लेखकाची थेट भेट !
समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्वविकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव मनाला जखम करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात. त्यांना विस्मृतीत ढकलणे हे तसे अवघड काम असते. आपण तसा कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्या आठवणी अधूनमधून उफाळून येतात.
साहित्याच्या प्रांतात लेखक व वाचक हे दोन परस्परावलंबी घटक आहेत. चांगला लेखक वाचकांना रिझवतो तर वाचक त्यांच्या प्रतिसादांतून त्या लेखकाला सुखावतात. एकप्रकारे लेखक आणि वाचक हे एकमेकाला घडवतात. लेखक हा एक कलाकार असतो पण वाचकाच्या दृष्टीने तो ‘पडद्यामागचा कलाकार’ असतो. एखाद्या चोखंदळ वाचकाला जर काही निमित्ताने लेखकाची भेट घडली तर त्याच्या दृष्टीने तो अविस्मरणीय प्रसंग असतो. पण अशा भेटीचे लेखकाच्या दृष्टीने काय मोल असते, कोण जाणे?
असो, आता प्रास्ताविक आवरतो आणि सुरू करतो माझ्या याबाबतीतल्या एका अनुभवकथनाला......
........
एका शहरातील प्रसिद्ध सभागृहात एक कलाविषयक वस्तूंचे प्रदर्शन भरले होते. वृत्तपत्रात त्याची बातमी वाचली आणि उत्सुकतेने ते बघायला गेलो. प्रदर्शन सुंदर होते. एकून सहा विभागांत ते मांडले होते. प्रत्येक विभागात संबंधित कलाकार उपस्थित होते. तेथील एका विभागाने माझे लक्ष वेधून घेतले. याचे कारण म्हणजे तेथे बसलेले कलाकार हे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. त्या गृहस्थांना एका कलेत गती आहे आणि ते एक प्रसिद्ध लेखकही आहेत. त्यांच्या लेखनाचा मी तरुणपणी चाहता होतो. याखेरीज ते लेखक विविध व्यासपीठांवरून भाषणे करीत असतात. तसेच अधूनमधून त्यांच्या जाहीर मुलाखती होत असतात. त्यातून त्यांनी सांगितलेले स्वतःच्या साधी राहणी आणि कमी खर्चाची जीवनशैली याबद्दलचे अनुभव खरेच चांगले असतात. त्यांच्या अशा काही चांगल्या सवयींचे मी अनुकरण करत असतो. एक ज्येष्ठ लेखक म्हणून मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो.
आता या प्रदर्शनात त्यांना पाहिल्यावर क्षणभर मी आनंदलो. हे लेखक माझ्याच कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. अर्थात आम्हा दोघांच्या वयात बरेच अंतर असल्याने आमच्या शिक्षणाचा काळ वेगवेगळा होता. तेव्हा मनात म्हटले, चला आज त्यांना भेटून त्यांची ओळख करून घेता येईल. त्यांना चांगले ओळखणारे दोघे जण माझेही मित्र आहेत. त्यांपैकी एकाचे नाव त्यांना सांगायचे मी मनात पक्के केले.
प्रदर्शनास फारशी गर्दी नव्हती. ते लेखकही त्यांच्या विभागात शांतपणे बसून होते. म्हणून मी त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांना अभिवादन केले. मग माझे नाव सांगून आम्ही दोघे एकाच कॉलेजचे माजी विद्यार्थी असल्याचे सांगितले. त्यावर ते फक्त ‘हूं’ म्हणाले. मग मी त्यांना आमच्या समान मित्राची ओळख सांगितली. त्यावर ते पुन्हा एकदा पण अस्पष्ट आवाजात ‘हूं’ म्हणाले. स्वतःची मान हलवण्याचीही तसदी त्यांनी घेतली नाही. आता माझी अपेक्षा होती, की ते थोडा संवाद करतील. निदान, ‘बरं, तुम्ही काय करता आता’ एवढे तरी मला विचारतील. पण छे! ते निर्विकारपणे त्यांच्या हातातील एका माहितीपत्रकाकडे बघत बसले.
मी दोन मिनिटे तेथे रेंगाळलो. त्यांच्या कलाकृतींवर एक नजर टाकली अन तेथून सटकलो. एव्हाना त्यांना माझ्याशी संवाद करण्यात बिलकूल रस नव्हता, हे स्पष्ट झाले होते. अधिक काही मीहून बोलणे आता वेडेपणाचे ठरले असते. कोणतीही दोन माणसे जेव्हा एकमेकांना भेटतात आणि ओळख करू पाहतात, तेव्हा त्यातील प्रत्येकाने दुसऱ्याला ‘आपण काय करता’ एवढे माफक विचारावे, हा शिष्टाचार आहे. त्यामुळे माझी काही त्यांच्याकडून ‘फार मोठी’ अपेक्षा होती, असे मला वाटत नाही. त्यांनी माझ्याशी किमान दोन वाक्यांचा संवाद केला असता तर मलाही त्यांच्या कलेसंबंधी अधिक जाणून घ्यायची इच्छा होती. उगाचच हवापाण्याच्या गप्पा मारण्याचा माझा इरादा नक्कीच नव्हता.
खरे म्हणजे अशा वलयांकित व्यक्तींच्या जवळपास फिरकायचा माझा स्वभाव नाही. याचे कारण असे, की बहुसंख्य गाजलेले लेखक, कलाकार, खेळाडू इत्यादी मंडळी ही आत्मकेंद्री असतात, असा सर्वसाधारण अनुभव आहे. ही मंडळी जेव्हा सार्वजनिक ठिकाणी वावरतात, तेव्हा त्यांच्या भोवती बऱ्याचदा खुशमस्कऱ्यांचा गराडा असतो. या सगळ्याचा मला अगदी तिटकारा आहे. पण या वेळेस मी सपशेल चूक केली आणि पस्तावलो. त्याबद्दल नंतर मनातल्या मनात माझ्यावरच रागावलो.
वास्तविक अशी मंडळी जनसामान्यांच्या प्रतिसादांमुळेच ‘मोठी’ झालेली असतात. पण, एकदा का ती वलयांकित झाली, की मग ‘मला पाहा आणि फुले वाहा’ अशी त्यांची प्रवृत्ती होते.
माझ्या वरील एका अनुभवावरून मी त्या लेखकाबद्दल कुठलाही निष्कर्ष काढू इच्छित नाही. माझ्या मनातील त्यांच्याबद्दलचा आदर कायम आहे. तरीपण मला जे खटकले ते मी मोकळेपणाने लिहीले आहे.
लेखकांच्या संदर्भात मी पूर्वी प्रसिद्ध अमेरिकी लेखक Robert Persig यांचे एक अवतरण वाचले होते. ते असे आहे, “The best place to meet an author is on the pages of his book. Anywhere else is a disappointment”.
या अनुभवाच्या निमित्ताने मला हे वाक्य मनापासून पटले. लेखकांबद्दल खुद्द एका लेखकानेच मांडलेले हे मत किती मार्मिक आहे!
…. तर असा होता माझ्या आयुष्यातील प्रत्यक्ष लेखक-भेटीचा एकमेव अनुभव. तशी आतापर्यंत काही प्रसिद्ध लेखकांशी पत्रभेट झालेली आहे आणि ती नक्कीच आनंददायी होती. एकांनी तर मला पत्रोत्तराबरोबर त्यांचे एक पुस्तकही भेट पाठवले होते.
आपल्यातील ज्यांना कुठल्याही वलयांकित व्यक्तीच्या प्रत्यक्ष भेटीचा अनुभव असेल तर त्याबद्दल जाणून घेण्यास मी उत्सुक आहे. असा अनुभव गोड वा कडू असणे हे व्यक्तीनुसार अवलंबून आहे. तर मग जरूर लिहा. धन्यवाद.
******************
💬 प्रतिसाद
(51)
ग
गामा पैलवान
Sun, 10/15/2017 - 16:25
नवीन
उदय,
बऱ्याचदा अशी माणसे मराठीपणाच्या न्यूनगंडाने पछाडलेली असतात. पूर्वेतिहासाची कसलीशी असुरक्षितता वाटंत असते.
अगदी घरकुळाचा पत्ता नसलेलं अनौरस अपत्यसुद्धा आत्मसन्मान असेल तर आपला इतिहास दडवून ठेवंत नसतं. मग अतिप्रसिद्ध व्यक्तींना कसली अडचण आहे?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2