्याला करायला जमत नाही आणि हवे तर आहे, मग जे उपलब्ध आहे ते घ्यावे (मी घरी करते).
डिंकाचे लाडू ही मिठाई आहे की नाही हे तपासायला हवे. रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू या मिठाया आहेत का?
- Log in or register to post comments
अ
अनामिक
गुरुवार, 10/19/2017 - 14:45
नवीन
बदलत जाणारी टेंपरेचरे (आठवा, पूर्वी दिवाळी आतासारखी खोडी पुढे मागे आली तरी पहाटे भरपूर थंडी असायची, आता नसते) पाहता त्यांनाही मिठाई ड्राय करावी लागत असेल का हा विचार करतिये.
त्यांची गणितं तेच जाणोत. पण बदलत जाणारी टेंपरेचरे हे कारण नसावं, तसं असतं तर नागपुरात हल्दीराम, हैद्राबादमधे दादूज किंवा स्वीट बास्केट ह्यांनीही तेच केलं असतं. वेगळ्याला वाईट म्हणत नाहिये तर जे वाईट आहे त्यालाच म्हणतोय. चितळेंचा साधा पेढा हा सुद्धा ड्राय असतो, १-२ दिवस उन्हात वाळत ठेवला की काय असं वाटण्या एवढा. तरी लोकांना तो आवडत असेल तर धन्य आहे. पण एकदा नाव झालं की काहीही खपतं ह्याचं चितळे एक उदाहरण म्हणता येईल.
मला पुण्यात आवडेल असं मिठाईचं दुकान मिळालं नाही अजून. त्यातल्या त्यात मगरपट्ट्यात एक दुकान आहे जिथे आताशा काजुकतली, मलई पेढा आणि रस मलई चांगली मिळू लागली आहे. बेस्ट मोतीचुर लाडू पुण्यात कुठेही मिळाले नाहीत.
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 10/19/2017 - 16:57
नवीन
नाव झालं की काहीही खपतं हे तर सगळीकडेच असतं. अनेक उदाहरणे मीही सांगू शकीन. जौ द्या! उगीच साड्यांच्या दुकानाच्या धाग्यावर नको. वेगळा धागा काढूयात की!
- Log in or register to post comments
म
मारवा
गुरुवार, 10/19/2017 - 18:58
नवीन
इतक नाव नाही मला अचुक सांगता येणार नाही पत्ता
पण पान मिठाई खाल्ली तर त्याची चव अजुन जिभेवर आहे.
किती सुंदर क्रिएटीव्ह मिठाई बनवतात पानाचा आणी मिठाईचा स्वाद एकत्र संतुलन न बिघडवता.
चितळेंकडे असल्या मिठाया मिळत नाहीत बहुधा माझ्या माहीतीप्रमाणे
आणि हो चितळ्यांनी बरे केले उगाच महाराष्ट्रीयन मिठाईच विकेल असा बाणेदारपणा दाखवला नाही
या भानगडीत पडले असते तर काय झाले असते
सर्वात स्टार आयटेम बाकरवडी देखील महाराष्ट्रीयन नाहीच तो गुजराती आहे
चितळेंनी कसा कॉपी पेस्ट केला किती चांगली कॉपी केली वगैरे स्टोर्या ही डिंकाच्या लाडवाच्या चिवट पणा ने सांगितल्या जाताअत
बंगाल्याने म्हटले मेरे पास रसगुल्ला है मिष्टी है मारवाड्याने म्हटले मेरे पास घेवर है फिणी है
तर चितळे काय म्हणाले असते बाणेदार पणे
मेरे पास श्रीखंड है मेरे पास डिंक के लाडु है ?
- Log in or register to post comments
म
मोदक
गुरुवार, 10/19/2017 - 19:09
नवीन
ते mayu4u पुढच्या भेटीत काजूकतलीचे बॉक्स फेकून मारतील आता.. :))
- Log in or register to post comments
M
mayu4u
Fri, 10/20/2017 - 05:47
नवीन
...तर चालतील ना तुम्हाला? :D
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
गुरुवार, 10/19/2017 - 12:54
नवीन
दुकानातल्या माणसांची उत्तरे माजोरडी वाटली नाहीत. "सर" म्हणणे आदरार्थी आहे.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
गुरुवार, 10/19/2017 - 15:58
नवीन
मस्त लेख. मजा आली.
लुंगी खरेदी आठवली...
- Log in or register to post comments
ग
गवि
Fri, 10/20/2017 - 07:32
नवीन
विनोदी लेख असला म्हणून काय झालं ? चितळे आणि पुणे यांचा उल्लेख आला की विनोदाला उताणा पाडून चिकित्सा होणारच. नाहीतर पुण्याला पुणे कसं म्हणणार? ;-)
धागा खुसखुशीत छान.
खुद्द याच दुकानात खरेदी केलेली असल्याने संपूर्ण वर्णन भिडलं.
- Log in or register to post comments
न
नाखु
Fri, 10/20/2017 - 07:56
नवीन
मुळ उद्देश तोच आहे, साडी खरेदी उगी आपलं तोंडीलावणे
नेमस्त नाखु
- Log in or register to post comments
M
mayu4u
Fri, 10/20/2017 - 17:21
नवीन
फक्त ते नेमस्त वगैरे काही पटलं नै ब्वा!
- Log in or register to post comments
व
विखि
Fri, 10/20/2017 - 14:56
नवीन
पुणेकर असुन देखील चितळे बंधु मध्ये जाण्याचा योग आला न्हवता आणि एक दिवस आला तो असा.
गुढीपाडवा होता. आदल्या दिवशी गोड काय आणायचं त्यावर छोटेखानी चर्चा झाली. बासुंदी आपली एकदम फेवरेट म्हनुन मी तिकडं जोर देऊ लागलो.
''इतकी वर्ष पुण्यात राह्तोय आणी चितळेचं तोंड पण नाय पाहीलं'' असला कायतरी फालतु युक्तिवाद करुन मी चितळे यान्ची 'बासुंदी' चा निर्णय पास करुन घेतला. तरी आई म्हनाली, ''कुठं जातो तिकडं बोम्बलत, आपल्या घरापशी एवढ्या डेर्या आहेत, तिथुनच कायतरी आन'' तसं मी 'इतर डेर्या आणि चितळे बंधु' हा फरक स्पष्ट करुन टाकला, आणि बहुमत मिळवलं व विजयी मुद्रेत वावरु लागलो.
झालं , गुढीपाडवा चा दिवस उजाडला, तसं मला 'चितळे बासुंदी' चे वेध लागु लागले त्या प्रमाणे मी मार्गस्थ झालो. राहायला कोथरुडला, तरी अधले मधले २/३ चितळे सोडुन, 'कोर चितळे' म्हणुन विश्रामबाग वाड्याच्या चितळे मध्ये जोशात वेन्ट्री केली. दुकान एकदम झाकपाक होतं, तुडुंब गर्दी होती. योग्य ठिकाणी आल्याचा भास होऊ लागला. गेल्या गेल्या हातामध्ये बशी च्या आकारा एव्ढं टोकन ठेवण्यात आलं, म्हणलं 'वा काय शिश्टीम आहे काय नियोजन आहे' माझ्या निर्णयाचा मला गर्व होऊ लागला.
माझा नंबर आला, तसं मी फुल चॉन्फीडन्स मध्ये ऑर्डर दिली '१ किलो बासुंदी द्या' तसा पलीकडुन प्रतीसाद आला ''द्या डबा'' , एकदम बाऊंसर आला ना,
मी विचारलं 'कसला डब्बा?' पलीकडुन ''बासुंदीसाठी'' परत मी '' डब्बा नाहीये, '' परत पलीकडुन '' डबा असेल तरच बासुंदी मिळेल''
मी '' बॅग मध्ये द्या की'' पलीकडुन ''बॅग मध्ये नाही देत'' " अहो, आत्ताच्या जमान्यात हे डब्बा वगेरे जरा जास्त नाय वाटत का तुम्हाला?पॅके़जिन्ग मध्ये एव्ढ्या सुधारणा होतायत आणि तुम्ही कुठं आम्हाला बासुंदी साठी डब्बा आणायला सांगताय '' जरा वैतागुनच बोललो, तसा पलिकडचा इसम माझाकडं अजुन खऊन बघु लागला आणि परत त्याची डब्ब्याची कॅसेट टाकली. ईडन गार्डन वर प्लॅश्टिक बॉल ची मॅच चालल्यागत वाटु लागलं, ती पण अंडरआर्म. मला आता जरा अती झाल्या सारखं वाटत होतं, चितळे बंधु ना रामराम ठोकला तो शेवटचाच. पुण्याचा स्वाभिमान अजुन काय :)
जाताना आमच्या जवळच्या अमराळे डेअरी मध्ये गेलो, बासुंदीची ऑर्डर दिली सोबत डबा नाहीये हे आधीच सांगीतले, तेव्हा ते पोरगं म्हनालं ''डब्बा? तो कशाला पाहीजे? देतो कि पॅक करुन मी''
काल दिवाळी साठी या डेअरी मधुनच बासुंदी आणली होती. चितळे माहीत नाही, पण ही बासुंदी जाम आवडली :)
- Log in or register to post comments
M
mayu4u
Fri, 10/20/2017 - 17:20
नवीन
पण याला माजोरडेपणा नाही म्हणायचं बर्का! शिस्त किंवा बाणेदारपणा म्हणत असावेत पुण्याकडे. आमच्या मुंबईत याला "चु" ने सुरु होणारा एक शब्द वापरतात.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Sun, 10/22/2017 - 07:42
नवीन
थोडक्यात काय की पुणे वि. मुंबई असा विषय आहे!
- Log in or register to post comments
M
mayu4u
Mon, 10/23/2017 - 07:41
नवीन
... वर काही पुणेकरांनी सुरु केला आहे. :D
- Log in or register to post comments
M
mayu4u
Mon, 10/23/2017 - 07:42
नवीन
सुट्टीनंतर पुन्हा कामाला लागण्यासाठी शुभेच्छा!
- Log in or register to post comments
श
शित्रेउमेश
Tue, 10/24/2017 - 04:39
नवीन
झकास...
~इनस्विंगिंग यॉर्कर. क्लीन बोल्ड. जमिनीवर पडलेला माझा चेहरा उचलून घेत मी फर्स्ट फ्लोर कडे~
खूप हसलो
- Log in or register to post comments
उ
उपेक्षित
Tue, 10/24/2017 - 09:56
नवीन
चांगली मिठाई सध्या मला सिंहगड रोडवरील जोशी स्वीट्स मध्ये मिळते रांका ज्वेलर्स समोर.
बाकी चितळे कडे पुर्वी लहान असताना जायचो पण गेल्या कित्येक वर्षात हिम्मत केलेली नाहीये जायची :)
जोशी स्वीट्स मध्ये मस्त व fresh माल असतो तेथील sandwich ढोकळा आणि साधा ढोकळा पण खास असतो.
- Log in or register to post comments
अ
अभिदेश
Tue, 10/24/2017 - 21:59
नवीन
पण चितळेंच नाव टाकला नसतं तर एवढा टी.आर.पी. मिळाला नसता.
- Log in or register to post comments
द
दिपस्तंभ
गुरुवार, 10/26/2017 - 23:35
नवीन
- Log in or register to post comments
द
दिपस्तंभ
गुरुवार, 10/26/2017 - 23:35
नवीन
लेख वाचुन चितळेंचे पदार्थ खुणावत आहेत... उदयाला खरेदी
- Log in or register to post comments
च
चामुंडराय
Mon, 10/30/2017 - 01:13
नवीन
चितळेंचा उल्लेख असल्याने धागा नव्वदी नंतर बंद होईल अशी काही शक्यता आहे का?
ह्या धाग्याचा नर्व्हस नाईंटी फेम चेतन चौहान होतोय. थोडा धक्का दिला तर शंभरी सहज पार करेल.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2