एक उनाड दिवस..
एगरकिंगनच्या फॅक्टरीमध्ये दिनेशची व्हिजिट होती. तो गाडीने जाणार हे ठरल्यावर मीही त्याच्याबरोबर जायचं ठरवलं. ए ५वरून आमची गाडी बासेलच्या दिशेने पळू लागली. कार्ल्सरुह मागे पडलं, आता स्ट्रासबुर्गकडे जाणारा रस्ता दिसू लागला. ए५ वरूनच पुढे जात फ्रायबुर्ग ओलांडून आम्ही बासेलकडे कूच केलं. मध्येच एकदा आमच्या आणि गाडीच्या टाक्या भरल्या. जरी ही काही माझी पहिली स्विस ट्रिप नव्हती, तरीही तिकडे जायचं असलं की वेगळाच उत्साह मनात असतो. त्यातून अनवट ठिकाणी जायचं असलं की बघायलाच नको.. बासेल क्रॉस करून आम्ही स्विसमध्ये प्रवेशलो आणि एगरकिंगनच्या वाटेला लागलो. दोबाजूला डोंगर, त्यावर चरणार्या गाई, त्यांच्या गळ्यातल्या घंटांची किणकिण.. "इथे फॅक्टरी आहे? इतक्या सुंदर खेड्यात?" माझ्या प्रश्नाला "हो" उत्तर देताना दिनेश म्हणाला, "तिकडे बघ डावीकडे.." उजवीकडे डोंगर ठेवून डाव्या बाजूच्या दरीत खोल पाहिलं, तर टुमदार गाव खाली वसलं होतं. कौलारू लहान घरं आणि एखाद्याच चर्चचा उंच कळस दिसत होता.एक वळण घेऊन पुढे गेल्यावर चित्र आणखीनच स्पष्ट दिसायला लागलं.
एगरकिंगन, ते चिमुकलं गाव आता अगदी समोर आलं होतं. एका बाजूला डोंगरांच्या माळा आणि समोरच्या दरीतच खाली उतरून आमचं हॉटेल होतं. हॉटेल फक्त दुमजली. तळमजल्यावर चारी बाजूंनी खोल्या आणि मधल्या चौकात मोठ्ठं हिरवळीचं अंगण. प्रत्येक खोलीचं दार त्या अंंगणात उघडत होतं आणि दाराबाहेरच बागेत बसायच्या खुर्च्या, टेबलही .. वरच्या मजल्यावरच्या खोल्यांना मोठा वर्हांडा होता, जो ह्याच हिरवळीच्या चौकात उघडत होता. दिल बाग बाग व्हायला त्या बागेतच गेलं एकदम.. त्या अंगणात खुर्च्या टाकून मस्त गाणी ऐकत संध्याकाळ सरली.दुसर्या दिवशी दिनेशची फॅक्टरी व्हिजिट होती. ह्या, अशा सुंदर गावात रूक्ष कारखाना आहे हेच मुळी पटत नाही. पण मध्येच दिसणार्या चिमण्यातला निळसर धूर ते सत्य सांगतो.भरपेट न्याहारी करून दिनेश कामाला आणि मी भटकायला बाहेर पडले.
काल दुरून पाहिलं होतं, आज ह्या गावाला भेटायचं होतं. रिसेप्शनवरून नकाशा घेतला आणि चर्चच्या दिशेने चढू लागले. सगळं गाव मुळी डोंगरात आहे. सरळ रस्ता नाहीच, सारखेच चढ-उतार.. समोरच्या डोंगरावर चरणार्या गाई, त्यांच्या गळ्यातल्या घंटांचा किणकिणाट ऐकू येऊ लागला. युरोपातलं गाव म्हटलं की एक चर्च, एक नदी, तिच्यावरचा एक पूल, नाहीतर मग एखादं सरोवर, हिरवे डोंगर, डोंगरातली चिमुकली घरं असं दृश्य डोळ्यापुढे येतंच. हे गावही त्याला अपवाद नव्हतं. रस्ता ओलांडून समोरच्या टेकडीच्या दिशेने चालायला लागले. हातातला नकाशा डावी घेऊन समोर चढायला सांगत होता. पुढे गेले आणि चर्चचा कळस दिसायला लागला, पण तिथेच वळणावर थबकले. नुकताच पाऊस पडून गेला होता. हवेत ओलसर गारवा होता. पाऊस पडून हिरव्या गवतावरची रंगीत रानफुलं वार्यावर डोलत होती. तिथे किंचित रेंगाळून कॅमेर्याच्या चिमटीत तिथला निसर्ग पकडण्याचा प्रयत्न करून हातातला नकाशा आणि चर्चच्या कोपर्यावरच्या पाट्या ह्यांची सांगड घातली आणि सरळ थोडं चढायचं ठरवलं.
समोरच्या रस्त्याने सरळ वर चढत गेलं, तर इतकं सुंदर काही समोर येत होतं की मी चित्रकार असते, तर तिथेच एका कोपर्यात कॅनव्हास उभा केला असता आणि दिवसभर चित्रं काढत बसले असते. कॅमेर्यात किती बंदिस्त केलं, तरी काहीतरी उरत होतं, सुटत होतं.. हिरव्या गवतावरची फुलं, कुरणात चरणार्या गाई, त्यांच्या किणकिण घंटा आणि वातावरणातला पक्ष्यांचा किलबिलाट.. हे सगळं धावत्या गाडीतून नव्हे, तर हात लांब केला की स्पर्श होईल एवढ्याच अंतरावर होतं. एका दिव्याच्या खांबाला एका वेलीनं लपेटून घेतलं होतं आणि निवांत फुललीही होती. रेंगाळत टेकडी पायवाटेने चढत होते, तर मुलांचा किलबिलाट ऐकू आला. जरा कानोसा घेतला, तर चार-पाच मुलांचा घोळका पाठीवर दप्तर अडकवून शाळेत चालला होता. मुलं कसली? रंगीत फुलांच्या गुच्छालाच पाय फुटून तो चालला आहे, असं वाटत होतं. एका बैठ्या घराची बेल त्यांनी वाजवली, तर आतून एक गोडुला कोबीचा गड्डा लुटूलुटू आला आणि त्यांच्यात मिसळला. सगळे पुढे धावू लागले आणि माझी चाहूल लागून एकदम थबकले. त्या एवढ्याशा गावात ही कोण परकी बाई? असं परग्रहावरून आलेल्या व्यक्तीकडे बघावं तसं माझ्याकडे पाहू लागले. मी आपलं हसून त्यांना गुटन मॉर्गन करत "शुलं.?"म्हणजे शाळेत चाललेत का? असं विचारलं, तर माझ्या अभिवादनाला जेमतेम उत्तर देत धूम पळाली सगळी, अगदी कोबीच्या गड्ड्यासकट..

स्वतःशीच हसून तशीच थोडी पुढे गेले आणि डोळे विस्फारून पाहतच राहिले. मी बर्यापैकी वर आले होते. खालच्या झाडांचे शेंडे आता माझ्या आय लेव्हलला आले होते. सफरचंदं, प्लम्स, पेअर यांनी ती सगळी नुसती लदली होती. मी सहज हात पुढे केला, तर हाताला येतील अशी.. कोणाला विचारून एखादं अॅपल, एखादं प्लम तोडावं, असा विचार करत मी तिथल्या बांधावर बसले. बराच वेळ झाला, कोणीच दिसेना.. न राहवून मग मी मनाला येतील तेवढे प्लम्स आणि अॅपल्स तोडले, काही खाल्ले, उरलेले पाठीवरच्या पिशवीत टाकून पुढे जायला लागले. वाटेतल्या सुंदर सुंदर घरांचे, झाडापानाफुलांचे फोटो काढत सुटले. एका बैठ्या घराच्या समोर बेडूक राणीचा दोन-अडीच फुटाचा हिरवा पुतळा दिसला. मुकुटावर अगदी 'लारा' असं लिहिलं ही होतं. गंमतच वाटली. त्याचं इथे काय प्रयोजन असेल असा विचार करत पुढे गेले. एका तिठ्यावर एका घराच्या खिडक्या इतक्या सुंदर सजवल्या होत्या आणि चक्क खिडकीच्या बाहेरच्या जागेत एक पिटुकली सायकल, काही पक्षी मांडून ठेवले होते. सहज हाताला येतील असे! घराला कुंपण बिंपण काही नव्हतं. अगदी मोठ्या रस्त्यावर सहज हाताला येईल अशा त्या शोभेच्या, चिमुकल्या वस्तू इतक्या निरखून बघत आणि त्या तिथे टिकल्या कशा, याचं आश्चर्य बाळगत मी पुढे चालू लागले.
त्या सुंदर खिडकीच्या आणि तिच्यातल्या वस्तू बघण्याच्या नादात मी रस्ता चुकले. आता समोर फक्त झाडं, टेकडी, जंगल होतं. घरं खूपच मागे राहिली असावीत. माझ्या हातातला नकाशा आणि रस्त्यावरच्या खुणांच्या पाट्या ह्याचा आता मेळ बसेना. डोंगरात ढग उतरत होते आणि समोरची वाट धुक्यात हरवत चालली होती. धुकं वाढलं असतं तर रस्ता सापडणं आणखी अवघड झालं असतं. एव्हाना चालून, चढून तीन तासाच्या वर होऊन गेले होते. इतका वेळ ह्या चित्रासारख्या देखाव्यात मीच हरवून गेले होते, आता रस्ता हरवला होता.
एवढ्यात टोकाच्या घरापाशी गाडीचा प्रकाश दिसला आणि त्यातून कोणीतरी उतरलं. लगबगीने तिथे जाऊन पत्ता विचारला आणि पुढे चालू लागले. एक-दोन वळणं पार केल्यावर ओळखीच्या - म्हणजे आत्ताच ओळखीच्या झालेल्या खुणा दिसू लागल्या. हरवलेला रस्ता सापडल्याच्या आनंदात पावसाचे तुषार अंगावर घेतले. हळूहळू पाऊस वार्याचा झिम्मा सुरू झाला. गार, बोचरा वारा आणि पाऊस टोचू लागला. आता गरम गरम कॉफी आणि भजी मिळतील तर काय बहार येईल.. असा विचार मनात आला. पण त्या रानातल्या पायवाटेत असं काहीही मिळणार नव्हतं. पण पुढच्या वळणावरून खालच्या रस्त्यावर दूरवर दिवे दिसले आणि चक्क मॅकदादाही.. मस्त वाफाळती कॉफी घेतली आणि भज्यांची तल्लफ नगेट्सवर भागवली. एक कोपर्यातली खुर्ची पकडून ते पाऊसगाणं पाहत आणि ऐकत राहिले. किती वेळ तंद्री लागली कोण जाणे.. पाऊसवार्याचा खेळ संपला आणि लख्ख ऊन पडलं. मग मीही तिथून उठले आणि परत चालायला लागले. एव्हाना संध्याकाळ झाली होती. दिनेशचा फॅक्टरीतून निघाल्याचा फोन आला. माझा आजचा उनाड दिवस पावसात चिंब भिजून हिरव्या टेकड्यांवरच्या त्या पायवाटांत मस्त आनंदात उधळला होता.

खरंच असा उनाड दिवस अधूनमधून आयुष्यात यावा..येस अगदी. सुरेख लिहिलं आहेस स्वाती.